वटवाघळांचे डॉक्टर – महेश गायकवाड

2
259

डॉ. महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण ! त्या अवलियाने भीतीचा आणि अंधश्रद्धेचा विषय असलेल्या वटवाघळांवर पीएच डी केली आणि निसर्गात राहून निसर्गाशी संवाद साधला. तो निसर्ग संवाद लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. लोक त्यांना ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून ओळखतात…

महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण ! त्यांची आणि माझी ओळख झाली आणि वटवाघळे माझ्या मानगुटीवर येऊन बसली. त्यांची ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणूनच प्रसिद्धी आहे. मी वटवाघळांपासून तेल करतात या माझ्या माहितीचा उल्लेख महेश गायकवाड यांच्याजवळ करताच, ते जोरात हसले. म्हणाले, ‘अहो, तेलासारखे तेल ते ! त्यात कोठलेही औषधी गुणधर्म नाहीत. आदिवासी लोक तेल उकळवताना त्यात मेलेले वटवाघूळ टाकतात आणि गंमत म्हणजे ते तेल शहरी लोकांना ‘फॅन्सी’ म्हणून हवे असते. आदिवासी मंडळी चार पैसे मिळतात म्हणून वटवाघळांना मारून तेलात टाकतात.’

महेश गायकवाड निसर्गसंवर्धन, पर्यावरणाचे रक्षण, वटवाघळांवर संशोधन अशी अनेक कामे एकाच वेळी करतात. महेश यांचा जन्म फलटणमधील निंबळक या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी विज्ञान विषय घेऊन शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी एस्सी ही पदवी मिळवली; शिक्षण घेता घेताच महेशला निसर्गाची ओढ वाटू लागली. महेशने पुण्यात येऊन एन्व्हायर्न्मेंटल सायन्स या विषयात एम एस्सी केले. त्यात प्रथम श्रेणी मिळवली. त्या काळात महेशने निसर्गात भटकंती करून डोंगर, दऱ्या, जंगले, देवराया पिंजून काढल्या. त्याने निसर्गातील सगळ्या घटकांमध्ये परस्परपूरक संबंध कसा असतो, हे जाणून घेतले. निसर्गचक्रात सजीव आणि निर्जीव, दोन्ही घटक महत्त्वाचे असतात, त्यांचाही त्याचा अभ्यास होऊन गेला. महेशने डॉक्टरेट मिळवण्याचे ठरवले; तर त्याला ‘वटवाघूळ’ या विषयाने आकर्षित केले. त्या संशोधनात त्याला त्याच्या प्रोफेसर डॉ. विशाखा कोरड यांनी मार्गदर्शन केले.

महेशने पीएच डी मिळवली. महेशने त्यासाठी सात वर्षे चक्क जंगलातच वास्तव्य केले. जंगलात भटकंती आणि गुहेमध्ये निवास ! जगभरात वटवाघळांच्या एक हजार तेरा जाती आहेत, भारतात एकशेतेवीस प्रकारची वटवाघळे आढळतात. वटवाघळांचे प्रकार तीन असतात. ऐंशी टक्के वटवाघळे कीटक खाऊन उपजीविका करतात. काही वटवाघळे उंदीर आणि बेडूक खातात, तर काही वटवाघळे पूर्णपणे शाकाहारी असतात. कुत्रा, मांजर, पोपट यांच्याप्रमाणे वटवाघूळ हा पाळीव प्राणी असू शकतो का? तर दक्षिणेतील रामकृष्णन यांनी चक्क घरी वटवाघळे पाळली आहेत. युरोपमध्येदेखील अनेक लोक वटवाघळे पाळतात. कारण ही वटवाघळे रात्री घरातील कीटक आणि डास यांचा फडशा पाडतात.

वटवाघळांना एकांत आवडतो. त्यामुळेच ती वस्ती पडकी देवळे, लेणी किंवा तशा निमर्नुष्य जागी तेथील कपारींमध्ये करतात. वटवाघळाचे आयुष्य सात ते बारा वर्षे, तर काहींचे पंधरा ते वीस वर्षे असते. वटवाघळे मुख्यत: उंबराच्या झाडांतील कीटक खातात आणि त्यांच्या विष्ठेतून उंबराचे बी जमिनीत रुजले जाते. वटवाघळे निसर्गातील अन्नसाखळीचा समतोल राखतात. विलक्षण गोष्ट अशी, की वटवाघळे त्यांच्या वजनांइतके कीटक खातात. ती त्यांचे पाय उत्क्रांतीमध्ये नष्ट झाले असल्यामुळे उभी राहू शकत नाहीत आणि म्हणून ती उलटी लटकलेली दिसतात ! ती कधीही माणसावर हल्ला करत नाहीत. ती माणसाच्या चाहुलीने फार तर त्याच्या आजूबाजूने फिरतील; पण आक्रमण करत नाहीत.

महेश यांनी पीएच डी च्या अभ्यासकाळात पश्चिम घाटातील दोन हजारांहून अधिक गुहांचा अभ्यास केला. त्यांनी त्या दरम्यान पाच हजार वटवाघळे पकडली, त्यांचा अभ्यास केला. महेश यांना वटवाघळाच्या एकतीस जाती ठाऊक झाल्या होत्या; पण त्या ओघात त्यांना आणखी तीन प्रजातींचा शोध लागला आणि आता, वटवाघळांच्या चौतीस जातींवर शिक्कामोर्तब झाले आहे ! अभ्यासासाठी त्यांनी पश्चिम घाटातील कोयना ते कळसुबाई हे अंतर चालून तो भाग पिंजून काढला आहे. महेश यांनी आदिवासींशी संवाद साधला, त्यांचे जगणे समजून घेतले, त्यांच्याबरोबर राहण्यास सुरुवात केली. महेश आदिवासींच्या जीवनाशी इतके समरस झाले, की ते महेश यांना त्यांच्यातील एक मानू लागले. एके दिवशी, आदिवासींनी वटवाघळे मारून आणली आणि त्यांचे मांस शिजवले. महेश यांनी त्यांच्याबरोबर तेही खाल्ले. ते मांस आंबूस चवीचे लागते असे ते म्हणाले.

महेश यांना आदिवासी मंडळी गुहा शोधून देण्यात आणि वटवाघळे दाखवण्यात मदत करत, तर महेश आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना साह्य करत. महेश यांनी आदिवासींना थेट बाजारपेठेशी जोडून दिले. कोठल्याही मध्यस्थांशिवाय बाजारपेठ मिळाल्यामुळे आदिवासींच्या हातात पैसा खुळखुळू लागला. महेश यांनी आदिवासींचे पारंपरिक नृत्य आणि गाणे, त्यांचे संगीत ऐकले/बघितले. त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत आदिवासींचे पारंपरिक नृत्य सादर करून त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. महेश यांनी आदिवासींना शौचालयाचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्यात आरोग्यविषयक जागृती आणणे, त्यांना दैनंदिन जगण्यासाठी भांडी-कपडे-घरे या गोष्टी मिळवून देण्यासाठी मदत करणे अशा गोष्टी साधल्या. महेश यांनी त्यांच्यात पर्यावरण जागृती शास्त्रीय पद्धतीने आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न ठेवला.

त्यांचा वटवाघळांच्या अभ्यासाबरोबरच त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचाही अभ्यास झाला आहे. त्यांनी ‘निसर्ग जागर प्रतिष्ठान’ नावाची संस्था स्थापन केली आहे. त्यांनी त्यांचे यापुढील आयुष्य निसर्गसंवर्धनासाठीच वेचण्याचे ठरवले आहे. त्यांनी मागील दहा वर्षांत पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे उपक्रम आणि प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. त्यांनी खेडेगावात विद्यार्थ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये निसर्गाबद्दल जागृती आणि संवर्धन व्हावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाअंतर्गत शिबिरे, व्याख्याने, कार्यशाळा घेतल्या. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यावरण आणि वन विभागाने ‘निसर्ग जागर प्रतिष्ठान’ संस्थेवर जबाबदारी सोपवली. महेश गायकवाड यांनी महाराष्ट्रातील पंधरा हजार शाळांमधून पर्यावरण शिक्षण प्रकल्प तयार करून राबवला. त्या प्रकल्पाचे यश हेच, की कोवळ्या वयातील मुलांना निसर्गाविषयी ओढ निर्माण झाली. फटाके का वाजवू नयेत हे मुलांना कळले. निसर्गात सगळेच जीव किती महत्त्वाचे असतात, हेही त्यांना समजले. महेश गायकवाड यांनी लोकांना स्थानिक झाडांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी शेवगा, मोह, उंबर, साधी बाभूळ ही झाडे निसर्गाला कशी जिवंत ठेवतात, हे अभ्यासले.

महेश गायकवाड जातील तेथील लोकांना, विशेषतः शालेय मुलांना आणि तरुणांना एकत्र करून त्यांना पर्यावरणाविषयी सजग करण्याचे काम अविरतपणे करत आहेत. ते लोकांमध्ये असलेल्या वटवाघळांविषयीच्या अंधश्रद्धा आणि अज्ञान नष्ट करून त्यांना शास्त्रीय माहिती देण्याचे कामही करत असतात. ते लोकांना शेतीसाठी आणि जंगले अबाधित राहण्यासाठी वटवाघळांचे असणे किती गरजेचे आहे, ही गोष्ट तळमळीने सांगतात.

महेश गायकवाड बारामतीच्या ‘एन्व्हायर्न्मेंटल फोरम’ या संस्थेचे प्रमुख पर्यावरण अधिकारी होते. त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओढ्यांचे खोलीकरण करणे, बंधारे बांधणे, पाणथळ जागा आणि पाणवठे यांचे पुनरुज्जीवन करणे, वन्य प्राण्यांकरता कृत्रिम जलसाठे तयार करणे- उन्हाळ्यात त्या साठ्यांमध्ये पाणी आहे की नाही हे पाहणे- पाणी नसेल तर टँकरने पाणीपुरवठा करणे या गोष्टी केल्या. त्यामुळे बारामती परिसरात वन्य जीवांची आणि पक्ष्यांची संख्या वाढली. या सगळ्या वाटेवर चालत असताना त्यांचा पक्ष्यांचाही अभ्यास झाला आहे आणि त्यांनी ‘भीमथडीचे पक्षिवैभव’ नावाचे सचित्र पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकामध्ये निसर्गाचे संवर्धन करणारे पक्षी, प्राणी, तिमिरदूत वटवाघूळ, शेतकऱ्यांचे मित्र असलेले पक्षी यांची उपयुक्त माहिती दिली आहे.

महेश गायकवाड निसर्गाची ओळख व्हावी, यासाठी निसर्गसहली, ट्रेक्स, निसर्गभ्रमंती यांचे आयोजन करतात. हिमालय असो वा केरळ, राजस्थान असो वा लेह-लडाख या सर्व ठिकाणी तेही बरोबर असतात. निसर्गातच तंबू ठोकून राहणे, निरीक्षण करणे आणि त्यामधूनच सोबत असलेल्या तरुणांमध्ये निसर्गाविषयीची तळमळ निर्माण करणे हा त्यांचा हेतू अशा सहलींद्वारे सफल होतो. स्वतः महेश गायकवाड कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहून पाण्यात चिंब भिजतात, तर कधी तंबूबाहेरच्या मोकळ्या मैदानात शेकोटी पेटवून काळोख्या रात्रीतील चांदणे टिपतात. निसर्गात रमणाऱ्या या माणसाला भौतिक सुखसोयी मोह पाडू शकत नाहीत.

महेश गायकवाड यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग असतो. त्यांनी मायनी गावातील काही गावकऱ्यांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मदत केली. त्यांनी दुष्काळी गावांतील पाझर तलावांची दुरुस्ती करणे, त्यांतील गाळ काढणे – त्यासाठी निधी उपलब्ध करणे अशी कामे हातात घेऊन गावकऱ्यांच्या सहभागाने पूर्ण केली. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात, जेथे शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या, तेथे जाऊन महेश यांनी तशा कुटुंबांच्या मदतीसाठी निधी उभारण्याचे काम हाती घेतले. गरजू शेतकऱ्यांचे पुनर्वसन केले. महेश गायकवाड ते काम शेतकऱ्यांच्या कर्जचुकतीसाठी रोख रक्कम उभारणे, त्यांना बी-बियाणे उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करणे अशा अनेक स्तरांवर करत आहेत.

अभिनेते सयाजी शिंदे हेही गायकवाड यांच्या कामात सहभागी झाले आहेत. इतके सगळे काम करताना महेश हा ‘तरुण’ त्रेचाळीस वर्षांचा होऊन गेला आहे. ‘निसर्ग जागर प्रतिष्ठान’ या संस्थेत त्यांच्या बरोबरीने तीस माणसे कार्यरत असून, अभिनेते सयाजी शिंदे, बारामतीजवळच्या गावात राहून शेती करणारे चंद्रशेखर व सुवर्णसंध्या धुमाळ हे डॉक्टर जोडपे त्यांच्याबरोबरीने काम करत आहेत.

डॉ. महेश गायकवाड, निसर्ग जागर प्रतिष्ठान, 9922414822 batmaheshbat@gmail.com

– दीपा देशमुख 9545555540 deepadeshmukh7@gmail.com

(बाईट्स ऑफ इंडियावरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

—————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. महेश गायकवाड यांच्या अनेकविध उपक्रमांचा फारच छान परिचय करून दिला आहे . धन्यवाद आणि शुभेच्छा!

  2. डॉ गायकवाड चा कोटरृबयुक्षण खुप उंच महत्वाचे आहेत. निसर्गाला कायम ठेवण्यासाठी त्यांनी स्वतः चा जीवन दिलं. आदिवासी विकास केला. त्यांच्या पुढील पिढीला चांगलं जीवन जगण्यासाठी शिक्षण देणे कायमचं चालू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here