वेळापूरचा अर्धनारी नटेश्वर

श्री क्षेत्र अर्धनारी नटेश्‍वर हे देवस्थान पुरातन असून, ते सोलापूर जिल्ह्यात, माळशिरस तालुक्यात वेळापूर या गावी आहे. ते अकलूज-पंढरपूर-सांगोला रोडवर येते. त्याचे बांधकाम चांगल्या अवस्थेत आहे. मंदिर भारतीय पुरातन वास्तू संरक्षण खात्याच्या देखरेखीत आहे. मंदिराची पूजाअर्चा व्यवस्थाही पुजारी गुरव महादेव व गौरीहर विश्वनाथ हे परंपरेने करत आहेत.

अर्धनारी नटेश्वर वेळापूरचे ग्रामदैवत. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर उजव्या बाजूस छोट्या बांधकामामध्ये सुंदर ऐटीत बसलेली गणेशमूर्ती दिसते. डाव्या बाजूस उंच दीपमाळ आहे. तेथे मोठी बारव आहे. बारवेमध्ये पाण्याला सर्व बाजूंनी झरे असल्याने बारव उन्हाळ्यात कधीही कोरडी पडली नाही. मुख्य मंदिरासमोर बारवेत नैऋत्य कोप-यामध्ये लहान मंदिर आहे. त्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांना काशीविश्वनाथ व रामेश्वर स्थान असे म्हणतात. ही दोन्ही शिवलिंगे पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर पाण्याखाली जातात, म्हणून बारवेतील जलाला सर्व तीर्थांचे महत्त्व लाभते अशी भाविकांची धारणा आहे. त्यांच्या शेजारी वायव्य बाजूला बळीश्वर मंदिर आहे. बळीश्वर मंदिराचे बांधकाम दगडी पाषाणामधील खांब व शिळा यांमध्ये बांधलेले आहे. ते मंदिर मुख्य मंदिराच्या समोर बारवेशेजारी थोडे खाली, जमिनीमध्ये असलेले दिसते. मंदिराच्या गाभा-यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. मुख्य शिवलिंग सुंदर आहे. छोटा नंदी आहे. बाहेरील बाजूस उंच आसनावर गणेशमूर्ती आहे. दुस-या दोन आसनांवरील दोन मूर्ती पुरातन वास्तू खात्याकडे आहेत. त्याच्यासमोर नागदेवता. त्या प्रत्यक्षात दक्षिणेकडे मुखाकडून एकमेकाला वेटोळे घातलेल्या स्वरूपात दोन नाग मूर्ती आहेत.

मुख्य मंदिराकडे जावे लागते ते प्रवेशद्वारापासून बारवेला डाव्या बाजूने वळसा घालून, पिंपळ वृक्षाखालून. मंदिराबाहेर चौकोनी उंच आसनावर दगडी मंडपामध्ये नंदी आहे. नंदीच्या शिंगामधून मंदिराच्या कळसाचे प्रथम दर्शन होते. नंदी मानेने थोडा वळून बघत थाटात बसलेला आहे. नंदी आकाराने मोठा आहे. नंदी मंडपाला चार खांब आहेत.

मुख्य अर्धनारी नटेश्वर मंदिरात प्रवेशासाठी तीन पाय-या आहेत. दोन्ही बाजूंला आसनव्यवस्था आहे. प्रथम मंदिरामध्ये दक्षिणमुखी सिद्धिविनायक गणेशमूर्ती आहे. त्यानंतर चालुक्य काळापासून पूजनीय असलेल्या सप्तमातृका पाहावयास मिळतात. त्यांच्यानंतर मंदिरात डाव्या बाजूस दोन खण आतमध्ये महान शिवोपासक, शांडिल्य ऋषींचे शिवलिंगरूपी पूर्वाभिमुख स्थान आहे. शांडिल्य ऋषींनी दंडकारण्यात असलेल्या या वेळापूर (एकचक्रनगर) या ठिकाणी तपस्या केली. त्यांनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगितले.

मुख्य शिवपार्वती मूर्तीतील पार्वतीच्या चरणावर चक्रचिन्ह आहे. त्यावरून गावाला एकचक्रनगर हे नाव पडले असावे. शाडिल्य ऋषी स्थानावर उत्तरेकडे मुख व हंस वाहन असलेली चतुर्भुज देवाची मूर्ती थोड्या भंगलेल्या अवस्थेत पाहावयास मिळते. तिच्या शेजारी, सिंहावर आरुढ झालेली, दशभुजा असलेली, विविध शस्त्रे हातात घेऊन उभी, महिषासुराचा वध करणारी देवीची पुरातन मूर्ती आहे. तीही काही ठिकाणी भंग पावली आहे. मंदिराच्या उत्तरेकडे गणेशाची बिगरसोंडेची मूर्ती आहे. तिचे तोंड पूर्वेकडे आहे. तीही भंग पावलेली आहे. त्याशेजारी चामुंडा देवीची मुखामध्ये बोट धरलेली मूर्ती दक्षिणमुखी आहे. तिच्या वरच्या बाजूला सप्तमातृका आहेत.

उजव्या बाजूस शेजघर आहे. त्यामध्ये सागाचा पलंग देवाच्या विश्रांतीसाठी आहे. अर्धनारी नटेश्वराच्या मुख्य गाभा-याबाहेर उंब-यावर चौकटीवर गजलक्ष्मी देवाची मूर्ती आहे. पूर्वी गजलक्ष्मी आराध्य मानत असल्यामुळे दोन्हीकडे हत्ती आणि मध्यभागी लक्ष्मी बसलेली आहे. मुख्य गाभा-यामध्ये मध्यभागी शिवलिंग आकारामध्ये शिवलिंगाच्या अर्ध्या अर्ध्या स्वरूपाला मूळ एकाच शिवलिंगात शिवपार्वतीच्या स्वतंत्र पूर्ण मूर्ती आहेत. ती मूर्ती अर्धी नसून शिवलिंगाच्या दोन भागांमध्ये आलिंगन स्वरूपात आहेत. शिव व शक्ती ह्या लिंग स्वरूपात एकरूप असल्याने तेथे शिवपार्वती स्वरूपातील एकलिंगामध्ये प्रकट आहेत. त्यामुळे त्या मूर्ती शिवपार्वती, उमामहेश्वर अर्धनारी नटेश्वर, शिवशक्ती अशा नावांनी पूज्य मानल्या गेल्या आहेत. शिवाची मूर्ती चतुर्भुज आहे. जटेमध्ये उजव्या बाजूस सूर्य व डाव्या बाजूस चंद्र कोरलेले आहेत असे वाटते. विश्वातील सर्वांत तेजस्वी रत्न जटेमध्ये धारण केलेले आहे. कपाळाच्या वर जटेखाली मुंडमाळा बांधलेल्या आहेत. शिवाचा चेहरा ध्यानमुद्रेत, नाजूक हास्य असलेला, सुंदर आहे. त्याने कानामध्ये कुंडले धारण केलेली आहेत. मूर्ती गळ्यापासून खाली पायांपर्यंत सुवर्णालंकाराने नटलेली आहे. अलंकार नाजूक आकारात पाषाणामध्ये कोरलेले आहेत. बोटावरील नखे व रेषा आणि लहान कोरलेली जटेची केशरचना कोरीव आहे. शिवाच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ व दुस-या हातामध्ये जपमाळ घेतलेली आहे. जपमाळेचा अंगठा तुटलेला असून त्यामध्ये चांदीसारख्या धातूचे हाड पाहावयास मिळते. म्हणतात, की अफझलखानाच्या स्वारीच्या वेळेस मूर्तीचे संरक्षण व्हावे म्हणून पूर्वजांनी मूर्ती समोरील बारवेत ठेवली. त्यावेळी तिला थोडी इजा पोचली व नंतर तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

शिवाने डाव्या बाजूचा हात पार्वतीच्या डोक्यावरील अंबाड्याच्यावर ठेवलेला आहे. त्याने हातामध्ये पाच फड्या असलेला शेषनाग पकडलेला आहे. दुस-या हाताने पार्वतीला कमरेला आलिंगन दिलेले आहे. पार्वतीमातेची मूर्ती नाजूक चेहरा असलेली, उजवा हात शिवाच्या खांद्यावर आलिंगन दिलेला आहे. दुस-या हातात कमळ व पाश घेतलेला आहे. पार्वतीच्या दोन हातांमध्ये बांगड्या, बोटांमध्ये  अंगठ्या, गळ्यामध्ये विविध हार, पायात जोडवी, पैंजण वगैरे दागिने कोरलेले आहेत. तीमधून जुनी अलंकारकला पाहण्यास मिळते. नाकामध्ये नथ घालण्यासाठी छिद्र ठेवलेले आहे. इतके नाजूक काम मूर्तीमध्ये केले आहे. अंबाडा ही केशरचना बारीक कलाकुसरीने साधली आहे. तिच्या कानात कर्णफुले पाहण्यास मिळतात. पार्वतीचा चेहरा, नाक, डोळे बघितल्यावर वाटते, की साक्षात पाहते अशी शिवलिंग आकारात शिवशक्ती एकरूप दाखवल्या आहेत.

मूर्तीला बाह्य पोषाख फेटा, धोतर, साडी, यांसारखी वस्त्रे नेसवली जातात. मूर्तीला पाषाणाची प्रभावळ आहे. त्यामध्ये शिवाच्या हातातील त्रिशुळाच्या वर ब्रम्हदेवाची लहान आकारामध्ये मूर्ती कोरलेली आहे. त्याच्यावर चार यमइंद्र, वरुण, कुबेर, ईशान अशा देवता मिळून अष्टदेवता आहेत. त्यांच्या मध्यभागी कीर्तिमुख मुख्य दोन्ही मूर्तींच्या वर मधोमध अतिशय सुंदर पाहून कीर्तिसंपन्न शिवपार्वती पाहण्यास मिळतात. पार्वतीच्या डाव्या बाजूस अष्टदेवतांच्या खालील बाजूस विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. त्यामुळे ब्रम्ह, विष्णू यांच्या मूर्ती शिवशक्तीसहित पाहण्यास मिळतात व त्या दर्शनाने सर्वांनंद प्राप्त होतो. तो शिवदरबारच आहे… शिवाच्या चरणाजवळ मूर्तीमध्ये भृगू ऋषी उभे आहेत. त्यांची मूर्ती ही अस्थिपंजर, अशक्त रूपात उभी दिसणारी आहे.

अर्धनारी नटेश्वराची पुराणात अशी कथा आहे, की एकदा भगवान शंकर व पार्वती बसले असताना अनेक देव व ऋषी भृगू तेथे आले. त्यांनी शिवपार्वती, दोघांना प्रदक्षिणा घातली आणि वाकून नमस्कार केला. पण भृगू यांनी पार्वतीमातेकडे दुर्लक्ष केले. तिला नमस्कारपण केला नाही. कारण ते फक्त शंकराचे भक्त होते. देवी पार्वतीला ते आवडले नाही. पार्वतीने भृगू ऋषींना शाप दिला, की भृगूच्या शरीरामधील मांस-रक्त नाहीसे होईल! लगेच तसे झाले व शरीर हाडावर फक्त कातडे घातल्यासारखे झाले. त्यांना नीट उभे राहता येईना, तेव्हा शंकरांना त्याची दया आली. शंकरांनी भृगूंना उभे राहण्यासाठी तिसरा पाय दिला. भृगू आनंदी झाले व ते आनंदाने नाचू लागले. पार्वतीला ते आवडले नाही. तेव्हा पार्वतीने तपश्चर्या करून शंकराकडून वर प्राप्त केले, की शिवपार्वती कधीही वेगवेगळे होणार नाहीत. त्यामुळे शंकरांनी अर्धनारी नटेश्वर असे स्वरूप धारण केले

तेथेच पार्वतीचे वाहन घोरपड आहे व शेजारी सर्वांत प्रथम पूज्य अशी गणेशाची मूर्ती आहे. त्या मूर्तीचे काम अतिशय नाजूक आहे.

मंदिराचे शिखर हे सुंदर असून जमिनीपासून थोड्या उंच भरावावर बांधकाम असून मंदिर दगडाचे आहे. शिखर जुन्या पद्धतीचे वीट व चुना यांचे आहे. मंदिर फार पुरातन असून मंदिराचा इतिहास व ब-याच दंतकथाही ऐकण्यास मिळतात. बळी मंदिराचे शिखरही तशाच पद्धतीचे आहे. मंदिरामध्ये काही साधू-संतांनी तपस्या करून संजीवन समाधी घेतल्या आहेत. त्यांपैकी काही बांधलेल्या आहेत. प्रत्येक समाधीवर शिवलिंग आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस (उत्तरेस) ओळीने मंदिरांसारख्या बांधलेल्या तीन साधूंच्या, सत्पुरुषांच्या फार जुन्या समाधी आहेत.

मंदिरामध्ये अर्धनारी नटेश्वर वार्षिक उत्सव यात्रा चैत्र (मार्च) महिन्यामध्ये गुढीपाडवा सणापासून सुरू होतो. चैत्र शुद्ध पंचमी शिवपार्वती विवाह हा वार्षिक उत्सव चालू होतो. पंचमीला हळदी उत्सव (चैत्र शुद्ध अष्टमी), लग्न उत्सव. चैत्र प्रतिपदा राजो पालखी(वरात) यात्रा उत्सव अष्टमीपर्यंत असतो. वार्षिक यात्रा उत्सवाला हजारो भाविक येतात.

श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. श्रावणामध्ये भक्त प्रभू शिवपार्वती पूजा, पोषाख, खाऊच्या पानाची मखर (शिखर) पूजा नवसाने व खुशीने भगवंतांची कृपा, यश, कीर्ती, सुख, संपन्न करण्यासाठी, फलप्राप्तीसाठी करतात. खाऊचे पान पूजा व बिल्व पूजा सुंदर असते. नवरात्रदेवी (अश्विन) महिन्यात शिव व अंबा यांच्या दर्शनाला भक्त शक्ती व शिव दर्शन घेतात. कार्तिक उत्सव – दीपोत्सव सर्व मंदिरात ब-याच वर्ते पासून होतो. मंदिर दीपप्रकाशाने सुवर्णमय दिसते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये व श्रावणामध्ये सोळा सोमवार व्रत केलेली व भाविकाची व्रत सांगता (उद्यापन) अभिषेक होतात. महाशिवरात्रीला दिवसभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी, अभिषेक, जागर व रांगोळी उत्सव व वर्षभर नित्य पूजा; अभिषेक, आरती वगैरे परंपरेने गुरव सेवा करतात. येणा-या भक्तांना भक्तनिवास आहे व मंदिरामध्ये अन्नदान सोमवार व गुरूवार या दोन दिवशी असते.

वेळापूरचे ते मंदिर किती काळापासून अर्धनारी नटेश्‍वराचे मंदिर म्‍हणून ओळखले जाते याद्दलची नेमकी माहिती उपलब्‍ध नाही. सोलापूरचे इतिहासाचे अभ्‍यासक आनंद कुंभार यांच्‍या सांगण्‍याप्रमाणे शंकर आणि पार्वती यांच्‍या अर्धनारी नटेश्‍वर या एकरुपाबद्दलची संकल्‍पना आणि वेळापूरच्‍या मंदिरातील मूर्ती यांमध्‍ये साम्‍य आढळून येत नाही. कुंभार वेळापूर येथील मूर्ती अर्धनारी नटेश्‍वराची असल्‍याचे नाकारतात. वेळापूर परिसरात त्या मंदिराविषयीची माहिती देणारे तीन ते चार शिलालेख आढळतात. त्‍यात दिलेल्‍या माहितीप्रमाणे अर्धनारी नटेश्‍वराचे समजले जाणारे ते मंदिर प्रत्‍यक्षात वटेश्‍वर नामक देवतेचे असल्‍याचा पुरावा सापडतो. मात्र ती मूर्ती आणि ते मंदिर परिसरातील ग्रामस्‍थांमध्‍ये अर्धनारी नटेश्‍वराच्‍याच नावाने ओळखले जाते.

वेळापूरच्‍या मंदिरातील देवतेविषयी डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या बृह्दग्रंथात वेळापूर येथील शिलालेखांचा अभ्‍यास करताना पूरक माहिती दिली आहे. डॉ. तुळपुळे यांचे ते पुस्‍तक पुणे विद्यापीठाने पन्‍नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले आहे.

वेळापूरच्‍या मंदिरात जाण्‍यासाठी अकलूज किंवा पंढरपूर या दोन ठिकाणाहून एस.टी. मिळतात. ते मंदिर पंढरपूरच्‍या तुलनेत अकलूजवरुन जवळ आहे. रेल्‍वेने येणा-यांना माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी रेल्‍वेस्‍थानकावर उतरता येते. तेथून पंढरपूरला येऊन एस.टी.मार्गे वेळापूर गाठावे लागते. रेल्‍वेने पंढरपूर रेल्‍वे स्‍थानकावर पोचण्‍याची सोय आहे.

(माहिती स्रोत – रवि गुरव – मंदिराचे पुजारी- 9890372561)

– विठ्ठल आहेरवाडी

About Post Author

1 COMMENT

  1. Aadharit Naresh war temple is
    Aadharit Naresh war temple is nice. It’s old historical place in belapur so please come in belapur and visit to temple

Comments are closed.