रोपवे सप्तशृंगी गडावर (Ropeway On Saptashrungi Fort)

0
125
_saptashrungi_gad_rope_way

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आधुनिक काळात फार यातायात करावी लागत नाही. ‘श्री सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्ट’चे प्रयत्न त्यास मुख्यत: कारणीभूत आहेत. गडावर वरपर्यंत वाहनांतून जाता येते; प्रत्येकी ऐंशी रुपयांचे तिकिट काढून रोपवेची सोय आहे. अगदी मंदिरापर्यंत तीन मिनिटांत पोचता येते. देवीच्या दर्शनाचा प्रवास सोपा आणि सुखकर होऊन गेला आहे.  

सप्तशृंगी गडाला दरवर्षी तीस ते पस्तीस लाख भाविक भेट देतात. तेथे आलेले भाविक दान उदारपणे करतात. त्यातून ‘श्री सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्ट’ने जबाबदारी स्वीकारून गडाच्या विकास कामास सुरुवात केली. त्यांनी गडाच्या पायथ्याला पहिल्या पायरीला लागून प्रशस्त महाद्वार उभारले आहे. त्या महाद्वारावर देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. त्यावर सुंदर नक्षिकाम आहे.

गडावर भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात- त्यात जावळ काढणे, निंब नेसवणे, नारळ फोडणे इत्यादींचा समावेश असतो. तशा भाविकांना थांबण्यासाठी व त्यांचे धार्मिक कार्य पार पाडण्यासाठी भव्य शेड बांधली आहे. तेथे बाजूला चिंतन हॉलही बांधला आहे. मंदिराचे सुशोभिकरण केले आहे. मंदिरावर असलेला पत्र्याचा ढाचा काढून त्याऐवजी सिमेंट-कॉक्रिटचा स्लॅब टाकला आहे.

भाविकांना मार्कण्डेय पर्वतावर जाऊन मार्कण्डेय ॠषींचे दर्शनही घ्यायचे असते. परंतु तो पाऊलवाटेचा व खडतर आहे. तेथे रोपवेची सुविधा झाल्याने तो प्रवास सोपा झाला आहे. रोपवेचे आगगाडीसारखे चार डबे आहेत. प्रत्येक डब्यात सहा माणसे बसू शकतात. त्याला काचेची खिडकी आणि दरवाजा असल्याने बाहेरचे सुंदर दृश्य पाहता येते. ते दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात. सुरक्षारक्षक जाण्या-येण्यासाठी फार छान मदत करतात. भाविक रोपवेने गडावर मंदिराजवळ तीन मिनिटांत जाऊन पोचतो. गडाच्या दोन्ही बाजूंला रोपवे आहे. काही लोक पायी गड चढून जाणे पसंत करतात. रोपवेचे तिकिटघर गडाच्या पायथ्याशी, बाहेर आहे. तेथे पाचशे वाहने उभी राहू शकतील असा वाहनतळ पाच हेक्टर जागेत उभारण्यात आला आहे. तेथे आत गेल्यावर प्रशस्त मोठे दालन आहे. त्याचे आधुनिक पद्धतीने सुशोभिकरण केले आहे. दुकानांसाठी वेगळी जागा, पादत्राणांसाठी सोय, उपाहारगृहे, फूड मॉल, भाविकांना बसण्यासाठी टेबल-खुर्च्या आणि सुलभ शौचालय अशा सोयीसुविधा आहेत. वाहनतळाजवळ स्वच्छतागृह, उपाहारगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.
गडावर निवासाच्या सोयीसाठी धर्मशाळेमध्ये अडीचशे खोल्या आहेत. गडावर राहण्यास आल्यानंतर एक दिवसासाठी खोली मिळते. संस्थानातर्फे पंधरा रुपये देणगी मूल्यामध्ये प्रसादाची सोयही आहे. पौर्णिमेला, नवरात्र काळ व चैत्र महिन्यात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते. 

हा ही लेख वाचा – 
वणी येथील सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi)

ट्रस्टने भाविकांसाठी ‘नांदुरी’ येथे भक्तनिवास उभारले आहे. तसेच, सप्तशृंगी गड या पायी रस्त्याचासुद्धा विकास केला आहे. त्या रस्त्यात वेगवेगळ्या प्रकारचे निवारा शेड्स, जागोजागी पाणपोया, वृक्षारोपण, स्वच्छतागृह यांचीही व्यवस्था केली आहे. पावसापासून सुरक्षित असा डोंगर प्रदक्षिणेचा मार्ग तयार करण्यात आला आहे. सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूला सतीच्या कड्याजवळ ‘शिवालय तलाव’ नावाचे प्राचीन तीर्थ आहे. गडावर येणारे भाविक त्याचा स्नानासाठी उपयोग करतात. तेथे वस्त्रांतर गृहाची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवालय तलावावर आर.सी.सी. शेड्स उभारण्यात आली आहे. आजूबाजूच्या परिसरात वृक्ष लागवड केली गेली असून, स्नानगृह व स्वच्छतागृह यांचीही सोय आहे. शिवालय तलावाजवळ पायी येणार्या  भाविकांसाठी डॉरमेट्री पद्धतीचा प्रशस्त हॉल उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पायी येणार्याप भाविकांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. 

ट्रस्टने गडाच्या पायथ्याशी असलेल्या हॉस्पिटलचा विस्तार केला. तेथे गरीब व आर्थिक दुर्बल घटक वर्गातील रूग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी ‘जीवनदान निधी’ योजना सुरू केली गेली आहे. रूग्णांना आर्थिक सहाय्यही केले जाते. सप्तशृंगी गड व परिसर हा आदिवासी भाग असल्याने त्याची म्हणावी तशी शैक्षणिक प्रगती झालेली नाही. आदिवासी मुलांना तांत्रिक शिक्षण देऊन, सुशिक्षित तरुणांना स्वावलंबी बनवण्याचा ट्रस्टचा मानस आहे.

– नीलीमा बेडेकर 
neelima.bedekar@rediffmail.com

About Post Author