व्यंगचित्रातील शंभर वर्षे….

0
81

व्यंगचित्र हा मराठीत शंभर वर्षे रूढ असलेला विनोदप्रकार आहे. मात्र त्याला चित्रकला दृष्ट्या व साहित्यदृष्ट्या फार महत्त्व दिले गेलेले नाही. ‘हिंदू पंच’ या नियतकालिकाचे संपादक फडके, शंकरराव किर्लोस्कर , र. बा. केळकर, राघवेंद्र हत्तंगडी हे मराठी व्यंगचित्रांचे प्रवर्तक मानले जातात. परंतु व्यंगचित्रांना बहर प्राप्त झाला तो स्वातंत्र्यकाळानंतर. दैनिक वर्तमानपत्रे आणि त्यामध्ये प्रसिध्द होणा-या रोजच्या घटना, बातम्या हे व्यंगचित्रांसाठी मुख्य खाद्य मानले जाते. स्वातंत्र्यकाळात राजकीय – सामाजिक घटनांना वेग आला आणि व्यंगचित्रकला बहरली. बाळ राणे, हरिश्चंद्र लचके , नागेश आर्डे, बाळ ठाकरे , प्रभाकर ठोकळ अशा विविधांनी त्या काळामध्ये आपल्या व्यंगचित्रांनी वर्तमानपत्रांची व मासिकांची पाने सजवली. त्याच बेताला वसंत सरवटे , श्याम जोशी अशांसारखे साहित्यिक कल लाभलेले व्यंगचित्रकार, त्या अंगाने आपली कला विकसित करत गेले आणि त्यांनी मराठी साहित्य व कला क्षेत्रांत अढळ स्थान मिळवले.

मुद्रण क्षेत्रात ऑफसेट छपाई १९८० नंतर सर्वत्र पसरली आणि व्यंगचित्रांचा प्रसिध्दीमध्ये वापर अधिक सोपा व कमी खर्चाचा झाला. त्यामुळेच त्या कलेचा प्रसार सर्वत्र होऊन मासिका-नियतकालिकांमधून व्यंगचित्रे मोठ्या प्रमाणावर दिसू लागली. व्यंगचित्रकारांची डेमॉन्स्ट्रेशन्स- प्रदर्शने हा गावोगावचा आकर्षणबिंदू ठरला. साहित्य संमेलनासारख्या मोठ्या महोत्सवात एखादा व्यंगचित्रकार छोटा तंबू ठोकून येणा-या प्रेक्षकांची तत्काळ अर्कचित्रे काढून देऊ लागला. शशिकांत गद्रे, चंद्रशेखर पत्की, सुभाष समेळ, सुरेश सावंत, ज्ञानेश सोनार, श्रीनिवास प्रभुदेसाई , प्रभाकर वाईरकर, संजय मिस्त्री असे काही व्यंगचित्रकार त्या काळात ख्यातकीर्त झाले. त्यांपैकी विकास सबनीस आणि विवेक मेहेत्रे यांनी हाच पूर्णवेळाचा व्यवसाय करून व्यंगचित्रकलेचा ध्यास घेतला. सबनीस चित्रे काढत राहिले, तर मेहेत्रे यांनी त्‍या कलेचे व कलाशिक्षणाचे अनेक पैलू धुंडाळले.

बाळ ठाकरे यांची प्रसिद्ध व्‍यंगचित्रे

बाळ ठाकरे यांची प्रसिद्ध व्‍यंगचित्रेबाळ ठाकरे यांची प्रसिद्ध व्‍यंगचित्रेबाळ ठाकरे यांची प्रसिद्ध व्‍यंगचित्रेमात्र मराठी व्यंगचित्रकारांना मराठी कलाक्षेत्रात हवी तेवढी प्रतिष्ठा नाही. त्यांच्या चित्रांचे प्रसिध्दीतील स्थान पानपुरकांचे राहिलेले आहे ह्याची कलाकारांना खंत वाटते. व्यंगचित्रकारांची ‘कार्टुनिस्ट कंबाईन’ नावाची संघटना आहे. ती फार क्रियाशील मात्र नाही.

प्रशांत कुलकर्णी नावाच्या आघाडीच्या व्यंगचित्रकाराने एक महत्त्वाचे काम केले. त्याने ‘निवडक मराठी व्यंगचित्रे’ नावाचा एक ग्रंथ १९९९ मध्ये प्रसिध्द केला. त्यामध्ये मराठी व्यंगचित्रकलेचा विकास यथार्थ प्रगट होत जातो. त्यात सुमारे ऐंशी व्यंगचित्रकारांची माहिती असून त्यांच्या कलेची झलकही समाविष्ट केली आहे. पुस्तकाला वसंत सरवटे यांची मोठी प्रस्तावना आहे. त्यामध्ये त्यांनी व्यंगचित्रकलेची मार्मिकता सुरेखरीत्या व्यक्त केली आहे.

मराठी व्यंगचित्रकलेची एक मोठी उणीव म्हणजे त्यात वैश्विकता नाही. त्याचे कारण एकूणच तुटपुंज्या, मर्यादित बौध्दिक संपत्तीच्या मराठी जीवनामध्ये आहे. शि. द. फडणीसांसारख्या एखाद्या चित्रकाराच्या कलेमधून निरागसता प्रगट होते. अथवा वसंत सरवटे, श्याम जोशी यांच्यासारख्या व्यंगचित्रकारांच्या कृतींमधून मराठी स्वभावाची संस्कृतिवैशिष्ट्ये दिसून येतात आणि अर्थातच ती आपलीशी वाटतात. मराठी व्यंगचित्रकला ही विनोदाच्या आणि हसवण्याच्या अंगाने जाते आणि त्यामुळे त्यामधून जीवनदर्शन अभावाने होते. जाणवते ती जीवनातील विसंगती, विसंवाद वगैरे. या पार्श्वभूमीवर प्रभाकर भाटलेकर आणि सुरेश लोटलीकर हे चित्रकार धक्का बसावा अशा त-हेने मराठी व्यंगचित्र कलासृष्टीत अवतरले. भाटलेकर यांनी अर्कचित्रांवर भर दिला आणि म्हणून व्यक्तिदर्शन घडवले. लोटलीकर यांच्या चित्रांमध्ये बौध्दिकता आणि जीवनविषयक समज अधिक प्रगल्भतेने जाणवते. त्‍या दृष्टीने, त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची रेखाटलेली व्यक्तिचित्र मालिका असो, अथवा दिवाळी अंकांमध्ये प्रसिध्द झालेल्या त्यांच्या व्यंगचित्रमाला असोत, त्यामधून त्यांनी एकूण जीवनाची त्यांना झालेली उमज व्यक्त केलेली दिसते. त्यासाठी त्यांनी रेखाटनशैली देखील जाणीवपूर्वक विकसित केलेली आहे. ती त्यांच्या चित्रांमधील बौध्दिक पातळीवरील वैश्विक आशयाला अनुरूप अशी आहे. दुस-या एका व्यंगचित्रकाराने लोटलीकर यांच्या व्यंगचित्रांचे वर्णन करताना समर्पकपणे म्हटले आहे, की मराठी व्यंगचित्रकला परंपरेत लोटलीकर यांची चित्रे ‘आऊट ऑफ बॉक्स’ येतात!

दिनकर गांगल

About Post Author

Previous articleमधुकर धर्मापुरीकर – व्यंगचित्रांचा साक्षेपी संग्राहक
Next articleव्यंगचित्र आणि जाणत्यांतील ‘व्यंग’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.