वाचन व विकासाच्या प्रसारक!

2
50
-bebitai-

अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या, सर्वसामान्य महिलेसारख्या दिसतात, पण बोलू लागल्या, की वाणी भल्याभल्यांना विचार करण्यास भाग पाडेल अशी – त्यांची वर्णनशैली बघा, हं – “वीरपत्नी कोण, तर जिच्या पतीने देशासाठी बलिदान दिले ती. तो सैनिक त्याला वीरमरण आले म्हणून थोर झाला, मात्र त्याच्या मागे आयुष्याला धैर्याने सामोऱ्या जाणाऱ्या वीरपत्नीला समाजात स्थान कसे दिले जाते? तिचे दागिने, तिला सन्मानाने दिलेली सरकारी मदत; सगळे काही हिसकावून घेतले जाते”… बेबीताई समाजातील एक हिडीस वास्तव पोटतिडिकेने मांडतात… “आपण वाचतो, शिक्षण घेतो, पैसा मिळवतो, त्याचा उपयोग काय? फक्त दोन वेळा खायला, की आपल्याच लोकांसाठी मार्ग दाखवायला?” त्या असे प्रश्नामागून प्रश्न धारदारपणे विचारत जातात. मात्र बेबीताईंचे शिक्षण आहे फक्त नववी पास!

त्यांना वास्तवाची जाण आणि परिस्थितीची उमज कशातून लाभली? बेबीताई लहानाच्या मोठ्या अहमदनगर जिह्याच्या शेवगाव तालुक्यातील छोट्याशा दहिगावमध्ये झाल्या. त्यांचे कुटुंब मोठे एकत्र होते. त्या सांगतात, “वाचनाचा वारसा मला माझ्या आई-वडिलांकडून लाभला आहे. माझे आईवडील, दोघेही अशिक्षित तरी त्यांना समाजभान होते. वडिलांना अध्यात्माचीही आवड आहे. मी लहान असताना आमच्या गावात पारायण होत असे. त्या पारायणाला वडील जात व मलाही आवर्जून नेत. पारायण झाल्यानंतर, घरी आल्यावर वडील ओव्यांचा अर्थ समजला का नाही ते मला विचारत माझ्याकडून कीर्तन म्हणवून घेत. ते त्यांना गोड वाटे. त्या कीर्तनात दाखले देण्यासाठी म्हणून मला वाचनाची आवड निर्माण झाली.”

हे ही लेख वाचा –
वाचन कसे आणि का शिकायचे?
रंगगंध कलासक्त न्यास – ‘अभिवाचना’ची एक वेगळी वाट
साहित्य अभिवाचन – नवे माध्यम

बेबीताईंची शाळा सुटली नववीत असताना. पाठच्या भावंडांनी शिकायचे तर मोठ्या मुलीने घरी थांबण्यास हवे, अशी परिस्थिती घरात निर्माण झाली. म्हणून त्यांना शाळा सोडून द्यावी लागली, पण तोपर्यंत त्यांची शब्दांशी जमलेली गट्टी कायम राहिली. बेबीताईंचे पती अशोक गायकवाड हे एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार होते. कंपनी युनियनच्या वादातून 2005 मध्ये बंद पडली. सातशे कुटुंबे रस्त्यावर आली. घरात खाण्यास काही नाही; स्वतःला किमान दोन वेळची भाकरी स्वाभिमानाने खाता यावी, म्हणून धडपड सुरू झाली. दुष्काळाची धग लागताच, त्या पती-पत्नीने अहमदनगर गाठले. तोपर्यंत संसारवेलीवर कन्यारत्नाचे आगमन झाले होते. त्यांनी लेकीला समर्थ बनवावे या विचाराने तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. ती शाळा परवडत नाही म्हणून तिची रवानगी लांबच्या मराठी शाळेत करण्यात आली. मायलेकींना तेथे जाण्यासाठी रोज तीन किलोमीटर ये-जा करावी लागे. अशोक गायकवाड यांनी शक्कल लढवली. ते म्हणाले, “लेकीला शाळेत सोडले, की तू भाजी विक.” बेबीतार्इंना ती कल्पना पटली आणि त्या भाजीची टोपली घेऊन शाळेजवळ बसू लागल्या. पहिल्याच दिवशी एक रुपया सुटला आणि हुरूप वाढला. जवळ असलेला वर्तमानपत्रांचा स्टॉल हा बेबीताईंचा आधार ठरला. त्या भाजी विकताना जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा वर्तमानपत्र वाचून काढत. त्यात येणारी पुस्तकांची माहिती वाचून त्यांच्या मनाला भुरळ पडे. त्या पुस्तके विकत घेण्यासाठी बचत करू लागल्या.

जवळपासचे रहिवासी भाजी खरेदी करण्यासाठी येत. त्यात शिक्षक, प्रोफेसर, नोकरदार असे लोक असायचे. त्यांना पेपर वाचणारी भाजीवाली लक्षवेधी वाटे. एका ग्राहकाने त्यांच्यासाठी लायब्ररी खुली केली. त्या ‘शिवाजी कोण होता’, ‘आई समजून घेताना’, ‘अग्निपंख’ अशी पुस्तके आणून वाचू लागल्या. त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतरच्या मुलाखतीत सांगितले, की “मी प्रथम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे ‘जागर’ नावाचे पुस्तक वाचले. मला त्या पुस्तकामुळे वक्ता कसा असावा या विषयीचे ज्ञान झाले. मी त्या पुस्तकामधील गोष्टी आत्मसात करू लागले. मी माझा व्यवसाय भाजीविक्रीचा असला तरी वाचनाची आवड कमी होऊ दिली नाही. माझे मत असे आहे, की माणसाला आवड असली की सवड आपोआप मिळते. मी भाजी ज्या ठिकाणी विकत होते, त्याच्यासमोरच आकाशवाणीचे केंद्र आहे. मी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असते. आकाशवाणीमध्ये काम करणारे लक्ष्मण देशपांडे माझ्या दुकानात नेहमी येत असत. मी त्यांना आवर्जून सांगत असे, की मी आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकते. त्यांनादेखील कौतुक वाटे. मग तेही म्हणाले, की तुम्ही वाचनाला सुरूवात -bebitai-gaikwad-bookकरा. ते मला आवडीची पुस्तके आणून देत असत आणि मी वाचन करत असे. मी अब्दुल कलामांचे ‘अग्निपंख’ हे पुस्तक वाचले आहे. तसेच, उत्तम कांबळे यांची पुस्तके नेहमी वाचते. त्या पुस्तकांमुळे मला त्यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी समजली. मी लेखकांना आवर्जून फोन करत असते. कांबळेदेखील मला पुस्तके वाचण्याचा सल्ला देत असत आणि कोण-कोणती पुस्तके वाचली पाहिजेत तेही सांगत असत.” बेबीताई त्यांना त्या पुस्तकांतून वाचण्याची आणि जीवन जगण्याचीही प्रेरणा मिळाली असे म्हणतात.

बेबीताईंच्या वाचनात, सावित्रीबाई फुले यांनी विधवांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी खास हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता, ही गोष्ट आली. त्यांना वाटले, त्यांनी ते का करू नये? त्यांनी आसपासच्या विधवांना आग्रहाने हळदीकुंकवाला बोलावले. पस्तीस महिला पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या! बेबीतार्इंनी भाजीची गाडी दुसऱ्या दिवशी नित्यनेमाने लावली. दुपार उलटून गेली तरी गाडीवर सामसूम! समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. नातलगांनी निषेध केला. मात्र अशोकराव बेबीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

त्यानंतर उभयतांनी नगरपासून चाळीस-पन्नास किलोमीटर परिसरात असलेल्या राहुरी, वांबोरी, बायजाबाई जेऊर यांसारख्या गावांना जाऊन आठवडे बाजारात भाजी विकण्यास सुरुवात केली; त्याला जोडधंदा म्हणून जेवणाचे डबे घरपोच देणारी मेस सुरू केली; वांबोरीला असलेल्या छोटयाशा शेतजमिनीत राबण्यास सुरुवात केली.

बेबीताईंनी गावातील सैनिकी कार्यालयात जाऊन हुतात्मा सैनिकांचे पत्ते मिळवले. त्यांच्या पत्नींना सन्मानाने त्या हळदीकुंकवाला आमंत्रित करू लागल्या. हळुहळू भाजीविक्री पूर्ववत होऊ लागली. वर्तमानपत्र-पुस्तके वाचणारी भाजीवाली विधवांचे हळदीकुंकू समारंभ सन्मानाने करते म्हणून बातमीचा विषय झाली. त्यांनी सांगलीत आयोजित केलेल्या हळदीकुंकवाच्या समारंभाला दीड हजार महिलांचा उत्साही सहभाग लाभला. त्यातूनच मग ओळखी वाढल्या, काही तरुण महिलांचे पुनर्विवाह झाले. त्या पुनर्विवाहांना मुलींच्या पालकांपेक्षा सासू-सासऱ्यांचा पाठिंबा अधिक मिळाला.

बेबीताईंचे उपक्रम पंचक्रोशीबाहेर, विविध जिल्ह्यांत माहीत झाले. त्या शेतात कांदे कापत असताना एका संध्याकाळी फोन आला, “बेबीताई, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या कवी मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2015-16 च्या मानकरी ठरल्या आहात.” बेबीताई यांना काही उमगेना! बातमी सर्वदूर पोचली. फोन खणाणू लागला. पत्रकारांनी फोटो मागितले तेव्हा त्यांनी फोटोग्राफरला मध्यरात्री बोलावून आणून फोटो काढवून घेतला. त्यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला जायचे म्हणून शेजारच्या एका साहेबांनी कौतुकाने गाडी दिली. पुरस्काराच्या आधी छोट्या चित्रफितीतून शेतात राबणाऱ्या, भाजी विकणाऱ्या, वाचन करणाऱ्या, विधवा महिलांना सन्मानाने वागवणाऱ्या, गरीब मुलांसाठी तत्परतेने मदत करणाऱ्या बेबीताई सगळ्यांसमोर आल्या! गायकवाड दाम्पत्य गहिवरून गेले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये अशा स्वरूपाचा पुरस्कार! बक्षिसाचे पैसे बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर उभी राहिली आहे त्यांची सेवाभावी संस्था- ‘स्वयंसिद्धा फाउंडेशन’. संस्थेचे उद्दिष्ट महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्यासाठी कौशल्यविकासाचे उपक्रम राबवणे. बेबीताई ‘लोकराज्य’ या सरकारच्या मुखपत्राचे जाहीर वाचन नियमित करतात. ते गावातील महिलांसाठी मागर्दर्शक ठरते.

-swaynsidha-bebitaiबेबीताई यांचा दिवस सुरू होतो पहाटे चार वाजता, पुस्तकवाचनाने! त्यांनी स्वत:ला, दररोज एक तास पुस्तकवाचन केलेच पाहिजे, ही शिस्त लावून घेतली आहे. गायकवाड दाम्पत्याची वांबोरीजवळ (तालुका राहुरी) थोडी शेती आहे. त्या परिसरात आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आहे. त्या कुटुंबांतील मुलांना शाळा म्हणजे काय हेच माहीत नाही, मुलांचा कार्यक्रम शेतात हुंदडणे एवढाच दिवसभर असतो. बेबीताईंनी बारा आदिवासी मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. त्यांची नावे जवळच्या वस्तीशाळेत टाकली आहेत. बेबीताई यांचे स्वत:चे घर छोटे आहे, मुलांसाठी जागा नाही, त्यामुळे त्या मुलांना वांबोरीत त्यांच्या कुटुंबांतच ठेवले गेले आहे. मात्र त्या, मुले शाळेत जातात की नाही याकडे लक्ष ठेवतात, त्यांनी मागितलेली मदत पोचवतात. त्या त्यांच्या भाजीविक्री व खानावळी यांच्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम त्या खर्चासाठी बाजूला काढून बँकेत ठेवतात.

त्यांच्या घरातील वाचनालयात एक हजाराहून अधिक पुस्तके आहेत. त्यांचा लाभ अनेक गरीब विद्यार्थी घेत आहेत आणि मुलांना अधिकाधिक पुस्तके वाचण्यास मिळावीत म्हणून त्या नवनवी पुस्तकेही खरेदी करतात. त्यांची समाजकल्याण आश्रमशाळा चालक समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्याअंतर्गत, त्या आश्रमशाळांना भेट देऊन तेथे आहार, सुरक्षितता यांची स्थिती काय आहे याचा आढावा घेत असतात. बेबीताईंनी तेरा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांत जाऊन वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी सहाशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्या म्हणाल्या, त्या सोलापूरला एका महाविद्यालयात व्याख्यानाला गेल्या होत्या. त्यांनी तेथील ग्रंथालयास भेट दिली. तेव्हा तेथील अधिकाऱ्याला विचारले, की “तुम्हाला ग्रंथालयात काम करताना कसे वाटते?” त्याने उत्तर दिले “मी येथे माणूस घडवण्यासाठी काम करत आहे! पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा माझा मानस आहे.” बेबीताई यांचा मानस वाचनामुळे माणूस समृद्ध होतो हाच संदेश सर्वांपर्यंत नेण्याचा आहे.  नगर जिल्ह्यातील बेबीताईंचे घर हे ‘पुस्तकांचे घर’ व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.

-bebitaigaykwad-and-herhusbandबेबीताईंनी ‘स्वयंसिद्धा फाउंडेशन’ या संस्थेची नोंदणी 22 डिसेंबर 2015 रोजी केली. त्या म्हणतात, ‘मला वाचेल तो वाचेल’ याचा अनुभव आयुष्यात खरोखरच आलेला आहे. वाचनाच्या आवडीने मला चांगले विचार तर दिले, पण मुख्य म्हणजे जगण्याची जिद्द दिली. प्रतिकूल परिस्थितीला तोंड कसे द्यावे ते पुस्तकांनीच शिकवले. सोशल मीडियाचे जग व्यापक झाले असले तरी वाचनाने माणूस घडतो हेच खरे!

त्यांच्या मुलीने (अश्विनीने) बी एस्सी (केमेस्ट्री) आणि मास्टर ऑफ सोशलवर्क ही डिग्री मिळवली आहे. मुलगा गौरव बी एस्सीच्या द्वितीय वर्षास शिकत आहे. त्यांना त्यांच्या कार्यात पतीचा पाठींबा असतो. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही पुरस्कार असे- सामाजिक कामासाठी 2012 मध्ये मैनाबाई पवार आदर्श माता पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार- लातूर, ‘दैनिक लोकसत्ता’चा 2015 चा नवदुर्गा पुरस्कार, काकासाहेब म्हस्के समाजरत्न पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा 2016 चा रत्नशारदा पुरस्कार. त्यांना अशा एकावन्न सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

– बेबीताई गायकवाड 9623482421
संपर्क – क्रांतीज्योती महिला मंडळ, कसबे वस्ती, भिस्तबाग नाका, सावेडी, नगर

– पल्लवी मुजुमदार pallav.mujumdar@gmail.com

(मूळ प्रसिद्धी – ‘झी मराठी दिशा’, लेखाचा विस्तार – थिंक महाराष्ट्र टीम)

About Post Author

2 COMMENTS

  1. खुप स्फूर्ती देणारे…
    खूप स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्व आहे.

Comments are closed.