दीपक नागरगोजे यांनी `शांतिवन` प्रकल्प बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या परिसरात साकारला आहे. आमटे पिता-पुत्रांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘आनंदवना’च्या धर्तीवर ‘शांतिवना’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शांतिवना’तील विद्यार्थ्यांची दैनंदिन पाण्याची गरज पूर्ण व्हावी, भाजीपाला व अन्नधान्य यांचे उत्पादन घेऊन प्रकल्प आत्मनिर्भर व्हावा यासाठी शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवण्याचा प्रयोग अमलात आला आहे. त्यातून सुमारे पाच कोटी लिटर पाणी साठले जाते. ते त्यांना पावसाळ्यापर्यंत वापरता येते. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील ही `वॉटर बँक` वाळवंटातील ओअॅसिसच ठरावी! पुण्यातील SMASH कंपनीचे अध्वर्यू आणि सुराग ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत चितळे यांचे या वॉटर बँकेच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य लाभले आहे. अन्य संस्थांचे योगदानही आहेच.
दीपक नागरगोजे हे बीड जिल्ह्यातील चुंबळी येथील रहिवासी. ते अकरावीत शिकत असताना बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पावर आयोजित श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झाले (1995 ). दीपक नागरगोजे तेव्हापासून संपूर्ण बाबा आमटेमय झाले होते. त्यांनी शिक्षण सोडायचे, आयुष्यात नोकरी करायची नाही, सामाजिक कार्याला पूर्णवेळ वाहून घ्यायचे असा निर्धार केला. त्यांनी घरच्या रेट्यामुळे बारावी आणि डी.एड.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. नंतर शिक्षणाला रामराम ठोकला. दीपक नागरगोजे यांचा सामाजिक कार्यातील वाढता सहभाग थोपवण्यासाठी घरच्या मंडळींनी त्यांना लग्नाच्या बेडीत अडकावले. ते 2000 साली नात्यातीलच कावेरी यांच्याशी विवाहबद्ध झाले.
लग्नानंतर दोघे बाबा आमटे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ‘आनंदवना’त गेले. कावेरी याही तेथील सेवाभावी वातावरणामुळे भारावल्या गेल्या. त्यांनीही दीपक यांच्या खांद्याला खांदा लावून पूर्णवेळ सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा निर्धार केला आणि जेथे राघव तिथे सीता असा सिलसिला सुरू झाला!
नागरगोजे कुटुंबीयांची शेती बीड जिल्ह्यात आर्वी परिसरात आहे. दीपक यांनी स्वत:च्या हिश्श्याची शेती शांतिवन संस्थेला दान केली. `शांतिवना’ची` स्थापना 27 नोव्हेंबर 2001 ला झाली. ते परिसरातील ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचे आशास्थान आहे. त्याशिवाय विधवा, परित्यक्ता, आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि समाजातील अनाथ मुले ‘शांतिवना’त वास्तव्यास आहेत. त्यांची शाळा तेथेच भरते. ‘शांतिवन’ पंधरा वर्षांत विस्तारले.
`शांतिवन` ज्या बालाघाटाच्या परिसरात आहे तो परिसर सतत अवर्षणग्रस्त. तो नगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांच्या सीमेलगत येतो. गेल्या काही वर्षांत दीड इंच पाऊस झालेला. एका वर्षी तर पाऊस झालाच नाही. त्याआधी दोन-अडीच इंच याप्रमाणे पाऊस पडला आहे. ‘शांतिवन’ची धडपड 2001 पासून ते 2015 पर्यंत पाण्यासाठी तशीच चालू होती. पाण्यावर खर्च दरवर्षी चार ते पाच लाख रुपये होत! पावसाळयात टँकरने पाणी आणावे लागे! टँकरदेखील सहजासहजी मिळत नसे. एक टँकर भरण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये दोन विहिरींवर जावे लागे. दरम्यान, ‘शांतिवना’त मुलांची संख्या झपाट्याने वाढत होती. जलसंधारणाचे काम करायचे तर भूपृष्ठाखाली काही अंतरावर काळा पाषाण आहे. तो खडक पाणी झिरपण्यासाठी मोठा अडथळा ठरतो. त्यामुळे शेततळे किंवा धरण हा उपाय समोर दिसत होता. दीपक नागरगोजे, सुरेश जोशी, सुलभा जोशी, कावेरी नागरगोजे आणि शांतिवन संचालक मंडळ या सर्वांच्या चर्चेतून शेततळे बांधण्याची संकल्पना तयार झाली. ‘शांतिवन’ परिसरातून उथळा आणि सिंदफणा या नद्या वाहतात; तसेच, त्या नद्यांना येऊन मिळणारे दोन ओढेदेखील त्याच परिसरात आहेत. सिंदफणा नदी पुढे माजलगावजवळ गोदावरीला मिळते. दोन नद्या आणि दोन ओढे यांतील जलसंपदेचा उपयोग करून घेण्यासाठी विहिरी खोदणे आणि शेततळे बांधणे अधिक लाभदायी ठरणार होते.
प्रत्यक्ष कार्यवाही मे 2015 मध्ये सुरू झाली. उथळा नदी आणि त्या नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्याजवळ तीन विहिरी खोदण्यात आल्या. संस्थेची शेती त्या परिसरालगत आहे. त्या ठिकाणी 80 मीटर x 50 मीटर आणि 13 मीटर खोल या आकाराचा तलाव बांधण्यात आला. संपूर्ण तलावात पॉलिथिन कापड अंथरण्यात आले. ज्या ठिकाणी विहिरी खोदण्याचे ठरले ते शेत खाजगी मालकीचे होते. ते शेतच विकत घेण्यात आले. त्या ठिकाणी सुमारे नव्वद फूट खोली असलेल्या तीन विहिरी खोदण्यात आल्या. विहिरींचे व्यवस्थित बांधकाम करण्यात आले. त्याशिवाय एक जुनी विहीर होती. त्या चारही विहिरींपासून शेततळ्यापर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली. पुढे शेततळ्यापासून ‘शांतिवना’तील पाण्याच्या टाकीपर्यंत दुसरी पाईप लाईन टाकण्यात आली. एवढी सर्व तयारी मे 2015 मध्ये पूर्ण झाली. मात्र जून-जुलैमध्ये पाऊस झालाच नाही. ऑगस्टमध्ये गणपती उत्सवाच्या काळात जोरदार पाऊस झाला. त्या पावसामुळे मोहीम फत्ते झाली. तसेच काम सिंदफणा नदीलगतदेखील करण्यात आले आहे. नदीपात्रालगतच्या विहिरींची पातळी उंचावली. तेथून इलेक्ट्रिक मोटारीने शेततळे भरण्यास सुरुवात झाली. त्या माध्यमातून चाळीस फूट खोल असलेल्या शेततळ्यामध्ये अठ्ठावीस फूटापर्यंत पाणी साठते. पाच कोटी लिटर पाणी सध्या वॉटर बँकेत आहे.
‘शांतिवना’त भाजीपाल्यासाठी दर महिन्याला साधारण पंचवीस हजार रुपये खर्च येतो. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. शिवाय, शेततळ्यामध्ये सुपरनेस आणि कटला जातींचे मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. त्या माध्यमातून वर्षाला साधारण पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. ‘शांतिवन’ संस्थेची शेती आहे.
दीपक नागरगोजे, शांतिवन, बीड
संपर्क : 9923772694
– संजय झेंडे
मी अंधश्रद्धा निर्मूलन…
मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ऐक कार्यकर्ती आहे माझी इच्छा आहे तुमच्या शंतिवणात महिन्यातून एकदा लेक्चर घेण्याच तुमचा contact no Mikel Ka
Comments are closed.