लिविंग इन रिलेशनशिप, ऐंशी वर्षांपूर्वी – महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश

0
41
_Living_In_Relationship_1.jpg

‘त्यागपत्र’ नावाची कादंबरी इंटरनेटवरून डाउनलोड करून घेतली होती.

हिंदी भाषेतील लेखकांपैकी अग्रगण्य असे जैनेंद्रकुमार यांची 1937 साली प्रकाशित झालेली ती कादंबरी दोनच वर्षात मराठीत अनुवादित झाली (अनुवादक- अ.म. जोशी, प्रकाशक – लक्ष्मण स. केळकर). जैनेंद्रकुमार अलिगढ जिल्ह्यात 1905 साली जन्मले. त्यांचे शिक्षण हस्तिनापूर येथे झाले. ते पदवीसाठी ‘बनारस हिंदू विद्यापीठा’त दाखल झाले; परंतु त्यांनी गांधींच्या ‘असहकार आंदोलना’त सामील होऊन शिक्षण अर्धवट सोडले. अनेक कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, काही अनुवाद आणि गंभीर स्वरूपाचे निबंधलेखन त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांना 1953 मध्ये ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार आणि 1971 मध्ये ‘पद्मभूषण’ सन्मान मिळाला. त्यांनी ‘हिंदुस्थानी सभा’ लाहोरमध्ये प्रेमचंद यांच्याबरोबर स्थापन केली. डॉक्टर झाकिर हुसेन त्या सभेचे सभासद होते. ते ‘हंस’ या नियतकालिकाचे संपादक हिंदी लेखक प्रेमचंद यांच्या निधनानंतर झाले.

‘त्यागपत्र’ या कादंबरीच्या मराठी अनुवादाला प्रभाकर माचवे यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत माचवे यांनी कादंबरीचा मूळ प्रश्न काय आहे ते सांगितले आहे – ज्याला आम्ही समाजप्रतिष्ठा म्हणतो ती जीवननीती खरोखरच मानवी आहे काय? आम्ही मानवाच्या अंतरंगातील आत्मव्यथेच्या सत्याची गळचेपी करून कोठवर आमच्या समाजात अधिकाधिक भेद निर्माण करणार आहोत? ही समाजव्यवस्था बदलून सर्वस्वी नवीन मानवी – सर्वथैव मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना आम्हास करावयास नको का?

माचवे या कादंबरीच्या संदर्भात पुढे असेही सांगतात, की केवळ भौतिक असे सत्य जगात कोणतेही नाही. भौतिकास अभौतिकाची, शास्त्रास काव्याची, बुद्धिवादास भावनेची आणि जडवादास गूढवादाची बैठक पाहिजे. जैनेंद्रकुमार यांची कादंबरी आत्मकथनपर आहे. एका न्यायाधीशाने त्याच्या न्यायमूर्तिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, तो त्याची कहाणी सांगत आहे असा कादंबरीचा घाट आहे. ती कहाणी त्याची अशा अर्थाने, की कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा, त्याची नुकतीच मृत्यू पावलेली आत्या लहानपणी त्याच्या आयुष्याचा अत्यंत जवळचा हिस्सा होती. मधील काही काळ सोडला, तर ती सतत त्याच्या भावविश्वाचा भाग होती. मूलतः ती गोष्ट आत्याची – म्हणजे असफल प्रेम न लपवल्याने प्रस्थापित पुरुषी अहंकाराचा बळी झालेल्या स्त्रीची आहे. तिने स्वतःचे विवाहपूर्व प्रेम नवऱ्याकडे सांगितल्याने, त्याला तिच्याबद्दल तीव्र तिटकारा निर्माण होतो, तो तिला धड वागवत नाही. तसे झाल्यावर ती स्वतः त्याला त्याची वेगळी सोय करण्यास सांगते. नव्या जागेत राहण्यास गेल्यानंतर परिस्थिती कठीण होऊ लागते व ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते. कोळशाचा एक व्यापारी तिला धीर देतो आणि ती त्याची रखेली म्हणून कृतज्ञ भावनेने राहू लागते. सुरुवातीला, तो तिच्यावर पूर्ण लोभावलेला असतो, परंतु ते आकर्षण काही दिवसांनंतर ओसरते. ते तसे ओसरणार हे तिला माहीत होते. ती नायकाला सांगते, की ‘ही आपल्यावर लुब्ध झाली आहे असा त्याचा भ्रम झाला आहे तो दूर करणे हे माझ्या जिवावर आले. त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणेही शक्य नाही, कारण तो स्वतःच्या वासनांचे लाड पुरवत होता हे मला ठाऊक आहे. मला त्याच्यापासून गर्भही राहिला आहे व त्याचे माझ्यावर खरे प्रेम नाही. त्याच्या विरक्तीला सुरुवात झाली आहे. त्याला त्याच्या कुटुंबीयांसमवेत नेऊन बसवीन तेव्हाच मला बरे वाटेल.’

_Living_In_Relationship_2_0.jpgअशी ही खऱ्या प्रेमाला महत्त्व देणारी आणि ते फक्त स्वीकारार्ह मानणारी स्त्री व्यवहारी जगात स्वीकारली जाणे अशक्यच असते. व्यवहार बघणाऱ्या कोणाही माणसाला नायकाच्या आत्याची भूमिका पटणारी नाही, कारण सामाजिक प्रतिष्ठा ‘सत्याला नसून सत्याच्या शवाला असते’ असे नायिकेला वाटत असते. पुढे नायिका तिची मुलगी (कोळशाच्या व्यापाऱ्यापासून झालेली) एका मिशनला देत नाही, ती कोणत्या तरी शाळेत नोकरी करते. नायकाला भेटते, ती त्याच्या भावी सासुरवाडीला. ती नायकाच्या भावी सासऱ्यांकडे मुलांना शिकवत असते. सासू-सासऱ्यांना खरी हकिगत समजल्यावर सासरा लग्नास तयार असला, तरी सासू तयार नसल्याने लग्न मोडते. नंतर अनेक वर्षांनी नायकाला आत्याबाईच्या मृत्यूची बातमी समजते. ती बातमी आल्यावर त्याला स्वतःच्या दुर्बलतेची प्रखर जाणीव होते. तो म्हणतो, “आत्याबाई, तू गेलीस. तू जिवंत असताना, मला योग्य मार्ग कधीच दिसला नाही. आता ऐक, न्यायाधीशाची ही जागा मी सोडत आहे! त्याचबरोबर जगातील लौकिक उपचारालाही रजा देणार आहे. केवळ दुसऱ्यासाठी जगायचे हे मला नव्याने शिकणे शक्य नाही; आता सवयी पक्क्या झाल्या आहेत. परंतु एवढे वचन देतो, की स्वतः मात्र केवळ जगण्यासाठी आवश्यक असेल इतक्या स्वल्पतेने जीवन जगेन”. अशी ही, लग्नाशिवाय एका पुरुषाशी पत्नीसारखी राहिलेली नायिका – ती कोणत्याही कारणाने का होईना त्याच्याबरोबर राहिलेली असू द्या, ते नव्वद वर्षांपूर्वी अघटित होते. त्यातून ती नायिका ज्याच्यापाशी राहते त्याच्या मदतीचे खरे स्वरूप किती तात्पुरते होते हे उमजूनही ती त्याला सोडत नाही, कारण त्याच्या पोटी तिच्या मनी कृतज्ञता जशी आहे; तसेच, तिला उघड उघड शरीरविक्रय करणेही मान्य नाही. म्हणजे तिने परंपरागत मूल्ये संपूर्णपणे त्याज्य ठरवलेली नाहीत.

या तपशिलांबरोबर स्वाभाविकपणे आठवण होते, ती डॉक्टर केतकर यांच्या ‘ब्राह्मणकन्या’ या जुन्या मराठी कादंबरीची. ती प्रथम प्रकाशित झाली १९३० साली. म्हणजे ‘ब्राह्मणकन्या’ आणि ‘त्यागपत्र’ एकाच दशकातील. ‘त्यागपत्रा’तील नायिकेप्रमाणे ‘ब्राह्मणकन्ये’तील कालिंदीसुद्धा जास्त वयाच्या एका तंबाखूच्या वखारवाल्या परप्रांतीयाची रखेली म्हणून राहते. कालिंदीला त्या व्यापाऱ्यापासून मूल होते. त्यानंतर कालिंदीला तिचे कृत्य गैर वाटू लागते. “तो माझी पात्रता रममाण होण्यास योग्य अशी स्त्री एवढीच समजतो. मी त्याला पैशांसाठी चिकटून आहे, माझ्या मुलाला हक्काने काही मिळावे असे मी काही केलेले नाही. दुसऱ्या एका बाईच्या सौख्यावर मी कुऱ्हाड घालत आहे, माझा मुलगा माझ्याकडे उपरोधाने पाहत आहे असे मला वाटू लागले” (प्रभा गणोरकर यांचा लोकसत्ता लोकरंग पुरवणी 10-2-2018 मधील लेखातून)

आता, कालिंदी आणि आत्याबाई यांच्यातील साम्य ठळक होऊ लागते. पुढे, कालिंदीही आत्महत्या करण्यापर्यंत निराश होते, पण एका मैत्रिणीमुळे सावरते आणि नोकरी करते. नंतर एका उदार मनाच्या वकिलाशी लग्नही करते.

_Living_In_Relationship_3.jpgदोन कादंबऱ्यांत जसे साम्य आहे तसे काही भेदही आहेत. कालिंदी स्वतः एका रखेलीची मुलगी होती तर आत्याबाई सुस्थापित वर्गातील कुटुंबाची घटक होती. कालिंदी रखेली म्हणून राहण्याचा निर्णय घेते ते “ज्या जातीला सर्वजण तुच्छ लेखतात त्याच जातीकडे वळणे भाग आहे. कायदेशीर लग्नाच्या मुलांना पैसे मिळावे, मला अन्नवस्त्र मिळावे आणि मुलांना कोणी अधर्मसंतती समजू नये एवढ्याच हेतूने. मला होणारी मुले कोणीही कुलीन मानणार नाही, तर विवाहसंस्थाच माझ्या बाबतीत निरुपयोगी ठरते. मी स्वतःला केवळ पैशांसाठी विकणार नाही. मला अविचारी म्हटले तरी चालेल, पण पैशांसाठी प्रेमसंबंध जोडला असे माझे वर्तन व्हायला नको” (गणोरकर – उपरिनिर्दिष्ट). या उलट, आत्याबाई कोळशाचा व्यापारी पत्करते ते बऱ्याच अंशी कृतज्ञता म्हणून – म्हणजे जगभरच्या धर्मात सांगितलेल्या आदर्श प्रेरणांपैकी एकीमुळे. कालिंदीच्या वडिलांनी कालिंदीचा निर्णय मान्य केला नाही, कारण त्यामुळे तिला कमीपणा येतो अशी त्यांची भावना – हा अर्थातच दंभ आहे, कारण त्यांनी स्वतः समाजसुधारणा म्हणून एका रखेलीच्या मुलीशी लग्न केले होते. कालिंदीने तिला आलेली मागणी (एका नायकिणीच्या मुलाकडून) नाकारली. आता ती मागणी नाकारते. कारण त्या मुलाला समाजमान्य असे कूळ नाही. म्हणजे कालिंदीचा समाजसंकेतांविरुद्धचा लढा हा खराखुरा तत्त्वनिष्ठ होता असे म्हणता येईल का? या उलट, आत्याबाई ती कोळशाच्या व्यापाऱ्याची होता होईतो सेवा करणार असे म्हणते – तेही त्याचा तिच्यातील रस संपत आहे याची जाणीव झाल्यावर – कारण ती कृतज्ञता महत्त्वाची मानते.

त्यामुळेच, ‘त्यागपत्र’ ही कादंबरी टॉलस्टॉयच्या विचारधारेजवळ जाते असे माचवे ‘त्यागपत्र’च्या प्रस्तावनेत सूचित करतात. “जो तत्व्यज्ञ लेखक आहे तो केवळ अनित्य मूल्यांनी भारावून जाऊन, एका किंवा दुसऱ्या टोकाला पोचणारा अतिरेकी (extremist) बनूच शकत नाही”.

वाचकांनी ‘ब्राह्मणकन्या’ वाचली नसेल तर दोन्ही कादंबऱ्या वाचाव्या अशा आहेत.  – ‘त्यागपत्र’ ओस्मानिया विद्यापीठाच्या डिजिटल लायब्ररीवर उपलब्ध आहे.

– मुकुंद वझे, vazemukund@yahoo.com

About Post Author