लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती ‘हाऊस अरेस्ट’मध्ये आहे. नैराश्य, हतबलता तर सर्वांनाच जाणवत आहे पण तरी आपल्या जगातल्या धीराच्या गोष्टी बऱ्याच चालू आहेत. त्या नोंदण्याचा हा धावता प्रयत्न. असेच काही सांगण्याची इच्छा असेल तर जरूर कळवा. ई-मेल –info@thinkmaharashtra.com
जितेंद्र सांडू याचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनीयरिंग व फायनान्स मॅनेजमेंट या विषयांमधील, परंतु त्याने नोकऱ्या-व्यवसाय करून पाहिले. काही वर्षे मुलांची ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्ट करण्याचा उद्योग चालवला. त्यासाठी ‘टॅलेंट मॅट’सारखी सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. त्यातून त्याला तरुणांना करिअर गायडन्स करण्याचे एक वेगळेच क्षेत्र गवसले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळे त्याचा शिक्षणक्षेत्राशी जवळचा संबंध आला. त्याच्याशी बोललो, की विद्यार्थ्यांच्या सद्यकाळातील गरजा आणि शिक्षणव्यवस्थेचा अपुरेपणा या गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. सर्वसंचारी जितेंद्र लॉक डाऊनमध्ये घरी बसावे लागल्यामुळे जाम वैतागला आहे. तो म्हणाला, की दोनतीन प्रोजेक्टस् हाती घ्यायला हवी, तर हा काळ जाईल. नाहीतर एकवीस दिवस करायचे काय?
मी त्याला म्हटले, ‘थिंक महाराष्ट्र’ची ताकद जाणून घे ना एकदा. तर तो म्हणाला, पाठवा बरे लिंक. त्यातून गप्पा सुरू झाल्या.
तो म्हणाला, या कोरोनानंतर बघा, सारं जग बदलणार आहे. टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन ही काय पॉवर आहे ते लोकांना कळणार आहे. माझ्या लेकाचे बिट्स पिलानीचे ऑनलाइन क्लास सुरू झालेदेखील. येत्या पाचदहा वर्षांत जगातील पाचपंचवीस युनिव्हर्सिट्या बंद पडतील. म्हणजे त्यांच्या इमारती, त्यांच्या मोठमोठ्या जागा यांना अर्थ राहणार नाही; कामही राहणार नाही. छोट्या मोठ्या संस्था उगवतील, तरतऱ्हेचे शिक्षण देतील. त्यातून मुले त्यांची ती बरेच काही शिकतील. आपल्याला वाटतं, की ही पोरं मोबाइल, आयपॅड किंवा लॅपटॉपवर खेळत आहेत. ती खेळतातच, पण त्या ओघात ती काय निर्माण करून ठेवत आहेत हे त्यांचे त्यांनाही वगळाच, पण आपल्यालाही कळत नाहीये. टेक्नॉलॉजी माणसाला फार सामर्थ्य देत आहे. हे कोरोना संपू द्या, एक नवे जग नंतरच्या काही वर्षांत उदयाला येणार आहे.
———————————————————————————————-