वेत्त्ये- निसर्गसंपन्न आडगाव! (Vettye)

5
38
_vette_gavcha_samudrakinara_4.jpg

वेत्त्ये हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सागरकिनारी वसलेले छोटेसे गाव. आडिवरे गावाचे उपनगर म्हणावे असे. त्या गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आडिवरे येथील महाकाली देवीच्या मानपानामुळे वेत्त्ये गावाला ते स्थान लाभले आहे. वेत्त्ये हे गाव स्वतंत्रपणे निसर्गाची देणगी आहे. तसा स्वच्छ, मनमोहक आणि रमणीय समुद्रकिनारा अन्यत्र सहज पाहण्यास मिळणार नाही, कारण वेत्त्ये आहे आडगाव. पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्या नजरेपासून दूर राहिलेले. तिन्ही बाजूंला भारदस्त असे डोंगर व एका बाजूने फेसाळणारा समुद्र … आणि त्याच्या बाजूला वाळूच्या छोट्या डोंगरानजीक विसावलेली टुमदार घरे. त्या डोंगरावर पावसाळ्यात सौंदर्याची अधिकची भर पडली जाते. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ते गाव अलिकडे प्रकाशझोतात येत आहे.

वेत्त्ये गावातील लोकांची व्यावहारिक कोकणी भाषा ऐकून तर कान तृप्त होऊन जातात. ती मिठास भाषा सतत ऐकून तिचे अनोळखीपण काही तासांत विसरले जाते. ‘वेत्त्ये ग्रामसुधारणा मंडळा’ची स्थापना 1936 साली चाकरमान्यांचे मंडळ असावे या कल्पनेने झाली. मंडळाने 1986 साली सुवर्ण महोत्सव व 2011 साली अमृत महोत्सव साजरे केले आहेत. गावाच्या विकासासाठी ब्याऐंशी वर्षें एकत्र राहणे हे भूषणावह आहे; कोण म्हणतो, कोकणात माणसे एकत्र नांदत नाहीत! मंडळाने गाववस्तीत बरीच विकासकामे घडवून आणली आहेत.

शासनाच्या लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत वेत्त्ये-कशेळी गावाच्या सीमारेषेवर बंधारा बांधला गेला आहे. गावाच्या समुद्राच्या पाण्याचे आक्रमण थांबवण्यासाठी एक दगडाचा व दुसरा मातीचा असे दोन बंधारे बांधून, त्याला फायबर ग्लासच्या झडपा बसवून घेतल्या आहेत. गावासाठी नळपाणी योजना राबवून घरोघरी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागले, पण काम झाले. काही ग्रामस्थांनी त्यांची जमीन योजनेसाठी विनामूल्य दिली, तर इतर ग्रामस्थांनी श्रमदानाने केलेली कामेही महत्त्वाची आहेत. धरणाचा दहा टक्के पाणीसाठा सिंचनाकरता वेत्त्ये गावासाठी राखीव आहे. त्याचे श्रेय ‘वेत्त्ये ग्रामसुधारणा मंडळा’ला; तसेच, ‘कोकण विकास आघाडी’ला आहे. सामाजिक वनीकरण खात्यामार्फत समुद्र किनाऱ्यालगत दहा हेक्टर जमिनीमध्ये सुरूच्या झाडांची लागवड झाली आहे. सुरूच्या वनामुळे समुद्रावरून येणाऱ्या वादळी वाऱ्यांपासून शेती; तसेच, आंबा, नारळ, फणस, काजू इत्यादी अनेक झाडांचे होणारे नुकसान टळले. हिरव्या सुरूच्या वनामुळे समुद्रकिनारा आणखीच शोभिवंत झाला आहे. तेथे पर्यटन केंद्र सुरू व्हावे व ग्रामस्थांना रोजगार मिळावा यासाठी ‘वेत्त्ये ग्रामसुधारणा मंडळ’ प्रयत्नशील आहे.

_vette_gavcha_samudrakinara_3.jpgगावात ‘एस टी’ आली तेव्हा गावकऱ्यांनी तीन किलोमीटर अंतरावरील आडिवरे-वेत्त्ये गावापर्यंत नाचत जाऊन गुलाल उधळत, वाजत-गाजत गाडी गावात आणली. मुले एस टीच्या मागे धावत होती. सारेच कुतूहल! तेथपासून आजपर्यंतचे विकसित वेत्त्ये गाव हा प्रवास ‘कोकण विकास आघाडी’च्या सहकार्याने घडून आला. अर्थात त्यात ग्रामस्थांनी केलेले श्रमदानही महत्त्वाचे आहे. ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ जाधव असून  मंडळात सध्या भिकाजी जाधव, हरिश्चंद्र जाधव, दत्ताराम तोडणकर व रमाकांत जाधव हे मंडळाचे सदस्य आहेत.

वेत्त्ये गावात भंडारी समाजाची वस्ती मोठी आहे. वेत्त्ये ग्रामस्थांचा मच्छिमारी आणि शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तेथे जुने प्राचीन म्हणावे असे तळेदेखील आहे. त्या ठिकाणी ‘थंब देव’ म्हणून महापुरुषाचे ठिकाण आहे. सर्व गावकरी एकत्र येऊन तेथे वर्षातून एकदा सांस्कृतिक, धार्मिक गावजेवणाचा आनंद लुटतात. सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा, दहीकाला उत्सव, गणपती उत्सव, तुलसी विवाह, होळी, देवस्थानाची जेवणे (समाराधना) असा सर्व महोत्सव होत असतो. ती पिढ्यान् पिढ्या चालू असलेली परंपरा आहे.

गावाची लोकसंख्या साडेतीनशेपर्यंत आहे. त्यांपैकी काही मंडळी नोकरी-व्यवसायासाठी मुंबईत मुक्कामाला असतात. गावात शिक्षण घेण्यासाठी चौथीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आडिवरे येथील शाळा व महाविद्यालय येथे जावे लागते. ‘आडिवरे इंग्लिश कॉलेज’ हे बारावीपर्यंत शिक्षण देणारे महाविद्यालय आहे.

आडिवरे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील एक गाव. त्या गावात असलेले ‘श्री महाकाली देवी’चे प्राचीन मंदिर हे गावातील चौदा वाड्यांचे आराध्य दैवत आहे. ती आडिवरे या गावाची ग्रामदेवता आहे. श्री महाकाली देवस्थानाची स्थापना बाराशे वर्षांपूर्वी खुद्द श्रीमंत शृंगेरी पीठाचे आद्य श्री शंकराचार्य यांच्या हस्ते झाली. शिलाहार वंशातील भोज राजाच्या एका दानपत्रात ‘अट्टवीरे’ या गावाचा उल्लेख आढळतो. त्याचाच अपभ्रंश ‘आडिवरे’ असा झाला असावा. शंकराचार्यांनी आडिवरे या गावी भेट देऊन तत्कालीन जैन धर्मीयांशी चर्चा केली होती आणि त्यानंतर आडिवरे येथे महाकाली देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. देवस्थानचा ट्रस्ट असून विश्वनाथ शेट्ये हे विश्वस्त म्हणून कारभार पाहतात.

‘वेत्त्ये’ हे त्याच महाकालीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याबाबत दंतकथा आहे. वेत्त्ये गावातील जाधव यांचे पूर्वज मासेमारीसाठी समुद्रात गेले असता त्यांच्या मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात देवीचे पाषाण अडकले. त्यांनी ते पाषाण गावात आणून गावकऱ्यांना दाखवले. ती माहिती सर्वत्र पसरताच पाषाण कोठे बसवायचे यावर विचारविनिमय करण्यात आला. चर्चेअंती वाडापेठला-आडिवरे येथे देवीची स्थापना करण्यात आली. देवी वेत्त्येमधून आली म्हणून त्या गावाला देवीचे माहेरघर म्हटले जाते.

आजही, देवीने तिला कौल लावल्यानंतर माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास वेत्त्ये गावात तिच्या आगमनाचा उत्साह संचारतो. गाव तिच्या स्वागताच्या तयारीला लागते. गावचे चाकरमानीदेखील तितक्याच लगबगीने गावात दाखल होतात. सटीसहामाशी येणाऱ्या माहेरवाशिणीची जशी डोळ्यांत तेल घालून वाट पाहिली जाते तशीच वाट ग्रामस्थ त्या दिवसाची वाट पाहताना दिसतात. ही घटना तीन वर्षांनी, पाच वर्षांनी दहा वर्षांनी अशी केव्हाही घडू शकते. शेवटचा कौल 2014 साली मिळाला होता.

_vette_gavcha_samudrakinara_2.jpgमहाकाली देवीच्या चतुर्थ सीमा पालखी दर्शनसोहळ्याचा मान वेत्त्ये ग्रामस्थांकडे असतो. त्यांच्या हस्ते देवीची पालखी निघण्यापूर्वी पूजाअर्चा केली जाते. गावातून पालखीची मिरवणूक बारा वाड्यांतून भव्यदिव्य वाजतगाजत काढली जाते. ती परंपरा वर्षानुवर्षांची आहे. देवी वेत्त्ये येथे तिसऱ्या दिवशी येते. पण माहेरात जास्त थांबायचे नसते म्हणून ती तेथे जास्त थांबत नाही. ती गावाजवळ ‘देवस्तंभ’ किंवा स्तंभदेव या ठिकाणी प्रथम पंधरा मिनिटे थांबते. तेथे गावाचे कल्याण व्हावे यासाठी वेत्त्यातील नारायण लहू जाधव या खोत असलेल्या जाधवांकडून परंपरेनुसार गाऱ्हाणे घातले जाते. (वेत्त्यात पंच्याण्णव टक्के जाधव आहेत. बाकी चार-पाच कुटुंबे मयेकर, शिर्सेकर अशी आहेत.)

देवीची पालखी माहेरी आल्यामुळे तिची खणा-नारळांनी ओटी भरतात. त्यानंतर देवीची पालखी गावात फिरते. तेथे घराघरातून सुवासिनी देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. पहिल्या दिवशी देवी मोगरे, तिवरे अशा बारा गावांमधून देवीचा प्रवास सुरू असतो. देवी सत्येश्वराच्या मंदिरात रात्री विश्रांती घेते. ते जवळच आहे. शेवटी, तिसऱ्या दिवशी ती मंदिरात परतते. त्या परिसराला नवरात्र उत्सवाच्या काळात मोठ्या जत्रेचे स्वरूप आलेले असते. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराच्या शेजारी भाविकांना राहण्यासाठी ‘भक्तनिवास’ बांधला आहे. तेथे गरम पाणी आणि शुद्ध शाकाहारी जेवण यांची व्यवस्था आहे.

महाकाली देवीचे ते स्थान म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे प्रतिरूप आहे. मंदिरात आणखी काही छोटी छोटी मंदिरे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समाजांतील लोक त्या ग्रामदेवतेचे भक्त आहेत. वेत्त्ये येथील शांत, निसर्गरम्य वातावरण म्हणचे शहरी वातावरणाला कंटाळलेल्यांसाठी तणावमुक्तीचे नैसर्गिक औषधच आहे!

– कमलाकर जाधव, kam20610@gmail.com

About Post Author

5 COMMENTS

  1. गावाच्या अंतरंगात घुसून…
    गावाच्या अंतरंगात घुसून तुम्ही चांगलं काम करताय. याकरिता आपणास शुभेच्छा.

  2. निसर्गरम्य सौंदर्य असलेल्या…
    निसर्गरम्य सौंदर्य असलेल्या वाडावेत्त्ये, पर्यटन स्थळांची अचूक माहितीबद्दल धन्यवाद,

Comments are closed.