विज्ञानातील हसरेपण!

0
34

ज्येष्ठ हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांनी इयत्ता चौथीपर्यंतच्या गणिताच्या पुस्तकांना काही वर्षांपूर्वी हसरे रूप दिले आणि आता पाहवे, तर विज्ञान विषयालाही हास्याचे कंगोरे असू शकतात हे त्याच कुळातील दुसरे हास्यचित्रकार यशवंत सरदेसाई सिद्ध करू पाहताहेत! यशवंत सरदेसाई यांची व्यंग-हास्यचित्रे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या आठवड्याच्या विज्ञान पुरवणीत ‘हसरे विज्ञान’ या शीर्षकाखाली तब्बल सात-आठ वर्षें प्रसिद्ध होत. त्यांनी त्या काळात रेखाटलेल्या तीनशेपन्नास व्यंगचित्रातील निवडक व्यंगचित्रांचा ‘हसरे विज्ञान’ हा संग्रह आहे.

यशवंत सरदेसाई यांच्या ‘उद्वेली बुक’तर्फे गेल्या दोन वर्षांत प्रसिद्ध झालेल्या ‘हास्यचित्रावली’ आणि ‘स्मितचित्रावली’ या दोन संग्रहांनंतरचा प्रस्तुतचा ‘हसरे विज्ञान’ हा तिसरा संग्रह. हास्य सर्वत्र नांदते! म्हणजेच विनोद निर्मितीला कोणताही विषय चालू शकतो ही बाब या संग्रहातील चित्रे पाहताना ठळकपणे जाणवते.

जडजंबाल संज्ञांनी भरलेल्या विज्ञानाची हसरी बाजू दर्शवणाऱ्या या संग्रहातील पहिलेच चित्र मोठे मजेदारच म्हणायला हवे. घरी बसून गुडगुडी ओढण्याची सवय असलेल्या शास्त्रज्ञाला प्रयोगशाळेत गुडगुडीची हुक्की आली आणि त्याने लगेच लांब नळीच्या आणि पसरट आकाराच्या काचपात्राचे गुडगुडीसदृश रबराच्या वादीचे एक टोक पात्रात ठेवून दुसऱ्या टोकाने गुडगुडी ओढत असल्याचा गंमतीदार आभास निर्माण केला आहे. तो पाहून ओठावर हसू उमटतेच! सरदेसाई चित्ररेखाटनासाठी ब्रश वापरतात का पेन, हा प्रश्न हास्यचित्रांचा निर्भेळ आनंद घेऊ पाहणाऱ्या हास्यचित्ररसिकांना पडण्याचे कारणच नाही. चित्राची मांडणी, त्यांतील व्यक्तिरेषा, प्रसंगानुरूप चित्राबद्दल अधिक माहिती देणारी ओळ एवढ्या गोष्टी जमून झाल्यावर खुदकन हसू का नाही येणार? हॉटेलातील पोर्‍याला न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण नियमाचे ते काय होय? पण प्रत्यक्षात, त्याने गिऱ्हाईकांनी ऑर्डर दिलेल्या चहाच्या कपसह विविध खाद्यपदार्थांच्या बशा एकावर एक रचल्या आहेत आणि गिऱ्हाईकाला तो सांगत आहे, ‘गुरुत्वमध्याला धक्का न लावता तुमची प्लेट उचला, साहेब!’

ऐन पावसाळ्यात पावसाने मारलेली दीर्घकाळाची दांडी आणि सरकारी पातळीवर कृत्रिम पाऊस पाडण्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ हे सर्वांच्या परिचयाचे. सरदेसाई यांच्या चित्रातील शास्त्रज्ञाच्याच डोक्यावर एक ढग पाऊस पाडत आहे. आणि त्या आनंदापासून वंचित झालेल्या दोघांपैकी एकजण दुसऱ्याला सांगतोय, ‘कृत्रिम पाऊस पाडणारे तज्ज्ञ असावेत!’

खूपच महत्त्वाचा प्रयोग करण्यास सिद्ध झालेल्या संशोधकाने प्रयोगशाळेतील उपकरणांच्या सहाय्याने आधी स्वतःसाठी इन्स्टंट चहा करण्याचा शोध लावलाय आणि तो आपल्या सहाय्यकाला म्हणतोय, ‘आता खरा हुरूप येईल संशोधनाला…’

पुस्तकाची पाने उलटत जाण्याचा आणि पानापानावरील व्यंगचित्रांचा आस्वाद घेण्याचा सिलसिला पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत चालूच राहतो आणि दर्जेदार, उत्तम व्यंगचित्रे पाहिल्याचे समाधान मिळून जाते.

व्यंगचित्रकार यशवंत सरदेसाई ‘लोकसत्ते’च्या अर्थकारण पुरवणीसाठीही बरीच वर्षें ‘हास्यार्थ’ शीर्षकाखाली चित्रे काढत.

– विजय कापडी

चित्रकार : यशवंत सरदेसाई

प्रकाशक : शर्वा प्रकाशन, मुंबई-७८. दूरध्वनी : ९००४१७०६१४

About Post Author