वरवंडी तांडा ते मुख्यमंत्र्यांची केबिन!

फेब्रुवारी 2019 मधील एक रात्र, औरंगाबादच्या विमानतळावरून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावणार होते. विमानात पहिल्या सीटवर होते- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर काही आमदार. त्यांना निरोप देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पवनीत कौर हजर होत्या… पण विमानातील ‘स्टार’ प्रवासी होते जिल्हा परिषद शाळा ‘वरवंडी तांडा नंबर दोन’चे तेहतीस विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक व काही पालक असे दहा जण. त्या त्रेचाळीस जणांची शैक्षणिक सहल मुंबईला निघाली होती! ते सारे विद्यार्थी हे ऊसतोड कामगारांची मुले आहेत. विमान हवेत झेपावले आणि भरत काळेसरांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे समाधान त्यांना लाभले.

विमानप्रवासापेक्षाही खास गोष्ट दुसऱ्या दिवशी मुंबईत घडली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मुलांना भेटले. भरत काळेसर सांगत होते, की “आम्ही दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये पोचलो. वाटले, की मुख्यमंत्री फक्त पाच-दहा मिनिटे वेळ देतील, पण त्यांनी तब्बल चाळीस मिनिटे आमच्या लेकरांशी गप्पा मारल्या. मुख्यमंत्री वेळ देत आहेत, हे बघून आमच्या मुलांनी त्यांची एक छोटीशी मुलाखतच घेऊन टाकली! त्यात मुख्यमंत्र्यांनी पहिलीत काही दिवस शाळा का सोडली होती या गमतीदार प्रश्नापासून आमच्या ऊसतोड कामगार मायबापांना सुखाचे दिवस कधी येणार, शेतकरी आत्महत्या कधी थांबणार, आम्हाला भविष्यात नोकऱ्या मिळणार का? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले. मुख्यमंत्र्यांनी आमची भेट झाल्यावर तीन तासांतच त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर मुलांच्या उत्साहाचे आणि चौकस बुद्धीचे कौतुक करत भेटीचे फोटो शेअर केले.

मुलांनी त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली व प्रेक्षक गॅलरीत बसून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाजही प्रत्यक्ष पाहिले. शिवाय, त्यांनी मुंबईतील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे म्हणून गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, जुहू समुद्रकिनारा, नेहरू तारांगण, हाजीअली दर्गा, वरळी सी लिंक अशी ठिकाणे पाहिली. त्या विद्यार्थ्यांनी जिवाची मुंबई चार दिवस केली.

सहलीची कल्पना कशी सुचली याबद्दल काळेसर सांगतात, “आमची शाळा औरंगाबादपासून वीस किलोमीटरवर आहे. मुले परिपाठाच्या वेळी आकाशातून विमाने जाताना बघत. त्यांचे लक्ष मग विमानातच गुंतायचे, मी त्यांना एके दिवशी गमतीत विचारले, ‘तुम्हाला आवडेल का विमानात बसायला?’ तर मुलांनी उत्तर दिले, ‘आम्हाला तर खूप आवडेल, पण आम्हांला कोण नेणार? आम्ही गरीब लोक, माय-बाप ऊसतोडणीला जातात. विमानात तर फक्त पैशेवाले लोक बसतात.’ मला त्यांचे बोलणे टोचले आणि त्याच दिवशी मी मुलांची सहल विमानातून काढण्याचे निश्चित केले.”

त्यांना दहा-अकरा हजार रुपयांचे विमान तिकिट परवडणार नव्हते. काळेसरांनी विमान कंपन्यांना विनंत्या सुरू केल्या. त्यांपैकी एअर इंडियाने विमानाचे तिकिट तीन हजार तीनशेसत्तर रुपयांत देऊ केले. आमदार संदिपान भुमरे यांनी मुलांच्या मुंबईतील राहण्या-जेवण्याच्या खर्चाची जबाबदारी उचलली. मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बऱ्याचशा पालकांनी सहलीची चार हजार दोनशे रुपये फी देण्याची तयारी दाखवली. ज्या मुलांना परवडत नव्हते अशा तीन मुलांचे तिकिट माजी विद्यार्थी दिनेश राठोड यांनी काढले. शिवाय बिडकीन पोलिस स्टेशनने सतरा हजार रुपये देऊ केले. औरंगाबादचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनीही दहा हजार रुपयांची मदत केली. काही मायबाप विमानात मुलांना बसवण्यासाठी घाबरत होते. त्यांची समजूत काढून एकदाची हवाई सफर निश्चित झाली.

वरवंडी तांडा जिल्हा परिषद शाळेने ऊसतोड कामगारांच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून त्या मुलांचे स्थलांतरसुद्धा शंभर टक्के थांबवले आहे. वरवंडी तांडा हे केवळ सत्तावीस उंबऱ्यांचे गाव आहे. गावातील वृद्ध लोक वगळले तर बाकी बहुतांश जण दरवर्षी दिवाळीनंतर ऊसतोडणीला पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत जातात. काळेसर त्या शाळेत 2013 मध्ये रुजू झाले. तेव्हा पटसंख्या अठ्ठ्याण्णव होती, पण शाळेत विद्यार्थी मात्र तीसच यायचे. शाळेच्या भिंतींचा रंग काळवंडलेला, परिसरात केवळ एक झाड होते. शाळेचे रूपडे असे जुनाट होते.

काळेसरांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने ग्रामस्थांशी स्थलांतराच्या गंभीर प्रश्नाबाबत संवाद साधण्यास सुरुवात केली. संपूर्ण गाव बंजारा आहे – त्यांची बोलीभाषा ‘गोरमाटी’ आहे. काळेसर ‘विद्यार्थी’ बनले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत ती बोलीभाषा आत्मसात केली. ते पालकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधत. त्यांनी पालकांना मुलांच्या सातत्यपूर्ण शिक्षणाचे महत्त्व समजावले. “तुम्ही पोटा-पाण्यासाठी दुसऱ्या गावाला गेलात, तरी मुलांना मात्र गावात त्यांच्या आजी-आजोबांसोबत ठेवा. त्यांची शाळा बुडाली तर अभ्यासातील रस कमी होतो आणि पुढे कदाचित त्यांना कधीच शाळेत जावेसे वाटणार नाही आणि मग न जाणो, तुमच्याप्रमाणे तुमच्या मुलांच्या हातातही कदाचित कोयताच येईल. ते घडू नये आणि पोरांनी सुखाचे दिवस बघावेत, असे वाटत असेल तर मुलांना शाळेत पाठवा, आम्ही त्यांची काळजी घेऊ,” अशी कळकळीची विनंती काळेसर करत.

सरांच्या विनंतीचा आणि मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या प्रयत्नांचा सुपरिणाम झाला. वरवंडी तांड्याच्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीमध्ये शिकणारे एकशेत्र्याऐंशी विद्यार्थी आहेत. केवळ तांड्यातील नाहीत, तर आजूबाजूच्या पाच-सहा गावांचे विद्यार्थी गुणवत्तेसाठी म्हणून त्या शाळेत येतात. मुलांचे आईबापांबरोबरचे स्थलांतर तीन वर्षांपासून शंभर टक्के थांबलेले आहे. शाळा भौतिकदृष्ट्याही सुंदर झालेली आहे. गावाने पाच लाख रुपयांचा लोकसहभाग शाळेच्या विकासासाठी 2015 सालापासून दिलेला असून त्यातून शाळेची रंगरंगोटी, सोलर पॅनेल, इन्व्हर्टर, संगणक, लॅपटॉप, साऊंड सिस्टिम, प्रयोगशाळेचे साहित्य, प्रत्येक वर्गात पंखा अशा सोयी-सुविधा उभारल्या गेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या गावात सहा-सहा महिने वीज नसायची त्या वरवंडी तांड्यात सोलर पॅनलच्या साहाय्याने शाळा स्वत: वीज तयार करते आणि त्या विजेवर सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवते. त्या सगळ्यासाठी मुख्याध्यापक आसराजी सोंडगे आणि सर्वश्री सुभाष माणके, गजेंद्र बारी, अप्पासाहेब कोथिंबिरे, पद्माकर मुसांडेसर; तसेच, उज्ज्वला क्षीरसागर यांचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख काळेसर करतात.

काळे मूळ बीडचे. ते आता औरंगाबादला राहतात. तेथ त्यांचे आईवडील व पत्नी असते. त्यांची शाळा पैठण तालुक्यात पंचवीस किलोमीटरवर आहे. ते रोज दुपारी वाहनावरून तेथे जा-ये करतात. ते तांड्याच्या शाळेत येण्याआधी कन्नडला पाच वर्षें होते. तेथे शाळा छोटी होती, मुले आदिवासी होती. काळे यांनी त्या मुलांना समाजजीवनाची गोडी लावली. त्यासाठी गॅदरिंग्ज वगैरे योजली. त्यांना मुलांसाठी काही करण्याची प्रेरणा बीडमधील झरेवाडीची शाळा व संदीप पवार यांचे तेथील उपक्रम पाहून मिळाली.

– भरत काळे 9420656649

स्नेहल बनसोडे-शेलुडकर, पुणे 9420779857, snehswapn@gmail.com

(दिव्य मराठी ‘मधुरिमा’वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

 

 

About Post Author