विश्वचरित्र कोशकार – श्रीराम कामत

0
72
_shriram_kamat

श्रीराम कामत हे ‘विश्वचरित्रकोशाचा अखेरचा खंड’ आणि ‘बोरकरांचे समग्र साहित्य प्रकाशन’ असे दोन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून निवृत्त होणार होते; पण, तोच मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला! त्यातील शोकात्म नाट्य असे, की कामत यांनी त्यांना कोशाच्या कामी मदत करणारे वाईचे सु.र. देशपांडे यांना मृत्यूच्या त्या रात्री तातडीने फोन केला. ते दोघे अर्धा-पाऊण तास बोलत होते. “आता, माझ्यानंतर उरलेले काम तुम्हालाच पूर्ण करायचे आहे. अन्य सहकारी मदत करतील. पण, मुख्य भार तुम्हाला उचलायचा आहे” असे ते आर्जवून सांगत होते. उलट, देशपांडे “ठीक आहे. मग बोलू. फार बोलू नका” असे त्यांना बजावत होते. त्यांचे ते संभाषण संपले आणि तासाभरात श्रीराम कामत यांची प्राणज्योत मावळली. त्यांना संशोधन कार्याच्या ध्यासात असा मृत्यू आला!

कामत यांनी विश्वचरित्र कोशाचे फार मोठे कार्य अंतिम टप्प्यापर्यंत आणून पोचवले होते, पण त्यांना त्या स्वप्नपूर्तीचा आनंद काही उपभोगता आला नाही. मात्र त्यांनी ‘विश्वचरित्रकोश’ या एकमेवाद्वितीय प्रकल्पाचे शिवधनुष्य जिद्दीने उचलले, त्याकरता तेहतीस वर्षें अथक परिश्रम केले. ‘महाराष्ट्राचा विश्वकोश’ प्रकल्प सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना पंचेचाळीस वर्षें रेंगाळला; श्रीराम कामत यांनी मात्र प्रचंड काम एकट्याच्या हिंमतीवर, आर्थिक पाठबळ नसताना तीसएक वर्षांत पूर्णत्वास नेले ही बाब कोणाही माणसाला अभिमानास्पद वाटावी अशीच आहे.

श्रीराम पांडुरंग कामत यांचे गोव्यातील अस्नोडा हे मूळ गाव. ते म्हापशाहून दहा-बारा किलोमीटर अंतरावर आहे. त्यांचा जन्म 17 मे 1934 रोजी झाला. कामत यांना कला व साहित्याविषयी विलक्षण आकर्षण होते. त्यांना तेथील पोर्तुगीज राजवटीत मराठी शिक्षण मनासारखे घेता आले नव्हते. म्हणून त्यांनी मॅट्रिक होताच, वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी मुंबई गाठली. ते मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये मराठी-इंग्रजी विषय घेऊन एम‌ ए झाले. त्यांनी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची ‘साहित्यविशारद’ ही परीक्षाही दिली. त्यांनी त्याच आवडीतून पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश घेतला. त्यांचे वृत्तपत्रीय स्तंभलेखन, अनुवादकार्य, ललितलेखन सुरूच होते. ते गोवा मुक्तीनंतर गोव्यात परतले. त्यांनी बा.द. सातोस्कर यांच्या संपादकत्वाखाली ‘गोमंतक’ या दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर ‘मांडवी’ मासिक सुरू केले. कामत यांनी ‘मांडवी’च्या संपादकीय लेखात ‘गोव्याच्या मुक्ततेनेच भारताचे स्वातंत्र्य पूर्ण झाले आहे. भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक असणाऱ्या महाराष्ट्रातच गोमंतकाचे विलिनीकरण होईल, अशी आपण आशा करूया’ असे नमूद केले होते. त्यांनी पहिल्याच अंकात विंदा करंदीकर, बा.भ. बोरकर, इंदिरा संत, कृ.ब. निकुंब व शंकर रामाणी यांच्या कविता छापल्या. त्यामध्ये ‘गोमंतक साहित्य संमेलना’चा ऐतिहासिक आढावा घेणारा पु.रा. बेहेरे यांचा लेख आणि ‘गोमंतक : काल, आज आणि उद्या’ हा बा.द. सातोस्कर यांच्या लेखमालेतील पहिला लेख असा भरगच्च मजकूर होता. 

 ‘मांडवी’चे अंक वाचनीय असत. त्यांनी महाराष्ट्र आणि गोमंतक भागातील फार मोठ्या साहित्यिकांची मांदियाळी ‘मांडवी’भोवती गोळा केली होती. आचार्य अत्रे यांच्यापासून धनंजयराव गाडगीळ आणि बॅ. नाथ पै यांच्यापासून डॉ. पिसुर्लेकर यांच्यापर्यंत बडे लेखक त्या मासिकासाठी लिहीत. कामत यांचे व्यक्तिमत्त्व ऋजू, नम्र, हसतमुख आणि आतिथ्यशील होते. ते ‘मांडवी’ मासिकात लिहिण्यासाठी लेखकांना जी विनंतीवजा पत्रे पाठवत; त्यांतून त्यांचे ते व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होई. त्यांची मानधन पाठवताना “मानधन कागद-शाईच्या खर्चाइतके पाठवत आहे. स्वीकार व्हावा.” अशी नम्र भाषा असे.

‘मांडवी’चा केशवसुत विशेषांक गाजला. ‘मांडवी’ मासिक गोव्याबाहेर महाराष्ट्रात सर्वत्र जात असे. त्यांनी ‘मांडवी’ मोठ्या उत्साहाने 1962 ते 1970 असे आठ वर्षें चालवले. त्यांनी बा.भ.बोरकर षष्टयब्दीपूर्तीनिमित्त 1970 मध्ये तीनशेसदुसष्ट पृष्ठांचा अंक काढला. तो शेवटचा अंक प्रकाशित झाल्यावर ‘मांडवी’ बंद पडले.

कामत ‘मांडवी’ बंद झाल्यावर पणजीला ‘इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रागांझा’ या इमारतीतील ग्रंथालयात सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत बसू लागले. त्यांना  तेथे सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा ‘भारतवर्ष चरित्र कोश’ हाती लागला. त्यांनी प्राचीन, मध्यमयुगीन आणि अर्वाचीन असे तीन खंड पुन्हा पुन्हा वाचले. त्यातून त्यांच्या मनात ‘विश्वचरित्रकोशा’च्या संकल्पनेने आकार घेतला. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांतील नामवंत _kamatव्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असे त्याचे स्वरूप तयार झाले. त्याची जुळवाजुळव व संपूर्ण आराखडा करण्यास तीन- चार वर्षें लागली. कामत यांनी पु.ल. देशपांडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पंडित महादेवशास्त्री जोशी  अशांच्या भेटी घेऊन त्यांना ती कल्पना सांगितली. त्यांनी आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचे, कमला नेहरू उद्यानातील ज्ञानकोशकार केतकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. कामत यांनी 16 सप्टेंबरला 1977 रोजी, गणेश चतुर्थीच्या दिवशी अस्नोड्याला गणपतीसमोर बसून एका वहीवर ‘विश्वचरित्रकोशा’चा श्रीगणेशा केला! त्यांना गोवर्धन पर्वत उचलायचा होता, पण द्रव्यबळ काहीच नव्हते. त्यांच्याकडे केवळ जिद्द आणि कार्य पूर्ण करण्याचा ध्यास होता. त्यांनी पणजीजवळील पर्वरी गावी ‘विश्वचरित्र संशोधन केंद्र’ त्याच दिवशी, म्हणजे 16 सप्टेंबर 1977 रोजी स्थापन केले. केंद्राचे पहिले अध्यक्ष कविवर्य बा.भ बोरकर हे होते.

मानवी संस्कृतीच्या शिल्पकारांची यादी तयार करणे हे प्राथमिक स्वरूपाचे कार्य होते. पणजीसारख्या एका बाजूला असलेल्या शहरात वास्तव्य करून जागतिक कीर्तीच्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींची यादी करणे सोपे काम नव्हते. जगातील देशोदेशींच्या साहित्यिकांची, चित्रकारांची, राजकारण्यांची, समाजसुधारकांची, शास्त्रज्ञांची, पत्रकारांची, अभियंत्यांची –सर्व क्षेत्रांतील महनीय व्यक्तिमत्त्वांची चरित्रे अकारविल्हे देणे हे अवाढव्य कार्य होते. तसा ‘विश्वचरित्रकोश’ मराठीतच नव्हे तर अन्य भाषांतही नाही.

कामत यांनी पणजीच्या सेंट्रल लायब्ररीत साडेतीन वर्षें सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बसून जगातील चाळीस हजार नामवंत व्यक्तींची यादी तयार केली. मानवी जीवनातील विविध प्रकारच्या सातशेचाळीस क्षेत्रांचा त्यांनी धांडोळा घेतला आणि त्यातील कर्तृत्ववान व्यक्तींची सूची बनवली. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडे सूची पाठवून त्यांचे अभिप्राय मागवले. कोणती नावे गाळावीत- कोणती ठेवावीत या संबंधीचा सल्ला घेतला. पहिल्या टप्प्यावर वीस हजार नावे गाळण्याचे ठरले आणि अखेरच्या चाळणीत बारा हजार नावे निवडली गेली. नोंदी लिहिण्याचे काम त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना विनंती करून सोपवायचे, त्यांना स्मरणपत्रे पाठवायची हे सर्व व्याप एकहाती करणे सोपे काम नव्हते. श्रीराम कामत यांना त्या कामी पत्नीचा आधार मिळाला. गीता पर्वरी येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. त्यांनी कोशाच्या कामासाठी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यांनी विश्वचरित्रकोशाच्या कामात स्वत:ला झोकून दिले. वाईच्या ‘विश्वकोश’ कार्यालयातील डॉ. सु.रा. देशपांडे आणि अ.ना. ठाकूर या अनुभवी संपादकांचे सहाय्य मिळतच होते.
देशभरातील लेखकांशी पत्रव्यवहार करावा लागला. भारतीय भाषांमधील विविध कोश, मॅक् ग्रा व्हेल, ब्रिटानिका, वेब्स्टर यांचे कोश संदर्भासाठी उपयोगी पडले. सुमारे दोनशेचाळीस जणांनी नोंदी लिहिल्या. लिहिणाऱ्यांचे नाव नोंदीच्या तळाशी देण्यात आले आहे. काही नोंदी संपादकवर्गाने प्रसिद्ध केल्या. तेथे ‘वि. सं. कें.’ (विश्वचरित्र संशोधन केंद्र) असा उल्लेख करण्यात आला आहे. इतर भाषांशी, देशांशी संबंधित असलेल्या नोंदी इंग्रजीतून मिळवल्या.

अने_kamat_patniकदा वाचनालयात कामत आणि ग्रंथपाल दोघेच असत. कामत यांच्या कामाचा झपाटा पाहून ग्रंथपाल त्यांची वेळ संपली तरी कामत यांना सोबत करण्यासाठी बसून राहत. कामत यांच्यापुढे ज्ञानकोशकार केतकरांचा आदर्श होता. वाईच्या विश्वकोश प्रकल्पात अनेक वर्षें काम करणारे अनुभवी कर्मचारी सवड मिळाली, की गोव्याला येत. कोशाची तांत्रिक बाजू सांभाळत.

बा.भ. बोरकर यांच्या नंतर ‘विश्वचरित्र संशोधन केंद्रा’चे अध्यक्ष अनुक्रमे प्राध्यापक गोपाळ मयेकर, कोशकार स.गा. देव, प्राध्यापक मे.पुं. रेगे, वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर हे झाले. विश्वचरित्रकोशाचा पहिला खंड अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर 6 मे 2000 रोजी प्रकाशित झाला. दुसरा खंड गुढीपाडव्याला 2 एप्रिल 2003 रोजी प्रसिद्ध झाला. पुढील तीन खंड अनुक्रमे 2005, 2007 आणि 2009 साली प्रकाशित झाले. मराठी विश्वकोशाच्या आकाराच्या, हजाराहून अधिक पृष्ठांच्या एकूण सहा खंडांत तो प्रकल्प पूर्ण झाला. पहिल्या पाच खंडांत प्रत्येक खंडागणिक दोन हजार ते पंचवीसशे थोर व्यक्तींची चरित्रे असून सहाव्या खंडात पाचशे शिल्पकारांची ओळख आहे. आ.रा.भट यांची ‘अंगद’ ही नोंद पहिली आणि मयेकर यांची ‘ज्ञानेश्वरी’ ही नोंद अखेरची. सहाव्या खंडात संपूर्ण सूची देण्यात येणार होती. कामत ती सूची अहोरात्र तयार करण्यात गुंतले होते.
प्रकल्पास आरंभ झाला तेव्हापासून कामत यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागले. शासनाकडून अनुदान मिळत नव्हते. काही दानशूर गोवेकरांनी थोडीफार मदत केली, परंतु गरज फार मोठी होती. मिठ्ठास वाणी आणि ऋजू स्वभाव एवढेच कामत यांचे भांडवल. खंड प्रसिद्ध होऊ लागले, जाणकारांनी कौतुकाचा वर्षाव केला. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे संशोधनास प्रोत्साहन म्हणून कामत यांना प्रतिष्ठित वरिष्ठ छात्रवृत्ती देण्यात आली. छोटेमोठे पुरस्कार, मानसन्मान त्यांच्या वाट्याला आले. त्यांच्या कामात बायपास शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांपूर्वी खंड पडला. पत्नी गीता यांचे निधन कामत यांच्या आधी दीड वर्ष झाले. कामत यांचा आधारस्तंभ मोडून पडला, विरक्ती आली. दोन्ही योजना अपूर्ण राहिल्या… हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यापूर्वीच मृत्यूने त्यांना गाठले. अखेरीस, कामत यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी 2010 साली अखेरचा सहावा खंड पूर्ण केला. 

– संकलित
(मुख्य भाग सुभाष भेंडे यांच्या लेखातील माहितीचा)

About Post Author