वसुधा कामत – आधुनिक तंत्रज्ञानाचा पाठपुरावा

0
68
vasudha 1

वसुधा कामत यांना भेटावे आणि त्यांच्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वाचा एकच पैलू ध्यानी यावा असा अनुभव बर्‍याच जणांचा आहे. तो पैलू आहे त्यांच्या शिक्षणविषयक ध्यासाचा, विशेषत: शैक्षणिक तंत्रज्ञानावरील भरवशाचा. त्यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तर त्यांना देशातील शिक्षण तंत्रज्ञानाच्या बहुअंगांनी विकसित व्हावे असे वाटते व तेच सूत्र त्या आग्रहाने मांडतात.

निर्मिती आणि उपक्रमशीलता यांना प्रोत्साहन, अन्य विद्यापीठांशी- तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर परस्परसंबध स्थापून, ते वाढवून टिकवणे, संशोधनास चालना देणे आणि उद्योगविश्व व विद्यापीठ यांचा समन्वय साधणे ही चार सूत्रे वसुधा कामत यांनी आपली व्हिजन म्हणून मांडली आहेत. त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून मे 2011 मध्ये पदभार स्वीकारला.

वसुधा कामत यांचा जन्म मुंबई मध्ये झाला. त्यांचे मूळ घर सिंधुदुर्ग  जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यात आहे. त्यांचे वडील सरकारी वैद्यकीय अधिकारी होते. वडिलांच्या सतत होणार्‍या बदल्यांमुळे आणि ते ग्रामीण भागात काम करत असल्यामुळे, वसुधा कामत यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात (तेव्हाचा कुलाबा) निरनिराळ्या गावांतल्या शाळांमध्ये झाले. शालेय जीवनात भेटलेल्या प्रामाणिक, निरलस वृत्तीच्या शिक्षकांचा त्यांच्यावर फार प्रभाव पडला असे त्या म्हणतात. त्यांचे वडील एकही दिवस सुटी न घेता काम करत असत. ते फक्त रुग्णसेवा न करता, गोरगरिबांच्या गरजाही (अन्न, वस्त्र वगैरे) पुरवण्याचा प्रयत्न करत असत. त्यांचे हे कृतिप्रवण संस्कार वसुधा कामत यांच्या मनात खोलवर रुजले. शिक्षकांनीही आपल्या चांगल्या वर्तनाने, आचाराने-विचाराने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करावेत, त्यांना चांगली जीवनमूल्ये जोपासायला शिकवावीत असे कामत यांना वाटते.

त्या साहाय्यक प्राध्यापक म्हणून एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या पी.व्ही.डी.टी. कॉलेजमध्ये (1983) रुजू झाल्या. त्या सलग चोवीस वर्षे एस.एन.डी.टी. विद्यापीठात काम करत होत्या. त्या 1986 मध्ये शैक्षणिक तंत्रविज्ञान विभागाच्या प्रमुख बनल्या व तिथे त्यांनी काही नवीन उपक्रम सुरू केले. पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण, पीएच.डी. असे सर्व अभ्यासक्रम सुरू झाले. ‘ई-शिक्षणपद्धतीसाठी शैक्षणिक आकृतिबंध’ या विषयाचा ‘ऑन लाईन कोर्स’ एस.एन.डी.टी. विद्यापीठाने सुरू केला. शैक्षणिक तंत्रज्ञान विभागाने या विषयाचा विद्यापीठीय अभ्यासक्रम, शिक्षकप्रशिक्षण, संशोधन, संवर्धन ह्या सर्वं क्षेत्रांत आपला लक्षणीय ठसा उमटवला आहे.

कामत ओळखल्या जातात ते शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या (Educational Technology ) आणि माहिती तंत्रज्ञानाच्या (Information and Communication Technology ) प्रणेत्या म्हणून. शिक्षणक्षेत्रात ह्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नांत त्यांचा सहभाग मोलाचा आहे. त्यांनी आयुष्याची चार दशके शाळा, महाविद्यालये, शिक्षक-प्रशिक्षण, स्त्री-शिक्षण, मुक्त व दूरस्थ शिक्षण, निरंतर शिक्षण ह्या सर्व शैक्षणिक विभागांत काम करण्यात व्यतीत केली आहेत.

नॅशनल कौंन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCERT : ncert.ne.in) ह्या संस्थेचाच एक भाग असलेल्या 2007 मध्ये C.I.E.T. (Central Institute of Educational Technology ) ह्या, संस्थेमध्ये, त्या संयुक्त-संचालक  म्हणून नियुक्त झाल्या. तिथेही त्यांनी संस्थेच्या कार्याचा स्तर उंचावला. माहिती-तंत्रज्ञान ह्या विषयासाठी शालेय शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी स्थापलेल्या समितीच्या सर्व सभासदांच्या मतांचा आढावा घेऊन, एक मसुदा बनवताना त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

‘शिक्षणाचा हक्क’ आणि ‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान’ ह्या योजनांमुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक प्रवाहात येतील आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी तेवढ्याच प्रमाणात शिक्षक लागतील. शिक्षकांची गरज पुरवण्याचे हे आव्हान पेलण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (I.C.T .) हेच समर्पक उत्तर ठरेल असे वसुधा कामत यांचे मत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग आता शालेय पातळीवरही अनिवार्य ठरवण्यात आला आहे.

शिक्षणातील नवीन प्रवाह, नवीन उपक्रम, त्यांत त्यांचा सहभाग कसा असेल आणि ही नवीन जबाबदारी पेलताना त्या काय करू इच्छितात हे सविस्तर शब्दांत मांडताना त्या म्हणाल्या, ‘Learning is innate. ते शिकवायला लागत नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते आणि जसे पाहिजे त्या पद्धतीने शिकण्यासाठी मदत करणे हे शिक्षकांचे काम असते. नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सोपे आहे. वर्गांत दहा तास बोलून जे शिकवता येणार नाही ते इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीद्वारा शिकता येते. तरी शिक्षकांना पर्यायच नाही.’ त्यांनी शिक्षकांना नवे तंत्रज्ञान शिकवण्यासाठी अनेक कार्यशाळा कार्यान्वित केल्या आहेत. ‘झिरो लेक्चर प्रोजेक्ट’च्या निर्मात्या म्हणून त्यांनी शिक्षकांना ‘सकारात्मक दृष्टिकोना’चा अवलंब करून, ‘न बोलता’ कसे शिक्षण द्यायचे हे शिकवणे सुरू केले. त्या प्रशिक्षणाचा प्रसार चालू आहे. त्यांनी एन.सी.इ.आर.टी .त असताना, जवळजवळ एक लाख शिक्षकांसाठी माहिती-तंत्रज्ञानाचा शाळेत उपयोग करताना शिक्षकांना व्यावसायिक बनवण्याची योजना राबवली होती. एन.सी.इ.आर.टी .ने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा मेळ घालत विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिक्षण चालू केले आहे. त्यात मोबाईल, सॅटेलाईट, टी.व्ही, इंटरनेट, ऑडिओ बुक्स इत्यादींचा समावेश आहे.

 

 

वसुधा कामत शिस्‍तप्रिय आहेत. त्‍यामुळे वरकरणी त्‍या कठोर वाटतात. मात्र त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व प्रसन्‍न आहे. कोणत्याही प्रश्‍नावर झटपट निर्णय घेऊन तो हातावेगळा करणे हे त्‍यांचे वैशिष्‍ट्य आहे. त्‍यांच्‍या विस्‍तृत कार्यामागे असलेली महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे त्‍यांची नाविन्‍याची आवड.  त्‍या कोणतीही नवीन गोष्‍ट किंवा तंत्रज्ञान शिकण्‍यास नेहमी तयार असतात. नवीन गोष्‍टी आत्‍मसात केल्‍याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही असे त्‍यांचे मत आहे.

कामत यांच्या कामाचे स्वरूप व्यापक आहे. त्यांचा अध्यक्ष किंवा सभासद म्हणून माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक समित्यांशी सबंध आला आहे. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन , यू.एन.डी.पी ., वर्ल्ड बँक , युनिसेफ , एमएचआरडी इत्यादी संस्थांसाठी झालेल्या संशोधनकामात, अभ्यासात मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्यांनी मुक्त विद्यापीठ सल्लागार समिती, सर्व शिक्षण अभियान या संस्थांच्या सभासद म्हणून काम केले आहे.

त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय परिषदा, बैठका, सभा, संशोधनकार्य, संस्थांना भेटी देणे अशा विविध उद्देशांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण व आंतरराष्ट्रीयीकरण Collaboration आणि Co-operation ह्यांमुळेच यशस्वी होईल ह्यावर त्यांचा विश्वास आहे. शिक्षणाच्या बाबतीत आपण अजून मागे आहोत असेही त्या नमूद करतात.

त्यांनी भारतीय शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात सेक्रेटरी म्हणून स्वत: राज्य, राष्ट्र आणि आतंरराष्ट्रीय पातळीवर काही परिषदा आयोजित केल्या आहेत. त्यांच्या नावावर महत्त्वाची पुस्तके आणि संशोधन प्रबंध जमा आहेत.

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मान-सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘उत्कृष्ट शिक्षिका’ हा पुरस्कार 2005-2006 साली दिला आहे. त्याच वर्षी त्यांना अमेरिका सरकारकडून ‘फुलब्राईट सिनीअर रिसर्च फेलोशिप’ मिळाली आणि तिथल्या फ्लोरिडा विद्यापीठात ‘जेंडर इश्युज इन ऑन लाईन लर्निंग’वर संशोधन करता आले. कॅनडा आणि मलेशिया ह्या देशांकडून मिळालेल्या आमंत्रणांचा स्वीकार करून, त्यांना तिथे जाऊन संशोधन करण्याची व तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली. ‘युनेस्को’ तर्फे साजर्‍या होणार्‍या, जागतिक शिक्षक दिनानिमित्त पॅरिस इथे

5 ऑक्टोबर, 2009 रोजी पार पडलेल्या समारंभात, त्यांना भारत देशाच्या प्रतिनिधी म्हणून हजर राहण्यासाठी निमंत्रण मिळाले होते. पण त्यांना सगळ्यात मोठा बहुमान वाटतो तो शिष्यांकडून मिळणार्‍या आदरयुक्त भावनेचा! पीएच.डी.चा अभ्यास करत असताना, त्यांनी म्युनसिपालिटीच्या शाळेत काम करणार्‍या मुलांबाबत अध्ययन केले होते. रिमांड होमच्या मुलांवरही संशोधन केले होते. शाळेतल्या मुलांच्या आयुष्यातल्या संघर्षात त्यांना मदत केली होती. ते विद्यार्थी त्यांना कुठे-कुठे भेटतात आणि ओळख दाखवत, मी तुमचा विद्यार्थी आहे असे सांगतात, ते क्षण त्यांना मोलाचे वाटतात. काही विद्यार्थिनी म्हणतात, की ‘बाई, तुम्ही आमची आयुष्ये बदलली’. तेव्हा त्यांना समाधान होते.

कामत यांनी बी.एस्सी.(रसायनशास्त्र), एम.एड.(प्रथम क्रमांक) पीएच.डी. आणि एम.ए. (समाजशास्त्र) ह्या पदव्या मिळवल्या आहेत, कामत गेली पंधरा वर्षे समाजसेविकेच्या भूमिकेतून कोकणस्थित ‘नारायण आश्रम’ (सोसायटी फॉर रुरल रिकन्स्ट्रक्शन अॅण्ड एज्युकेशन) ह्या संस्थेसाठीही काम करत आहेत.

त्या एस.एन.डी.टी. मध्ये कुलगुरू म्हणून नवीन जबाबदारीला सामोर्‍या जात आहेत. पण फक्त विद्यापीठाचा विचार न करता इतर क्षेत्रांशी संबधित राहून, चांगले प्रकल्प आणि संधी शोधून, त्यांचा उपयोग सर्वांना होईल असे कार्य आपल्या हातून घडावे अशी त्यांची इच्छा आहे. विद्यापीठ अनुदान मंडळ, सरकार ह्यांनी भारतातले साडेतीनशे मागास तालुके निवडून तिथे शिक्षणसंस्था काढण्याचे ठरवले आहे. तिथे राहणार्‍या लोकांची आर्थिक परिस्थिती, पारंपरिक व्यवसाय ह्यांचा मेळ घालून सर्व्हे घेतला जाणार आहे. नवीन अभ्यासक्रम सुरू करून विकसनशील मार्ग शोधला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी व्हिजन म्हणून मांडलेल्या चार सूत्रांशिवाय, शिक्षणात व्होकेशनल व अॅकेडेमिक अशी जी विभागणी झाली आहे ती दूर करण्यासाठी व विद्यार्थिनींना त्यांची आवड व व्यवसायाची निवड ह्यांची सांगड घालून शिकता येईल असे अभ्यासक्रम कसे निवडता येतील ते पाहिले जाईल.

‘ॐ सहनाभवतु, सहनौ…..’ हा मंत्र शैक्षणिक बोधवाक्य. तसेच, सर्वांनी एकत्र येऊन ‘Together we will grow’  म्हणत एकमेकांना मदत करत सर्व नवेजुने तंत्र-मंत्र आणि ज्ञानाने संपन्न होत एकविसाव्या शतकातले चांगले नागरिक घडावे हे त्यांचे ब्रीद आहे. त्यात त्यांच्या सहकार्‍यांचाही मोलाचा वाटा असणार आहे.

पाच विद्यार्थिंनींनिशी सुरू झालेली एस.एन.डी.टी. (1916) ही संस्था खूप मोठी झाली आहे. ह्या विद्यापीठाच्या शाखा इतर राज्यांपर्यंत पोचल्या आहेत. जवळपास पंच्याहत्तर हजार विद्यार्थिनी तिथे शिक्षण घेत आहेत. ‘नॅक’ने पाच स्टार देऊन विद्यापीठाचा गौरव केला आहे. खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण क्षमता आणि गुणवत्ता अजून वाढवून, ती तळागाळातल्या सर्व विद्यार्थिंनींपर्यंत नेऊन, विद्यापीठातील विद्यार्थिनींची संख्या एक लाखापर्यंत न्यायची आहे. जीवनकुशल, जीवनाभिमुख आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याकडे लक्ष द्यायचे आहे.

कामत यांना गिर्यारोहण , प्रवास, फोटोग्राफी, वाचन, मैत्री करणे आवडते, पण मुलाखतींत स्वत:विषयी बोलायला आवडत नाही. स्वत:बद्दल त्या एवढेच म्हणतात, ‘I owe my everything to society’. समाजानेच मला आधार देत इथवर आणले आहे आणि त्याच समाजातल्या, ज्यांना माझ्या आधाराची गरज असेल त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात सदैव तत्पर असेल.

वसुधा कामत, कुलगुरू,
एस.एन.डी.टी. विद्यापीठ,
1,एन. ठाकरसी मार्ग,
मुंबई – 400020,
संपर्क – +91-22-22031881/22014775,
फॅक्‍स – 91-22-22031882
इमेल – vasudhak2000@gmail.com, vcsndt@sndt.ac.in  

परिचय

नाव  – वसुधा कामत

शिक्षण– Ph. D. Education Technology (एस.एन.डी.टी. विद्यापीठातून – 1978 ते 1981) B.Sc. M.A (sociology), M.Ed. Ph. D. (Education) (मुंबई विद्यापीठातून)

अनुभव – एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्‍या कुलगुरू – (पदावर कार्यरत) C.I.E.T आणि NCERT च्‍या सहसंचालक (कार्यकाळ – सप्‍टेंबर 2007 ते मार्च 2011) एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या शिक्षण तंत्रज्ञान विभागातील मुख्य अधिकारी (कार्यकाळ – 1986 ते 2007) इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन , यू.एन.डी.पी ., वर्ल्ड बँक ,  युनिसेफ , एमएचआरडी इत्यादी संस्थांच्‍या संशोधन व अभ्यासात मार्गदर्शक म्‍हणून कार्य केले.

पुरस्कार– महाराष्‍ट्र राज्‍य शासनाकडून उत्‍कृष्ट शिक्षिकेचा पुरस्‍कार, 2006 फुलब्राईट शिष्यवृत्ती, यूएसए, 2006 इंटरनॅशनल फेलोशिप (मलेशियात शिकवण्‍यासाठी) 2004

{jcomments on}

About Post Author