विभावरी बिडवे यांचे खाद्यकॅलेंडर

0
88
_vibhawari_bidve_khadyacalendar

आषाढाचा पहिला दिवस माझ्यासाठी वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा असतो. खरे तर, महाकवी कालिदास यांच्या नावाचा दिन. पण माझे खाद्यकॅलेंडर त्या दिवसापासून सुरू होते. आषाढातील संततधार कोसळू लागते आणि विविध खाद्यपदार्थांचे वेध लागतात. प्रत्यक्ष सुरुवात आषाढी एकादशीने किंवा लेकीच्या वाढदिवसाच्या गुलाबजामने होते. एकादशीला खिचडी, वरई, रताळ-बटाट्याचा कीस, गोड थालीपीठ, चिवडा, वेफर्स, बटाटा पापड आणि रात्री उरलेले सगळे पदार्थ एकत्र करून तळलेले साबुदाणा वडे आणि वर फ्रुट सलाड! म्हणजे म्हणायचे उपवास; पण तो झाला, की पुढील दोन दिवस डीटॉक्सवर राहवे लागते! मग आखाड तळणाचा म्हणून एखादे तिखट तळण म्हणजे वाटल्या डाळीच्या करंज्या आणि गोड म्हणून लाल भोपळा आणि गूळ घालून केलेले भोपळ घाऱ्या होऊन जातात. पूर्वी, आई आणि तिच्या मैत्रिणी ‘कांदे नवमी’ करायच्या. त्या दिवशी कांद्याच्या पदार्थांची रेलचेल असायची. आता, कांदे नवमी कधी होऊन जाते ते कळतही नाही आणि अर्थात आता, कांदा-लसूण वर्ज्य असे काही श्रावणातदेखील पाळण्यास जमत नाही. नवमी नाही तर नाही पण वाढत्या पावसाबरोबर कांद्याची भजी किंवा कांदा घालून केलेले भाजणीचे वडे हे मात्र नित्य नेमाने केले जातात. मग येतो सगळ्यात हवाहवासा दिवस. दीप अमावास्या. बाजरीची भरड काढून आणि कणिकेमध्ये गूळ घालून केलेले, इडलीच्या कुकरमध्ये वाफावलेले दिवे – तेही भरभरून तूप घेऊन किंवा कुस्करून, दुधात भिजवून खायचे आणि बरोबर, टॉमॅटोचे सार आणि बटाट्याची भाजी… अहाहा! मी वर्षभर त्या दिवसाची वाट बघत असते. सगळे जुनेपुराणे दिवे घासून, लखलखीत करून त्यांना आराम देण्याचा तो दिवस. आजकाल, त्या दिव्यांना तसा आरामच असतो आणि बल्बची पूजा करण्याची रीत नाही. नव्या जमान्यात कितीतरी दिवस संकल्पनात्मक साजरे केले जातात.

श्रावण तर माझ्या कॅलेंडरमधील राजा! नागपंचमीला (मला) पुरणाची फारशी आवडत नाहीत म्हणून गूळ-खोबऱ्याचे सारण करून केलेली दिंडे आणि वर ओतलेली साजूक तुपाची धार. नारळी पौर्णिमेचा नारळी भात, स्वातंत्र्यदिनी आणलेल्या जिलब्या, अष्टमीला कालवलेला दहीपोह्यांचा काला, श्रावणी शुक्रवारी माम्या-मावश्या यांच्या घरची आमंत्रणे आणि ‘तुला कोण आयतं देणार’ असे म्हणत म्हणत त्यांनी वाढलेल्या गरम गरम पुरणाच्या पोळ्या, मग जवळपास मंगळागौरींची तीन-चार आमंत्रणे आणि मंगळागौरीचा टिपिकल पुणेरी मेनू म्हणजे भाजणीचे वडे आणि मटकीची उसळ. शुक्रवारच्या जिवतीच्या पुरणाच्या औक्षणानंतर ताम्हणातील तुपात भिजलेला पुरणाचा गोळा… या सगळ्यांनी माझा श्रावण महिना समृद्ध होऊन जातो. मग शुक्रवारच्या ऐवजी रविवारी घरी काम करणाऱ्या मावशींनाच जेवण्यास बोलावले आणि खरोखर, ज्यांना कधीच आयते जेवण्यास मिळत नाही त्यांच्या चेहेऱ्यावरील समाधान बघितले, की माझाही श्रावण महिना कृतकृत्यतेने पार पडतो. त्यात स्वातंत्र्यदिनी लेकीला काहीतरी ट्रिपल कलरचा पदार्थ हवा असतो. ट्रिपल कलर राईस, पुडिंग वगैरे. मग अशा प्रकारे फ्युजन सादर करण्यास वाव मिळतो.

_dive_khadyaगणेश उत्सवाच्या धामधुमीत आई करते ती हरतालिका आणि ऋषिपंचमी माझ्याकडून मागे पडली, तरीही त्याची निदान एक आठवण तरी होऊन जातेच. तळणीचे आणि उकडीचे मोदक एकेकदा होऊन जातात; पण एका गणपतीत केलेल्या पनीर आणि डेसिकेटेड कोकोनटच्या बॉल्सचे कौतुक इतके झाले, की गणपतीत ते करण्याची माझ्यापुरती प्रथाच होऊन गेली आहे. सारखेच गोड खाऊन कंटाळलेल्या गौरी आणि गणपती यांनी मिळूनच त्यांच्या मेनूमध्ये अळूच्या वड्या, वाटली डाळ, घोसाळ्याची भजी, गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी साताळी डाळ हे पदार्थ ठरवले असणार! ते सारे एका दिवशी करणे आणि खाणे होत नाही. त्यामुळे मी त्यातील बरेचसे पदार्थ तीन दिवसांत विभागून करते.

गौरीगणपतीची धामधूम संपली, की देवी एखाद्या समंजस गृहिणीसारखी घरातील गृहिणीला पंधरा दिवस हक्काची रजा देते आणि नवरात्रात येते; तेही फुलोऱ्याव्यतिरिक्त काही विशेष मागणी न घेता. त्या दरम्यान, मी नैवेद्याच्या निमित्ताने पाक असलेल्या पाककृती म्हणजे लाडू आणि वड्या यांची ट्रायल घेते. मी मागील कितीतरी वर्षें त्यांची ट्रायलच घेत आहे. दरवेळेस, नव्याने पाक कच्चा तरी राहतो किंवा मग इतका पक्का होतो, की लाडूचा टप्पा पडावा. कोजागिरीला चंद्र दिसो- न दिसो पण आकाशात कोठेतरी असणाऱ्या त्याला मस्त आटवलेले केशरी चारोळीयुक्त दूध बाल्कनीमध्ये ठेवल्याखेरीज मला ते ओठाला लावावेसे वाटत नाही.
त्या सगळ्या धामधुमीमध्ये कधीतरी नवऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरी एखादा थाई, मेक्सिकन पदार्थ होऊन जातो आणि त्याला घेतलेल्या मोठ्ठ्या गिफ्टच्या निमित्ताने का होईना आम्हाला एखाद्या grand हॉटेलमध्ये grand पार्टी मिळते. मग दिवाळी येते. मी या वर्षी ‘दिवाळीला फारसे काही करायचे नाही, तसेही सगळेच एकदम खाल्ले जात नाही, आई वगैरे देतच असते’ असे मनाशी बजावून ठेवते; पण लक्ष्मीपूजनाला लागतात म्हणून अनारसे आणि लाडू मस्ट. मग वेगळा आयटम म्हणून चॉकलेट बॉल्स, चीज शंकरपाळे, पटकनच तर होतो म्हणून चिवडा असे पदार्थ होऊनच जातात. शकुनाचे असते (असे आज्जी असंख्य वेळा म्हणायची) म्हणून करंज्या आणि बघू तिच्यापेक्षा माझ्या छान कुरकुरीत होतात का हे दाखवण्यासाठी चकल्या आणि मला करण्यास आवडतात म्हणून चिरोटे असा घाट घातला जातो. दरम्यान, मध्ये कधीतरी नणंदेबरोबर फोन झालेला असतो, मग ती काय करत आहे याचा अंदाज घेऊन पुन्हा पदार्थ वाढवले जातात.

मग एकदा खंडेराय येऊन वांग्याची भाजी, कांद्याची पात, भाकरी खाऊन जातात. त्या सगळ्यांनंतर खरे तर ‘हरे रामा’ म्हणावेसे वाटते; पण, डिसेंबर महिना चालू असल्याने ‘ओह जिझस’ असे म्हणून एखादा फ्रुट केक केला, की जरा हुश्श व्हायला होते. हुश्श एवढ्याचसाठी, की अगदी त्याच वेळी त्याच दिवशी ते केलेच पाहिजे असा अट्टहास नंतर राहत नाही. पण मग स्वतःची आवडनिवड सुरू होते. तोपर्यंत थंडी ऐन बहरात आलेली असते. मलाच मग म्हणून हुलग्याच्या पिठाच्या शेंगोळ्यांची आठवण येते. चर्र लसणाची फोडणी देऊन, आधण ठेवून त्यात त्या पिठाच्या हाताने केलेली वाटोळी सोडायची आणि गरम गरम भाकरीबरोबर ते शेंगोळे खायचे. थंडीत एकूणच वेगवेगळी सुप्स, करी, छोले, डिंकाचे आणि अळीवाचे लाडू; झालेच तर नाष्ट्याला गव्हाचा तूप आणि जायफळ घातलेला गोड किंवा जिरेपूड आणि तेल घातलेला मिठाचा चिक, बाजरीची भरड घेऊन केलेली खिचडी बरोबर पोह्याची मिरगुंडे हे चालूच राहते. ते सगळे झाल्यावर माझ्याकडून एकतर चुर्इंगमसारख्या चिवट किंवा मग भुगा तरी होणाऱ्या तिळाच्या वड्या वगैरेकडे मी फार लक्ष देत नाही. गुळाच्या पोळ्या मला मस्त जमतात. ती खास आईची रेसिपी. महाशिवरात्रीला एकादशीप्रमाणेच जंगी मेन्यू असतो. त्यातील कवठाची चटणी आणि रताळ्याच्या साखर-गुळातील फोडी हे अगदी लाडके पदार्थ. किती वेळा म्हटले cake_with_dizartतरी एरवी केले जात नाहीत. मग अॅनिवर्सरी निमित्ताने पुन्हा एकदा काहीतरी अभारतीय डिशचे प्रयोग सुरू होतात. तोच आरामाचे थोडेसे ‘अच्छे दिन’ जवळ येतात. नव्या इंग्रजी वर्षाचे नवे संकल्प! तरी चैत्राची चाहूल लागली, की आपोआप वाढत्या उन्हाबरोबर लोणची, टक्कू, मेथांबा यांची आठवण होऊ लागते. चैत्रगौरीच्या निमित्ताने कैरीची डाळ, पन्हे, शेवयाची खीर होतच राहते. होळीला पुरणाच्या पोळ्या पुन्हा एकदा होऊन जातात आणि आजकाल, लेक आणि तिचे मित्रमंडळ भरपूर रंग खेळतात म्हणून खसखस, बदाम, काळीमिरी, बडीशेप, वेलची, केशर दुधात वाटून घाटून थंडाई केली जाते. त्याचा तोंडाला चटका लावणारा तो गोडवा! त्या त्या सणसमारंभाचे आणि पदार्थांचे अतूट नाते असते. ते एकमेकांची लज्जत वाढवतात.

हे ही लेख वाचा – 
यशोगाथा : चवीने खाणार त्याला यशो देणार!
कल्याणचा वझे यांचा ‘खिडकीवडा’!

मग एकदा का पहिल्या आंब्यांचा आणि रसाचा नैवेद्य देवाला दाखवून झाला, की कोणाचाही विचार न करता आपण आणि आंबे! कैरीचे काही पदार्थ आणि अगदीच गेला बाजार मँगो मिल्क शेक आणि शेवटी शेवटी साखरांबा, गुळांब्याच्या बरण्या भरल्या जातातच. अगदी येता जाता, पण मी तो सिझन खरा आरामाचा सिझन- म्हणजे करून टाकला आहे. आज्जी, आई त्याच दरम्यान वेगवेगळे पापड, कुरडया, पापडया, सांडगे आणि लोणची, मसाले, भाजणी करत. येता-जाता लाट्या तोंडात टाकणे, अर्धवट वाळलेली वाळवणे खाणे यांसारखी मजा नाही. पण ते घरी होत नाही. आठवण मात्र खूप होते. मग आई, आज्जेसासुबाई आणि आत्या देत राहतात- पापडाची कच्ची पीठे, मग फक्त खाण्यापुरत्या म्हणून लाट्या करून घ्यायच्या. हौशी तरुणी मला अजूनही भाजण्या, लोणची, मसाले यांची सॅम्पल देतात; ज्यामध्ये माझे पुढील अनेक महिने निघून जातात. ते तसे न संपणारे असते. ते सगळे आई करायची तेव्हा अर्थातच जास्त आल्हाददायक असायचे. आईच्या हातची चव आणि स्वतःला कष्ट नाहीत. आता कधी कधी खूप काम चालू असताना, मुलगी खूपच लहान असताना, आजारपण, क्लाएंट्सचे फोन कॉल्स, राहिलेले ड्राफ्टिंग आणि आडवारी येणारे सण! कधी कधी, जीव मेटाकुटीला येतो आणि नाही केले तर विचित्र रुखरुख लागून राहते. अशामध्ये आईने आणि आज्जीने केलेले पदार्थ आठवत राहतात आणि मग वाटते, आपल्याला ते सुख आपल्या आईने आणि आज्जीने दिले; मग आपण आपल्या मुलीसाठीही ते करायलाच पाहिजे.

त्या सगळ्याच पदार्थांत असेही भरभरून प्रोटीन्स, विटामीन्स, मिनरल्स असतात. त्या त्या वेळेला त्या ज्या योजना पूर्वजांनी केलेल्या आहेत त्या किती विचार करून केलेल्या आहेत; अगदी दिवाळीला तळणीचा फराळ हा थंड हवेत चांगला असतो, जो उन्हाळ्यात खाऊ नये म्हणतात. अर्थात ते सगळे आपल्याला आई आणि आजी यांच्याकडून फ्री रेडीमेड मिळत असताना, आपल्याला मात्र कळण्यासाठी कोणीतरी ऋजुता दिवेकर यावी लागते.

_indipendance_day_special_dishते सगळे सण समारंभ म्हणून केले जातात. पूर्वी देवाच्या भीतीने, ‘हे लागतंच’ अशा हेतूने बायका करत; पण आता तर आपल्याला मनापासून वाटते, की देवाला काय एक नमस्कारही पुरतो. मग ते कुळधर्म, कुळाचार, हे सोपस्कार, ते नैवेद्य कशासाठी? पण मी माझ्यापुरते तर बघून ठेवले आहे, ही व्यवधाने असतात. ‘त्यानंतर ते आहे, त्यानंतर ते येते, आता असे करायचे, आता तसे करायचे, इतकेच काय पण ‘या वर्षी आमच्याकडे काही करायचे नाहीये’… या विचारानेदेखील येणारी व्यवधाने माणसाला गुंतवून ठेवतात. ते सगळे नसेल तर माझे आयुष्य किती रिकामे रिकामे होऊन जाईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. रिकामे डोके सैतानाचे घर! आणि मग किती वेळ मॉल्समध्ये फिरून निरर्थक घालवते ते माहीत नाही. कामाच्या व्यवधानातूनही ते सगळे करण्यास मला आवडते. संस्कृती तर जपलीच पाहिजे ना? मग माझ्यावर खाद्यसंस्कृतीसारखी सृजनात्मक गोष्ट जपण्याची जबाबदारी असेल तर अगदी वॅनिला विथ हॉट चॉकलेट सॉस!

– विभावरी बिडवे 9822671110
vibhabidve@gmail.com 

About Post Author