विविधगुणी प्रभाकर साठे आणि त्यांची गीतगीता

0
22
_Prabhakar_Sathe_Aani_Gitageeta_1.jpg

प्रभाकर साठे हा माणूस विविधगुणी आहे आणि त्यांचे गुण, वय पंच्याऐंशी उलटले तरी अजून प्रकट होत आहेत. त्यांचे कायम वास्तव्य अमेरिकेत कॅलिफोर्नियात असते, परंतु ते त्यासाठी ऊर्जा भारतातून – तीही पुण्यामधून घेऊन जातात. त्यासाठी ते भारतात काही काळ येत असतात. ‘गीतगीता’ हे त्यांचे नवे अपत्य. त्याचे दोन प्रयोग अमेरिकेत केल्यावर, त्याची डीव्हीडी घेऊन ते भारतात आले आहेत आणि येथील संधींचा शोध घेत आहेत. ‘गीतगीता’ हा पुणे-कॅलिफोर्निया यांचा संयुक्त आविष्कार आहे. त्यामध्ये गीतेचे तत्त्वज्ञान गाण्यांमधून व पडद्यावरील दृश्यांतून लोकांसमोर मांडले जाते. साठे यांनी हा खटाटोप गीतेचे सार विद्वतजनांपर्यंत सीमित न राहता आमजनांपर्यंत पोचावे हे उद्दिष्ट घेऊन मांडला आहे.

साठे मूळ पुण्याचे. त्यांनी भारत सरकारमध्ये मोठी कारकीर्द गाजवली. त्यांनी नेपाळ, मंगोलिया, इराण या देशांमध्ये दूतावासातील अधिकारी म्हणून अत्यंत कसोटीच्या काळात काम केले. ते नेपाळमध्ये होते तेव्हा वीस व्यापारी चौक्यांवर नजर ठेवण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. दलाई लामा त्याच बेताला भारतात आश्रय घेऊन आले. ते मंगोलियात होते तेव्हा रशिया-चीन तणाव शिगेला पोचला होता. ते तेथून इराणमध्ये गेले तेव्हा तेथील सत्ताधीश शहाचे शेवटचे दिवस भरले होते आणि वर्षभरातच शहा पदच्युत झाले! त्यांची बदली भारतात आधीच झाली होती. जनता सरकार तेथे होते. साठे सरकारने जाहीर केलेल्या खास स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ घेऊन सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी पत्नी-मुलांसह भारतातील चंबुगबाळे आवरून वर्षभरात अमेरिकेस प्रस्थान ठेवले. त्यांनी त्यांचा भारताच्या विदेश सेवेतील अनुभव ‘राजदुताची रोजनिशी’ या लेखमालेत *(प्रसिद्धी – एकता, कॅनडा) शब्दबद्ध केला आहे. त्यांनी व त्यांच्या पत्नीने अमेरिकेत मिळेल ती नोकरी स्वीकारत नवा संसार थाटला व अखेरीस, संगणक शिक्षण घेऊन त्या क्षेत्रात रीतसर निवृत्तीपर्यंत नोकरी केली. त्यांच्या पत्नी, कौमुदी 2009 साली वारल्या. “नाट्य आणि संगीत या विषयांवरील सगळ्या सादरीकरणांत पत्नी कौमुदी यांचे विशेष सहाय्यच नव्हे भरघोस पाठिंबा आणि प्रोत्साहन मला अविरत लाभले” असे साठे अभिमानाने सांगतात. त्‍यांचा मुलगा आणि मुलगी उत्तम रीत्या स्थिरावली आहेत. साठे यांना नातवंडे आहेत.

साठे यांच्या या चरित्रक्रमात अनेक धक्के आहेत. अनेक माणसे तसे धक्के नोकरीव्यवसायात पचवत असतात. साठे यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी गुणदर्शनाचा मार्ग स्वीकारला व त्यांचे अंगभूत कौशल्ये सुबक रीतीने लोकांसमोर मांडली. अंगभूत गुण कोणते? – तर कुतूहल-जिज्ञासा-धडाडी. त्यांना विमानदलातील सेवेपासून भाषाज्ञानापर्यंत सर्व गोष्टींत तरुणपणापासून आस्था होती आणि कोठे बिचकायचे नाही, उलट पुढे अग्रस्थानी जाण्याचा प्रयत्न ठेवायचा असा त्यांचा बाणा होता. त्यामुळे ते वेळोवेळी सर्वांगांनी प्रकटत राहिले. त्यांनी अमेरिकेत नाट्यप्रयोग केले, संगीतविषयात संशोधन केले, ‘विलास खानी’ नाटक प्रस्तुत केले. लोकांची गरज म्हणून ज्ञानप्रबोधिनीच्या विधींनुसार लोकांच्या घरोघरी जाऊन पौरोहित्य केले – चक्क नव्वद लग्ने लावली! त्यांना त्यांचे ‘मराठी नाटकातील विनोदाचे स्थान’ आणि ‘मराठी नाटकातील संगीताचे स्थान’ हे दोन प्रयोग विशेष सांगावेसे वाटतात, कारण त्यामध्ये त्यांनी त्या दोन विषयांत केलेले संशोधन आहे – त्यासाठी घालवलेल्या चार फलदायी वर्षांचा तो मनोरम काळ आहे; त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी आहेत आणि संहिता सिद्ध झाल्यावर त्यांचे रंगमंचावरील सादरीकरण आहे. साठे अभिमानाने सांगतात, की चिं.वि. जोशी हे त्यांचे आतेमामा होते. त्यांनी ‘मराठी नाटकातील विनोदाचे स्थान’मध्ये वेगवेगळ्या शैलींचे सहा नाट्यप्रवेश निवडून ते सादर केले. त्यातून एक पोटकार्यक्रम निर्माण झाला तो सात निवडक फार्सचा – फार्स हेही मराठी रंगभूमीचे बलस्थान मानले जाते ना! त्यांनी त्या प्रयोगांत अमेरिकेतील पंचाहत्तर कलाकारांना घेतले होते. त्यांपैकी पस्तीसजण तर प्रथमच स्टेजवर येत होते.

त्यांनी ‘मराठी नाटकातील संगीताचे स्थान’ या प्रयोगासाठी नाट्यसंगीतातील नवरसांवर आधारित सत्तावीस गाणी निवडली व ती वेगवेगळ्या गायकांनी मूळ शैलीत सादर केली. साठे त्या कार्यक्रमाबद्दल बोलताना हळवे होतात; कारण तो पहिला कार्यक्रम 2010 साली, त्यांची पत्नी, कौमुदी (माहेरच्या केळकर) हिच्या पहिल्या स्मृतिदिनी सादर झाला होता. तो इतका उत्तम वठला, की त्याचा दुसरा प्रयोग शिकागो येथे ‘बृह्नमहाराष्ट्र मंडळा’च्या द्विवार्षिक अधिवेशनात ‘मुद्दाम निमंत्रित’ म्हणून सादर झाला.

प्रभाकर साठे यांच्या विविध गुणांत भाषाज्ञान हे मुद्दाम नमूद करायला हवे. त्यांना संस्कृत, नेपाळी, रशियन, जर्मन, उर्दू या भाषा येतात. ते म्हणाले, की ते रशियन भाषा इतक्या सफाईदारपणे बोलतात, की त्या भाषेतून संभाषण फोनवरून झाले तर दुस-या माणसास साठे यांचे मूळ भारतीय-अमेरिकन रूप कळत नाही.

_Prabhakar_Sathe_Aani_Gitageeta_3.jpgसाठे यांच्यावर माधवानंदांचा प्रभाव मोठा आहे. माधवानंद हे मूळ नगरकर. ते पावस येथील स्वरूपानंदांच्या परंपरेतील गीतेचे अभ्यासक आहेत. माधवानंदांचा आश्रम पुण्यात अलंकार पोलिस चौकीजवळ आहे. माधवानंद हे माधवनाथांचे शिष्य. ते अमेरिकेच्या व्याख्यानदौ-यावर दरवर्षी जातात. त्यांच्या 2014 सालच्या दौ-यात त्यांची वेळ घेऊन प्रभाकर साठे यांनी ‘गीतगीता’चा कार्यक्रम योजला. त्यामुळे माधवानंदांचे निवेदन त्यात येऊ शकले. साठे म्हणाले, की माधवानंदांच्या निवेदनाने श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन व्यक्तिमत्त्वांचा तोल नीट सांभाळला गेला. साठे त्यामुळे कार्यक्रमनिर्मितीवर विशेष खूष आहेत. ते म्हणतात, की स्वामींचे निवेदन, नाना दातारांची गाणी आणि त्यांच्या मुलांचे संगीत दिग्दर्शन असा त्रिवेणी संगम उत्तम जमला आहे. त्याला देखणेपणा आला तो साठे यांच्या प्रयत्नांतून. त्यांनी पडद्यावरील इलेक्ट्रॉनिक इफेक्ट तर महाभारताला शोभेसे अचूक मिळवलेच, पण रंगमंचावरील ‘प्रॉपर्टी’देखील कोठून कोठून पैदा केली. श्रीकृष्ण-अर्जुनाचा बारा बाय बाराचा रथ चक्क पुण्यात बनवून घेतला व फोल्ड करून अमेरिकेत नेला.

प्रभाकर साठे यांच्या मनात गीतेच्या संगीत नाट्यरूपांतराची अफलातून कल्पना तीन वर्षांपूर्वी उद्भवली आणि ती 2014 सालच्या एप्रिल महिन्यातील लॉस एंजेलिस व बे एरिया येथील प्रयोगांनी सिद्धही झाली. त्यांच्याच प्रयोगशील दिग्दर्शनाखाली ते प्रयोग घडून आले. अमेरिकेत कॅलिफोर्नियातील रंगमंचावर गीतेचा नाट्यरूप अवतार प्रकटला! बे एरियातील ‘महाराष्ट्र मंडळा’तर्फे सॅन रमोन येथे झालेल्या कार्यक्रमास साडेतीनशेच्यावर रसिक प्रेक्षक/श्रोते उपस्थित होते. सारे पावणेतीन तासांच्या सलग (मध्यंतर विरहित) कार्यक्रमात रंगून गेले.

साठे यांनी पुण्याच्या ‘स्वरूपयोग प्रतिष्ठान’चे स्वामी माधवानंद यांच्याशी संपर्क केला. स्वामीजींनी सक्रिय सहकार्य दिले. मुंबईचे नारायण तथा नाना दातार (सध्या वास्तव्य अथश्री, बाणेर, पुणे) यांचे गीतेवरील बावन्न कवितांचे ‘गीत गीता’ हे पुस्तक 1982 साली ‘गीता धर्म मंडळा’तर्फे प्रसिद्ध झाले आहे. कार्यक्रम त्या कवितांच्या आधाराने करण्याचे ठरले. साठे, स्वामी माधवानंद आणि दातार यांनी तीन वर्षें विचारमंथन करून कार्यक्रमाची संहिता केली. दातार यांची रचना ओघवती आहे. त्यांची गीते सोप्या पण विषयास अनुरूप अशा भारदस्त भाषेत आहेत. ती माधवानंद यांनाही आवडली. ते म्हणतात, की गीतेचा भावार्थ त्या गीतांत समर्पकपणे व्यक्त झाला आहे. स्वामीजींनी एकूण बावन्नपैकी चौदा गीते निवडली. त्याचबरोबर स्वरूपानंद आणि मुंबईच्या गीता पटवर्धन यांचेही एकेक गीत घेण्यात आले. टोरांटोचे संगीतज्ञ नरेंद्र दातार यांनी गीतांना सुंदर, कर्णमधुर चाली दिल्या. गीतांचे शब्द व्यवस्थित कळावेत म्हणून गायल्या जाणा-या गीतांची छोटी पुस्तिका प्रत्येक श्रोत्याला देण्यात आली होती. धृतराष्ट्र (सुशील करमरकर) कुरुक्षेत्रावरील हकिगत विचारत आहे, संजय (निखिल करमरकर) दोन्ही बाजूंच्या सैन्यांचे वर्णन करत आहे. हा व्हिडिओ-चित्रित भाग पडद्यावर दाखवण्यात आला. दृश्याने व त्याबरोबरच्या गीताने श्रोत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तिकडे अरुणाने सूर्याचा रथ पूर्व क्षितिजावर आणला आणि त्याच वेळी इकडे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्रावर उतरवला. धावणा-याल घोड्यांच्या टापांचा टप् टप् आवाज ऐकू येत होता. कृष्णार्जुन रथातून उतरले.

पार्थाचे मन त्याचे बांधवच युद्धभूमीवर असलेले पाहून करुणेने व्यापून गेले. तो व्यथित स्वरांत म्हणू लागला –

“कसा मी मारू या स्वजना?

कसा रोखुं मी बाण,

येतसे अंधारी नयना” ||

अर्जुनाच्या भूमिकेत होते सुबोध करमरकर. संशयग्रस्त अर्जुन, मार्मिक सवाल करणारा बुद्धिवंत अर्जुन, कृष्णभक्त अर्जुन, गीतोपदेशानंतर सर्व संशय नष्ट होऊन युद्धाला सज्ज झालेला वीर अर्जुन… अर्जुनाच्या अशा बदलत्या अवस्था देखण्या सुबोध करमरकर यांनी प्रभावी संवाद आणि समर्थ अभिनय यांतून उत्तम प्रकारे व्यक्त केल्या. कार्यक्रमात बहुतांश गाणी कृष्णाची आहेत. नचिकेत यक्कुंडी हे कानडी गायक कृष्ण झाले होते. नचिकेत हे पद्मभूषण पंडित बसवराज राजगुरू यांचे शिष्य आहेत. त्यांचा आवाज मधुर, लवचीक आणि उंच आहे. गायकी श्रेष्ठ प्रतीची आहे. विविध रागांतील त्यांची सारी गाणी उत्तम झाली. ती श्रोत्यांच्या मनात बराच काळ गुंजन करत राहिली. त्यांचा अभिनयही चांगला होता.

_Prabhakar_Sathe_Aani_Gitageeta_2.jpgगीतेतील विश्वरूप-दर्शन हा भाग नाट्यमय आहे, पण त्याचे प्रत्यक्ष दर्शन प्रेक्षकांना घडवणे हे दिग्दर्शकाच्या दृष्टीने आव्हान आहे. साठे यांनी ते आव्हान समर्थपणे पेलले. तो एकंदर कार्यक्रमातील सर्वोत्तम भाग म्हटला पाहिजे. साठे आणि तंत्रज्ञ सल्लागार अतुल वैद्य यांनी त्या प्रसंगासाठी कोठून कोठून विविध प्रकारची अद्भुत दृश्ये, व्हिडिओ-चित्रित करून ठेवली होती. रंगमंचावर “पार्थासाठी योगेश्वर तो करि अद्भुत लीला | दावितो विश्वरूप त्याला || ” हे गीत गायले जात असताना, पडद्यावर भूकंप, ज्वालामुखी, अंतराळातील कित्येक अकल्पित गोष्टी, सृष्टीतील विविध आश्चर्य इत्यादींची भव्य चित्ताकर्षक रंगचित्रे दाखवली जात होती. ते अक्षरश: अद्भुत-भीषण विश्वरूपदर्शनच होते! गीतेतील शब्दांचा भावार्थ व्यक्त करणारा तो भाग पडद्यावर पाहणे हा उपस्थितांसाठी रोमांचकारी अनुभव होता. साठे आणि वैद्य या जोडीचे परिश्रम आणि प्रतिभा यांना दाद दिलीच पाहिजे!

गीतेचे तत्त्वज्ञान यथार्थ रीत्या मांडण्याकरता विवेचनात्मक निवेदनाची गरज होती. माधवानंद यांनी ती निवेदने केली. स्वामीजींचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि विद्वत्तायुक्त व प्रसंगोचित विनोदयुक्त वक्तृत्व यांमुळे स्वामीजींची निवेदने हा कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू ठरला. सभागृहात अ-मराठी श्रोतेही होते. कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून सर्व गीते आणि कृष्णार्जुनाचे संवाद यांचे इंग्रजी भाषांतर पडद्यावर दाखवले जात होते.

संजयाचे ‘उत्साहाने सन्मुख झाला अर्जुन युद्धाला | पाश केतूचे तोडून सविता मुक्त जणुं झाला | कहाणी सरली भूपाला ||’ हे गीत कार्यक्रमातील शेवटचे गीत होते. त्याचे पार्श्वगायन संगीत-नियोजक नरेंद्र दातार यांनी स्वत: केले आहे. त्या गीताच्या वेळी हस्तिनापुरातील भव्य राजप्रासादात धृतराष्ट्र व संजय यांच्या संवादाचे व्हिडिओ-चित्रण श्रोत्यांना पुन्हा दाखवण्यात आले. साठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समापन केले. ‘छंद एक हा लागो चित्ता | येतां जातां गावी गीता ||’ हे कार्यक्रमाचे ‘आयटेम साँग’ किंवा ‘थीम साँग’ कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनोज ताह्मणकर आणि नीरज साठे यांनी गायले होते. त्याचीच भैरवी नचिकेत यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस रंगमंचावर गायली. त्या वेळी सर्व कलाकार, वादक, तंत्रज्ञ, इत्यादी सर्वजण आणि साठे, स्वामीजी व गीतकार दातार या सर्वांनी रंगमंचावर येऊन प्रेक्षक/श्रोत्यांना अभिवादन केले. प्रेक्षक/श्रोत्यांनीही त्यांना ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले.

गायनाच्या साथीत संवादिनीवर विवेक दातार/गोपाळ मराठे, तबल्यावर सतीश आणि आशीष तारे हे पिता-पुत्र/संदीप कात्रे, व्हायोलिनवर सतीश गदगकर आणि टाळ-वादक अभिजित जेरे हे होते. त्या सर्वांची साथ संवादी ठरली व गीते उठावदार झाली, खुलली. सुरेश नायक आणि मुकुंद मराठे यांच्याकडे व्हिडिओ चित्रिकरणाचे काम होते. अतुल वैद्य या तज्ञ कलावंताचे मार्गदर्शन आणि परिश्रम दृक्-श्राव्य तंत्रज्ञानामागे होते. निखिल करमरकर हे प्रकाशयोजना सांभाळत होते. त्याशिवाय सीमा करमरकर, रेखा नायक, विद्या वैद्य, सतीश साठे, प्राची गोखले इत्यादींनी कार्यक्रमात साहाय्य केले आहे.

प्रभाकर साठे – 9511876956 (भारत), 4088069814 (कॅलिफोर्निया)
pkarsathe@gmail.com

– प्रतिनिधी

(टीप – ‘एकता’ हे उत्तर अमेरिकेतील मराठी लोकांनी कॅनडातून चालवलेले मराठी मासिक आहे.)

About Post Author