विश्वनाथ खैरे – संस्कृती संशोधक

2
53
_Snskruticha_Sanshodhak_2.jpg

समाजशास्त्राचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्याला दोन गोष्टींनी गोंधळल्यासारखे होते. एक म्हणजे परदेशी समाजशास्त्रज्ञांनी समाजाविषयी मांडलेले सिद्धांत. ते सिद्धांत भारतीय समाजाला कितपत लागू होतील असा प्रश्न तर पडतोच, पण मुख्य म्हणजे ते फार रूक्ष, कोरडे आणि रटाळ वाटतात. त्यांनी मनाचे समाधान होत नाही. पण दुसरी आणि त्याहीपेक्षा गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे भारतीय समाजाविषयीचेच अपुरे ज्ञान, विशेषत: भारतीय सामाजिक इतिहासासंबंधीचे. भारतीय समाजाचा इतिहास फार लांबचा असला तरी तो सुसंगत लिहिला गेलेला नाही. भारतीय उपखंडात मानवी वस्ती कधीपासून झाली, तीत बदल कोणकोणते झाले, समाजाची घडण निरनिराळ्या कालखंडांत कशी होती, जी अफाट विविधता आणि विषमता त्यात दिसते तिचा उगम कसा झाला, एकाच भूभागात अगदी भिन्न-भिन्न म्हणाव्यात अशा संस्कृती कशा काय नांदत राहिल्या… असे अनेक प्रश्न अभ्यासकाला पडत राहतात. त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत की शास्त्र शिकूनही गोंधळल्यासारखे होते.

हे प्रश्न अनेक असले तरी ढोबळ मानाने तीन प्रकारचे आहेत. एक म्हणजे भारतात निरनिराळे म्हणावे असे जनसमूह निर्माण कसे झाले? निरनिराळे गट निरनिराळ्या काळात भारतात  वस्तीला आले, की ते एकाच कोणत्या तरी समाजातून निर्माण झाले? गट निरनिराळे असले तर त्यांच्यात एवढी एकात्मता का? आणि ते एकाच समाजातून उत्पन्न झाले असे मानले तर मग एवढे भेदाभेद का?

दुसरी समस्या जातिव्यवस्थेसंबंधीची आहे. लोकांमधील भेदभाव आणि विषमता पृथ्वीवरील इतरही देशांत असली तरी जशी जातव्यवस्था भारतीय उपखंडात निर्माण झाली तशी ती इतर कोठेही झाली नाही. जातव्यवस्था निर्माण कशी झाली हे फार मोठे कोडे आहे. ती कशी चालते ते बऱ्यापैकी समजते, टिकून का राहिली तेही; पण मुळात, ती याच देशात निर्माण झाली याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
तिसरी समस्या येथील भाषांसंबंधात आहे. भारतात इतक्या भाषा निर्माण कशा झाल्या आणि त्यांचे एकमेकींशी संबंध पूर्वीच्या काळात काय होते, या निरनिराळ्या भाषांची आई एकच होती, की आजच्या प्रमाणभाषा निरनिराळ्या बोलीभाषांच्या घुसळणीतून तयार झाल्या, जे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात ते ‘लोक’ म्हणून वेगवेगळे आहेत का, असे प्रश्न भाषांच्या बाबतीत पडतात.

समाजशास्त्रात आणि मानवशास्त्रात निरनिराळ्या प्रकारचे संशोधन होत असले तरी ही कोडी पूर्णत: सुटलेली नाहीत. निरनिराळे विद्वान या संदर्भात निरनिराळे विचार मांडत असतात, निरनिराळे तर्कही करत असतात. कधी कधी ते इतके परस्परविरुद्ध असतात, की त्यातून ज्ञान वाढण्याऐवजी गोंधळच वाढत असतो. फारच थोडे विचार किंवा संशोधन अशा प्रकारचे असते, की त्यांच्यामागे भक्कम पुरावा तर असतोच, पण ते सामान्य ज्ञानाच्या कसोटीवरही उतरते.त्यांपैकी भाषेच्या बाबतीतील जे कोडे आहे ते विश्वनाथ खैरे यांच्यामुळे काही प्रमाणात उलगडत आहे.

भाषेच्या बाबतीतील कोड्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकात दोन कारणांमुळे झाली. भाषाशास्त्रज्ञांनी त्यांच्या त्यावेळच्या ज्ञानाला धरून अशी समजूत करून घेतली, की भाषांची कुळे निरनिराळी असतात. भारतातील भाषा पाहून येथे चार प्रकारची कुळे मानली गेली – युरोपीय-हिंदुस्थानी (इंडो-युरोपीयन), द्रविड, तिबेटी-ब्रह्मी आणि मुंडारी (ऑस्ट्रो-एशियाटिक). युरोपीय-हिंदुस्थानी भाषांमध्ये संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली इत्यादी भाषा मोडतात. त्या लॅटिन, ग्रीक, इंग्रजी, जर्मन यांच्या कुळातील मानल्या गेल्या. द्रविड भाषाकुळात दक्षिण भारतातील तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड इत्यादी भाषा मोडतात. तिबेटी-ब्रह्मी भाषा या हिमालयातील पर्वतरांगांत तर मुंडारी भाषा या मध्य भारतातील छोटा नागपूरच्या पठारावर बोलल्या जातात. भाषांची कुळे मानणे भाषाशास्त्राच्या त्या वेळच्या ज्ञानाला आणि पद्धतीला धरून जरी असले, तरी दुसरी एक समजूत अशी होती, की उत्तर हिंदुस्थानी भाषांची जननी संस्कृत ही आहे. म्हणजे त्या भाषा संस्कृतपासून तयार झालेल्या आहेत. संस्कृत आधी आणि मराठी, गुजराती यांसारख्या बाकीच्या भाषा नंतर अपभ्रंश होऊन निघालेल्या.

त्या समजुती केवळ भाषाशास्त्रापुरत्या असत्या आणि केवळ तेवढ्यावर वादविवाद झाले असते तरी हरकत नव्हती, पण त्या समजुतींपोटी भारताचा सामाजिक इतिहासच वेगळ्या प्रकारे बघितला गेला. भाषांची वेगवेगळी कुळे मानली गेली तेव्हा त्यातून अर्थ असा काढला गेला, की वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक हे ‘जनसमूह’ म्हणूनही वेगवेगळे आहेत. किंबहुना त्याचा दुसरा अर्थ असा होता, की ते वेगवेगळ्या कालखंडांत भारतात येऊन स्थायिक झाले असतील. संस्कृत ही जननी मानण्यामुळे असे समजले गेले, की संस्कृत बोलणारे कोणी तरी लोक भारतात आले आणि त्यांचा विस्तार भारतभर झाला. ते लोक जसे व जेथे पसरले तेथे ते संस्कृतपासून अपभ्रंश झालेल्या भाषा बोलू लागले. संस्कृतचा युरोपीयन भाषांशी, विशेषत: लॅटिन व इराणी भाषांशी जो संबंध दिसला त्यावरून असे समजण्यात आले, की संस्कृत बोलणारे लोक हे वायव्येकडून भारतात आले आणि प्रथम गंगा-यमुनेच्या खोर्या,त पसरून मग भारतभर पसरले. ते लोक ‘आर्य’ होते, त्यांची आर्यभाषा संस्कृत होती, ते लढाऊ वृत्तीचे आणि वरचढ शस्त्रास्त्रे असणारे होते, त्यांच्या आक्रमणापुढे स्थानिक लोक व स्थानिक भाषा टिकल्या नाहीत. विशेषत: दक्षिणी, द्रविडी भाषा बोलणारे लोक टिकले नाहीत. ते विंध्य पर्वताच्या खाली रेटले गेले आणि त्यांच्या भाषा दक्षिण हिंदुस्थानात सांभाळत राहिले. थोडक्यात समजूत अशी, की हा आर्य-अनार्य किंवा संस्कृत-द्रविड किंवा उत्तर-दक्षिण असा संघर्ष आहे. तो पुरातन काळात सुरू झाला आणि आजमितीसही चालू आहे.

त्याच समजुतीचे पुढील भयावह रूप असे होते, की भारतातील उच्चवर्णीय हे सगळे आर्य कुलोत्पन्न आहेत तर निम्नवर्णीय (त्यात आदिवासी, दलित, शेतकरी, कारागीर सगळे आले) हे अनार्य कुळातील आहेत. आर्य बाहेरून आले तर अनार्य स्थानिक होते. त्यांच्यात जो संघर्ष झाला त्यात अनार्यांचा पराभव झाला व त्यांना आर्यांचे दास्यत्व पत्करावे लागले. हे दास्यत्व किंवा गुलामगिरी सगळ्याच बाबतींत होती – राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक. त्या गुलामगिरीतूनच भारतात वर्णव्यवस्था, जातव्यवस्था आणि अस्पृश्यतेसारख्या जुलमी प्रथा निर्माण झाल्या. मात्र अनार्यांच्या द्रविड किंवा संथाळी यांसारख्या भाषा पूर्णपणे नष्ट झाल्या नाहीत. त्या भाषा टिकल्या म्हणून त्यांचे सांस्कृतिक अस्तित्व टिकले. किंबहुना त्या भाषांचे वेगळेपण हाच सांस्कृतिक संघर्षाचा प्रमुख पुरावा आहे.

सांस्कृतिक संघर्षाच्या या समजुतींमुळे भारतीय समाजाचे नुकसान अफाट झालेले आहे. भारताच्या एकजिनसीपणाची तर त्यामुळे हानी झालीच, पण माणसां-माणसांमध्ये, जाती-जातींमध्ये आणि भाषा-भाषांमध्ये द्वेषभाव पसरून सामाजिक वातावरण कलुषित झाले. तो इतिहास जर पुराव्यानिशी सिद्ध झालेला असता तर मग तो मान्य करण्यास हरकत नव्हती. पण त्या समजुती तोकड्या ऐतिहासिक ज्ञानावर आधारलेल्या होत्या आणि ते अर्धेकच्चे ज्ञान युरोपीय इतिहासकारांच्या अज्ञानातून, पोकळ तर्कातून, सत्य सापडल्याच्या अभिनिवेशातून आणि अहंगंडातून निर्माण झालेले होते. त्या समजुती अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत तयार झाल्या आणि भारतीय विद्वानांनी त्या पुरेशी चिकित्सा न करता स्वीकारल्या.

भाषाशास्त्रातील समजुती मुख्यत: विल्यम जोन्स (1746-1794) या पंडितामुळे उदयास आल्या. ते ईस्ट इंडिया कंपनीच्या कोलकाता येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. तसेच ग्रीक, लॅटिन, जर्मन, फ्रेंच या युरोपीय व अरबी, फारसी या पौर्वात्य भाषांचे तज्ज्ञ होते. ते संस्कृत भारतात आल्यावर पारंपरिक हिंदू कायदा समजावून घेण्यासाठी शिकले. त्यांच्या लक्षात संस्कृतचे ग्रीक व लॅटिन भाषांशी असणारे साम्य आले. त्यांनी ज्या अर्थी या भाषा बोलणाऱ्यात साम्य आहे, त्या अर्थी त्या बोलणाऱ्याचे पूर्वज पूर्वी कोठे तरी एकत्र राहत असले पाहिजेत आणि त्या भाषांना जन्म देणारी मूळ भाषा एक असली पाहिजे असा सिद्धांत मांडला. त्या कल्पित भाषेला ‘इंडो-युरोपीयन’ असे म्हणण्यात आले.

मॅक्समुलर या जर्मन भाषाशास्त्रज्ञाने ‘आर्य वंश’ (आर्यन रेस) हा शब्दप्रयोग पुढे, एकोणिसाव्या शतकात केला. आर्य लोकांच्या आक्रमणाचा सिद्धांत वेदवाङ्मयातील काही उल्लेखांवरून आणि ग्रीक-लॅटिन व संस्कृत यांच्या भाषिक साम्यावरून मांडण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, मोहेंजोदडोमध्ये मिळालेल्या काही अवशेषांवरून त्या सिद्धांताला बळकटी लाभली. मॅक्समुलरने खुलासा नंतर अनेक वेळा केला, की त्याला ‘आर्य’ हा शब्द फक्त भाषा किंवा संस्कृती यांच्या संदर्भात (आर्यन कल्चर) अभिप्रेत होता, वंश म्हणून नव्हे, पण त्या गोष्टीची नोंद घेतली गेली नाही. आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताने भारतीयांच्या मनाची पकड घेतली ती कायमची! त्यातच, हिटलरसारख्यांनी आर्यांच्या वंशश्रेष्ठत्वाचा डांगोरा पिटल्यामुळे भारतातील उच्चवर्णीयांच्या मनात अहंगंड आणि इतरांच्या मनात न्यूनगंड तयार झाला. ते कमी होते म्हणून, की काय, एच.एच. रिस्ले या सेन्सस कमिशनर-संशोधकाने त्याच्या ‘कास्ट्स ऑफ बेंगॉल’ या ग्रंथात, तेथील माणसांच्या डोक्याची आणि नाकाची मोजमापे घेऊन, भारतातील उच्च जातीचे लोक हे टोकदार नाकांचे (आणि म्हणून युरोपीयनांना जवळचे) असतात असा सिद्धांत मांडला.

ते सर्व सिद्धांत घाईघाईने आणि अपुऱ्या  माहितीवरून काढण्यात आलेले होते. भारतीय समाजाची पाहणी नीट आणि सखोल करणाऱ्या माणसाला ते समाधानकारक वाटत नाहीतच, पण मानवशास्त्रात आणि पुरातत्त्वशास्त्रात जे नवनवीन संशोधन होत आहे त्यामुळेही त्याचा फोलपणा लक्षात येतो. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ गोविंद सदाशिव घुऱ्या यांनी रिस्ले यांचे म्हणणे निखालस खोटे आहे, हे तशाच मोजमापांचे पुरावे देऊन पन्नास वर्षांपूर्वीच सिद्ध केले. मात्र घुऱ्या यांच्या सिद्धांतांना इरावती कर्वे यांनीही आव्हान दिले. घुऱ्या यांनी संस्कृतिसंघर्ष नाकारला नाही. त्यांनी एकाच मोठ्या जनसमूहाचे विखंडन (विभाजन) होऊन वेगवेगळ्या जातींची निर्मिती झाली असे मत मांडले. त्या उलट, इरावतीबार्इंनी निरनिराळ्या जनसमूहांची गोधडीसारखी जुळणी होऊन (फ्युजन), भारतीय समाजाला त्याचे रूप प्राप्त झाले असावे असे मत मांडले. पुरातत्त्वशास्त्रात जे नवीन संशोधन झाले त्यावरून असे दिसून आले, की मोहेंजोदडोमध्ये मिळालेल्या ज्या सांगाड्यांवरील खुणांवरून आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत रचला गेला, त्या खुणा लढाईच्या नाहीच आहेत. हडप्पा संस्कृतीचा -हास हा पर्यावरणातील बदल, नद्यांना येणारे पूर आणि समुद्राच्या पाण्याचा दबाव या कारणांनी झाला असावा; बाह्य आक्रमणामुळे नाही. मानवशास्त्रातील संशोधनाप्रमाणे माणसांच्या वेगवेगळ्या प्रजाती नसतात तर माणसां-माणसांतील फरक हे पर्यावरणामुळे, जैविक घडामोडींमुळे आणि सरमिसळणीतून होत असतात. गोरे, पिवळे किंवा काळे असे माणसांचे वर्ण किंवा वंश मानणे चुकीचे आहे. जागतिक पातळीवर तर वंश ही कल्पना रद्दबातल ठरवण्यात आली आहे!

पृथ्वीवरील सगळी माणसे ही मुळात एक आहेत हे मत मानवशास्त्रात मान्य होत आहे. जी सगळी माणसे पृथ्वीवर आहेत, त्या सगळ्यांची एक आई सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी दक्षिण-पूर्व आफ्रिकेत असावी आणि त्या समूहातून निघून माणसे सर्वदूर पसरली असावीत असे संशोधन सांगते. ती माणसे निरनिराळ्या विभागांत पसरली तेव्हा भौगोलिक, जैविक आणि पर्यावरणीय कारणांमुळे त्यांच्यात भेद तयार झाले आणि ती एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी वाटू लागली. एखाद्या भव्य वृक्षाच्या फांद्या एकमेकींपासून खूप दूरवर जाव्यात आणि वेगवेगळ्या परागांचे आरोपण होऊन त्यांवर वेगवेगळी फुले लागावीत तशी ही परिस्थिती आहे. फांद्या वेगवेगळ्या दिसल्या तरी मूळ व खोड एकच आहे.

त्या संदर्भात भाषेच्या बाबतीत जे नवीन संशोधन होत आहे त्याचे श्रेय विश्वनाथ खैरे यांच्याकडे आहे. खैरे यांचे नाव खरे तर महाराष्ट्राला अपरिचित असण्याचे कारण नाही. ते त्या बाबतींतील त्यांची मते गेली सुमारे पंचवीस-तीस वर्षें मांडत आले आहेत. त्यांचे नाव जर कोणाला माहीत नसेल तर ते त्या व्यक्तीचे सांस्कृतिक दुर्दैव मानावे लागेल. खैरे यांचे प्रमुख योगदान म्हणजे मराठी आणि तमिळ भाषा या एकमेकींशी जोडलेल्या आहेत ही त्यांची दृष्टी. ते त्याला सिद्धांत म्हणत नाहीत तर ‘मानीव’ (इंग्रजीत हायपोथिसिस) असे म्हणतात. त्यांनी त्यांच्या ‘अडगुलं मडगुलं’ या पुस्तकात त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. हे मानीव वरकरणी अगदी साधे वाटेल, पण भारताच्या सांस्कृतिक इतिहासाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. मराठीचे मूळ तमिळमध्ये आहे असे म्हटले किंवा पूर्वीच्या महाराष्ट्रात तमिळ प्रचलित असावी असे समजले, की त्याचे परिणाम अनेक अंगांनी होतात.

प्रथम म्हणजे संस्कृत-मराठी-तमिळ असा एक ‘संमत’ मार्ग किंवा सेतू तयार होतो. संस्कृत व तमिळ या पूर्णपणे भिन्न कुळांतील भाषा आहेत असे मानण्याऐवजी त्या भारतातील लोकजीवनातूनच त्या निर्माण झाल्या असतील असे मानावे लागते. संस्कृतपासून मराठीसारख्या भाषा निर्माण झाल्या असे नसून, संस्कृत ही त्या लोकभाषांतून संस्कारित होऊन, पूजाविधींसाठी, देवधर्मासाठी म्हणून तयार झाली. देवांशी बोलायची भाषा सामान्य जनांपासून गुप्त राहिली पाहिजे म्हणूनच देवाच्या पुरोहितांनी ती त्यांच्यापाशी ठेवली, पण त्याचा अर्थ ती भाषा परकीय किंवा दक्षिण भारताशी संबंध नसलेली होती असा होत नाही.

त्याचाच दुसरा आणि महत्त्वाचा अर्थ भारतातील लोकांमध्ये एकात्मता आहे असा होतो. संस्कृत बोलणारे लोक आणि तमिळ-तेलगू बोलणारे लोक कोणी वेगवेगळे नसून, लोकांच्या पातळीवर तमिळ-तेलगू-मराठी, तर विद्वानांच्या पातळीवर संस्कृत असा त्याचा अर्थ होतो. हे इतर भाषांच्या बाबतीतही खरे होते. ‘विविधतेत एकता’ ही नुसती पोकळ घोषणा नाही, तर ते सत्यही आहे. भयानक विषमता असली तरी भारतीय उपखंडात एक प्रकारची ऐतिहासिक एकता आहे. मराठी व तमिळ यांचा संबंध जसा शोध केल्यामुळे दिसला तसाच तो भारतातील इतर भाषांमध्येही दिसेल! त्यापूर्वी भारतातील भाषांमध्ये असा तुलनात्मक शोध कोणी घेतला नव्हता. तसा तो घेतला तर मग भिली, गोंडी, तुळू, संथाळी, अवधी, जोनपुरी, मारवाडी अशा वरकरणी भिन्न भासणाऱ्या भाषांमधील एकात्मताही लक्षात येईल. खैरे यांनी भारतातील भाषाविषयक संशोधनाचा सगळा मोहरा अशा रीतीने फिरवला आहे आणि ते फार मोठे सांस्कृतिक योगदान आहे. खैरे अर्थात तेवढेच करून थांबत नाहीत. त्यांनी दोन हजारांहून जास्त पानांचा मजकूर दैवतकथा, मिथ्यकथा, सांस्कृतिक इतिहास, लोक-संस्कृती अशा विविध विषयांवर लिहिलेला आहे.

_Snskruticha_Sanshodhak_1.jpgखैरे हे पुणे जिल्ह्यातील सुपे गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मले. ते लहानपणी शेणगोठा, गुरे राखणी, नांगरणी करून शिक्षण घेत असताना 1946 साली मुंबई विद्यापीठात चौथा क्रमांक मिळवून मॅट्रिक झाले. त्यांना संस्कृतात त्या काळात शहाऐशी टक्के गुण मिळाले होते. ते पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजमधून पहिल्या वर्गात पहिले येऊन बी.ई. (सिव्हिल) उत्तीर्ण झाले. त्यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकामखात्यात तेहतीस वर्षें नोकरी करून धरणे, बोगदे, हमरस्ते, इमारती असे अनेक महत्त्वाचे सार्वजनिक प्रकल्प पूर्ण केले. त्यामध्ये काश्मीरमधील बनिहाल खिंडीतील जवाहर बोगदा आणि भारत-नेपाळ सीमेवरील ‘सिद्धार्थ राजमार्ग’ यांचा समावेश होतो. ते तमिळ नोकरीच्या काळात चेन्नई म्हणजे मद्रासला असताना शिकले. त्यांनी अरबी भाषेचा परिचय आफ्रिकेत येमेन या देशात प्रतिनियुक्तीवर असताना करून घेतला. त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य 1985 साली नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाषाविषयक संशोधनाला वाहून घेतले.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व विचारवंत प्रा. स.ह. देशपांडे यानी लिहिलेले ‘विश्वनाथ खैरे यांचा संमतविचार आणि नवी भारतविद्या’ (मौज प्रकाशन, मुंबई, 2005) हे पुस्तक जरूर वाचावे. देशपांडे त्या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘(खैरे) जे काय म्हणत आहेत ते सर्वस्वी नवीन आहे, त्यामागे कणखर युक्तिवाद आहे आणि ते त्यांच्या म्हणण्याला बळकटी देणारे पुराव्यांचे डोंगर उभे करतात, त्यांचा (संबंधित) विद्याशाखांचा अभ्यास प्रचंड आहे, त्यांची बुद्धी चपल आहे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप मोठी आहे….’’.

सध्या समाजशास्त्र, मानवशास्त्र व पुरातत्त्वशास्त्र यांमध्ये जे नवीन संशोधन होत आहे ते खैरे यांच्या मताला पाठिंबा देणारे आहे. भारतात जे पुरातत्त्वीय संशोधन होत आहे त्यानुसार भारतात मानवाचा वावर फार प्राचीन काळापासून होत आला आहे. भारतात सर्वदूर मानवीवस्तीचे पुरावे साधारण पंचवीस ते तीस हजार वर्षांपासून मिळालेले आहेत. शेतकरी खेड्यांचे ताम्र-पाषाणयुगातील म्हणजे सुमारे पाच ते सहा हजार वर्षांपासूनचे पुरावे तर अगदी ठाशीव आहेत. भारतभर पसरलेली ती माणसे कोणती ना कोणती भाषा बोलत असतीलच. ते लोकसमूह आकाशातून पडलेले नसल्याने एकमेकांशी जोडलेले असणे साहजिक आहे. त्याचमुळे त्यांच्या भाषाही एकमेकींशी जोडलेल्या असणार. त्या जोडणीचा अभ्यास कधी केला गेलेला नाही. त्या-त्या भाषेतील अभ्यासक फक्त त्या-त्या भाषेचे व्याकरण आणि रचना बघत असतात आणि त्यावरून निष्कर्ष काढत असतात. सखोल तुलनात्मक अभ्यास केला तर भारतीय भाषा परस्परविरुद्ध कुळातील आहेत असे मानण्याचे कारण राहणार नाही.

स्थानिक भाषा संस्कृतपासून अपभ्रंश होऊन निघालेल्या नाहीत तर त्या भाषांपासून उदभ्रंश होऊन म्हणजे त्यांच्यावर संस्कार करून संस्कृत निघालेली असावी हे खैरे यांचे मत सामान्य माणसाला सहज पटण्यासारखे आहे. कारण कोणतीही भाषा लोक आधी बोलत असतात. लोकांना भोवती जे पदार्थ दिसतात, ते ज्या वस्तू हाताळतात, ते ज्या नैसर्गिक प्रकिया बघतात त्यांना ते नावे देतात. उदाहरणार्थ पाणी, दगड, सूर्य, झाड, आग, वारा, आई, बाप, मूल, कोंबडा, बकरी, वाघ, जेवणे, झोपणे, बघणे, बुडणे इत्यादी गोष्टी कोणत्याही आदिम समाजात असतातच. त्याला ते लोक ती ती नावे देतातच; त्यासाठी कोणीतरी संस्कृत पंडित येऊन नावे देण्यासाठी थांबत बसत नाहीत. त्यामुळे मराठीतील सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती संस्कृतमध्ये शोधणे व्यर्थ आहे. उलट, संस्कृतने निरनिराळ्या लोकभाषांतील शब्द घेतले असणे शक्य आहे. उदाहरणार्थ, संस्कृतमध्ये पाण्याला अनेक शब्द आहेत, जे थोड्या-फार फरकाने निरनिराळ्या बोलीभाषांत प्रचलित आहेत (कन्नड-नीर, हिंदी-पानी, बंगाली-जल). ते संस्कृतमधून त्या त्या भाषांत गेले असे म्हणण्याऐवजी संस्कृतने ते त्या त्या भाषांतून संकलित करून घेतलेले असणे अधिक संभाव्य आहे. कारण संस्कृतची प्रवृत्ती तशी आहे. इंग्रजी तिची शब्दसंपत्ती जसे संकलनाचे काम करून वाढवते, त्याच प्रकारे.

येथे कोणाच्या मनात असे येईल, की संस्कृत जर भारतीय उपखंडातील स्थानिक भाषांमधून निघाली असे मानले तर मग संस्कृतचा जो संबंध पारशांच्या इराणी भाषेशी किंवा त्याही पलीकडे लॅटिन-ग्रीक भाषांशी लागतो त्याचे स्पष्टीकरण कसे करायचे? त्याचे स्पष्टीकरण अजिबात अवघड नाही. एकदा लोक एकमेकांशी जोडलेले असतात हे समजले म्हणजे त्यांच्या भाषांची जोडसाखळी खूप लांब अंतरावर पसरलेली असू शकते. विशेषत: ऐतिहासिक काळात ज्या लोकांनी एक भला मोठा भूभाग सामायिक रीत्या वापरलेला असतो किंवा ज्यांच्या संस्कृती त्या भूभागावर निर्माण झालेल्या असतात, त्यांच्या भाषांमध्ये तशा तऱ्हचे संबंध असणे सहज शक्य आहे. भारतातच बघायचे झाले तर तमिळ-कन्नड-कोकणी-मराठी-अहिराणी-गुजराती-मारवाडी-राजस्थानी-हिंदी-पंजाबी-उर्दू-पख्तून-फारसी-अरेबिक अशी साखळी लांब अंतरापर्यंत विस्तारत जाईल. दूरवरील फक्त पख्तून आणि दक्षिणेतील नजिकची तमिळ या भाषा शेजारी शेजारी आणल्या तर त्या फार टोकाच्या भिन्न भिन्न भाषा आहेत असे वाटेल, पण मधली जोडसाखळी समजून घेतली (दर बारा मैलांवर बदलणारी कडी लक्षात घेऊन) तर मग त्यांच्यामधील संबंधांचे आश्चर्य वाटणार नाही. शिवाय, भाषा ही अचल नसते, लोक ती सदैव बदलत असतात, काही वेळा समाजातील धुरीण तिची वेगळ्या प्रकारे रचना करतात. ही गोष्ट लक्षात घेतली तर मग परिस्थिती कोड्यासारखी वाटणार नाही.

खैरे यांच्या या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या हाती लागते, ती म्हणजे मानवाचा सांस्कृतिक इतिहास हा फक्त सध्याच्या राष्ट्राच्या सीमांमध्ये न बघता फार मोठ्या भूभागावर बघितला गेला पाहिजे. म्हणजे भारतीय उपखंडातील लोकांच्या संस्कृतीचा वेध घ्यायचा असेल तर मग इजिप्तपासून ब्रह्मदेशापर्यंतचा विस्तार नजरेखाली घालायला पाहिजे- फक्त काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी इतिहासाचाही बराच लांबचा काळ, म्हणजे पाच-दहा हजार वर्षांचा, बघायची तयारी असायला पाहिजे. कारण लोक इतिहासपूर्व काळात फार आधीपासून या भूभागावर राहत आहेत. त्यांची नुसती स्थलांतरे झाली किंवा एकमेकांवर आक्रमणे झाली असे नाही तर त्या घडामोडी होत असतानाही किंवा नसतानाही लोकांची वस्ती चालूच होती. लोक एकमेकांना जोडून राहत होते. इतिहासास अलीकडच्या म्हणजे गेल्या सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपासूनच्या घडामोडींची काही माहिती आहे, पण त्यापूर्वीच्या घडामोडींची नाही. ती माहिती पूर्ण होईल तेव्हाच या बाबतीत ठाशीव विधाने करता येतील.

आफ्रिकेतून झालेल्या स्थलांतराचा जो उल्लेख आधी केला (त्याला इंग्रजीत ‘आउट ऑफ आफ्रिका हायपोथिसिस’ म्हणतात.) त्याने या समजुतीला पाठिंबा मिळतो. जर माणूस आफ्रिकेतून निघून सर्वत्र पसरला असेल तर मग तो जोडसाखळी करतच पुढे सरकला असेल. काही समूह जे एकदम लांब पल्ल्यावर स्थलांतर करते झाले असतील आणि इतरांपासून बराच काळ विलग राहिले असतील (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील आदिवासी) त्यांच्यामध्ये भाषेची रचना पूर्णपणे वेगळ्या रीतीने होणे शक्य आहे. पण जे समूह एका सलग भूभागावर एकमेकांशी सतत, दीर्घकाळ संबंध येणाऱ्याश पद्धतीने राहिले असतील त्यांच्या भाषा एकमेकींशी जोडलेल्या असणे साहजिक आहे. ती जोडणी कशी आहे ते अभ्यासकांनी समजून घेतले पाहिजे आणि विश्वनाथ खैरे नेमके तेच करत आले आहेत.

खैरे यांच्या मांडणीचे सध्याच्या वैचारिक जगात काय महत्त्व आहे? पहिली गोष्ट म्हणजे खैरे सध्याच्या रूढ समजुतींना कलाटणी देत आहेत. इंग्रजीत ज्याला ‘पॅराडाइम शिफ्ट’ म्हटले जाते, तशा प्रकारची ती घटना आहे. खैरे सध्याच्या विचारांचा मोहरा संस्कृतकडून लोकभाषांकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, उच्च वर्गाकडून बहुजन वर्गाकडे आणि मुख्य म्हणजे संकुचितपणाकडून मोकळेपणाकडे फिरवत आहेत. हा अत्यंत पुरोगामी (म्हणजे पुढे जाणारा) असा विचार आहे.

खैरे यांचे पुरोगामित्व कशात आहे? सर्वांत प्रथम म्हणजे ‘भाषा ही अडाण्याची’ असे खैरे ठासून सांगत आहेत. भाषा ही उच्च किंवा अभिजनवर्गाची देणगी आहे असे मान्यवरांत समजले जाते. अभिजन किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर शहरातील उच्चवर्णीय लोक जी भाषा बोलतात तीच खरी भाषा आहे असे मानले जाते. खैरे त्याच्या बरोबर उलट भूमिका मांडत आहेत. ते असे म्हणतात, की भाषेच्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यायचा असेल तर तथाकथित अडाणी किंवा अशिक्षित लोकांकडे बघायला पाहिजे. आणि खैरे तसे म्हणताना त्यांच्या विचारविश्वाचा मोहरा हा दलित, आदिवासी, भटके अशा वंचित वर्गाकडे फिरवत आहेत. कारण ते लोक सामाजिक-आर्थिक बाबतीत जसे वंचित राहिले आहेत तसेच भाषेला मान्यता मिळण्याच्या बाबतीतही. खैरे त्या वर्गाला भाषेच्या अभ्यासामध्ये अग्रभागी आणत आहेत. मुख्य म्हणजे तसे करताना त्यांच्या अस्मितेलाही महत्त्व देत आहेत. जनसमूहाची अस्मिता किंवा ओळख ही त्याच्या भाषेत असते. खैरे यांनी वंचित समूहांची अस्मिता जागी करून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी जो भाषिक ऐवज पाहिजे तो उपलब्ध करून दिला आहे.

खैरे यांच्या पुरोगामी विचारांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विचार हा कृषिकेंद्री आहे. त्यांनी त्यात शेतकऱ्याला म्हणजे ग्रामीण शेतीसंस्कृतीला महत्त्व दिलेले आहे. शहरी-औद्योगिक व्यवस्थेत शेतकऱ्याला महत्त्व उरलेले नाही. ती व्यवस्था वर्षानुवर्षे शेतकऱ्यावर अन्याय तर करत राहिलीच, पण जागतिकीकरणाच्या प्रकियेत शेतकऱ्यालाच जीव देण्यास भाग पाडू लागली आहे. भारतासारख्या देशात संस्कृतीची जी जपणूक केली गेली ती शेतकऱ्याकडूनच. भाषेतील केवळ निरनिराळे शब्द नव्हेत तर भाषा वापरण्याच्या विविध तऱ्हच या शेतीसंस्कृतीत जपल्या गेल्या. अन्न ही माणसाची पहिली गरज. अन्न आणि भाषा परस्परांशी किती घट्ट जोडल्या गेलेल्या असतात हे वेगळे सांगण्यास नको. लहान मूल पहिल्यांदा तोंडातून आवाज काढते तेच मुळी ‘मम्म्म् मम्म्म्’ असा. त्यामुळे अन्न पिकवणारी जी संस्कृती तीच भाषा पिकवणारी पहिली संस्कृती असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेती ही निसर्ग आणि माणूस यांचा प्रत्यक्ष संबंध घडवणारी व्यवस्था आहे. त्यामुळे भाषेमधील पर्यावरणीय किंवा निसर्गाशी संबंधित असा जो ऐवज असतो तो शेतीमधून व्यक्त होत असतो. दुसरे असे, की शेती ही निरंतर चालू शकेल अशी उत्पादक व्यवस्था आहे. खनिजांचे किंवा नैसर्गिक वायूचे साठे संपू शकतात, पण जमीन, पाणी, झाडे व सूर्यप्रकाश यांच्या संयोगाने बनणारी शेतीची व्यवस्था ही चिरंतन आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कृषिसंस्कृती ही मानवी संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा राहणार.

खैरे यांच्या विचाराचे तिसरे पुरोगामी वैशिष्ट्य म्हणजे तो स्त्रीकेंद्रीही आहे. खैरे ज्या लोकभाषांना महत्त्व देतात, त्या भाषा आणि ती भाषिक संस्कृती ही मुख्यत: स्त्रियांनी जपलेली आहे. किंबहुना स्त्रियांच्या अस्तित्वाचा सगळा आविष्कार हा त्या लोकभाषांतून, बोलींतून आणि लोकसंस्कृतीतून झालेला आहे. स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती, त्यामुळे स्त्रियांचा प्रवेश लिखित साहित्यात उशिरा झाला, पण त्याचा अर्थ स्त्रियांना भाषा बोलता येत नव्हती असा नव्हे. उलट, भाषेचा जास्तीत जास्त आविष्कार घराच्या, शिवाराच्या आणि गावाच्या ज्या परिघामध्ये होत होता, तो परीघ स्त्रियांच्या अमलाखाली होता. त्यामुळे भाषेची सगळी ताकद, सगळा जिवंतपणा आणि सगळी वाढ ही स्त्रियांच्या जगण्यातून निष्पन्न झालेली आहे. कोणत्याही भूभागातील स्त्रीमनाला किंवा स्त्रियांच्या इच्छा-आकांक्षांना समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या तोंडची भाषाच समजून घ्यायला पाहिजे. खैरे यांचा लोकभाषांबद्दलचा आग्रह हा अशा प्रकारे स्त्रीवादाचा आहे. तो भारतीय स्त्रीवादाची उभारणी करण्यासाठी जसा पोषक आहे तसाच भारत विद्या शास्त्राला (इंडॉलॉजीला) स्त्रीवादाचे भान आणून देण्यासही उपकारक आहे.

विश्वनाथ खैरे यांचे लिखाण नुसते माहितीपर नाही तर प्रचंड मनोरंजकही आहे. सर्वसामान्य माणसाला तो कोण आहे? त्याची जात म्हणजे काय? त्याची भाषा कशी निर्माण झाली- तिचे इतर भाषांशी काय संबंध आहेत? निरनिराळ्या शब्दांची गंमत काय असते? असे प्रश्न पडत असतात. खैरे यांच्यासारखे लोक त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास धडपडत असतात आणि फक्त शोधतात असे नव्हे तर त्यांना जे समजले, ते लोकांपुढे ठेवत असतात. वैयक्तिक ज्ञानाचे रूपांतर सामाजिक ज्ञानात करत असतात आणि ते सुद्धा अगदी सोप्या भाषेत. त्यातूनच मानवी संस्कृती निर्माण होत असते.
मिलिंद बोकील  msbokil@gmail.com 

About Post Author

Previous articleचवीचे मराठी खाणे
Next articleचित्रकला आणि माझं जगणं
मिलिंद बोकील हे लेखक व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांची पौगंडावस्थेतील शाळकरी मुलांचे भावजीवन चित्रित करणारी ‘शाळा’ ही कादंबरी प्रसिद्ध आहे. शिवाय ‘उदकाचिया आर्ती’, ‘झेन गार्डन’, आणि ‘महेश्वर-नेचर पार्क’ हे कथासंग्रह; ‘गवत्या’ ही कादंबरी; ‘एकम’, ‘समुद्र’, ‘रण-दुर्ग’, ‘मार्ग’ आणि ‘सरोवर’ ह्या लघु कादंबऱ्या; समाजशास्त्रीय संशोधनावर आधारित ‘जनाचे अनुभव पुसतां’, ‘कातकरी: विकास की विस्थापन’, ‘गोष्ट मेंढा गावाची’, ‘कहाणी पाचगावची’ ही पुस्तके; ‘समुद्रापारचे समाज’ हे विदेशी समाजचित्रण; ‘साहित्य, भाषा आणि समाज’ व ‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’ ही वैचारिक पुस्तके आणि ‘वाटा आणि मुक्काम’ हे सहलेखन प्रसिद्ध आहे.

2 COMMENTS

Comments are closed.