रा.ना.वादाची ओळख

_RN_Chawhan_1.png

रा.ना.चव्हाण हे एक प्रभावी समाजचिंतक तसेच समाजसुधारकदेखील होते. चव्हाण यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहवास लाभला होता. त्यांनी त्यांच्या लेखनातून शिंदे यांचा विचारवारसा पुढे चालवत 1950 ते 1990 या काळात परिवर्तन व फेरबदल यांचा विचार मांडला. रा.ना. यांचा विचार हा सामाजिक प्रबोधनाचा आणि एकोप्याचा आहे; तसाच, तो फुले-आंबेडकरवादाचा एक धुमारा आहे. अशा ‘रा.ना.वादा’ची प्रबोधन चौकटीतील तत्त्वमीमांसा ‘प्रबोधनाची क्षितिजे’ या पुस्तकातून मांडली गेली आहे. प्रबोधन ही प्रक्रिया समाज, व्यक्ती आणि राष्ट्र यांत आधुनिकीकरण करणारी असते या मुद्याचा वेध त्या पुस्तकात घेतला आहे.

लेखकाने वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे ते संकलन आहे. त्या सर्वांचा समान धागा प्रबोधन हा असून तो मननीय आहे. पुस्तकात एकंदर सतरा लेख आहेत. त्यांपैकी सोळा लेख मराठीत, तर शेवटचा एक लेख इंग्रजीत आहे. ‘नॉन ब्राह्मीन मूव्हमेंट अँड इंडियन नॅशनल काँग्रेस’ हे त्या इंग्रजी लेखाचे नाव. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकहितवादी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरचे लेख त्यात आहेत, तर काही लेख हे समाजप्रबोधनाची मागील वाटचाल व भावी वाटचाल त्यांचे समर्पक वेध घेणारे आहेत. लेखकाने त्यांचे तटस्थ, परखड व चिकित्सकपणे विश्लेषण केले आहे.

त्यांनी ‘मंडल आयोगा’नंतरची भारतीय समाजव्यवस्थेमध्ये झालेली सामाजिक घुसळणदेखील मांडली आहे. पुस्तकास अशोक चौळसकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात – “रा.ना. हे महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीचे चिकित्सक व साक्षेपी अभ्यासक होते, त्याचप्रमाणे त्या चळवळीस आपल्या परीने गती देणारे ते सिद्धहस्त लेखकपण होते. त्यांना वि.रा. शिंदे व भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला होता. त्याचप्रमाणे ते प्रार्थनासमाज आणि ब्राह्मोसमाज परंपरेशी संबंध जोडून असल्यामुळे त्या चळवळींच्या वाङ्मयाशी त्यांचा जवळून परिचय होता… आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत चार प्रमुख प्रवाह होते. रा.ना.चव्हाण त्या चारही प्रवाहांचे साक्षेपी अभ्यासक होते.”

लेखकाने या पुस्तकांमध्ये वैचारिक तुलना करण्याचा प्रयत्न केला आहे. फुले, रानडे, आंबेडकर, भांडारकर, शिंदे, पाटील, लोकहितवादी या सर्वांचे विचार तुलनात्मकरीत्या मांडले आहेत. त्या विचारवंतांचे विचार समजून घेण्यासाठी लेखकाची तुलनात्मक वैचारिक दृष्टी उपयुक्त ठरू शकते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात प्रबोधन व परिवर्तन यांचा सुरेख समन्वय कशा प्रकारे साधला होता त्याचे विवेचन ‘श्री शिवाजी छत्रपती यांचे प्रबोधन व परिवर्तन’ या पहिल्या प्रकरणात केले आहे. लेखकाच्या विचारांची मध्यभूमी ही फुले यांचे विचार आहेत. त्यामुळेच या ग्रंथामध्ये फुले यांच्यासंबंधी चार लेख आहेत. फुले यांच्या विचारांची मांडणी करण्याबरोबरच फुले यांची बाबासाहेब आंबेडकर व भाऊराव पाटील यांच्याशी केलेली वैचारिक तुलना लेखकाच्या चिकित्सक वृत्तीची जाणीव करून देते. लेखक स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये होऊ शकलेले नाही अशी टीका करतात. त्याला कारण म्हणजे नवे प्रश्न सोडवण्यासाठी कुचकामी ठरलेले जुने प्रबोधन. त्यासाठी नवे प्रबोधन गरजेचे आहे. भ्रष्टाचार ही समस्या केवळ सरकार बदलून सुटणार नाही, तर ती नव्या नैतिक प्रबोधनातून सुटू शकेल. नेतृत्व, जनता या सर्वांनी विधायक अहिंसावादी रचनात्मक विवेक अंगिकारला पाहिजे. सार्वजनिक व्यवहारात आणि राजकारणात वापरली जाणारी भाषाही लेखकाला महत्त्वाची वाटते. सौम्य, मृदू, मितभाषी सहजपणे समन्वय घडवून विकासाचा मार्ग दाखवतो. त्याउलट हिंसक, आक्रमक, रांगडी भाषा अनेक प्रश्न -समस्या निर्माण करते.

रानडे यांचा विचार हा सकलजनवादी होता हे लेखकाने उत्कृष्टरीत्या मांडले आहे. मराठीमधील अनेक पुस्तकांमध्ये फुले व रानडे यांच्यामध्ये सहकार्य होते हे लेखक दाखवून देतो. कोणत्याही समाजसुधारकाकडे किंवा नेतृत्वाकडे जातीच्या दृष्टिकोनातून किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहू नये अन्यथा त्याने केलेले कार्य समजून घेतले जाऊ शकणार नाही असा चित्तवेधक विचार पुस्तकातून मांडला आहे. लोकहीतवादींनी ‘शतपत्रा’च्या माध्यमातून समाजजागृती व समाजकल्याण करण्याचा केलेला प्रयत्न लेखक अधोरेखित करतात. चिपळूणकर, आगरकर, टिळक या तिघांमध्ये वैचारिक मतभिन्नता असली तरी त्या तिघांना जोडणारा समान धागा होता -तो म्हणजे राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा. पुस्तकातील एका प्रकरणात ब्राह्मोसमाज, परमहंससभा, प्रार्थना समाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज यांनी प्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा तुलनात्मक आढावा घेतला आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनात विवेकाचा वापर केला गेला पाहिजे. धार्मिकता, भावनिकता यापेक्षा सदाचार व नैतिकता यांचा अवलंब सार्वजनिक जीवनात झाला पाहिजे. समाजामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्वांची सोडवणूक करण्यासाठी समाजाचे प्रबोधन अत्यंत गरजेचे आहे. त्या प्रबोधनाचे स्वरूप राजकीय, धार्मिक असण्यापेक्षा नैतिक असणे लेखकाला जास्त गरजेचे वाटते.

थोडक्यात, सामाजिक प्रश्नाची उकल करण्याची नवी दृष्टी पुस्तकातून लेखकाने मांडली आहे. परखड विचारांमुळे पुस्तकातील निष्कर्ष कालसुसंगत ठरतात. पुस्तकात संघर्षाची भाषा नसून प्रबोधनाची वाटचाल कशी होत गेली व ते कसे गरजेचे आहे याच दृष्टीने मांडणी केली आहे. तो वैचारिक ठेवा समाजापर्यंत पोचवण्याचे काम हीदेखील प्रबोधनाच्या वाटचालीतील विवेकशील कृतीच आहे!

‘प्रबोधनाची क्षितिजे’ : रा.ना.चव्हाण,
संपादक : रमेश चव्हाण,
प्रकाशक :रमेश चव्हाण,
पुणे,
पृष्ठे : 224, मुल्य : 225 रुपये.

– प्रा. वैशाली पवार

(लोकसत्ता, लोकरंग पुरवणी  14 डिसेंबर  2014 वरून उद्धृत)

About Post Author