लालबागचा राजा गेल्या दोन दशकांत आर्थिक दृष्टया श्रीमंत होत गेला, परंतु त्याचे प्रजाजन देशोधडीला लागले; मात्र ‘गणेश’या विद्याकलेच्या देवतेने तेथील कलागुणांना प्रोत्साहन दिले. तेच कलाकार आज मराठी संस्कृतीवर राज्य करत आहेत…
लालबाग-परळ भागात गेल्या शतकभरात एक जीवनपद्धत विकसित होत गेली व ती लोपही पावली. त्या जीवनपद्धतीचा कापडगिरण्या हा आधार असल्याने ती गिरणगाव संस्कृती या नावाने ओळखली जाते. अवघ्या साठ-सत्तर वर्षांच्या आयुष्यात या जीवनपद्धतीने आरंभीचा भाबडेपणा पार करून मुख्य मराठी जीवनसंस्कृतीवर प्रभाव पाडणे सुरू केले. प्रथम तो जयंत पवार वगैरेंच्या नाटकांतून दिसून आला, मग टीव्हीच्या माध्यमातून आदेश बांदेकर-निर्मिती सावंत यांनी आणि चित्रपटांतून भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी यांच्याकडून प्रकट होत गेला. गेल्या वर्षभरात पंढरीनाथ सावंत व आदिनाथ हरवंदे यांची लालबागवर दोन पुस्तके आली आणि तिसरे नीरा आडारकर यांचे ‘कथा, मुंबईतील गिरणगावाची’ हे ‘ओरल हिस्टरी’च्या स्वरूपातले.
लालबागची संस्कृती इतिहासजमा होत असताना घेतलेला हा आढावा…
‘लालबाग–परळ‘ संस्कृतीचा प्रभाव
– राजीव जोशी
मुंबई हे सात बेटांनी बनलेले शहर… तिथे पूर्वीपासून अनेक जाती-जमातींचे राज्य… प्रत्येकीच्या वेगळ्या संस्कृतीचे पडसाद… त्यातून बनत गेलेला या महानगराचा तोंडवळा. एक स्वतंत्र संस्कृती. मुंबईवर फार पूर्वी पांढरपेश्यांचा प्रभाव होता. ब्रिटिशांनी बाबू-कल्चर, व्यापार आणि ‘लोखंडी अग्निरथ’ म्हणजे रेल्वे आणल्याने मुंबईने तेव्हापासून आर्थिक राजधानीचे ‘बाळसे’ धरले. विरंगुळा म्हणून नाटक, जलसे, गाण्यांच्या मैफिली, व्याख्याने, पुढा-यांच्या सभा अशी पांढरपेशी मध्यमवर्गीयांची संस्कृती रुजली. पुण्यात जसे वाडे, तसे मुंबईच्या गल्ली-बोळात वसलेल्या चाळी. त्यातून फुलत गेली डालडाच्या डब्यातील तुळशीप्रमाणे गिरगाव-दादरची संस्कृती! ब्राह्मण, सीकेपी, सारस्वत आणि इथलेच असणारे पाठारे प्रभू – ह्यांच्यातील तरुण पिढीने पांढरपेशी संस्कृती निर्माण केली. ती मुख्यत: गिरगावातून प्रवर्तित झाली व पुढे पार्ले, गोरेगाव व बोरिवली येथे स्थिरावली.
कापड गिरण्या हा मुंबापुरीचा जोरात चालणारा उद्योग होता. मिलमध्ये भरती होण्यासाठी कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मंडळी इथे आली. अशिक्षित, अकुशल परंतु मेहनती व प्रामाणिक. त्यांच्या कुटुंबांना उपजीविकेचे साधन मिळाले. त्यांनी दिवसभराच्या कामानंतर विरंगुळा म्हणून भजन, मेळे, दशावतार असे आपापल्या गावा-गावाचे कलाप्रकार जवळ केले. सार्वजनिक उपक्रम म्हणून वाचनालये, अभ्यासिका यांच्या व कॅरम खेळण्यासाठी सोयी केल्या. वर्षभरातील विविध सण आणि घरातील कार्यक्रमांच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची लयलूट असायची.
पण तरीही पुढल्या काळात लालबाग-परळवर शिक्का बसला तो गुंडगिरीचा, मवालीपणाचा! खरे तर, गिरणी कामगारांचा तो पिंड नव्हता; मिलच्या संपातही राडे झाले नाहीत, पुढे जे उपनगरातल्या फॅक्ट-यामध्ये व्हायचे! आणि लालबाग-परळमध्ये बेकारी, अस्वस्थता, असंतोष आणि कम्युनिस्ट-शिवसेना संघर्षातून राडे …. दंगली धुमसत राहिल्या!
सामाजिक स्थित्यंतर घडत होते. सत्तेची केंद्रे पांढरपेशांच्याकडून बहुजनांकडे गेली होती. त्यांच्याही हाती शिक्षणामुळे, नोक-यांमुळे पैसा हाती येत गेला आणि त्यांच्याही घरातली गरिबी हटत गेली. केवळ पुस्तकी शिक्षणाऐवजी डॅशिंगपणा, लढा देणे, हक्क मिळवून घेणे अशा गुणांनी काही तरुण पुढे सरसावू लागते. पांढरपेशी पुस्तकी किड्यांऐवजी अभ्यासाव्यतिरिक्त मर्दानी खेळ व कलाप्रकारात चमकणारी मुले दृष्टीस पडू लागली. त्यांचा सच्चेपणा, रांगडी मांडणी थेट होते. नाटकामध्ये प्रोसेनियमच्या चौकटीतील पारंपरिक मध्यमर्गीय कौटुंबिक-सामाजिक आशयाची दिवाणखानी नाटके ‘साचेबध्द’ झाली होती. याउलट नवीन पिढी आपल्या नजरेतून इतिहास, प्रचलीत समाज ह्याबाबत सडेतोड टिप्पणी करणारी करमणूकप्रधान नाटके करू लागली. संतोष पवार हे असे एक ठसठशीत उदाहरण.
बंदिस्त नाट्यगृहात येणारा – नाटकाला नव्हे जणू ‘सांस्कृतिक वा घरगुती कार्यक्रमा’ला नटून-थटून येणारा – टिपिकल प्रेक्षकवर्ग मागे पडला व नवा प्रेक्षक वाढला. पांढरपेशा प्रेक्षक दोन कारणांनी नाटकांपासून दूर गेला. 1. नवीन नाटके टाईमपास गटातली आणि पूर्वीची नाटके कशी ‘अभिजात’ सकस होती. ही त्यांची भ्रामक भावना.
2. रंगमंचापेक्षा घरच्या घरी टीव्हीवर असंख्य प्रकारची करमणूक विनासायास उपलब्ध होत गेली. उलट ज्यावर ‘बाल्कनीतला प्रेक्षक’ म्हणून स्टॅम्प मारला जायचा, त्याने थिएटरमध्ये ‘फ्रंटसीट’ घेतली. तमाशा, ऑर्केस्ट्रा, लोकनाटय किंवा तत्सम करमणुकीचे प्रकार पाहणारे नाटयप्रेक्षक होऊ लागले. तळागाळातल्यांना नाटके आपली वाटू लागली
सिनेमात पांढरपेशी विषयांऐवजी दादा कोंडकेंचे अस्सल गावरान व करमणूक करणारे सिनेमा ‘सिल्व्हर ज्युबिली हीट’ होऊ लागले. गावोगावी लावण्यांचे प्रोग्रॅम्स आणि जत्रा-जत्रांमध्ये ग्रामीण-कौटुंबिक सिनेमे तुफान चालत होते. समाजाची सांस्कृतिक अभिरुची बदलत होती. त्यामध्ये बदलत्या सामाजिक घटकांचे, नव्या जडणघडणीचे प्रतिबिंब दिसत होते.
लालबाग-परळमुळे गिरणी कामगारांची वसाहत वाढली. तेथे असलेल्या अनेक ठिकाणच्या कुटुंबांमुळे भिन्न संस्कृती एकजीव झाली. केवळ कामधंदा नव्हे, तर परस्परांबद्दल आदर, ममता आणि रिकाम्या वेळी आपल्या कलागुणांचे व त्याद्वारे पारंपरिक भारतीय संस्कृतीचे जतन करणे हे इथले वैशिष्ट्य. त्यामुळे इथे कलाकार घडले, क्रीडापटू घडले, आणि आधुनिक काळातील बिघडत्या परिस्थितीत राजकीय पक्षांना व गुंडांच्या टोळ्यांना ‘तरुण रक्त’ मिळाले.
गिरणी कामगारांच्या लढ्याने हजारो कामगारांचा प्रश्न धगधगत राहिला. गिरण्यांच्या जमिनीचा वापर उत्पादनक्षेत्रासाठी न होता गृहनिर्माणासाठी, बाजारपेठेसाठी व काळया पैशांची आयती संस्कृती जोपासण्यासाठी झाला. ही पार्श्वभूमी एवढी दाहक होती, की अनेकांच्या आशा-अपेक्षांची आहुती गेली, भावनांची राखरांगोळी झाली. त्यातून नव्या वेधाच्या साहित्य, नाट्यकृती न घडल्या तरच नवल! गिरणी कामगारांच्या समस्या व एकूण लालबाग-परळ संस्कृतीतील कथा व व्यथा, साहित्य, नाट्य, सिनेमा इत्यादी कलाकृतींमध्ये चित्रित होत आहेत. ही लाट नाही की त्यांची वेदना ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न नाही. तर या लेखकांनी, कलावंतांनी आपल्या संवेदनाक्षम मनाने केलेल्या प्रांजळ भावना आहेत; त्यांचे यथार्थ चित्रण आहे. आपल्या देशाला महादु:खाची, महाआपत्तींची व महायुध्दाची पार्श्वभूमी नाही, म्हणून आपण ‘जबरदस्त कलाकृती’ तयार करू शकत नाही; असे म्हटले जायचे. पण गिरणी कामगारांचे, त्यांच्या कुटुंबांचे दु:ख हे दु:ख नव्हते का? जयंत पवारच्या ‘अधांतर’ नाटकामधून ती भेदकता व्यक्त झाली व म्हणून विजय तेंडुलकरांनी त्याला ‘सर्वश्रेष्ठ’ नाटक म्हटले.
स्थित्यंतर काळातील ह्या नव्या पिढीच्या नव्या आविष्काराला तोंड फुटेपर्यंत, गिरणगाव म्हटल्यावर आपल्या डोळयांसमोर येई ती नारायण सुर्वें यांची धगधगती कविता. गिरणी कामगारांचे दु:ख आणि वेदना बोलक्या करणारी प्रखर कविता. ऐसा गा ब्रह्म मी, माझे विद्यापीठ यांसारखे संग्रह. नामदेव ढसाळ व अन्य कवींनी आपल्या मनातला अंगार शब्दांद्वारे फुलवला. हे सारे लालबागच्या परिसरात होते. अन्य कवीही आहेत की ज्यांनी गिरणी कामगार संप, लालबाग संस्कृती आपल्या काव्यातून मांडली. स्वातंत्र्यकाळात आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक शाहिरांनी कवने केली, पोवाडे रचले. शाहीर अमरशेखांचे शब्दांचे आसूड, मुंबईची लावणी यांतून आपल्याला हे पाहायला मिळते.
ह्या संस्कृतीचा परिणाम होऊन भाऊ पाध्येच्या ‘वासुनाका’ने पांढरपेशा साहित्य-संस्कृतीवर ओरखडा उमटवला. पवित्र, गुळमुळीत, पांढरपेशीय साहित्याला वास्तववादी स्वरूप आले. गिरगावातून व पुण्यातून प्रसिध्द होणा-या साहित्यात कामगार जीवनाचे रूप अधिक यथार्थ उमटू लागले. दिवाकर कांबळीसारख्या नवीन बंडखोर लेखकाने परळचे जीवन, शिवसेनेचा उदय अशा विषयांवर ‘परळ-६८’ व ‘डोकेफूट’ अशा कादंब-या लिहिल्या. शरद सावंतसारख्या संवेदनशील कवीने आपल्या काव्य व कथांमधून इथल्या तरुणांचे भावविश्व प्रकट केले.
हे सारे जिरवून लालबागचा समग्र वेध घेऊ पाहणारी दोन नवी पुस्तके आली आहेत. पंढरीनाथ सावंतांसारख्या ज्येष्ठ पत्रकाराने आपल्याला दिसलेल्या गिरणी कामगारांचे, परळचे सामाजिक-राजकीय जीवन शब्दरूपात मांडलेले आहे. ते 1944 पासून आजतागायत – म्हणजे स्वत:चे बालपण ते म्हातारपण त्याच भागात काढल्याने आलेले अनुभव त्यांनी पत्रकार-लेखक म्हणून सांगितले आहेत. ‘मी पंढरी गिरणगावाचा’ हे पंढरीनाथ सावंतांचे आत्मचरित्र आहे. ते स्वत: गिरणी कामगार नव्हते, परंतु अवतीभवती सर्व कामगार होते. त्यानी गिरणगावात राहून सर्व स्थित्यंतरे अनुभवली, भोगली आहेत. त्यांनी पत्रकार, चित्रकार व शिक्षक आणि माणूस या भूमिकांतून प्रांजळ आत्मकथन केलेले आहे.
त्यांची गिरणी कामगारांच्या मुलांबद्दल टिप्पणी बोलकी आहे. ते म्हणतात – ”त्यांच्या पोरांचे शिक्षण तुटले. शिक्षणाशिवाय नोकरी नाही. नोकरी नाही, तर समाजात लायकी नाही. वैफल्याने ग्रासलेली (दारिद्र्याने पीडलेलीसुध्दा) अशी हजारो पोरे मुंबईतल्या गँगस्टरच्या फौजांमध्ये सामील झाली. या पोरांमधले पुढे गँगवॉरमध्ये मेले.”
सावंतांची काही निरीक्षणे –
– संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणी कामगारांबाबतचा लढा ह्यात लढाऊ असलेला पण नंतर विकल झालेला गिरणगाव माझ्या चाळीने पाहिला होता.
– संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात गिरणी कामगार व माथाडी कामगार यांनी जेवढा मार खाल्ला तेवढा इतर कुणी खाल्ला नसेल!
– गिरण्या आधुनिक फॅशनच्या काळात तोट्याचे साधन ठरल्या. त्याउलट जमिनींचे भाव वाढत होते. तेव्हा मालकांसाठी गिरणी बंद पडणेच फायद्याचे होते! सामंतांचा ‘संप’ ही इष्टापत्ती होती. संप बारगळला, तरी सामंतांचे ‘वाढदिवस’ चालू राहिले. अडीच लाख कामगार बेकार झाले.
– नळावर भांडणा-या बायका, पण कोणावर काही प्रसंग आला की मदतीला धावून जायच्या, हा शेजारधर्म दुर्मीळ आहे.
दुसरे पुस्तक म्हणजे ‘ग्रंथाली’ने आदिनाथ हरवंदे यांची ‘लालबाग’ ही कादंबरी प्रकाशित केली आहे. एक पत्रकार, कुशल जनसंपर्क अधिकारी आणि मुळात स्वत:च्या आयुष्यातील घडणीची महत्त्वाची वर्षे हरवंदेंनी लालबागमध्ये व्यतीत केली असल्याने तेथील जीवन त्यांनी जवळून अनुभवलेले आहे. गिरण्यांच्या निमित्ताने कामगारांची वस्ती, त्यांचे राहणे-जगणे, मिल बंद पडणे आणि त्याबद्दलचे लढे, शिवसेनेचा जन्म अशा अनेक विषयांना हात घालणारी – काल्पनिक पात्रांच्या साहाय्याने वास्तव दर्शन घडवणारी ही कादंबरी. ह्यांतली पात्रे काल्पनिक तरी कसली? नावे वेगळी, पण जीवन तेच. हरवंदेंनी एक कालखंड – एका संस्कृतीचे जीवन जिवंत केलेले आहे. त्यांतले संदर्भ इतके अस्सल आहेत की डोळ्यांसमोर अनेक घटना-प्रसंगांच्या शृंखला सिनेमाप्रमाणे प्रगट होतात. गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकरांनी या पुस्तकाबाबत म्हटल्याप्रमाणे, गिरणी कामगार व कष्टकरी यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा हा दस्तावेज आहे, तर अशोक हांडे यांनी या पुस्तकाला दीपस्तंभ म्हणून गौरवले आहे.
‘लालबाग’ ही वयाच्या सहाव्या वर्षी लालबागमध्ये राहायला आलेल्या नवनाथाची आणि त्याच्या मित्रांची व बदलत्या भवतालाची कहाणी आहे. मुलांचे बालपण, गिरणी कामगारांचे विश्व, त्यांच्या बायकांची घरकामे, खानावळी, बदलती गुंडगिरी, दारू-मटक्यांचे अड्डे, सणासुदीचे वातावरण, सरकारी नोकरी लागल्याचे अप्रूप, लग्न आणि त्यानंतर काहींनी लालबाग सोडले, तरुणांमधील दारूचे व्यसन, सिनेमांच्या तिकिटांचा काळाबाजार, गुंडगिरी – भाईंचा उदय, मराठी माणसांवर होणा-या अन्यायाला ‘मार्मिक’मधून वाचा फोडणे व शिवसेनेचा जन्म, कृष्णा देसाई यांची हत्या व नंतरची पोटनिवडणूक, शिवसेनेची विधायक कामे, गिरणी संप मोडणे, संघर्ष समितीचे प्रयत्न… लालबागने कात टाकणे असे सामाजिक-सांस्कृतिक व औद्योगिक-आर्थिक बदल हरवंदेंनी सूक्ष्मपणे टिपले आहेत. शेवटी, लालबागची आत्ताची अवस्था पाहून नायक नवनाथ भिरभिरतो. असा लालबागचा सुमारे साठ वर्षांचा पट त्यांनी मांडलेला आहे.
गिरणगावातील नाटके एकेकाळी ऐतिहासिक-पौराणिक व भाबडी घटनाप्रधान असत. बदलत्या परिस्थितीत या रंगभूमीनेही कात टाकली व मुख्य प्रवाहात प्रवेश केला. प्रवीण शांताराम, याने ‘आमच्या या घरात’सारख्या जळजळीत नाटकाद्वारे एका तरुणाची
‘शि-याभाय’ होण्याची प्रोसेस मांडली. सयाजी शिंदेनी साकारलेला ‘भाय’ ही त्यांची अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाची भूमिका म्हणता येईल. ‘तारा सखाराम’ हे नाटक व अन्य काही एकांकिकांद्वारे प्रवीण शांताराम यांनी गिरणगावातील व्यक्तिरेखा व समस्या नाट्यबध्द केल्या.
लालबाग-परळमधील घटनांवर एकांकिका-नाटके लिहिली गेली. शरद सावंत या कवी-नाटककाराने थेट लालबाग समस्या न मांडता, अप्रत्यक्षपणे व्यथा मांडली. रमलरफु व इसापचा गॉगल ही नाटके लिहिली. नाटककार व पत्रकार जयंत पवार ह्यांनी ‘घुशी’सारख्या एकांकिकाद्वारे व ‘अधांतर’ या नाटकाने गिरणी कामगारांच्या कुटुंबाचे दु:ख अधोरेखित केले. शिवाय, ते व्यावसायिक रंगभूमीवर आल्याने, त्याला पारितोषिके प्राप्त झाल्याने व त्याच्या अनेक प्रयोगांमुळे प्रेक्षकाभिमुख झाले. घरातला कर्ता पुरुष त्याची नोकरी बंद पडल्यावर आर्थिक फटक्याने संपूर्ण कुटुंबाची कशी वाताहत होते व खरोखरच लालबागची तरुण पिढी वाममार्गाला का लागली? ह्याची उत्तरे नाटकात भेदकपणे मिळतात. संजय नार्वेकर, भरत जाधव, अनिल गवस, लीना भागवत या कलावंतांनी व दिग्दर्शक मंगेश कदम ह्यांनी हे नाटक सजीव केले व नाटककाराचा आशय गडदपणे तुमच्या-आमच्यापर्यंत पोचवला. ह्याच नाटकावर महेश मांजरेकरांनी ‘लालबाग-परळ’ हा सिनेमा तयार केला.
अलिकडे बहि:शाल, मुंबई या संस्थेने ‘आख्यान – तुकारामभाऊ’ हे नाटक सादर केले आहे. गिरणी कामगार पित्याची समस्या घरातच पाहिल्याने व त्यामुळे होणा-या विवंचना भोगल्यामुळे अनिल रसाळ ह्यांनी हे ‘आख्यान’ लिहिले. हौशी रंगभूमीवर दिग्दर्शन करणारे संतोष चुरी ह्यांनी तितक्याच संवेदनाक्षमतेने ते मांडले. तुकाराम कोतावडे या दशावतारी नाटकातील दुय्यम नटाला, पोटासाठी मुंबईतल्या मिलमध्ये काम करावे लागते. ते त्याचे दु:ख, त्यामुळे होणारी त्याच्या कुटुंबाची फरफट या दीर्घांकात दिसते. हे नाट्य सरळपणे न मांडता त्यात अधुन-मधून केलेला ‘दशावतार’ या लोककलेचा समर्पक उपयोग आशयाला सखोल करतो. कोर्टात चालू असलेला गिरणी मालकाविरुध्द खटला, फुटकळ कारणांमुळे पडत चाललेल्या तारखा, मुलीचे लग्न, मुलाच्या करियरचा प्रश्न, पत्नीने मानसिक आधारासाठी गजानन महाराजांच्या पोथीचा – भक्तीचा आधार घेणे, मुलाची श्रीमंत मैत्रीण – तिने गिरण्यांचा संप ह्या विषयावर रिसर्च करणे – त्यानिमित्ताने गरीब-श्रीमंतांच्या जगण्यातील विरोधाभासाचे दर्शन. एका संपामुळे गिरणी कामगारांचे, त्यांच्या कुटुंबांचे अवघे जीवन अंधारले. जणू काळ त्यांच्यासाठी अठ्ठावीस वर्षांपूर्वीच गोठला! त्यांच्या विश्वाबाहेरच्या जगात प्रचंड वेगाने ‘बदल’ होत राहिले. पण ते सर्व ह्यांच्या परिघाबाहेर. तरीही ही मंडळी दु:ख जगत राहिली. जगणे थांबले नाही. त्यांच्यातला आशावाद चिवटपणाने परिस्थितीशी झुंजत राहिला. असे हे ‘आख्यान’ सच्चे व भिडणारे वाटते. अनिल रसाळचा तुकारामभाऊ हा अभिनय करतो असे वाटतच नाही. हीच गोष्ट शिल्पा सुर्वे कदम (पत्नी), शिरीष पवार (मुलगा), किरण गायकवाड (मुलगी) व तेजल नलावडे (मुलाची मैत्रीण) ह्यांच्याबद्दल सांगता येईल. नेपथ्य, पार्श्वसंगीत हेही पूरक आहेत. या तरुण मंडळींना केवळ गिरणी कामगारांचे दु:ख दाखवायचे नाही, तर त्यांचा ‘आशावाद’ अनेकांपर्यंत पोचवायचा आहे.
टीव्हीने हैदोस घालण्याआधी गणेशोत्सव-नवरात्रोत्सव साजरे करताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर व्हायचे. त्यात प्रामुख्याने मेळे व गिरणगावातील नाटककारांनी कौटुंबिक-सामाजिक समस्या मांडणारी नाटके लिहिली. त्यात तत्कालीन समस्या मांडलेल्या असत. त्यांचे असंख्य प्रयोग झाले. अशा नाटककारांमध्ये ना. ल. मोरे, वसंत जाधव, पां. तु. पाटणकर, बाळ साळसकर, दशरथ राणे, के राघवकुमार, जगदीश दळवी व नंतरच्या पिढीत प्रा. अवधूत भिसे, विजय खानविलकर, गोसावी यांचा समावेश होतो. ह्यांनी विविध विषय मांडले. पूर्वी मामा वरेरकरांनी गिरणी समस्येवर ‘धावता धोटा’ हे नाटक लिहिले होते. रत्नाकर मतकरींनी ‘गणेश गिरणीचा दहिकाला’ लिहून त्याचे अनेक प्रयोगही झाले. केदार शिंदे, प्र. ल. मयेकर, पुरुषोत्तम बेर्डे हे नामवंत इथलेच!
कलाकारांमध्ये तर काय भरत जाधव, अंकुश चौधरी, प्रमोद पवार, विजय चव्हाण, विजय कदम, आदेश बांदेकर, हरिष तुळसुलकर, विकास कदम ही मुंबईची नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राची लाडकी नट मंडळी आहेत. निर्मिती सावंतचे नाव महाराष्ट्रभर दुमदुमत आहे.
आजच्या नाटकांच्या, सिनेमांच्या किंवा मालिकांच्या प्रेक्षकांना ही मंडळी आवडतात. कारण त्यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना जवळच्या-आपल्याशा वाटतात. त्यांचे बोलणे, वागणे, संवाद साधणे – हिरोच्या थाटाचे, पारंपरिक पध्दतीचे नसते. त्यांची अभिनयशैली सर्वसामान्यांशी हितगुज साधणारी, रसरशीत, जिवंत अशी असते. खोटे तत्त्वज्ञान, आदर्शवादी व्यक्तिरेखा, काळ्या-पांढ-या छटांची माणसे, बेतलेले नाट्यसंघर्ष, उच्च मध्यमवर्गीय समस्या – या सगळयांपेक्षा वेगळे, थोडे पौराणिकतेशी, लोकनाटयाशी नाते सांगणारे, आजच्या समस्यांवर ‘विच्छा माझी’ स्टाईल भाष्य करणारे, क्वचित प्रसंगी ‘रामायण-महाभारत-राजा प्रधान’ ह्यांच्या माध्यमातून आजच्या गोष्टींचे विडंबन करणारे – शिवाय, दोन घटका निखळ करमणूक, कोठेही लेक्चर वा डोसबाजी वा प्रबोधन यांचे अवडंबर नाही. म्हणून ही कला जवळची वाटली, कलाकार गळयातले ताईत झाले! (हीच टप्पोरी भाषा विकास कदमने ‘मुन्नाभाय’मध्ये नेली) महेश मांजरेकरांनी ‘अधांतर’ नाटक पाहून अस्वस्थ झाल्यावर मराठी व हिंदीत सिनेमा करण्याचे ठरवले. ‘लालबाग-परळ अर्थात मुंबई झाली सोन्याची’ हा मराठी व हिंदीत ‘सिटी ऑफ गोल्ड’ असे चित्रपट तयार केले.
शशांक शेंडे व सीमा बिश्वास ह्यांनी गिरणी कामगार पिता व मातेची भूमिका केली. त्यांची मुले म्हणजे अंकुश चौधरी (लेखक), धिरज पटेल (नरू) आणि वीणा जामकर (अंजू) यांची ही कहाणी. मिल बंद पडल्यानंतर तिघेही तीन वाटांनी जातात. प्रत्येकाच्या वाट्याला भीषण दु:ख येते. हे प्रातिनिधीक चित्र आहे. गरिबीमुळे आत्महत्या करणे, गुन्हेगारीकडे वळणे किंवा प्रामाणिकपणाने दोन वेळेची भ्रांत सोडवणे – अशा पर्यायांतून जगण्यासाठी धडपडत राहतात. सिध्दार्थ जाधव (स्पीडब्रेकर) हा देखील गिरणी कामगार नेत्याचा मुलगा. हरकाम्यातून एक भाई होण्यापर्यंत व पित्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गिरणी मालकाच्या जावयाचा खून करण्यापर्यंत त्याचा प्रवास घडतो.
तीन कोटी रुपयांत बनलेल्या या द्विभाषिक सिनेमाचे महाराष्ट्रातील 170 सिनेमागृहांत एकाच वेळी प्रदर्शन झाले. याचा अर्थ सिनेमा हे माध्यम म्हणून गिरणी कामगारांचा प्रश्न लोकांपर्यंत पोचवण्यास समर्थ आहे. परंतु ते हजारो-लाखोंपर्यंत पोचू शकते ही खरी ताकद आहे. ‘अधांतर’ नाटक जितक्या प्रेक्षकांनी पाहिले असेल, त्यापेक्षा अनेक पटींनी प्रेक्षकांना हा ‘प्रॉब्लेम सिनेमा’ पाहण्यास मिळाला.
मुख्य धारेतला सिनेमा करणे व हिंदीत करणे – या धाडसाबद्दल महेश मांजरेकरांचे कौतुक करायला हवे. कारण त्यामुळेच ही समस्या, तिचे शहराला – महानगराला ग्रासणारे अक्राळविक्राळ रूप जनतेला पाहता आले. हा केवळ गिरणी कामगारांचा प्रश्न नाही, तर कष्टक-यांचा प्रश्न आहे. एक पेशा – एक उद्योग नामशेष होत-होता, त्यासाठी खपलेल्या श्रमजीवींच्या उपजिविकेची, पर्यायी रोजगाराची, उत्पन्नाची काहीही सोय न करता, त्यांच्या कुटुंबकल्याणाचा विचार न करता उत्पादन बंद करणे, उद्योग-व्यवसायाची जमीन सोन्याच्या भावाने बिल्डरच्या घशात घालणे – हे सगळे जेव्हा नाटक/सिनेमा माध्यमाद्वारे हजारो/लाखो लोकांपर्यंत पोचते तेव्हा लोकशाही देशात काय चालले आहे? असा प्रश्न मनात निर्माण झाला. एक पिढीच्या पिढी बेकार झाली, पुढची पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली, राजकारण्यांनी त्यांचा ‘वापर’ केला, हे कटू सत्य पडद्यावरून मनावर कोरले जाते. हीच या माध्यमाची ताकद.
‘अशा वेळी रिजनल सिनेमा हेच योग्य माध्यम वाटते. त्यामुळे यापुढे असे प्रश्न, वेगळे सिनेमे तयार करण्यासाठी मराठीप्रमाणे बंगाली, तामीळ व तेलुगु अशा अन्य भारतीय भाषांतही सिनेमे करण्याचा मनोदय आहे’ असे भाष्य मांजरेकर यांनी केले आहे.
आज माध्यमांमुळे साहित्यावर, वाचनसंस्कृतीवर परिणाम झालेला आहे असे म्हटले जाते. पण दुसरीकडे, या माध्यमाची ताकद ओळखून जर आपण त्यांचा उपयोग योग्य प्रकारे केला, तर समस्या दृक्श्राव्य माध्यमांद्वारे प्रभावीपणे पोचू शकतात. ‘लालबाग-परळ’च्या निमित्ताने हेच सिध्द झालेले आहे. एकाच वेळी लिखित शब्द व दृक्श्राव्य माध्यम यांद्वारे एखादी समस्या समांतरपणे मांडली गेली तर ती व्यापकपणे पोचू शकते.
– राजीव जोशी
भ्रमणध्वनी : 9322241313
rmjoshi52@yahoo.co.in