विद्यार्थ्यांसाठी जीवतोड मेहनत

1
21
_vidhyarthyansathi_mehnat_1.jpg

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जिल्हा परिषदेची अशी एक शिक्षिका आहे जी तेथील माडिया गोंडांच्या गरीब मुलांना जीव तोडून शिकवते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिने  बाळंत व्हायच्या फक्त तीन दिवस आधी सुट्टी घेतली आणि विशेष म्हणजे पुन्हा एकाच महिन्यात कामावर रुजूसुद्धा झाली! उज्ज्वला बोगामी असे त्या हरहुन्नरी  शिक्षिकेचे  नाव आहे.

शिक्षक नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी त्या भागात शिकवण्यास जाण्याला तयार नसतात. त्यामुळे दोन-तीन दशके तेथे शिक्षकच मिळत नव्हते. प्रकाश आमटे यांनी दाखवलेल्या धाडसानंतर या भागातली काही मुले  शिकू लागली. या प्रयत्नांतून शिकून बाहेर पडलेल्या काही मुलांनी त्यांच्या भागात शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांतून मुलांना शिकवण्याला सुरुवात केली. उज्ज्वला बोगामी या त्या पहिल्या फळीतील  महिला शिक्षकांपैकी एक.

उज्ज्वला बोगामी यांचा जन्म 1978चा. त्यांच्या वडलांची शिक्षणावर अढळ श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी उज्ज्वला यांच्यासह चारही अपत्यांना उत्तम शिकवले. उज्ज्वला बारावीनंतर डीएड झाल्या. त्यांनी एका संस्थेत काही काळ नोकरी केली. नंतर  त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरीस लागल्या. त्या अरेवाडा या दुर्गम गावातील  शाळेत आहेत. उज्ज्वला यांचे वडील मालू कोपा बोगामी हे गडचिरोली काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष होते. मालू बोगामी म्हणजे लोकशाहीचे हात बळकट करणारा माणूस. पण नक्षलवाद्यांना तेच आवडले नाही. नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या २००२मध्ये छत्तीसगड सीमेजवळ केली. जिल्हा हादरला, पण उज्ज्वला डगमगल्या नाहीत. समाजाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचे असेल आणि लोकशाही बळकट करायची असेल तर येथील मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे हेच त्यावरचे उत्तर आहे आणि तीच वडिलांना  खरी श्रद्धांजली असेल असे समजून त्यांनी ज्ञानदानाचे काम जोमाने सुरू ठेवले. त्या ज्या आरेवाडा येथील शाळेत शिक्षक आहेत तेथे जास्तीत जास्त माडिया आदिवासी मुले  आहेत. माडिया आदिवासींना मराठी येत नाही. त्याबाबत आदिवासी कार्यकर्ते लालसू नोगोटी सांगतात, की ‘मराठी भाषा ही आमच्यासाठी परकीय भाषा आहे.’ मात्र त्यांना सगळे शिक्षण मराठीतूनच दिले जाते. त्यामुळे त्या भागातील मुलांचा शैक्षणिक स्तर उंचावला गेला नाही. उज्ज्वलासुद्धा माडिया गोंड असल्यामुळे त्यांनी या सगळ्या मुलांसोबत माडिया भाषेतून बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी असे करत मुलांना मराठी भाषेकडे वळवले आणि त्या शाळेतील मुले वाचू-लिहू शकली. शाळेचा शैक्षणिक स्तर कमालीचा उंचावला आहे. त्याबाबत उज्ज्वला सांगत होत्या, की ‘इतर शाळांच्या तुलनेत सध्या माझी मुले कमालीची हुशार आहेत.’ शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी भामरागडला भेट दिली आणि उज्ज्वला यांचा हा प्रयोग सर्वत्र राबवण्याचे ठरवले. महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागात स्थानिक बोली भाषा वापरल्या जातात, त्या त्या भागात नोकरीसाठी त्या बोली भाषेतील शिक्षकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाचा महाराष्ट्रभरात चांगला परिणाम दिसून आला. भामरागड हा अतिदुर्गम, डोंगराळ भाग असल्यामुळे तेथील नदीनाल्यांना जोरदार पूर येत असतो. पाऊस कधी कधी महिना महिना थांबत नाही. अशा दिवसांत उज्ज्वला नदीनाला पार करून आणि कधी शक्यच नसेल तर _vidhyarthyansathi_mehnat_2.jpgभामरागडला असलेल्या निवासी शाळेतील मुलांना शिकवतात. उज्ज्वला रविवारीही जगाच्या स्पर्धेत मराठी मुले मागे पडतील या भीतीपोटी शाळेत जाऊन मुलांना शिकवतात. ताईंच्या आयुष्यातील आणखी एक प्रेरणा आहे त्यांचे पती लालसू सोमा नोगोटी. लालसू हे गरीब घरातील, आईवडील नसलेला मुलगा. पण अभ्यासात हुशार. पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजला शिकायला होता. मुलाची हुशारी पाहूनच उज्ज्वला यांच्या वडिलांनी त्यांची मुलगी लालसूला देऊ केली होती. पण दरम्यान उज्ज्वला यांच्या वडिलांची हत्या झाली. आणि लालसूचा आधारच कोसळला! तेव्हा उज्ज्वला यांनीच लग्न झालेले नसतानासुद्धा लालसूला सांगितले, की ‘मी खचलेली नाही, तूही डगमगू नकोस, मी यापुढे तुझा शिक्षणाचा सगळा खर्च करीन.’ त्या वेळी उज्ज्वला नुकत्याच जिल्हा परिषद शाळेत नोकरीस लागल्या होत्या आणि त्यांना फक्त तीन हजार रुपये पगार मिळायचा. त्या पगारातील तिकिटापुरते पैसे ठेवून घेऊन बाकी सगळे पैसे त्या लालसूला पाठवायच्या, पुढे लालसू त्याचे आयएलएसचे शिक्षण पूर्ण करून गावी परत आला, आणि मग उज्ज्वला-लालसू या दोघांनी लग्न केले. सध्या लालसू हे गडचिरोली जिल्हा परिषद सदस्य आहेत. वडिलांच्या निधनानंतरही स्वतःच्या नवऱ्याला शिकवण्याची इतकी जिद्द होती त्या महिलेत. ही गोष्ट २००४ सालातली असेल. उज्ज्वला लाहेरी येथील शाळेत शिक्षिका होत्या. भामरागडला एखाद्या महिलेने अशा सुट्ट्या घेतल्या तर तेथे बदली शिक्षक मिळत नाही. तेथील सहकारी शिक्षकावर अतिरिक्त जबाबदारी दिली जाते. त्यामुळे शिकवण्या व्यवस्थित होत नाहीत व विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे उज्ज्वला यांच्या डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा त्यांनी डिलिव्हरीच्या फक्त तीन दिवस आधी सुट्ट्या घेतल्या आणि डिलिव्हरीनंतर एका महिन्याच्या आत त्या शाळेत दाखलही झाल्या. एका महिन्याच्या लहान मुलाला सोबत घेऊन उज्ज्वला शाळेत जायच्या, शाळेच्या व्हरांड्यातच मुलासाठी झोळी बांधायच्या आणि त्याला झोका देत मुलांना शिकवणे सुरू असायचे. उज्ज्वला यांच्यासारखे असे अनेक लोक त्यांच्या समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी बेतोड झटत आहेत, म्हणूनच गडचिरोलीतील माडिया आदिवासी विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागला आहे.

 उज्ज्वला यांनी सोळा वर्षांच्या कारकिर्दीत शाळेला एकदाही दांडी मारलेली नाही, हे विशेष. माडिया गोंडांच्या कुमारी मातांच्या मुलांसाठी अनाथाश्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. कुमारी मातांचे प्रमाण वाढू नये यासाठी त्या किशोरवयीन मुलींसोबत सातत्याने संवाद साधून त्यांचे समुपदेशन करत असतात.

– दत्ता कनवटे

('दिव्यमराठी'च्या ‘मधुरिमा’ पुरवणीवरून उद्धृत,सुधारित व संस्कारित)

About Post Author

1 COMMENT

  1. उज्वला मोठ्ठं काम करते आहे …
    उज्वला मोठ्ठं काम करते आहे . तिला सलाम.

Comments are closed.