Home सामाजीक निसर्गसंवर्धन लामकानी : भरदुष्काळात चराईचे कुरण

लामकानी : भरदुष्काळात चराईचे कुरण

0

चारा टंचाईच्या काळातही हमखास चारा मिळण्याचे ठिकाण हा लौकिक लामकानी (तालुका धुळे) या गावाने 2019 च्या दुष्काळातदेखील कायम ठेवला आहे! वास्तविक लामकानी परिसरात अवघा दोनशे-सव्वादोनशे मिलिमीटर पाऊस पडतो. गेल्या पावसाळ्यातही तसा तो फक्त दोनशेसाठ मिलिमीटर पडला, तोही फक्त तीन दिवसांत, नंतर पावसाची चिडीचूप. तरीदेखील लामकानी परिसर आजुबाजूच्या गावांतील पशुपालकांना ओअॅसिस वाटतो. तेथे अत्यल्प पाऊस होऊनही पाण्याची पातळी फारशी खालावलेली नाही. सीझनला कपाशीची बोंडे बऱ्यापैकी भरलेली दिसतात. मात्र ती किमया साध्य होण्यासाठी ग्रामस्थांनी पाणलोट क्षेत्रविकासाचे प्रयत्न सतत बारा वर्षें केलेले आहेत आणि त्यामागे धुळे येथील डॉ. धनंजय नेवाडकर या पॅथॉलॉजिस्टचा दृढ संकल्प आहे. नेवाडकर म्हणाले, की 2019 च्या दुष्काळात दीडदोनशे टन चारा शेतकऱ्यांनी कापून नेला आहे. अजून सत्तर टन चारा शिल्लक आहे. या वर्षी दुष्काळ निधी असल्यामुळे टनाला आठ रुपये मजुरी कापणी व गढी बांधणी याकरता मिळाली. त्यासाठीसुद्धा बेलिंग मशीन आहे. गतवर्षी आगीत अडीचशे हेक्टरवरील चारा जळून गेला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वत:हून चारा कापून सुरक्षित राहील यासाठी मदत केली.  

लामकानी गावाचे नाव प्रथम ऐकताना गमतीदार वा सिंध प्रांतातील वाटते. ते पूर्वी कुरणांनी व्यापलेले असे, म्हणे. तेथे लांब कानांचे ससे मोठ्या संख्येने राहत. म्हणून त्याचे नाव पडले लामकानी! चांगले दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे ते. तेथे चांगली सुबत्ता स्वातंत्र्यपूर्व काळात किंबहुना नंतरही साठ-सत्तर सालापर्यंत होती. दूध-दुभते भरपूर होते. चारा होता. त्यावेळी महसूल व वनविभाग एकत्र काम करत असत. गवताळ कुरणांवरील चराईसाठी काही योजना राबवल्या जात असत- चक्राकार चराई (रोटेशनल ग्रेझिंग) ही त्यातील एक पद्धत. म्हणजे काय? तर काही ठरावीक काळ एखाद्या भागावर चराईला परवानगी असायची. मग तो भाग बंद करायचा. त्याला म्हणायचे ‘बंद भाग’. अहिराणीत त्याचा अपभ्रंश झाला बनभाग. पुढे पुढे, लोक बनभाग म्हणजे वनविभाग असे म्हणू लागले. कुरणे संरक्षित राहिल्याने चांगल्या गवतांची वाणे त्यात टिकून होती. गुरांची संख्यादेखील मर्यादित होती. दूध-दुभते भरपूर असे. परिस्थिती बहात्तरच्या दुष्काळानंतर बदलली. अनेक ‘बनभाग’ खुले केले गेले. काही ठिकाणी गैरफायदा घेतला गेला आणि वाढत्या चराईमुळे कुरणाचे नुकसान होत गेले. जी काय थोडी फार जंगले होती तीही कापली गेली आणि सुबत्ता संपुष्टात आली.

गवताळ राने कमी झाल्याने वा निकृष्ट दर्ज्याची झाल्याने गुरांचा प्रकार बदलला. गाई कमी झाल्या. शेळ्या-मेंढ्या वाढल्या, त्या निकृष्ट दर्ज्याच्या चाऱ्यावर वाढू शकतात. पूर्वी जे मेंढपाळ स्थलांतरित व्हायचे त्यांतील काही स्थायिक झाले. मेंढपाळांना एखाद्या भागात गुरे चारण्याकरता ‘चराई’ची पावती फाडावी लागते. म्हणजे मोबदला वनविभागाला द्यावा लागतो. तो गुरांच्या संख्येवर ठरवला जातो. त्यामुळे ती संख्या कमी सांगण्यावर, कमी मांडण्यावर भर दिला जाऊ लागला. भ्रष्टाचार सुरू झाला. त्या सगळ्याचा दुधाच्या धंद्यावर परिणाम तर झालाच, परंतु तो ज्या निसर्गावर अवलंबून होता तोही उतरंडीस लागला! शेवटी गावातील लोकांचे ऊसतोडणीकरता स्थलांतर सुरू झाले. विहिरी आटल्या. शेतीवर परिणाम झाला. तरुणदेखील धुळ्याला अथवा अन्य ठिकाणी उपजीविकेसाठी बाहेर पडू लागले. गाव ओकेबोके झाले.

-dushkal-sukal-lamkaniडॉ. धनंजय विष्णू नेवाडकर हे धुळ्यातील पॅथॉलॉजिस्ट. ते मूळ लामकानीचे रहिवासी. नेवाडकर यांना सप्टेंबर 2000 मध्ये झालेल्या अपघातात तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. लामकानीवासी त्यांना त्या काळात भेटण्यास येत तेव्हा त्यांच्या गप्पा, दुष्काळ, आटलेल्या विहिरी, माना टाकलेल्या कूपनलिका या मुद्यांभोवती असत. नेवाडकर यांनी गावासाठी चिरंतन असे काम करण्याचा निर्धार त्या काळात केला. त्यांच्या वाचनात पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराची यशोगाथा आली होती. समस्या जवळपास सारखी, फरक होता तो लोकसंख्येचा. लामकानीची लोकसंख्या आठ ते दहा हजार. शिवाराचे क्षेत्र मोठे. शिवाय राजकीय गटतट, जातीपातीचे राजकारण आणि अन्य राजकीय संवेदशीलता हा मसाला ठासून भरलेला होता. 

नेवाडकर यांनी अपघातातून सावरल्यावर हिवरे बाजाराला जानेवारी 2001 मध्ये भेट दिली; त्या पाठोपाठ, फेब्रुवारी 2001 पासून त्यांनी लामकानी गावाला दर रविवारी भेट देणे सुरू केले. त्यांनी स्थानिक डॉक्टर मित्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शिक्षक यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. त्यांना हिवरे बाजारची व्हिडिओ कॅसेट दाखवली. तो कार्यक्रम पुढे गावाच्या चौकाचौकात सभा घेऊन सुरू झाला. श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी हे नियम पाळावे लागतील हे सांगितल्यावर गावकऱ्यांच्या शंकाकुशंका अधिक वाढल्या. तरी कामास तयार झाली ती माणसे घेऊन माथा ते पायथा तत्त्वानुसार काम करण्याचे ठरले. गावाचा डोंगर उतार पूर्व-पश्चिम जवळ-जवळ तीन किलोमीटर पसरलेला आहे. ते सुमारे चारशे हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात. वन विभागात चकरा सुरू झाल्या. प्रथम पन्नास हेक्टर क्षेत्रात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी सुरू केली, फुटलेला बांध श्रमदानाने दुरुस्त करून घेतला. श्रमदान 2002 च्या एप्रिल-मे महिन्यात सुरू झाले. दिवसा उन्हाचा तडाखा असल्यामुळे रात्री बत्ती, कंदील, इमर्जन्सी लॅम्प लावून गावातील तरुण, बुजूर्ग कामे करत. वनसंरक्षण व वनव्यवस्थापन समिती स्थापली गेली. वन विभागाने 2002च्या पावसाळ्यानंतर सलग समतल चरांचे (सीसीटी) काम प्रत्यक्ष सुरू केले. रोहयो आणि श्रमदान यांमधून एकूण तीनशे हेक्टर डोंगरउतारावरील जल/मृदासंधारण 2007पर्यंत झाले. त्याच भागात चराई/कुऱ्हाडबंदीचे पालन होत गेले.

‘वॉटर’ (WOTR) या संस्थेने ‘इंडो-जर्मन सोसायटी’च्या निधीमार्फत मदत केली. गावकऱ्यांनीदेखील पासष्ट हजार रुपये निधी प्रकल्पाकरता गोळा केला. नेवाडकर यांनी कीर्तनाचादेखील आधार लोकसहभाग वाढवण्यासाठी घेतला; तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली. वृक्षदिंडी, बी रोपण, रोपांची लागवड असे काही उपक्रम शाळेतील मुलांबरोबर घेण्यात आले. गावात झाडोरा खूपच चांगला 2005 सालापर्यंत फोफावला. पाणी वाढण्यास सुरुवात झाली. काही विहिरींची पाहणी वर्षभर करून नोंदी ठेवण्यात आल्या.2008 पर्यंत तर लक्षणीय बदल दिसू लागले. पूर्वीचे निकृष्ट जातीचे ‘कुसळी’ नावाचे गवत पूर्णतः नाहीसे झाले. त्याची जागा उत्कृष्ट जातीच्या ‘पवन्या’, ‘मारवेल’, ‘डोंगरी’ या गवतांनी घेतली. म्हणजे परिसंस्थेची सुद्दढतेकडे वाटचाल सुरू झाली. मातीवरील आच्छादन वाढल्याने तिचे तापमान नियंत्रित झाले. उन्हाळ्यातही झाडोरा जमिनीवर राहिल्याने तिची सुपीकता, बीजांकुरण क्षमता टिकून राहण्यास व वाढण्यास मदत झाली. गवताबरोबर अकेशिया म्हणजेच बाभूळ वर्गातील झाडे वाढीस लागली. त्यांतील काही सदाहरित आहेत. प्राणी-पक्ष्यांचे आसरे वाढले. कीटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. अशा रीतीने लामकानी ग्रामस्थांनी गवत-पाण्याकरता राखलेल्या भागावर पर्यावरणीय पुनरुज्जीवनच घडून आले.

अर्थात, या गोष्टी निर्वेध घडत गेल्या नाहीत. चराईबंदीचा निर्णय सुखासुखी अमलात आला नाही. त्यातून अनेक तंटे निघाले. नेवाडकर आणि लामकानीवासी यांना पोलिस ठाण्यापर्यंत चकरा माराव्या लागल्या. नियम मोडणाऱ्यांकडून दंडापोटी एक लाख रुपये वसूल झाले. चराईसाठी विशिष्ट भाग मोकळा ठेवला गेला. जसे काम होत गेले व त्याचे दृश्य परिणाम दिसत गेले तसा लोकांचा सहभाग वाढत गेला. लामकानीच्या डोंगरउतारावर रोहयोमधून झालेली कामे दर्ज्याबद्दल चांगली ठरतील. वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, माधवराव चितळे, वॉटर संस्थेचे फादर बाकर, अरुण निकम, वनअधिकारी सुरेश थोरात, वसंतराव टाकळकर, सर्वेशकुमार निगम, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम भापकर, माजी जिल्हाधिकारी भास्कर मुंडे या मंडळींचे मार्गदर्शन लाभले. त्या प्रयोगांमुळे खडकाळ डोंगरांवर दाट पवन्या गवत डोलते. ते गवत परिसरातील वीस-पंचवीस गावचे दुग्ध व्यावसायिक कापून नेतात. पूर्वी वर्षानुवर्षें खुरटलेल्या अवस्थेत असलेल्या हिवर/बाभळाच्या झाडाझुडपांनी चांगली वाढ धरली आहे. दरवर्षी केलेल्या बीज रोपणाने हजारो नवीन रोपटी तयार झाली आहेत. त्याशिवाय त्या परिसरात पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पाखरांची वाढलेली संख्या कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. बंद कूपनलिका सुरू झाल्या. अस्तंगत झालेली बागायती शेती ही संकल्पना पुन्हा मूळ धरत आहे.

हे ही लेख वाचा – 

हिवरे बाजार गावाचा कायापालट
कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला
आर्द्रता चक्र फिरू लागले तर…

 

परिसरात भीषण दुष्काळ 2008 साली पडला होता. त्या वर्षी परिसरातील पंचवीस खेड्यांतील सर्व शेतकऱ्यांना मिळून चारशे टन एवढा उत्कृष्ट प्रतीचा चारा उपलब्ध करून देण्यात आला. त्याच वर्षी त्या प्रयोगाला ‘संत तुकाराम जनग्राम’ पुरस्कार मिळाला. गावात सातशे गाई, दीडशे म्हशी एवढी जनावरे आहेत आणि पाचशे हेक्टर संरक्षित प्रदेशातून सुमारे पंधराशे टन एवढी चाऱ्याची उपलब्धता आहे. तो चारा पुरून उरतो. चराईबंदी चालू आहे. गवत कापून गोठ्यात जनावरांना दिले जाते. चक्राकार पद्धतीने कापणी सुरू असते. त्यामुळे पूर्वीची निसर्गाची स्थिती येऊ घातली आहे. विहिरी, कूपनलिका उन्हाळ्यातदेखील ओसंडून वाहताना दिसतात. नेवाडकर या प्रकल्पाचे यश एका वाक्यात सांगतात. ते म्हणतात, “पंधरा वर्षांपूर्वी भावाच्या साखरपुड्याकरता एक खट्टी (दहा लिटर) दूधदेखील गावात मिळाले नव्हते. ते धुळ्याहून आणावे लागले. आता मात्र दरदिवशी जवळ जवळ तीन हजार लिटर दूध धुळ्यात पाठवले जाते!”

नेवाडकर यांनी अमिरखान, किरण व सत्यजित भटकळ हे तिघे कुरण पाहण्यास येऊन गेल्याचे सांगितले. गाव वॉटर कप स्पर्धेत सहभागी होते, त्यांनी तालुका पातळीवर बक्षीसही मिळवले. डॉक्टर नेवाडकर त्या काळात दीड-दोन महिने रोज पहाटे उठून गावाकडे येतात. नेवाडकर म्हणाले, की महाराष्ट्रात कुरणक्षेत्र सुमारे दोन लाख हेक्टर आहे, मात्र राज्याला कुरणासंदर्भात धोरण नाही. चराईनियंत्रणासंबंधीचे नियम आहेत. त्यांनी अशीही माहिती दिली, की माधव गाडगीळ आणि अनिल काकोडकर यांच्या प्रमुखत्वाखाली ‘महाराष्ट्र जीन बँक’ प्रकल्प चालू आहे. त्यात जैवविविधता जपण्यासाठी गवताच्या विविध जाती जपण्याचा प्रयत्न आहे. लामकानी गाव त्या प्रयोगात सामील आहे. 

गावातील तरुण तेथेच थांबलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्वात मोठे लळिंग येथील कुरण पुनरुज्जीवित करण्याची योजना त्यांच्याकडून आखली जात आहे. लामकानीतील ‘पवन्या’चे बी ते लळिंगच्या कुरणात पसरले गेले देखील!
(संपर्कः डॉ. धनंजय नेवाडकर (093728-10391)
 

संजय झेंडे 9657717679 sanjayzende67@gmail.com व केतकी घाटे– thinkofketaki@gmail.com यांच्या लेखनावरून संकलित. अपडेट व जादा माहिती – ‘थिंक महाराष्ट्र’ चे प्रयत्न. 

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version