विदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक

carasole

महाकवी कालिदासाचे प्रसिद्ध काव्य ‘मेघदूत’. त्यातील कथा अशी –

एका यक्षाच्या हातून चूक होते. यक्षांचा राजा कुबेर याच्या आज्ञेवरून त्या यक्षाला गृहत्याग करावा लागतो. तो यक्ष दूर रामगिरी पर्वतावर जाऊन राहतो. कुठे कुबेराची राजधानी अलकावती नि कुठे रामगिरी! रामगिरी येथे असताना, यक्षाला त्याच्या पत्नीची आठवण येते. तो विरहाने व्याकूळ होतो. आषाढ महिन्यात आकाशात मेघ जमा होऊ लागतात. यक्ष त्यातील एका मेघाबरोबर रामगिरीहून त्याच्या पत्नीला खुशालीचा निरोप पाठवतो. ‘मेघदूता’त निसर्गाचे आणि विरहातून निर्माण झालेल्या अतीव प्रेमाचे यथार्थ वर्णन आढळून येते.

महाकवी कालिदासाच्या शाकुंतल, मालविका, अग्निमित्र, विक्रमोर्वशिय ही नाटके, तर मेघदूत, कुमारसंभव, रघुवंश, ऋतुसंहार या काव्यकृती प्रसिद्ध आहेत. त्यांतील ‘मेघदूत’ या काव्याची कथा ही रामटेकला म्हणजेच रामगिरीवर घडली आहे.

कालिदासाचे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे काव्य प्रसिद्ध आहे; म्हणून आषाढातील पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला कालिदास दिन साजरा केला जातो.

‘मेघदूता’त वर्णन केलेला रामगिरी पर्वत म्हणजेच नागपूरजवळचे रामटेक होय. ते निसर्गसुंदर आहे. अनेक हौशी प्रवाशांची आणि पर्यटकांची, भाविकांची तेथे वर्दळ असते. तेथील रामगिरी हा डोंगर व त्यावरील मंदिरे हे नजिकच्या पंचक्रोशीतून लक्ष वेधून घेतात. रामटेकला पोचताक्षणी डोळ्यांना वेड लावणारे दृश्य दिसले. ‘हिरव्या झाडांच्या पांघरुणाआड दडलेली उंचच उंच टेकडी, तिच्यावर पांढरी शुभ्र देवळे. वरच्या निळ्या आकाशाला हात लावू पाहणारे त्यांचे कळस.’ (टेक या शब्दाचा स्थानिक भाषेतील अर्थ ‘प्रतिज्ञा’ अथवा ‘नवस’ असा होतो.) रामटेक म्हणजे रामाची प्रतिज्ञा. त्या ठिकाणी जे भाविक संकल्प सोडून प्रतिज्ञा करतात अथवा नवस करतात, ती प्रतिज्ञा अथवा नवस प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने पूर्ण होतात अशी भावना त्या भागातील लोकांची आहे.

सकाळच्या पिवळ्याधमक उन्हात  न्हाणाऱ्या त्या टेकडीचे सौंदर्य काही औरच! टेकडी चढून जाण्यासाठी तीन बाजूंनी पायऱ्या आहेत. गावाकडून, धुम्रेश्वराकडून आणि अंबाळा तलावाकडून. धुम्रेश्वराकडून जाणाऱ्या पायऱ्या सोप्या आहेत. टेकडीवर जाण्याकरता सडक हल्ली पक्की झाल्याने पायऱ्यांवरून चढून जाणाऱ्यांची संख्या कमी असते. पक्की सडक अंबाळा तलावाकडून जाते. जसजसे आपण वर जातो तसतसा झाडाच्या जाळींतून सूं-सूं आवाज करत वेगाने वाहणारा वारा अंगावर येतो, पण त्या वाऱ्याने मन कसे प्रसन्न होते!

टेकडी वर चढून आल्या आल्या पर्यटकांचे स्वागत होते, ते रामाच्या सेनेकडून. शेपट्या उंचावत वर-खाली जाणारी वानरांची टोळकी मोठ्या आशेने त्यांच्याजवळ जातात. त्यांच्या हातातील प्रसाद, वस्तूही हिसकावून घ्यायला सेना तत्पर असते.

प्रथम लागते ते धुम्रेश्वराचे मंदिर. त्याचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर नृसिंहाचे मंदिर… अंबाळा तलावाकडून येणाऱ्या पायऱ्या तेथे दिसतात व अंबाळा तलावही दिसतो. झाडीतून डोकावणारा हिरवा अंबाळा कसा पाचूसारखा चमचमतो! अंबराजाचे गलतकुष्ठ अंबाळ्याच्या पाण्याने दूर झाले अशी पौराणिक कथा आहे. सीतामाईने त्याच अंबाळ्यात स्नान केले होते अशीही आख्यायिका आहे.

किल्ल्याचा मोठा कोट व त्याचा मोठा दरवाजा दिसतो. दरवाज्याच्या डाव्या बाजूला भोगरामाचे देऊळ आहे. देवळापुढे महानुभाव पंथाचे लोक दंडवत घालतात. उजव्या बाजूला वराहाची मूर्ती आहे. वराहाच्या पायाखाली हिरण्याक्ष आहे. त्यापुढे थोडे चालत गेल्यावर राम-लक्ष्मणाचे मुख्य मंदिर लागते. देवळाला मोठा कोट आहे. चारी दिशांना दरवाजे आहेत. मुख्य द्वारातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. अगस्ती ऋषींचा आश्रम रामटेक परिसरात होता व त्यांना भेटण्यासाठी रामचंद्र सीतामातेसह तेथे आले होते. रामचंद्रांनी लक्ष्मण, सीता यांच्यासह चौदा वर्षांच्या वनवासात तेथे काही काळ वास्तव्य केले होते अशी आख्यायिका आहे.

राम, लक्ष्मण, सीतामाता या तिघांच्या एकत्रित मूर्ती तेथे नाहीत. लक्ष्मणाचे वेगळे मंदिर प्रमुख मंदिराच्या पुढे आहे. लक्ष्मणाची मूर्ती पांढरीशुभ्र आहे. तेथे प्रथम दर्शन घ्यावे लागते. लक्ष्मणाच्या मंदिरात प्रवेश करते वेळी उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे. लक्ष्मणाचे दर्शन झाल्यानंतर मागील मोठ्या मुख्य मंदिरात जायचे. मागच्या रामसीतेच्या देवळातील रामाची मूर्ती काळी. राम सावळा. रामाच्या शेजारची सीता गोरीपान. चांदीच्या नक्षीदार प्रभावळीत राम आणि सीता यांच्‍या मूर्ती उभ्या आहेत. मूर्तीच्या अंगावर हिऱ्यामाणकांचे बहुमोल अलंकार आहेत. रामाची कोदंडधारी मूर्ती विलोभनीय आहे. मंदिराचा गाभारा व वरील नक्षिकाम पाहण्यासारखे आहे. मंदिर नागपूरचा राजा रघुजी भोसले यांनी छिंदवाड्यातील देवगड किल्ल्याच्या विजयानंतर बांधले आहे.

लक्ष्मणाने त्याच्या थोरल्या भावाची सेवा कशी केली त्याची वर्णने अनेक स्त्रीगीतातून नि लोकगीतांतून केली गेली आहेत.

‘राम चाले वाटे, लक्ष्मण झाडी काटेl असे बंधु नाही कोठे, संसारात’

अशा आदर्श धाकट्या भावाचे देऊळ एक पाऊल पुढे असावे हे योग्यच होय.

मंदिरातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला रामाची माता कौसल्या व त्यापलीकडे सुमित्रा यांची देवळे आहेत. रामाचे व लक्ष्मणाचे मंदिर व शिखर संगमरवरी असल्याने ती पांढरीशुभ्र मंदिरे लक्ष वेधून घेतात. रामाच्या देवळाच्या मागच्या बाजूला उंच जागा आहे. तेथे त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपूर लावतात. रामटेकला त्या दिवशी तिथल्या उंच जागेवर एका घंगाळात तुपात भिजवलेला पीतांबर जाळतात. त्याला त्रिपूर जाळणे असे म्हणतात. त्याच्या ज्वाळा दूरवरूनही दिसतात. रामटेकला त्रिपुरी पौर्णिमेला यात्रा भरते. मंदिराच्या कोपऱ्यात रामझरोका आहे. तेथे सोसाट्याचा वारा आहे. तेथून रामटेकचे व गावाचे पूर्ण दर्शन होते. गावातील घरे खेळण्यातल्यासारखी इवली इवली दिसतात.

रामटेक गावाला रामगिरी डोंगराचा भक्कम आधार वाटतो. तो सदैव पाठीशी उभा आहे. रामगिरीहून विशाल रामसागर व त्यापलीकडे जैनांचे देखणे जैनमंदिर दिसते. पलीकडच्या टोकाला नागार्जुनाचे देऊळ आहे. तेथे चिंचोळ्या तिकोनी गुहेत शेंदूर माखलेली नागार्जुनाची ओबडधोबड प्रतिमा आहे. ती सीतान्हाणी . तेथे सीतामाईने अंघोळ केली असे सांगतात.

लोक पूर्वी पायी काशियात्रा करत असत. दक्षिण भारतातील लोकांचा मार्ग रामटेकवरून जात असे. रामटेकला यायचे, प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचे आणि पुढे काशियात्रेला प्रस्थान ठेवायचे अशी पद्धत होती; म्हणूनच रामटेकला काशियात्रेचे महाद्वार म्हटले जायचे. रामटेक येथील रामनवमी उत्सव दिमाखात साजरा होतो. रामाने लक्ष्मण-सीतेसह तेथे वास्तव्य केल्यामुळे त्यास तीर्थक्षेत्राचे महत्त्व आले आहे.

रामगिरीवर रामटेक येथे कवी कालिदास स्मारक उभारले गेले आहे. त्यात कालिदासाच्या महाकाव्यातील, नाटकांतील सुंदर पदे कोरली आहेत. मेघदूत, कुमारसंभव, रघुवंश, शाकुंतलम्, मालविकाग्निमित्र या नाटकांतील व काव्यांतील दृश्यांची सुंदर काल्पनिक चित्रे स्मारकामध्ये पाहावयास मिळतात. परिसर सुंदर आणि शांत आहे. स्मारक पाहताना कवी कालिदासांच्या महान प्रतिभेची कल्पना मनात आल्याशिवाय राहत नाही. नोव्हेंबर महिन्यात दोन दिवस कवी कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यात नाटके, नृत्य, साहित्य, काव्य यांची रेलचेल असते. रसिक, साहित्यिक, दूरदूरहून महोत्सवासाठी हजेरी लावतात. कालिदास महोत्सवामुळे विदर्भातील जुन्या वैभवशाली संस्कृतीला व आठवणींना उजाळा मिळतो.

रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) असून त्याची स्थापना १८ सप्टेंबर १९९७ रोजी झाली. संस्कृत भाषा ही भारतीय भाषांचा आत्मा आहे व रामटेक ही महाकवी कालिदासांची कर्मभूमी आहे. म्हणून तेथे त्यांच्या नावाने संस्कृत विश्वविद्यालय स्थापन होणे हे समर्पक आहे. तेथून संस्कृत भाषेचा प्रसार व वर्धन करण्याचे कार्य चालते. विद्यापीठात वेद, वेदांग, साहित्य, साहित्यशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, योगशास्त्र इत्यादी विषय सखोल अभ्यासता येतात. विद्यापीठ संस्कृत भाषेच्या उत्थापनासाठी कार्य करत आहे असे विद्यापीठाला भेट दिली असता जाणवले.

त्याशिवाय अंबाळा तलाव, खिंडसी तलाव हीदेखील आकर्षणाची केंद्रे झाली आहेत. पर्यटक खिंडसी तलावात नौकानयनाचा आनंद लुटतात. रामटेकजवळ मणसर येथील वस्तुसंग्रहालय, नागरधन किल्ला, रामसागर तलाव, मंगल धातूंच्या खाणी ही ठिकाणेदेखील पाहण्यासारखी आहेत.

रामटेक हे तालुक्याचे ठिकाण नागपूरच्या उत्तर बाजूस असून नागपूरपासून बावन्न किलोमीटर अंतरावर आहे. रामटेक येथे एम.आय.डी.सी.ने हॉटेले व विश्रामगृहे उभी केली आहेत. रामटेकला जाण्यासाठी एस.टी. बसेसची व रेल्वेची सोय आहे. भारताच्या पुरातन संस्कृतीचा वारसा तेथे प्रयत्नपूर्वक जपल्याचे सदैव जाणवत राहते.

– रंजना उन्‍हाळे

(मूळ लेख, ‘आदिमाता’, 2010)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.