राहतच्या स्नेहप्रेमाने सुखावले लॉकडाऊनमधील कष्टी वाटसरू (Lockdown Period Rahat Center)

नगरच्या ‘स्नेहालय’चे गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या संलग्न विविध संस्थांनी एकत्र येऊन नगर-मनमाड रस्त्यावर राहत केंद्राची सुरुवात केली. राहत केंद्रातर्फे परराज्यातील मजुरांच्या नाष्ट्या-खाण्या-पिण्याची-प्रवासाची सोय केली जात आहे. तेथे कार्यकर्त्याना आलेले अनुभव शब्दबध्द केले आहेत अजित कुलकर्णी यांनी…
राहतच्या स्नेहप्रेमाने सुखावले लॉकडाऊनमधील कष्टी वाटसरू
एक ग्रूप अंधारात आला. आम्ही रस्त्याजवळ उभे राहून, पानी-खाना मोफतअशा आरोळ्या ठोकून मजुरांना आवाज दिला. असंख्य जण केंद्रावर आले. आलेला ग्रूप दुचाकीवरून पुणेमार्गे दिल्ली-आग्रा येथे निघाला होता. त्यात एक चार वर्षांचा सूरज वर्मा नावाचा मुलगा होता. गर्दी व प्रवासाने गदगदून गेला होता. चौकशी केल्यावर समजले, की त्याची आई मिळेल त्या वाहनाने पुढे इंदूरच्या दिशेने गेली; हा मागे राहिला आहे. बापासोबत चालला आहे. त्याची अवस्था पाहवत नव्हती. त्या सर्व दुचाकी गटाला विचारले तर समजले, की ते लोक बांधकामात पीओपीचे काम मुंबईत करतात. कोरोनामुळे आयुष्यात  कायमचीच मुंबई सोडून जावे म्हणून ते सर्व निघाले. हे सगळे ऐकून महासत्ता शब्द डोक्यातून गळून पडला.

       पुढे, एक मोठा दोनशेपेक्षा जास्त लोकांचा लोंढा आला. ते लोक सुपा एमआयडीसीमधून गाझियाबादला निघाले होते. त्यांना टेम्पोने कोणीतरी राहुरीजवळ सोडले. नगर रेल्वे स्टेशनवरून ट्रेन आहे असे कोणीतरी अंधारात म्हणाले. म्हणून ती गर्दी नगर रेल्वेस्टेशन शोधत पायी निघाली होती. त्या गर्दीत नवीन लग्न झालेले एक दाम्पत्य होते. औरत का नाम क्या? असे विचारले तर समजले की ती मालन. ती नवी नवरी चालून चालून भेंडाळली होती. ‘भाईसाहब, ट्रेन मिलेगी क्या’? असे विचारले तर ते उत्तर काय द्यावे समजेना. त्या गर्दीला लवकर घरी पोचणे आहे; इकडे कोठे क्वारंटाइन न होता गाव लवकर जवळ करायचे आहे.

चौकशीत विचारले तर फारसे कोणी बोलत नाही. संसर्ग टाळावा म्हणून आम्ही जपून, दुरून बोलतो. त्यात त्यांनीही मास्क लावले असल्याने स्पष्ट ऐकू येत नाही. सगळे संवादाचे प्रश्न आणि प्रश्न आहेत. प्रशासन व रेल्वे, बसव्यवस्था यांचे काही समजत नाही. शासनाच्या सतत सूचना, निकष बदलल्याने लोक गोंधळून गेले आहेत. भूकबळीची प्रचंड भीती कोरोनापेक्षा जास्त आहे. रस्त्यावर अपघात मोठे होतील याचीही भीती आहे.

दाट अंधार होत गेला आणि डोळ्यांतून पाणी यावे असे दृश्य पाहिले. साधारण आठ ते बारा लोक, त्यात तीन बायका होत्या. त्यात लेकुरवाळी एक बाई होती. त्या घोळक्यात चार वर्षांची एक पोरगी अक्षरशः फरफटत तिच्या बापाचा हात धरून चालत होती. अंधार होता, रस्त्यावर हे दृश्य होते. लेकरू रडत होते. आम्ही काय करावे ते कळेना? नि:शब्द सगळे… तो घोळका अंधारात बुडून गेला. दुसरा दिवस उगवला तरी ते रडणे आणि ते दृश्य डोळ्यांसमोर ठळक होते. अजूनही ते दृश्य डोळ्यांसमोरून जाता जात नाही.

लॉकडाऊनचा कालावधी, प्रवासावर निर्बंध आणि कोरोनाची टांगती तलवार यामुळे मुंबई-पुणे-ठाणे आदी औद्योगिक क्षेत्रांतून मजूर मूळगावी परत निघाले आहेत. कोरोनात महाराष्ट्र रेड झोनमध्ये आहे. मोठी शहरे कोरोनाच्या लाल रेषेत गडद होत आहेत. त्यामुळे भीतीने त्यांच्या गावाच्या दिशेने अनेक मजूर चालत, रेल्वेरूळावरून, सायकलवर, कंटेनर-मोठे ट्रक-टेम्पो यांमधून … मिळेल त्या पर्यायाने गावाच्या दिशेने धावत आहेत. त्यांना जीवाची पर्वा राहिलेली नाही.
हे सर्व चित्र केवळ विचित्र नसून एखादे कापड फाटावे तसा देश फाटत असल्यासारखे चित्र आहे. ते पाहून ‘स्नेहालय’चे डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या तत्त्वानुसार -‘मी नाही तर कोण? आज नाही तर केव्हा’ -इनलोगो को महाराष्ट्र से भूखे नही जाने देंगे…! या भावनेने आम्ही 11 मे रोजी काम सुरू केले. स्नेहालय-अनामप्रेम-आय लव नगर -लाल टाकी मित्र मंडळ, आमी संघटना- क्रॉम्प्टन कंपनी, हेल्पिंग फॉर हंगर ग्रूप या संस्था परिवाराने एकत्र येऊन स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठी ‘राहत केंद्र’ सुरू केले. रोज सरासरी चार हजार मजूर त्या केंद्राची मदत घेत आहेत. सेंटर नगर-मनमाड बायपासवरील निंबळक गावानजीक सुरू आहे. अन्न-पाणी-प्रथमोपचार, रस्त्यांची माहिती  देण्याचे काम तेथे चालते. गिरीश कुलकर्णी, महेश मुळे, राजीव गुजर, अनिल गावडे, दीपक बुरम, दिव्यांग कार्यकर्ते ज्ञानेश्वर गडाख, विष्णू वारकरी, महेश सूर्यवंशी, विशाल अहिरे, योगेश गवळी, विकास रंजना गुलाब, श्याम असावा हे कार्यकर्ते तेथे सतत कार्यमग्न आहेत.
सहा तरुण मजुर उत्तरप्रदेशला दुचाकीवरून निघाले होते. ते आहेत वीस-पंचवीस वर्षांचे. ते म्हणाले, की -‘लॉकडाऊन के पचास दिन बीत गये | हम सब दस लोक 100 स्क्वेअर फूट की खोली मे रहते थे | कोरोना खत्म होने की राह देखते रहे, लेकीन सह नही पाये, कोरोना का भय… तो पुरानी एम.ए.टी. गाडी पर सवार हुये, हम  सब बस्ती जिला उत्तर प्रदेश को जा रहे है | महाराष्ट्र ने आज तक हमे रोटी दियी है | इस कोरोना के हाल मे महाराष्ट्र हमे भूखा नही जाने देगा यह भावना से हम अपने जान पर यह लंबी सवारी कर रहे है |
         
मुंबई-पुणेसह कोकणातील मोठी शहरे, उरण बंदर, उरण बंदर, पश्चिम महाराष्ट्र येथून लाखो परप्रांतीय त्यांच्या राज्यात तिसऱ्या लॉकडाऊनच्या शेवटी माघारी जात आहेत, असे दृश्य होते. एका संध्याकाळी राहत केंद्रावर पायी चालत तब्बल बासष्ट मजूर आले. ते मजूर चाकण व पुणे येथे लेबर काम करणारे होते. त्यातील बहुतांशी मजूर हे पेंटिंगची कामे करणारे लेबर होते. त्यांच्या ठेकेदाराने त्यांना मागील दोन महिन्यांत मजुरी न दिल्याने व पुढील काळ अनिश्चित असल्याने ते रिकाम्या खिशाने पायी निघाले होते. झारखंड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड या राज्यांतील ते मजूर. त्या मजुरांना त्यांचे गाव पायी गाठायचे होते. एवढे मजूर त्यांच्या राज्यांत शेकडो किलोमीटर अंतर पायी कसे जाणार? हा प्रश्न सर्व कार्यकर्त्यांना सतावत होता. मजुरांमध्ये चार जोडपी होती. त्यांतील महिलांची स्थिती पायी चालल्याने दीनवाणी झाली होती. प्रशासन आणि परिवहन, आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून त्या मजुरांसाठी काही करायचे राहत टीमने ठरवले. रात्रभर ते मजूर राहत केंद्रावर झोपले. त्यांची जेवण, संडास-बाथरूम-पाणी यांची व्यवस्था राहत टीमने केली. त्यावेळी त्यांना बस उपलब्ध व्हावी म्हणून प्रशासन व परिवहन विभागातील सर्व अधिकारी यांच्याशी राहत टीम बोलणे करत होती. प्रवासास बस मिळण्यासाठी राहत केंद्रावर मुक्काम करावा लागणार हे मजुरांना समजावण्यात राहतला यश मिळाले. ‘आम्ही पायी जाऊ, अशी बस आम्हाला सहजी मिळणार नाही, आम्हाला चौदा दिवस क्वारंटाइन करतील’ अशी भीती मजुरांची होती. त्या मजुरांतील शिवसागर याच्याशी बोलल्यावर परिस्थिती अत्यंत बिकट आहे हे लक्षात आले. ठेकेदार व कंपनी यांना जरी माणुसकीच्या नात्याने मजुरांना लॉकडाऊन काळातील पगार, मजुरी देण्यास शासनाने सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र मजुरांच्या हाती निराशा आली होती. भूक आणि कोरोना भीती यामुळे आम्ही गावी जात आहोत, असे सर्वांचे म्हणणे होते.
सकाळचा सूर्योदय मात्र त्या मजुरांना बस मिळेल ही आशा घेऊन झाला. सर्वांना चहा- पाणी-अन्न- स्वच्छतागृह- मोबाईल चार्जिंग व्यवस्था मिळाल्याने दमलेले मजूर ऊर्जावान वाटत होते. सर्व मजुरांना स्नेहालय स्कूल बसद्वारे नगरच्या तारकपूर आगारात दहा वाजण्याच्या सुमारास पोचवण्यात आले. तारकपूर आगारात आधीच शेकडो मजूर उभे होते. ते त्यांचे सामान, बायका-लेकरे यांच्यासह उन्हात बसव्यवस्थेकडे डोळे लावून उभे होते. आगारात सतत येणारी गर्दी, कायदेशीर प्रकिया, तपासणी आदी करून करून अधिकारी वर्ग, चालक-वाहक, आरोग्य विभाग अक्षरशः दमून गेला आहे. सर्व मजुरांना आगारात पोचवण्यास स्नेहालय स्कूल बसला तीन चकरा माराव्या लागल्या. सर्व मजुरांना एकत्र सावलीत रांगेत, अंतर ठेवून बसवण्यात आले. प्रक्रियेतील पहिला टप्पा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्पेश सूर्यवंशी यांनी समजावून सांगितला. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जागृती फटांगरे यांनी सर्वांच्या नोंदी नोंदणी पत्रकात घेतल्या. आगारात अन्न-पाणी अशी कोणतीच सोय शक्य नव्हती, त्याचे कारण मजूर संख्या व सुरक्षित अंतर पाळणे. तेव्हा राहत केंद्रातर्फे बिस्किटे-पाणी-भेळभत्ता यांचा स्टॉल स्वतःच्याच गाडीवर लावण्यात आला. बसवाहकांनाही अन्नसाहित्य देण्यात आले.   


आगारात अविनाश मेमाणे, सतीश लोढा, सुनील आहुजा, नागर देवळे येथील तरुण शेतकरी विजय खरपुढे हे स्वखर्चाने बिस्किटे, बालकांना-गर्भवती महिलांना दूध देत होते. आम्ही सर्वजण एकत्र आलो. आमची एकमेकांशी नव्यानेच ओळख होत होती. आपण एकाच बिरादरीतील आहोत अशी भावना आमची झाली. आम्ही सर्वजण एकमेकांना मदत करत मजुरांना वस्तू वाटप करू लागलो. मजुरांना सूचना दिल्या जात होत्या. सर्व मजुरांची नोंदणी पत्रकात झाल्यावर आरोग्य तपासणी करण्यास वाहक देवराम गीते यांनी मजुरांच्या रांगा लावल्या. परिवहन निरीक्षक अविनाश गायकवाड यांनी मजुरांना आम्ही मोफत महाराष्ट्र सीमेपर्यंत सोडत असल्याचे सांगितलेकोणी कोणाला पैसे देऊ नये असेदेखील बजावले. त्यामुळे मजूर आश्वस्त झाल्याचे दिसले. डॉ.सौरभ मीस्सर, डॉ.अमित पालवे, डॉ.शुभांगी सुर्यवंशी यांनी राहत केंद्राद्वारे आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी केली.

परराज्यात जाणाऱ्या मजुरांचे दोन विभाग करण्यात आले. पहिला विभाग छत्तीसगढ-मध्यप्रदेश-झारखंड याकरता दोन बस सोडण्यात आल्या. दुसरा विभाग उत्तर प्रदेश-बिहार-पश्चिम बंगाल याकरता दोन बस सोडण्यात आल्या. सहायक मोटार वाहन निरीक्षक राहुल सरोदे यांनी इतर मजूर आगारातून गोळा करून संख्यापूर्ती केली. प्रत्येक बसमध्ये चोवीस प्रवासी बसवण्यात आले. मध्यप्रदेश-छत्तीसगढ-झारखंडकरता देवरी-नागपूर येथपर्यंत मोफत बस रवाना झाली तर बिहार-पश्चिम बंगाल-उत्तरप्रदेशसाठी शेंदवा (जिल्हा धुळे) येथपर्यंत बस पाठवण्यात आली. मजुरांची एकूण जवळजवळ आठशे किलोमीटरपर्यंतची पायपीट टळली. जाताना बसमध्ये बसलेले सर्व मजूर हात जोडून, डोळे मिटून धन्यवाद देत होते. आम्ही प्रत्येक मजुराला पाणी-भेळभत्ता-बिस्कीट पुडा हातात दिला. जाताना सर्व मजुरांनी जय हिंद, भारत माता की जय आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा मनापासून दिल्या. त्यामुळे आगारातील वातावरण भावुक झाले होते. अधिकारी वर्गआम्ही कार्यकर्ते आमचे डोळे पाणावले. निघालेल्या बसमधून सर्व मजुरांना स्वतःच्या घरातील माणसांना प्रेमाने दाखवतो तसे निरोपाचे हात एकमेकांनी दाखवले. हा कायम मनात राहणारा अनुभव होता.
          राज्यांतर्गत वाहन व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक मजूर अद्याप राज्यातल्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पायीच जात असल्याने टीम राहतने राज्यांतर्गत बसची गरज प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.
– अजित कुलकर्णी  9011020174
———————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here