शहाबाज हे रतनगडच्या पायथ्याशी वसलेले गाव, तेथील टेकडीच्या भोवताली वसलेले शहाबाज, कमळपाडा, धामणपाडा, चौकीचापाडा व घसवड हे पाच पाडे. गावात देवतांची अनेक मंदिरे आहेत, पण टेकडीच्या माथ्यावर दत्तमंदिर व मुरलीधराचे मंदिर आहे. त्या दत्तमंदिराचा म.सु. पाटील यांच्या ‘लांबा उगवे आगरी’ या आत्मचरित्रात हृद्य उल्लेख येतो. धरमतरचा पूल ओलांडला, की उजव्या बाजूस टेकडीवर दत्ताचे मंदिर दिसते व गाव आल्याची खूण पटते. आता, तो परिसर पार बदलून गेला आहे. शहाबाजला प्राथमिक शाळा १८६५ साली सुरू झाली! शाळेत सातवीचा वर्ग १८९९ साली आला. प्राथमिक शाळा पूर्ण झाली. अनेक विद्यार्थ्यांनी १९०१ पासून सातवीच्या प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यात प्रथम श्रेणीत पास होण्याचा मान मिळवला. शहाबाज गाव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र बनले. सातवी पास झालेल्यांना प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळण्याची सोय असल्यामुळे शहाबाज गावासजिल्ह्याला प्राथमिक शिक्षक पुरवणारा गाव अशी प्रसिद्धी मिळाली.
आगरी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी परिषद १९०६ साली स्थापन झाली. त्यावेळी शहाबाज गावचे व्यापारी विठोबाशेठ पाटील व हरी जोमा पाटील हे उपस्थित होते. परिषदेने समाजातील वाईट सवयी, पंरपरा, रुढी, चालीरीती बंद करण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्याचा ठराव केला; समाजातील पुढाऱ्यांनी ते कार्य हाती घ्यावे असे आवाहनही केले. त्यातून प्रेरणा घेऊन विठोबाशेठ पाटील व हरी जोमा पाटील यांनी त्यांच्या गावात व पंचक्रोशीत समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले.
कमळ विठू पाटील या निर्भीड व्यक्तीने केसरी, सुधारक, संदेश अशी वर्तमानपत्रे गावात आणून त्यांचे सामुदायिक वाचन भैरवनाथाच्या मंदिरात सुरू केले. लोकांची आवड व उत्साह पाहून, हरी जोमा पाटील यांनी ‘विद्यार्थी मंडळा’ची स्थापना केली. त्या मंडळात चाळीस-पन्नास विद्यार्थी सामील झाले. गावातील सुशिक्षित लोकांनी त्या वाचन चळवळीला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. त्या लोकांनी गावातील शिक्षणप्रेमी, दानशूर, उदार नेत्यांच्या सहकार्याने ३ एप्रिल १९१६ रोजी विठोबा राघो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काशी विश्वेश्वर मंदिराच्या माडीवर ‘सार्वजनिक मोफत वाचनालया’ची मुहूर्तमेढ रोवली.
नारायण जाखू भगत व तुकाराम जाखू भगत या बंधूंनी स्वखर्चाने वाचनालयाच्या इमारतीचा पाया १९२८ मध्ये बांधून दिला. ग्रामस्थांकडून लोकवर्गणी, देणगी जमा केली. त्या कामी ‘विद्यार्थी मंडळा’ने पुढाकार घेतला. प्रसंगी श्रमदान करून इमारत पूर्ण केली. इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांच्या हस्ते झाले. वाचनालयासाठी स्वतंत्र मालकीची इमारत असलेले जिल्ह्यांतील ते खेडेगावातील एकमेव वाचनालय असावे.
– शशिकांत गोपाळ पाटील