विमामहर्षी वासुदेव गणेश तथा अण्णासाहेब चिरमुले (Anna Chirmule – Father of Indian Insurance)

2
79

अण्णासाहेब चिरमुले

इंग्रजांनी मराठी राज्य जिंकले (1818) व त्यायोगे इंग्रजी अंमल हिंदुस्तानच्या बहुतेक सर्व क्षेत्रांवर लागू झाला. तेथून पुढे नव्या मनूचा उदय सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वगैरे क्षेत्रांमध्ये घडून आला. विविध ज्ञानशाखांची ओळख भारतीयांना इंग्रजी भाषेच्या प्रसारामुळे झाली. त्याचप्रमाणे, जगात घडणाऱ्या घडामोडी भारतीयांना कळू लागल्या. भारतीयांना इतर देशांमध्ये आर्थिक क्षेत्रात काय घडत आहे याचे ज्ञान होऊ लागले. वासुदेव गणेश तथा अण्णासाहेब चिरमुले यांचा जन्म त्या शतकाच्या उत्तरार्धात, 4 जून 1864 रोजी सातारा येथे झाला. अण्णांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. त्यांचा स्वभाव अबोल व शांत होता. ते एकटे एकटेच असत; परंतु शाळेतील खेळांमध्ये पुढे असत. त्यांना व्यायामाचीही आवड होती. तालमीत जाऊन जोर-बैठका काढणे आणि कुस्त्या खेळणे हा त्यांचा शालेय जीवनात नित्याचा दिनक्रम असे. त्यामुळे त्यांची शरीरप्रकृती उत्तम राहिली.

अण्णांचा अभ्यास उत्तम असल्याने त्यांना नादारी सहज मिळत असे. इतर मुले अभ्यासातील शंका विचारण्यासाठी अण्णांच्या घरी येत असत. अण्णांचा मुळात असलेला मितभाषी स्वभाव, त्यांना घरच्या आर्थिक स्थितीची जाणीव होऊ लागल्यावर गंभीर होत गेला. अण्णा मॅट्रिकच्या परीक्षेत पास झाले (1881). ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात शिकण्यास गेले. त्या काळी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची परीक्षा मुंबईस होई. आगगाडी मुंबई ते पुणे एवढीच असल्याने कोल्हापूरच्या कॉलेजातील अण्णा व त्यांचे सहाध्यायी बैलगाडीने प्रवास करून मुंबईस परीक्षेस गेले. अण्णांना परीक्षेत उत्तम गुण मिळाल्यामुळे त्यांना सर आल्फ्रेड शिष्यवृत्ती मिळाली.

अण्णांनी मुंबईस एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. त्यांचे विषय इतिहास व अर्थशास्त्र हे होते. अण्णासाहेब बी ए झाले (1884). त्यांच्यासमोर एम ए होऊन शिक्षक होणे वा एल एल बी करून वकील होणे हे दोन पर्याय होते. पैकी वकिलीत अधिक उत्पन्नाची शक्यता होती. शिवाय, त्या वेळेपर्यंत अण्णासाहेबांचे लग्न झाले होते व इतरही नातेवाईक त्यांच्यावर अवलंबून होते. त्यांनी एल एल बीचा अभ्यास व तात्पुरती शिक्षकी नोकरी सुरू केली. त्यांनी मुंबईत काही सहकाऱ्यांबरोबर दि मराठा स्कूल या नावाची एक शाळाही काढली. तेथून पुढे ते जमखंडी येथे शिक्षकाची नोकरी करण्यास गेले. अण्णासाहेब एल एल बी झाले (1890). अण्णासाहेबांना न्यायाधीश म्हणून नोकरी मुधोळ संस्थानात मिळाली. अण्णासाहेबांनी न्यायाधीशाचे काम निस्पृहपणे केले. एका खटल्यात न्यायदानामध्ये वरून अडथळा निर्माण करण्यात आला. त्या वेळी अण्णासाहेबांनी त्या अडथळ्यास न जुमानता कायदा पाळूनच निकाल दिला; परंतु लगेच, त्या नोकरीचा राजीनामाही दिला.

अण्णासाहेबांनी साताऱ्यात वकिलीस सुरुवात केली (1894). त्यांनी लॉ क्लास काढला. ते तो क्लास मोफत चालवत असत. ते कोर्टात अशिलाचा खोटा कज्जा असेल तर चालवण्यास घेत नसत. अण्णासाहेबांनी सातारा नगरपालिकेच्या अनेक कमिट्यांवर काम केले. त्यांनी नगरपालिकेसंबंधी कायद्याचा आणि संस्थेच्या कारभाराचा सखोल अभ्यास केला. नगरपालिकेतील अनावश्यक खर्च कमी करून तेथेही आर्थिक दक्षता आणली. त्यांनी युनियन क्लब व नगर वाचनालय यांच्या कमिट्यांवरही काम केले.

स्वदेशीचा विचार पुढे आल्यावर, अण्णासाहेब चिरमुले व त्यांचे काही सहकारी यांनी मिळून चार हजार रुपयांच्या भांडवलावर 1906 सालच्या पाडव्याला स्वदेशी कापड विकणारे दुकान, एक लिमिटेड कंपनी स्थापून सुरू केले. पांढरी शुभ्र साखर बनवण्याचा कारखाना मद्रास इलाख्यात तालीकूपम येथे पेरी कंपनीचा होता. अण्णासाहेब साखर तेथून स्वदेशी दुकानात मागवत. त्यांनी त्या साखरेची विक्री पुणेमुंबई येथेही केली. त्या दुकानास भांडवलाची कमतरता पडू नये म्हणून त्या दुकानात ठेवी ठेवून घेण्यास सुरुवात प्रथमपासूनच केली होती. ठेवींवर व्याजही दिले जाई. ठेवलेले पैसे जरुरीप्रमाणे परत मिळत. अण्णासाहेबांनी आर्थिक क्षेत्रात पुढे फार मोठे कार्य केले. त्याची सुरुवात तेथून झाली. विशेष म्हणजे,त्या दुकानांतून विधवा, विद्यार्थी आणि अनाथ यांपैकी लायक व्यक्तींना खरेदीवर सवलत दिली जात असे.

अण्णासाहेबांनी साताऱ्यात सहकारी मंडळ्या स्थापन करण्यात विशेष मदत केली. रजिस्ट्रारनी अण्णासाहेबांना सातारा जिल्ह्यात सहकारी मंडळ्यांचे सन्माननीय ऑर्गनायझर म्हणून नेमले. त्यांना शेतकी असोसिएशनचेही सन्माननीय चिटणीस नेमण्यात आले. अण्णासाहेब त्या संस्थांमार्फत दुष्काळनिवारणार्थ जंगलांची वाढ, उत्तम बी-बियाण्यांची निगा, शेतकऱ्यांस शेतकीचे शिक्षण इत्यादी विषयांबाबतचा प्रचार चालवत असत.

अण्णासाहेब स्वत:ची वकिली उत्तम तऱ्हेने करत. त्यांच्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवणे, निष्कलंक जीवन, निस्वार्थी वृत्ती, शांत व अबोल स्वभाव, विचारी कृती, निर्लोभीपणा या गुणांमुळे, साताऱ्यात आर्थिक क्षेत्रात नवीन काही करायचे असेल तर त्याचे पुढारीपण आपोआप त्यांच्याकडे येऊ लागले. अण्णासाहेबांनी पाच आर्थिक संस्था लिमिटेड स्वरूपात काढून नावारूपाला आणल्या, त्या अशा 1. दि वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कं. लि., 2. दि सातारा स्वदेशी कमर्शियल बँक लि., 3. दि युनायटेड वेस्टर्न बँक लि., 4. दि वेस्टर्न इंडिया ट्रस्टी अॅण्ड एक्झिक्युटर कं. लि., 5. विमा मुद्रक आणि प्रकाशक लि. या पाच आर्थिक संस्थांना अण्णासाहेबांच्या पंचकन्या असे म्हणतात. त्यामधील दि वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कं. लि. या कंपनीच्या व्यवसाय-व्यापाने अण्णासाहेबांचे नाव सर्वतोपरी झाले. विम्याचा धंदा हा चामट, चिवट व लोचट धंदा आहे असा लोकप्रवाद त्या काळी होता. लोक विमा एजंटांना चुकवत असत. विमा एजण्ट म्हणजे यमाजी भास्कर व विमा पॉलिसी म्हणजे मृत्युपत्रअसाच समज लोकांचा असे! अण्णासाहेबांनी मात्र विम्याचा धंदा यशस्वीपणे करून दाखवला व कंपनीस उच्चपदी नेले. विमा व्यवसायातील आदर्श कंपनी म्हणून दि वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कं. लि. या कंपनीस भारतवर्षात लौकिक प्राप्त करून दिला.

त्या कंपनीची सुरुवात मात्र वेगळ्याच पुढाकाराने झाली. काकाराव जोशी व वासुदेवराव जोशी हे साताऱ्यात विमा एजंट म्हणून विसाव्या शतकाच्या सुरुवातीस काम करत होते. त्यांच्या विमा कंपन्या परदेशी होत्या. दोघांच्याही मनात विम्याची स्वदेशी कंपनी असण्यास हवी अशी जाज्वल्य भावना होती. दोघांनी अण्णासाहेब चिरमुले यांना त्यासाठी प्रवृत्त केले. अण्णासाहेबांनी त्या विषयावरील वाचन केले, अभ्यास केला व त्यांचे मत पुढीलप्रमाणे मांडले आवश्यक भांडवल उभे करता आले, विमा उतरवण्याकरता उत्तम प्रकृतीच्या माणसांची निवड केली, एकंदर कारभार काटकसरीने केला आणि शिल्लक पैसा सुरक्षित व चांगल्या व्याजाने गुंतवण्यात आला, तर आयुर्विमा उतरवणारी कंपनी स्थापन करून ती यशस्वीपणाने चालवणे कोणाही सचोटीच्या, चिकाटीच्या, निश्चित धोरणाच्या व थोड्याबहुत स्वार्थत्यागी, सुशिक्षित मनुष्यास सर्वस्वी शक्य आहे. अण्णासाहेब स्वत:च त्या सर्व गुणांनी युक्त असल्याने त्या कंपनीचे प्रमुखपण त्यांच्याकडे येणे क्रमप्राप्तच होते. अण्णासाहेबांनी साताऱ्यातील विविध सहकारी व विद्वान वकिल यांच्या मदतीने प्रॉस्पेक्ट्स, विम्याच्या विविध योजना- त्यांचे दर, सुरुवातीच्या खर्चाचा अंदाज घेणे, कचेरीच्या कामकाजाचे फॉर्म, घटना बनवणे, अंतर्गत कामाचे नियम बनवणे या सर्व गोष्टी पूर्ण करून घेतल्या. कंपनीचे नाव ठरले दि इंडियन इन्शुरन्स कंपनीव सुरुवातीचे भांडवल म्हणून आठ हजार रुपये जमा झाले. अण्णासाहेबांचे मित्र वामनराव गोवईकर यांनी पंचवीस हजार रुपयांचे रोखे कंपनीस दिले. त्या बळावर कंपनी मुंबईस रजिस्टर झाली (13081913).

त्याच नावाची दुसरी कंपनी अस्तित्वात असल्याचे पुढे काही काळाने आढळून आले. तेव्हा काकाराव जोशी यांनी दि वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी हे नाव कंपनीसाठी सुचवले व ते कायम झाले. कंपनीचे भागभांडवल खपून पुढे काही काळाने कंपनीचे भांडवल सदुसष्ट हजार रुपये झाले. गुंतवणुकदारांच्या मनात विचार त्यातून नफा काय मिळेल हा नव्हता तर विमा हप्त्यांचा पैसा भारत देशात राहील हा होता. तसेच, महाराष्ट्रातील पहिली विमा कंपनी सातारकरांनी काढली हा रास्त अभिमानही होता!

कंपनीने घटना लिहिताना अनेक नवीन बाबी त्यामध्ये अतर्भूत केल्या. सात डायरेक्टरांपैकी दोन डायरेक्टर व कंपनीच्या दोन हिशोबतपासनीसांपैकी एक हिशोबतपासनीस यांची निवड विमेदारांकडून करवणे या गोष्टी घटनेतच समाविष्ट करण्यात आल्या होत्या. ती गोष्ट त्यावेळी नवीन होती. त्यामुळे पारदर्शीपणा वाढून नुसत्या भागधारकांना नाही तर विमेदारांसही ती कंपनी त्यांची आहे असे वाटले. त्याच प्रमाणे जो नफा कंपनीस होईल त्यांपैकी एक तृतीयांश नफा गंगाजळीत घातल्यावर नव्वद टक्के नफा विमेदारांमध्ये विभागला जाऊन दहा टक्के नफा भागीदारांस मिळेल अशी व्यवस्था घटनेतच केली होती. विमा कंपनी 13 ऑगस्ट 1913 रोजी स्थापन होऊन तिचे भाग विक्रीस काढले तेव्हा ते खपवण्यास कमिशन म्हणून एक पैसाही कोणास दिला नाही. तसेच, सुरुवातीचे चीफ एजंट काकाराव जोशी, वासुदेवराव जोशी आणि वासुदेवराव गोळे यांनी त्यांच्या पूर्वीच्या कंपनीतील रिन्युअल कमिशनवर पाणी सोडले व या कंपनीचे काम विवक्षित ध्येयाने स्वीकारले. अण्णासाहेबांनी स्वत: कंपनीची आर्थिक स्थिती चांगली होईपर्यंत अजिबात वेतन न घेण्याचे ठरवले होते. कंपनीचे काम प्रारंभी टेबल-खुर्च्या वगैरेचा खर्च न करता जमिनीवर बसून चाले.

अण्णासाहेबांना विमा हा विषय नवीन असल्याने त्यांनी त्या विषयावरील जवळ जवळ दीडशे पुस्तके वाचून काढली. अण्णासाहेबांनी त्या अभ्यासाच्या आधारे कंपनीस आवश्यक असे पाचशेपर्यंत फॉर्म तयार केले. कंपनीतील सेवकांचे कामकाजातील ज्ञान वाढावे म्हणून विम्यावरील पोस्ट मॅगॅझिन वाचून त्यातील विषयसूची करणाऱ्या कारकुनांना स्वतंत्र भत्ता ठेवला होता. तसेच, नवीन उपयुक्त सूचना करणाऱ्या किंवा कंपनीच्या कामकाजातील चुका शोधून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने बक्षिसे ठेवली होती. कंपनीत अॅक्चुरियल विभाग 1918 साली सुरू झाला. त्यामुळे कंपनीने ग्रॅज्युएट मंडळींना नोकरीत घेण्यास सुरुवात केली. त्याच प्रमाणे कर्मचारी जसजसे वाढत चालले तसतसे कामाचे व कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचे नियम ठरवण्यात आले. कामानुसार काही कर्मचारी अर्धवेळही घेतले जात. तसेच, मेडिकल रिपोर्ट पाहण्यासाठीही पॅनेलवर डॉक्टर घेऊन त्यांना कामानुसार रक्कम दिली जाई. त्यामुळे अधिकाधिक चांगल्या व्यक्ती कंपनीशी जोडल्या जाऊन खर्चात मात्र बचत झाली.

विमा कंपनीची सुरुवात झाली; नेमक्या त्याच काळात काही बँका बुडाल्या. त्यामुळे विमा कंपनीस काम मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. पहिली चार-पाच वर्षे कंपनीस दरवर्षी दोन-तीन लाखांचे काम मिळे. पण खर्चाचे प्रमाण कमी असल्याने अडचणींची निभावणी होत होती. त्यामुळे कंपनी मर्यादित स्वरूपात पण सातत्याने नफा कमावत राहिली. कंपनी 1913 साली सुरू झाली आणि जागतिक महायुद्ध 1914 मध्ये सुरू झाले. त्यामुळेही कंपनीच्या कामकाजास फटका बसला. कंपनीचे प्रथम मूल्यमापन 1917 साली झाले तेव्हा मूल्यमापनाच्या रिपोर्टात पुढीलप्रमाणे स्तुती होती

1. कंपनीस पहिल्या चार वर्षांच्या आतच नफा झाला आहे ही बाब अभिनंदनीय आहे. हे अत्यंत तुरळक असे उदाहरण आहे. 2. कंपनीचा कारभार काटकसरीने चालला आहे. 3. कंपनीने पैसा बिनधोक तारणात गुंतवला आहे. 4. कंपनीने कमी दर्ज्याचे विमा अर्ज योग्य जादा आकार लावून घेतले आहेत.

कंपनीचे दुसरे मूल्यमापन 1920 साली झाल्यावर आणि कंपनीची विमेदारांना बोनस व भागधारकांना नफा देण्याची परिस्थिती दिसल्यावर महाराष्ट्रभर कंपनीची कीर्ती गाजली. कंपनीचा दैनंदिन कारभार अण्णासाहेबच प्रामुख्याने पाहत. त्यांचे धोरण धीमेपणाने पण टिकाऊ काम करण्याचे होते. तसेच, त्यांचा कल कंपनी काटकसरीने चालवण्याकडे होता. नवीन विमा सर्व कसोट्या व्यवस्थित लावून मगच विकला जाई. परंतु त्याचा परिणाम म्हणून कंपनीच्या प्रगतीची गती धीमी होती. अण्णासाहेबांनी खर्चाच्या काटकसरीची सुंदर व्यवस्था घालून दिली होती. तीन कंपन्यांच्या पहिल्या तेराव्या वर्षाचे आकडे (खर्चाचे उत्पन्नाशी प्रमाण) असे नॅशनल इन्शुरन्स 70.10 टक्के, हिंदुस्तान को. ऑप. 66.10 टक्के, वेस्टर्न इंडिया 39.30 टक्के.

कंपनीचा व्यवसाय मुंबई, पुणे, पंजाब, गुजरात, सिंध, नागपूर, वऱ्हाड या भागांत पंधरा-वीस वर्षांत वृद्धिंगत झाला. कंपनीने त्या भागांमध्ये शाखा उघडल्या. कंपनी कार्यालयाच्या शाखा पुणे, नागपूर, सिंध व मुंबई येथे व पुढे अहमदाबाद येथेही काढल्या. पुढे तर लाहोर व दिल्ली येथेही काढल्या; कंपनीने त्या त्या विभागातील वजनदार मंडळी सल्लागार म्हणून घेतली. त्यांची नावे पाहिली तरी वेस्टर्न इंडिया इन्शुरन्स कंपनीला समाजात किती मानाचे स्थान होते ते दिसून येईल! त्यांपैकी काही सल्लागारांची नावे पुढीलप्रमाणे डॉ. एम.आर. जयकर, रँग्लर डॉ. आर.पी. परांजपे, ग.वा. मावळंकर माजी अध्यक्ष, मुंबई असेंब्ली, नानकचंद पंडित एम ए (ऑक्सफर्ड), बॅरिस्टर, लाहोर, टिकमदास बंधुमल – एम ए (ऑक्सफर्ड), बॅरिस्टर, कराची, अलगाप्पा चेटियार – एम ए, बॅरिस्टर, मद्रास. कंपनीमार्फत विमा एजंटांना कमिशनखेरीज प्रॉव्हिडंट फंड व विम्याची व्यवस्था करण्यात आली होती. नोकरांना नियमित पगारवाढ, प्रॉव्हिडंट फंड, रजा वगैरे सुनियंत्रित सवलती, खेळ खेळावे आणि शरीर व मन ताजेतवाने ठेवावे आणि त्यायोगे बुद्धीच्या कार्यक्षमतेमध्ये तीक्ष्णपणा आणावा ही अण्णासाहेबांची इच्छा असे. कंपनीचा कामगार व्यायामशाळेत जात असेल तर त्याची व्यायामशाळेची फी कंपनी भरत असे. अण्णासाहेब फुलझाडे व फळझाडे यांची लागवड आणि जपणूक करण्याचा नाद लावून घेणाऱ्यास व त्याबाबत सक्रिय हौस दाखवणाऱ्यास काही दिवस अलाऊन्स देत असत.

विमाधारकाला विमा संपताना जेव्हा पैसे मिळतात तेव्हा मध्ये पंचवीस-तीस वर्षे गेलेली असतात. त्यावेळी ती विमारक्कमही विमेदाराच्या म्हातारपणाची काठी असते अथवा विमेदार मृत्यू पावल्यास त्याच्या विधवा पत्नीस पुढील जीवन जगण्यासाठी मिळालेली ती आधार रक्कम असते. मृत विमेदाराच्या बालकांची ती जीवन संजीवनी असते. तसा विचार करून विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीने सुरक्षित तारणांत गुंतवणे अपेक्षित असते. अण्णासाहेबांनी कंपनीची आर्टिकल्स बनवली त्यावेळी कंपनीच्या रकमांची गुंतवणूक करण्याबाबत पुढील नियमांचा त्यात अंतर्भाव केला- 1. कंपनीने तिचे पैसे 1862 च्या इंडियन ट्रस्ट अॅक्टप्रमाणे मंजूर असलेल्या तारणातच गुंतवावे. कारण त्या रकमांना सरकारची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हमी असते. 2. सरकारी अगर निमसरकारी कर्जरोखे खरेदी करावे. 3. रेल्वे कंपन्यांचे भाग अगर डिबेंचर्स घ्यावे. कारण त्यास सरकारी हमी असे. 4. समाजजीवनास अत्यावश्यक अशा व्यापारी संस्था म्हणजे वीज कंपनी अगर टेलिफोन कंपनी यांसारख्या कंपन्यांचे प्रेफरन्स शेअर्स अथवा डिबेंचर्स घ्यावे. या गुंतवणुकी म्हणजे अण्णासाहेबांनी कंपनीच्या पैशांभोवती उभारलेल्या सुरक्षिततेचा तटच होता!

अण्णासाहेब विविध गुंतवणूक शक्यतांचा सूक्ष्म अभ्यास करून सुरक्षितता व अधिक व्याजदर जेथे मिळेल तेथे रकमा गुंतवत. त्यामुळे अण्णासाहेबांनी कंपनीचे पैसे विखरून जवळ जवळ शंभर ते सव्वाशे विविध तारणांत गुंतवले होते व गुंतवणुकीच्या रकमांमध्ये वधघट झाल्यास त्याची तोशीस विमेदारास लागू नये म्हणून 1913 मध्ये इन्व्हेस्टमेंट रिझर्व फंड निर्माण केला. कंपनीकडे विमाहप्त्यांच्या रूपाने जसा अधिकाधिक पैसा येऊ लागला तसतशा गुंतवणूक संधी अण्णासाहेबांना अपुऱ्या वाटू लागल्या. कंपनीच्या विमेदारांनी ठिकठिकाणी भरलेल्या हप्त्यांच्या रकमांची वसुली विविध बँका करत होत्या. तसेच, गुंतवलेल्या  रकमांचे रोखे अगर शेअर सर्टिफिकिटे सुरक्षित ठेवून त्यांच्या व्याजाची वसुली दरसाल करण्याचे कामही काही बँका करत होत्या. त्या कामांसाठी कंपनीला बरेच कमिशन बँकांना द्यावे लागे. त्यामुळे स्वत:चीच एखादी बँक असल्यास तो पैसा त्याच बँकेस मिळेल असा विचार करून अण्णासाहेबांनी सातारा येथे दि युनायटेड वेस्टर्न बँक लि.ची स्थापना 1936 मध्ये केली व त्या बँकेचे शेअर्स विमा कंपनीस घेता येतील अशी आर्टिकल्समध्ये दुरुस्तीही करून घेतली. त्या बँकेची प्रगती चांगली झाली. त्या कामापाठोपाठ अण्णासाहेबांनी 1938 मध्ये मुंबईस कंपनीची स्वत:ची इमारत उभी केली. अण्णासाहेबांनी विमा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर व नंतर अध्यक्ष म्हणून काम 1938 पर्यंत पाहिले. दिल्लीत असेंब्लीच्या सिलेक्ट कमिटीत 1938 साली जेव्हा नवा विमा कायदा चर्चिला जात होता, तेव्हा त्या चर्चेत वेस्टर्न इंडिया विमा कंपनीचा उल्लेख आदर्श कंपनी म्हणून वारंवार होत होता. ती बाब कंपनीस अभिमानास्पद होती. नवीन विमा कायद्यान्वये विमेदारांच्या हिताची व विमा कंपन्यांना भक्कम आर्थिक पायावर उभे करण्यासाठी जी जी बंधने सर्व विमा कंपन्यांवर लादली गेली ती कोणतीही बंधने दि वेस्टर्न इंडिया इन्शुरन्स कंपनीस नवीन नव्हती. कंपनीने ती बंधने स्थापनेपासून पाळली होती. त्यामुळेच महायुद्धाच्या काळात भारतात कार्यरत असलेल्या दोनशे कंपन्यांपैकी फक्त दहा कंपन्यांनी विमेदारांस बोनस व भागीदारांस नफा वाटप केले, त्यामध्ये दि वेस्टर्न इंडिया इन्शुरन्स कंपनी होती.

अण्णासाहेबांनी निवृत्ती 1931 साली घेतली तेव्हा त्यांना कंपनीने समारंभपूर्वक पंधरा हजार रुपयांची थैली अर्पण केली. अण्णासाहेबांची विमाक्षेत्रातील भरीव कामगिरी व तपश्चर्या यांमुळे 27 फेब्रुवारी 1935 रोजी पुण्यास भरलेल्या विमा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. अण्णासाहेबांनी हिंदी रिइन्शुरन्स कंपनी असावी असे प्रतिपादन त्यावेळी केले. अण्णासाहेबांनी त्यांच्या मृत्युपूर्वी पाच वर्षे दि वेस्टर्न इंडिया ट्रस्टी अँड एक्झिक्युटर कंपनी लि.ची स्थापना केली. तसेच, मृत्युपूर्वी तीन वर्षे अगोदर विमा मुद्रक आणि प्रकाशक लि.ची स्थापना केली. अण्णासाहेबांनी त्यांच्या स्वभावगुणांप्रमाणे संपूर्ण आयुष्य कार्यरत जगून 29 ऑगस्ट 1951 या दिवशी देह ठेवला.

दिलीप पाठक 9673222256 dilippathak54@gmail.com

दिलीप पाठक यांचे बी एससी, एल एल बी, सी ए आय आय बी असे शिक्षण झाले आहे. त्यांनी युनायटेड वेस्टर्न बँकेत सिनीयर मॅनेजर पदापर्यंत विविध पदांवर1977 ते 2006 या काळात नोकरी केली. ते निवृत्त आयडीबीआय बँकेतून असिस्टंट जनरल मॅनेजर पदावरून झाले. त्यानंतर त्यांनी आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून 2020 पर्यंत काम पाहिले. ते श्रीराम देवस्थान ट्रस्ट (चाफळ), कै.सुलोचनादेवी पाटणकर ट्रस्ट (पाटण) आणि कै.वा.ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरीटेबल ट्रस्ट या ठिकाणी विश्वस्त आहेत. त्यांना लेखन, वाचन आणि क्रिकेटचा छंद आहे. त्यांची ‘काही गप्पा काही गोष्टी’, ‘विथ नो गॉडफादर’ आणि ‘योगायोग’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  

———————————————————————————————-

About Post Author

Previous articleकान्होळा नदी : गावाचे वैभव हरपले! (Plight Of Kanhola River)
Next articleवसईतील बावखलांचे निसर्गचक्र (Bavkhals In Vasai – Traditional Water Tank)
दिलीप पाठक यांचे बी एससी, एल एल बी, सी ए आय आय बी असे शिक्षण झाले आहे. त्यांनी युनायटेड वेस्टर्न बँकेत सिनीयर मॅनेजर पदापर्यंत विविध पदांवर1977 ते 2006 या काळात नोकरी केली. ते निवृत्त आयडीबीआय बँकेतून असिस्टंट जनरल मॅनेजर पदावरून झाले. त्यानंतर त्यांनी आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून 2020 पर्यंत काम पाहिले. ते श्रीराम देवस्थान ट्रस्ट (चाफळ), कै.सुलोचनादेवी पाटणकर ट्रस्ट (पाटण) आणि कै.वा.ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरीटेबल ट्रस्ट या ठिकाणी विश्वस्त आहेत. त्यांना लेखन, वाचन आणि क्रिकेटचा छंद आहे. त्यांची ‘काही गप्पा काही गोष्टी’, ‘विथ नो गॉडफादर’ आणि ‘योगायोग’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 9673222256

2 COMMENTS

  1. वा,दिलीप फार सुंदर माहिती. अण्णासाहेबांनी काळाच्या फारच पुढचे असे काम करून ठेवले आहे व आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहे.

  2. सर,खूपच अभ्यासपूर्ण माहिती.आजच्या सर्वक्षेत्रात विस्तारलेल्या विमा चे मूळ अण्णासाहेबांच्या नसानसात भिनलेले आहे.हे या लेखातून कळले.धन्यवाद व अण्णांच्या कार्याला प्रणाम!🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here