लोकजत्रा

4

माळेगावची जत्रा म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची-कपड्यांची दुकानं आणि आकाश पाळण्यांचा खेळ नव्हे. ती सामजिक अभिसरणाला मदत करते… मार्गशीर्षाचा महिना मध्यावर आला म्हणजे मन्याड खो-याच्या टापूत माळेगावच्या जत्रेची लगबग सुरू होते. जत्रेचा आरंभ मार्गशीर्षाच्या अवसेला मल्हारी म्हाळसाकांत खंडेरायाच्या देवसवारीनं होतो. ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’ च्या जयघोषानं आसमंत गर्जू लागतो.  आभाळाच्या निळाईवर खंडोबाच्या देवसवारीवर उधळलेलं खोबरं अन् बेलभंडार भारी वाटतो. मल्हारी देवाच्या वाटेवर भक्तगण आपल्या देहाच्या पायघड्या अंथरतात. त्यापुढे अंगात आलेले पाच-पन्नास वारूं घुमत असतात ; चाबकाच्या फटका-यांनी आपल्या अंगाची कातडी सोलून घेतात. सर्वांत पुढे  सनईचे सूर आणि हलगीवर घोड्या- वारूंची घाई निघते. हलगीवर पडणा-या टिप-यांच्या कडाडणा-या आवाजाने वारू बेभान होऊन झुलत असतात. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकातील हजारो भक्तगण माळेगावची वाट तुडवून, तहान-भूक हरवून जत्रेची मजा घेतात.
जत्रा दक्षिण भारतात अव्वल ठरते, ती शेतकरी, कष्टकरी, बारा बलुतेदार, दलित, भटके, विमुक्त अशा सर्व स्तरांतील लोकसहभागामुळे. दूर-दूरहून आलेले लोककलावंत आपापल्या लोककलेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवतात. त्यांच्यासाठी खास व्यासपीठ नाही, पण ते आपली लोककला जिथं जमेल तिथं रस्त्यात उभं राहून अदा करतात. महाराष्ट्राची लोकधारा जत्रेत तुडुंब भरून वाहत असते.  त्यात माकडवाले – मदारी, अस्वलवाले – दरवेशी, सापवाले – गारूडी, नंदीवाले, भविष्यवाले – जोशी, कुडमुडे जोशी, कडकलक्ष्मी, खंडोबाचे भगत वारू, वाघ्या-मुरळी, भवानी भगत, आराधी, झाडांच्या डिरीवर जाऊन देवदान मागणारे पांगुळ, कोल्हाटी, अंबाबाईचे भगत गोंधळी, वासुदेव, पोतराज, मनातले ओळखणारे मनकवडे ; तसेच भटक्या जमातीतले घिसाडी, कैकाडी, वडार, जाने, वैदू, मसणजोगी, पाथरवट, गोंदणारे सारेजण आपल्या जीवाची जत्रा करायला तेथे येतात. संसाराला, व्यवहाराला करवादून गेलेले हे मुके जीव तेथे समाधान पावतात. सारे जित्राब घेऊन जत्रेला गेले, म्हणजे वर्षातून एकदा, अशी जीवा – शिवाची गाठ पडते. भटक्यांच्या सोयरिकी, लग्नकार्येसुद्धा जत्रेतच पार पडतात. त्याचबरोबर तंटेबखेडे, फारकती, काही सामाजिक सुधारणांचे नवे कायदे ‘वैदू’ समाजासारख्या जमाती जत्रेतल्या जातपंचायतीत  करतात.
भटक्या जमातींची हजेरी आणि त्यांची जातपंचायत हे या जत्रेचं खास वेगळेपण. विशेषत: वैदू समाजाची जातपंचायत. सारा संसार गाढवांच्या पाठीवर लादून ‘आज इथं तर उद्या तिथं’ असा उपरेपणाची जिंदगी जगणारा वैदू समाज. सांगायला गाव नाही अन् राहायला घर नाही अशी जिनगानी पाचवीला पुजलेली. मढी( जि. अहमदनगर)  येथील कानिफनाथाची जत्रा म्हणजे वैदूंच्या जात-पंचायतीचे सर्वोच्‍च न्यायालय, तर माळेगाव जत्रा उच्च न्यायालय मानली जाते. तळ्याच्या काठी रामपा-यात सूर्यनारायणाच्या साक्षीने जातपंचायत भरते. त्यासाठी सारे गोलाकार बसतात. आपापल्या अशिलाची बाजू पटवून देणारे वैदू सर्वांत समोर, काठ्या घेऊन बसतात. मुद्दा पटवून देण्यासाठी काठी जमिनीवर आपटतात.    जत्रा म्हणजे तमाशा हवाच! रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे, भिका-भिमा, किरणकुमार ढवळपुरीकर, कुंदा पाटील, शिवकन्या बडेसह हरिभाऊ बडे… अशी नामांकित तमाशा, लोकनाट्य मंडळे आपापले तंबू माळेगावच्या जत्रेत ठोकतात. मात्र अस्सल पारंपरिक लोककला जत्रेतूनही  अस्तंगत होत आहे.  घोडे, उंट, गाढव, माकड, शेळ्या, मेंढ्या, लाल कंधारी गाई-गो-हे, कोंबड्या, लव्हरं, तितरं, पारवे, कबुतरं या सा-या पशु-पक्ष्यांचा एकाच ठिकाणी बाजार प्रदर्शन आणि शर्यतीचे संयोजन करणारी दक्षिण भारतातील सर्वांत मोठी जत्रा म्हणूनही माळेगावचा बडेजाव आहे. खंडोबा मंदिराच्या दक्षिणेला घोड्यांचा बाजार भरतो. यंदाच्‍या घोडे बाजारात किमान चार ते पाच हजार घोडे आले होते, असे  वाशिमचे शेख मेहबूब अब्दुल्ला सांगतात. पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात या राज्यांतील घोडे माळेगावच्या जत्रेत येतात. गावरान कंतरी, पांढरे काठेवाड, पंजाब काठेवाड, काठेवाड बनारस, काठेवाड हरियाणा या जातींचे घोडे श्रेष्ठ दर्जाचे. त्यांच्या किंमती दोन लाखांपासून सुरू होतात.  माळेगावच्या जत्रेत अशी बाजारहाटापासून समाजाकारणापर्यंत आणि लोककलावंतांपासून दरवेशांपर्यंत सार्‍यांचीच हजेरी असते. म्हणूनच ही जत्रा ख-या अर्थाने लोकजत्रा असते.

शिवाजी आंबुलगेकर, मोबाईल – 07385209145, 9423440598

सर्व छायाचित्रे सदा वडजे यांच्‍या सौजन्‍याने

{jcomments on}

About Post Author