वसईचा भुईकोट किल्ला – पोर्तुगीज वैभव (Fort of Vasai – Portuguese heritage)

2
339

वसई हे ऐतिहासिक शहर आहे. ते पाचशे वर्षांत पाच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या आधिपत्याखालून गेले. गुजरातच्या बहादुरशाहचा अंमल, नंतर दोनशे वर्षांचे पोर्तुगीज राज्य, नंतर मराठ्यांचे आधिपत्य; इंग्रज 1802 साली तेथे पोचले आणि 1947 नंतर स्वतंत्र भारत… वसईचा किल्ला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली आहे.

वसईचा किल्ला भुईकोट किल्ल्यांमध्ये अभेद्य असा समजला जातो. तो एकशेदहा एकर परिसरात पसरला आहे. त्याची तटबंदी चारही बाजूंनी सशक्त अशी उभी आहे. आतमध्ये मात्र सर्व परिसर पडझड झालेल्या इमारतींनी व्यापलेला आहे. किल्ला हा पोर्तुगीजांनी बांधलेला असल्यामुळे किल्ल्यातील इमारती या पोर्तुगीज स्थापत्य, कला, संस्कृती आणि ख्रिस्ती धर्म यांच्याशी संबंध दर्शवतात.

गुजरातचा बहादूरशाह ह्याच्या मलिक तुघान ह्या सरदाराने 1530 च्या आसपास जकात आणि इतर कर यांच्या वसुलीकरता छोटीशी गढी वसई येथे उभी केली. पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतान बहादूरशाह यांच्या फौजांवर 1533 साली हल्ला चढवून वसई ताब्यात घेतली आणि तेथे बालेकिल्ला बांधला. तो बालेकिल्ला साडेचारशे फूट लांब आणि तीनशे फूट रुंद असा आहे. तो बहादूरशाहच्या राजवटीतील गढीवजा किल्ला होता, त्याच जागेवर उभा आहे. बालेकिल्ल्याच्या उभारणीचा पुरावा म्हणून एक शिलालेख त्याच्या भिंतीवर आहे. त्यावर पोर्तुगीज भाषेत पुढील मजकूर कोरलेला आहे. “नुनो डीकुन्हा, गवर्नर यांच्या आदेशावरून पहिले किल्लेदार गार्सिया डिसा यांनी 1536 साली हा किल्ला बांधला.”  किल्ल्याच्या आत गव्हर्नरचा महाल, मोकळे मैदान, एक विहीर आणि सैनिकांसाठी बरॅक आहेत. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीज राजचिन्ह (Coat of Arms) दिसते. त्यामध्ये मध्यभागी क्रूस आणि पृथ्वीगोलासह दोन्ही बाजूंना बाण/भाले यांसह राजमुकुट दिसून येतो. ते प्रतीक साऱ्या जगावर धर्म आणि युद्धसामर्थ्य ह्यांच्या बळावर स्वामित्व प्राप्त करणे ह्या पोर्तुगीज विचारसरणीचे होते.

पोर्तुगीजांनी त्यांच्या दोनशे वर्षांच्या राजवटीच्या काळात वसईला उत्तरेकडील राजधानी असा दर्जा दिला आणि तिला एक वैभवशाली नगरी; तथा, विदेशी व्यापाराचे एक प्रमुख केंद्र बनवले. सतराव्या शतकातील युरोपीयन प्रवाशांनी वसईचे वर्णन तांदूळ, डाळी, इतर धान्ये, नारळ व तेल यांनी सुपीक आणि सोयीस्कर बंदरांनी सुसज्ज असे सुंदर तटबंदीचे शहर असे केले आहे. त्या पदार्थांची निर्यात आणि अरबी घोड्यांची आयात वसईच्या बाजारपेठेतून होई असे त्या वेळच्या जमेल कुरेरी ह्या इटालियन प्रवाशाने लिहिले आहे. पोर्तुगीज सरदारांनी किल्ल्याच्या आवारात त्यांच्याकरता टुमदार अशी निवासस्थाने बनवली. त्यांनीच किल्ल्याच्या आजुबाजूच्या सुपीक जमिनी विकत घेतल्या. पोर्तुगीज सरकारची विविध कार्यालये, बाजारपेठा, इस्पितळे आणि सात भव्य ख्रिस्ती मंदिरे (चर्चेस) यांची उभारणी तेथे झाली. त्या सर्व इमारती मिळून, वसईचा किल्ला ज्या एकशेदहा एकर क्षेत्रफळात उभा आहे त्या सबंध परिसराला गवसणी घालणारी एक भक्कम अशी तटबंदी पोर्तुगीजांनी उभी केली. वसईच्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी दोन हजार चारशेची फौज 1634 पर्यंत तैनात करण्यात आली. त्यांत चारशे युरोपीयन, दोनशे स्थानिक युरोपीयन आणि अठराशे गुलाम यांचा समावेश होता. त्या शिवाय किल्ल्याला नव्वद मोठ्या आकाराच्या आणि सत्तर लहान आकाराच्या तोफांचा तोफखाना होता. किल्ल्याबाहेरील खाडीत एकवीस जहाजांचा ताफा नेहमी तयार असे.

किल्ल्याला दोन दरवाजे आहेत- ‘पोर्ता दा तेरा’ म्हणजे भूमीवरचा दरवाजा आणि ‘पोर्तो दो मार’ म्हणजे समुद्रावरचा दरवाजा. किल्ल्याच्या भूमीच्या बाजूतील भिंतीची रुंदी जवळ जवळ पंचवीस फूट असल्यामुळे कोठल्याही तोफेच्या माऱ्याने अथवा हत्तीच्या आक्रमणाद्वारे तिचा भेद करणे अशक्य होते. किल्ल्यामध्ये जाणारा सद्यकालीन रस्ता ती भिंत तोडून बनवण्यात आला आहे. तो रस्ता सरळ समुद्री दरवाज्याकडे जातो. त्या रस्त्याने जरा पुढे गेले की डाव्या बाजूला पोर्तुगीजांवर विजय मिळवून किल्ला काबीज करणारे मराठा सेनापती वीर चिमाजी अप्पा ह्यांचे स्मारक आहे, तेथे अश्वारूढ असलेला त्यांचा पुतळा उंच जागी बसवलेला आहे.

किल्ल्यातील सात ख्रिस्त मंदिरांचे अवशेष आहेत. त्यांतील बहुतेकांच्या संरचनेच्या भिंती जरी उभ्या असल्या तरी त्यांची छपरे, बहुधा मराठ्यांनी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे जमीनदोस्त झालेली आहेत.

चर्च ऑफ होली नेम किंवा जेसुइट चर्च हे डागडुजी करून आणि त्याला छप्पर लावून ख्रिस्ती उपासना विधी करण्यासाठी वापरले जाते. त्या मंदिराला लागून धर्मगुरूंचा मठ होता आणि तेथे प्रशिक्षण विद्यालय होते. त्याचे भव्यपण अवशेषांत लक्षात येते. चर्चला लागून प्रांगण आहे, त्यात रोमन स्थापत्यशास्त्राचा सुंदर वापर दिसतो. त्याचे गोल खांब आणि कमानी उभ्या आहेत. बाजूचा परिसरही मोहक वाटतो. ख्रिस्तमंदिराचा दर्शनी भाग गोव्यातील प्रसिद्ध बॉम जेसू चर्चशी साम्य साधणारा आहे.

सेंट फ्रान्सिस्कन चर्च आणि मठ या वसई किल्ल्यातील सर्वात जुन्या धार्मिक वास्तू आहेत. चर्चचा पाया 1557 मध्ये खोदण्यात आला. त्या संरचनेत मठ इत्यादी अनेक जोडण्या नंतरच्या काळात केल्या गेल्या. संपूर्ण वास्तू मृत सरदारांच्या खाचा आणि त्यावरील शिलालेख ह्यांनी जडलेली आहे. ते बहुतेक लेखन पोर्तुगीज भाषेत आहे. बाजूचा असेंब्ली हॉल (58×63) हा ऐतिहासिक असा महत्त्वाचा आहे, तेथेच 16 मे 1739 रोजी मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातील शरणागतीचा अंतिम तह झाला होता.

संत जोसेफ (मदर) चर्च हे एकशेसत्तर फूट लांब आणि पंचेचाळीस फूट रुंद आहे.  ख्रिस्तमंदिराचा एकशेआठ फूटी मनोरा किल्ल्यातील सर्वात उत्तुंग असा आहे. त्याचे दर्शन मुंबईवरून ट्रेनने येताना वसईच्या खाडीच्या पूलावरून देखील होते. त्या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे अजून सुस्थितीत असलेला चक्री जिना. तेथून वर जाऊन सभोवतालच्या अनेक किलोमीटरपर्यंतच्या परिसराचे विहंगम दर्शन घेता येते. कोरलेल्या दगडी पायऱ्या एकमेकांवर रचून मध्यवर्ती भागात केलेला तो जिना त्या वेळच्या रचना अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना आहे.

वज्रेश्वरी आणि शिव ही दोन मंदिरे ‘कामारा’ किंवा टाऊन हॉल यासमोर दिसतात. पोर्तुगीजांविरुद्धच्या मराठा मोहिमेदरम्यान, किल्ल्याच्या अभेद्य संरक्षक रचनेमुळे 9 जून 1737, 9 जुलै 1737 आणि 12 सप्टेंबर 1737 या तीन मोहिमा अयशस्वी झाल्या होत्या. मराठा सेनापती चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या मोहिमेत किल्ल्याची चहुबाजूंनी कोंडी झाली आणि पोर्तुगीजांचा पराभव होऊन गेला. चौथ्या मोहिमेच्या आरंभी चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरी देवीला वाहिलेल्या नवसाची प्रतिपूर्ती म्हणून ही दोन मंदिरे बांधली गेली असे म्हणतात. वज्रेश्वरी मंदिर हे, वसई मोहिमेच्या यशस्वीतेच्या दोन वर्षांनंतर चिमाजी अप्पा ह्यांच्या झालेल्या निधनामुळे, त्यांचे वचन पूर्ण करण्यासाठी, पेशवा बाळाजी बाजीराव यांनी बांधले. मंदिराच्या गर्भगृहात देवी आणि सिंह यांची प्रतिमा विराजमान आहे. मंदिराच्या बाहेर यज्ञकुंड आहे. मंदिराच्या बाहेर आवारात दोन दीपस्तंभ व तुळशीवृंदावन आणि दोन साधूंच्या समाधी आहेत.

शिवमंदिर (नागेश्वर मंदिर) वज्रेश्वरी मंदिराला लागूनच आहे. ते पूर्व दिशेला असून त्याची उंची पंचेचाळीस फूट आहे. पार्वतीची प्रतिमा गर्भगृहात शिवलिंगाच्या मागे ठेवली आहे. गर्भगृहासमोर नंदी आहे. त्याचे बांधकाम वसई किल्ल्यावर मराठ्यांच्या विजयानंतर दोन महिन्यांनी (27 जुलै 1739) सुरू झाले आणि चिमाजी आप्पांच्या मृत्यूपूर्वी पूर्ण झाले.

छोटेखानी हनुमान मंदिर किल्ल्याच्या दक्षिण टोकाला समुद्र दरवाज्याजवळ आहे, ते 1739 साली उभारले गेले. त्यातील हनुमान मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिल्पकाराने हनुमान मूर्तीच्या चेहऱ्यावर मिशी दाखवलेली आहे.

मराठा फौजांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली किल्ल्यावर ताबा 1739 साली मिळवला. मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह 16 मे 1739 रोजी झाला आणि वसईचा किल्ला मराठ्यांकडे गेला. वसईवरील विजयामुळे मराठ्यांना पोर्तुगीजांच्या ताब्यातून वीस किल्ले, तीनशेचाळीस गावे आणि पंचवीस लाखांचा दारूगोळा मिळाला.

मराठ्यांच्या वसई स्वारीचे मुख्य उद्दिष्ट होते ते म्हणजे पोर्तुगीज सत्तेचा त्या भागातील शेवट करणे. मराठ्यांना किल्ल्यामध्ये रस नव्हता. म्हणून पडझड झालेल्या वसई किल्ल्यातील इमारतींची पुन्हा उभारणी झाली नाही. मराठ्यांनी किल्ल्याबाहेर एक गाव वसवले. त्याला त्यांनी बाजीपूर असे नाव दिले. इंग्रजांच्या काळात वसईचे नाव बॅसिन असे पडले. कालांतराने त्याचे पुनश्च वसई म्हणून नामकरण झाले. काळाच्या ओघात किल्ल्याची शान आणि वैभव लोप पावले आणि ओस पडलेला परिसर ह्या पलीकडे त्याला महत्त्वही नव्हते. अलिकडच्या काही वर्षांत स्थानिकांच्या सक्रियतेमुळे हा ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. पुरातत्त्व विभागाद्वारे किल्ल्यामधील वास्तू व परिसर यांचे संवर्धन केले जात आहे.

– दीपक मच्याडो 9967238611 deepak.machado@yahoo.com

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here