मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांना स्वत:मधील गुणदोषांची ओळख होण्यास हवी. त्यांना काय चांगल्या प्रकारे जमते, आवडते ते त्यांचे त्यांना कळण्यास हवे; नाहीतर योग्य त्या वयात, योग्य तो निर्णय घेता न आल्यामुळे, पुढे त्यांची प्रगती होत नाही. तेव्हा ती निर्णयक्षमता योग्य त्या वयातच येणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य विचारांची गरज आहे. ते पुन्हा आत्मविश्वासातून निर्माण होतात.
विचार करणे ही गोष्ट सध्या टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स यांमुळे थांबली आहे किंवा चुकीच्या दिशेने जात आहे. विचार जीवनाला योग्य दिशा देतो. एक चांगला विचार मनुष्याचे आयुष्य बदलू शकतो.
मेहनतीचे महत्त्व मुलांनाच नव्हे तर, प्रत्येकाला कळणे आवश्यक आहे. ज्ञानाइतकीच मेहनत आवश्यक आहे हे मुलांच्या मनात रूजणे आवश्यक आहे. मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी नुसतीच पुस्तके किंवा कॅाम्प्युटर यांचा उपयोग होणार नाही. ती साधने आवश्यक आहेतच, पण मुलांना स्वतःच्या उन्नतीसाठी त्यांचा उपयोग कशा प्रकारे करून घ्यायचा ही समज प्रथम येण्यास हवी. त्यासाठी मानसिक पातळी उंचावण्यास हवी. मुलांना त्यांनी काय करावे व काय करू नये याची समज येण्यास हवी. त्यासाठी त्यांची प्रत्येकाची स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी ओळख होण्यास हवी. ती ओळख झाल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास हातभार लागेल. त्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाची, समुपदेशनाची गरज आहे. ते नुसतेच टेक्नोलॉजी किंवा पुस्तकी ज्ञान देऊन होणार नाही. त्यासाठीच ‘रोजनिशी उपक्रम’ सुरू करण्यात आला. उपक्रमाचे पाच टप्पे आहेत.
पहिला टप्पाः मुलांना लिहिण्यास सांगावे. त्यांनी काहीही लिहावे. मराठी नीट येत नसेल तरी, तोडक्या-मोडक्या मराठीत लिहावे. अन्यथा त्यांनी त्यांच्या मातृभाषेत लिहावे. त्यांना चित्रांद्वारे व्यक्त व्हावे असे वाटत असेल तर, तसे करावे. अक्षर कसेही असू देत त्यांनी लिहित राहवे. शिक्षकांनी मुलांना अक्षर सुधारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, पण धाक दाखवू नये. कोणाही मुलाची वही त्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्या कोणाला दाखवू नये. फक्त शिक्षकांनी ती पाहवी व त्या बाबतीत गुप्तता ठेवावी. काही चांगली गोष्ट दुसऱ्यांना सांगावीशी वाटली तर, मुलांची तशी परवानगी घेऊन सांगावी. त्यामुळे मुलांना सन्मानाने वागवल्यासारखे वाटेल. त्यांना काहीतरी व्यक्त करण्याची इच्छा निर्माण होर्इल. त्यांना कोणीतरी (शिक्षक) त्यांच्या जीवनात आहे ज्याच्याकडे त्यांचे मन मोकळे करता येते हा विश्वास वाटेल.
दुसरा टप्पा : मुलांना शाळेतील अनुभव लिहिण्यास सांगावे, प्रत्येक तासाला काय घडले-काय समजले-काय नाही समजले-का नाही समजले? त्यांना मित्र-मैत्रिणींविषयी, शिक्षकांविषयी, आर्इ-वडील, नातेवार्इक यांच्याविषयी काय वाटते? त्यांनी शाळेत येताना, जाताना काय पाहिले? त्यांचे शेजाऱ्यांशी वागणे कसे होते हे सर्व लिहिण्यास सांगावे. यामुळे मुलांची विचार करण्याची पद्धत, त्यांची कल्पनाशक्ती यांचा परिचय शिक्षकांना होईल. त्याची आवडनिवड, घरचे वातावरण समजल्यामुळे खूप फरक पडेल.
तिसरा टप्पा : मुलांना छोटे-छोटे विषय किंवा गोष्टी किंवा व्यक्तींची चरित्रे सांगून, त्यावर लिहिण्यास सांगावे. ते इतिहास, भूगोल, विज्ञान अशा सर्व बाबतींत करता येईल.त्याचा उपयोग हिंदी, मराठी, इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी होईल. गणित विषयासाठीदेखील त्या पद्धतीचा उपयोग होईल. कारण, गणितामध्ये समजणे हा भाग फार मोठा आहे. कित्येकदा, मुलांना भीतीमुळे किंवा मनातील गोंधळामुळे साधे गणित समजत नसते. त्यांच्या क्षुल्लक चुका बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना होत राहतात. मूल जेव्हा शांतपणे काही लिहिते, ते लिहिताना हळुहळू त्याला त्याच्या आवडीनिवडींचा परिचय होऊ लागतो. त्यातून त्याचा आत्मविश्वास वाढीला लागतो आणि आत्मविश्वास वाढला की काही कठीण राहत नाही!
चौथा टप्पा : शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये परस्पर विश्वासाचे संबंध निर्माण झाले, की विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे आपसुकच वाटेल. विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख होण्याकरता रोजनिशीचा उपयोग होईल. त्यांना स्वतःच्या क्षमता कळल्या, की त्यांचा आत्मविश्वास वाढेल. मुले त्यांचा ती त्यांना पुढे काय करायचे आहे त्याचा विचार करू लागतील. त्यांच्या लक्षात येईल, की मेहनत, परिश्रम, रोजचा सराव याशिवाय खरी प्रगती शक्य नाही. त्यांचे त्यांना त्यांनी रोज अभ्यास केला तर चांगले मार्क मिळतात आणि अभ्यास नाही केला तर हुशार असूनही मार्क मिळत नाहीत हे उमजेल. त्यामुळे ती मेहनत आपोआप घेऊ लागतील.
पाचवा टप्पा : दहावीच्या वर्गात येईपर्यंत मुलांचे व्यक्तिमत्त्व आकाराला आलेले असेल. अनेक चांगले संस्कार गोष्टीरूपाने, शिक्षकांच्या वागण्यातून त्यांच्यावर झालेले असतील. मुले चांगले संस्कार, विचार, मेहनतीची तयारी या सर्व शिदोरीसह कॉलेजच्या विश्वात पाऊल टाकतील!
उपक्रमाची उद्दिष्टे :
• विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास
• विद्यार्थ्यांमध्ये लिहिण्या-वाचण्याची आवड निर्माण करणे
• करिअरविषयक मार्गदर्शन व समुपदेशन
• विविध मान्यवरांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
• विद्यार्थ्यांची त्यांच्या स्वत:च्या क्षमतांशी ओळख होणे.
शिक्षणपद्धतीत या गोष्टीचा प्रथम विचार होणे आवश्यक आहे, की विद्यार्थी व शिक्षक यांचा परस्परांवर विश्वास हवा. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता कळून, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांच्या विचारांना आत्मविश्वासामुळे योग्य वळण मिळेल. त्यांनी त्या विचारांना जर मेहनतीची जोड दिली तर सर्व विद्यार्थ्यांची प्रगती योग्य होईल.
हा ही लेख वाचा- शिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा!
शिक्षकांनी मुलांना रोज लिहिण्यास सांगावे. शिक्षकांनी मुलांना रोजनिशीचा चार्ट द्यावा; त्याप्रमाणे मुलांशी आठवड्यातून एकदा चर्चा करावी. त्यांनी काय लिहावे ते सुचवावे. त्यांनी आधीच्या आठवड्यात जे लिहिले असेल त्यावर त्यांना मार्गदर्शन करावे. त्यांच्यामधील उणिवा व चांगल्या गोष्टी त्या लिखाणातून हळूहळू शिक्षकासमोर येतील; शिक्षकांनी उणिवांवर चर्चा जास्त न करता, मुलांच्यामधील ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यावर जास्त भर द्यावा. जर खूपच काही चुकीची गोष्ट असेल, तर ती मात्र लक्षात आणून द्यावी. प्रत्येक मूल सर्वच गोष्टी अगदी सत्य लिहील, बोलेल असे नाही, पण शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना जाणण्याची उपजत कला, अनुभव असतो त्या कौशल्यांचा आधार घ्यावा.
रोजनिशी उपक्रमाअंतर्गत अनेक वेगवेगळे उपक्रम देता येतील; त्यामुळे मुलांना विचार करण्यास उद्युक्त करता येईल- जसे, की निबंधलेखन, एखाद्या पुस्तकातील परिच्छेद वाचून त्यावर स्वत:चे विचार व्यक्त करणे, एखादा उपक्रम राबवून त्याविषयी स्वत:चे मत लिहिणे अशा. मुले टीव्ही, मोबाईल, इंटरनेट यांमुळे फक्त पाहण्याचे काम करतात. त्या कारणाने ती विविधांगी विचार करण्यास प्रवृत्त होत नाहीत. त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे काय चांगले, काय वाईट हे त्यांना उलगडत नाही. ते त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे.
जग फार छोटे झाले आहे. लहानशा कॉम्प्युटरद्वारे जगातील कोठलीही घटना मुलाला बसल्याजागी समजू शकते. जे प्रगती करणारे देश आहेत, त्यांच्याकडे पाहिले तर कळून येते, की त्यांच्या देशातील प्रत्येक व्यक्ती मेहनत घेणारी आहे. ऑफिसर असो, की ऑफिसमधील शिपाई असो प्रत्येक व्यक्ती तेथे भरपूर मेहनत घेते. अंगमेहनतीच्या कामाला तेथे कमी समजले जात नाही. ती गोष्ट भारतीय मुलांना समजणे फार आवश्यक आहे.
रोजनिशी उपक्रमाअंतर्गत शाळेची साफसफाई, परिसराची साफसफाई, एखाद्या चर्मकाराची, सफाई कामगाराची, हॉस्पिटलमधील परिचारिकेची मुलाखत घेऊन- त्याविषयी स्वत:चे मत लिहिणे- तसेच, लेखक, डॉक्टर्स, इंजिनीयर्स, शिक्षक या व्यक्तींच्या मुलाखती घेणे. त्यातून ते काय शिकले ते लिहिणे असे उपक्रम घेता येतील. आईला घरकामात मदत, आजारी शेजाऱ्यांना मदत असेही उपक्रम त्यांना सुचवता येतील. त्यातून मुलांना हळूहळू मेहनतीचे महत्त्व कळत जाईल.
प्रगती – अशा उपक्रमांद्वारे मुलांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, आवडीनिवडीचा बोध होईल, त्यांना आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते आकळत जाईल. त्याप्रमाणे त्यांना दहावीमध्ये किंवा दहावीनंतर करिअरविषयी मार्गदर्शन करता येऊ शकेल.
त्याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनाहोईल. तसेच, मी ‘शिक्षक व्यासपीठा’वरून हे आवाहन करत आहे, की या रोजनिशी उपक्रमाविषयी जर कोठल्या शाळेला माहिती, मार्गदर्शन हवे असेल, तर ते आमच्या टीमकडून देण्यात येईल.
– शिल्पा खेर 98197 52524
संयोजक शिक्षक व्यासपीठ
khersj@rediffmail.com
Brilliant
Brilliant.
My name is Saish dhopavkar …
My name is Saish dhopavkar my favourite game is cricket I study in class six my language is Marathi in Marathi information thank you
ITs good
ITs good
I can meet you in one place…
I can meet you in one place pls
Comments are closed.