खलनायक नही, नायक हूँ मै
मी स्वत:ला काही प्रश्न कोठलेही पुस्तक वाचून झाल्यावर विचारतो, की या पुस्तकातून मला काय घेता आले ? या पुस्तकाने मला काय दिले? कधी कधी उत्तर सापडत नाही, पण तरीही त्या पुस्तकाने मनाचा ठाव खोलवर कोठेतरी घेतलेला असतो, ‘रावण – राजा राक्षसांचा’ या लेखक शरद तांदळे यांच्या कादंबरीबाबतही तसेच घडले. मी ती कादंबरी तीन वेळा वाचली, पण ती मला प्रत्येक वेळी नवीनच भासली! सर्व पात्रांची ओळख पुन्हा नव्याने होत गेली. असंख्य जाती-जमाती रावणाच्या साम्राज्यात सुखेनैव नांदत होत्या. त्याने स्वतःची राक्षस संस्कृती उभी केली होती, त्याच्या राज्यात प्रत्येकाला राहण्याचा, स्वतःची जात-धर्म-संस्कृती जपण्याचा, विचार मांडण्याचा हक्क, अधिकार होता. तेथे सर्व तऱ्हेचे स्वातंत्र्य होते. रावण हा मातृभक्त, महान शिवभक्त, आज्ञाधारक शिष्य, विख्यात ज्ञानी पंडित, जबाबदार बंधू, लढाऊ वृत्तीचा जिद्दी योद्धा, प्रेमळ पती, मार्गदर्शक पिता अशा अनेक उपाधींनी बांधला गेलेला, प्रगतिशील विचारांचा कुशल राज्यकर्ता होता. लेखकाने त्याचा दशग्रीव ते ‘रावण – राजा राक्षसांचा’ असा घडलेला वाखाणण्याजोगा प्रवास खुबीने लिहिला आहे. लेखकाने अनेक रूपांत नाविन्याचा शोध घेत रावणाचे व्यक्तिचित्रण केले आहे. कादंबरीकाराने रावणाच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू नव्याने उलगडून, त्याचे रुपडे पालटल्याचे चित्र कादंबरीत सुस्पष्ट शब्दांत अधोरेखित केले आहे.
आजोबा, मामा, आई, मावशी, बंधू, भगिनी यांना आणि साम्राज्यातील जनतेला सुख, समाधान, स्थैर्य देत सोन्याचे घर बांधून देणारा रावण हा एकमेव राजा असेल. ज्या रावणाला दुष्ट, कपटी, खुनशी, पाताळयंत्री या यादीत गणले गेले, त्या यादीतील बहुतांश उपमा कादंबरीकाराने या कादंबरीत खोडून काढल्या आहेत. परिस्थितीच्या फेऱ्यात गुरफटलेले त्याचे जीवन नियतीचे अनेक फटकारे खात होते, ‘रावण – राजा राक्षसांचा’ या कादंबरीत शरद तांदळे या लेखकाच्या लेखणीने त्याच्या आयुष्याचा सारा लेखाजोखाच मांडला आहे. त्यांनी रावणाच्या आयुष्याचे सार मुक्तहस्ताने लिखित करून, त्याच्या वेदनेचा सल भरून काढला आहे. त्याच्या मनातील खंत नव्या स्वरूपात व्यक्त केली आहे. तो अनार्य दासीपुत्र असल्याने आर्य होऊ शकत नाही. त्याच्या बालमनावर स्वतः जन्माला घातलेल्या पोरापेक्षा धर्माला महत्त्व देणाऱ्या धर्मनीतीचा झालेला परिणाम, त्याच्या पदरी कर्तृत्वावर नाही तर कुळावर श्रेष्ठत्व ठरवणाऱ्या लोकांकडून पडलेली उपेक्षा, अवहेलना-अपमान अशांनी बाधित बाल्यावस्थेतून क्रूरतेकडे होऊ घातलेला त्याचा प्रवास लेखकाने कादंबरीत शब्दबद्ध केला आहे. कादंबरी वाचून वाचकाच्या मनात भावभावनांचा कल्लोळ होतो. देवादी देव इंद्रदेवांना बंदिस्त करणारा रावण अनेक ठिकाणी कुतूहल जागे करतो. ‘रक्ष इति राक्षस’ – लोकांचे रक्षण करणारी जमात म्हणजे राक्षस. तो स्वकर्तृत्वाने सोन्याच्या लंकेसारखे बलाढ्य साम्राज्य उभे करून सर्वांना समानता देण्याचे काम करतो, त्यामुळे त्याचे कौतुक वाटते.
रावणासारखा आप्तांवर, बंधूवर निर्व्याज प्रेम करणारा भाऊ असावा, कुंभकर्णासारखा रावणाच्या प्रत्येक निर्णयात पाठराखण करणारा पाठीराखा असावा, पण बिभीषणासारखा निर्वाणीच्या वेळेला साथ सोडणारा घरभेदी कोणालाही असू नये असे अनेक किंतु-परंतु यथामती-यथाशक्ती कादंबरीत वर्णिले गेले आहेत. त्यातील युद्धाचे प्रसंग तर अंगावर शहारे आणतात. ‘मी मरणार नाही’ हे वाक्य तर कायमच प्रेरणा देते, आई कैकसीने दिलेले ध्येय, सुमाली-पौलत्स्य आजोबांनी दाखवलेली प्रकाशाची वाट, प्रहस्तमामाने लढण्याची दिलेली ऊर्मी, भावांचे वैचारिक संभाषण, स्वतःशी संवाद करत खेळलेले बौद्धिक द्वंद्व, ब्रह्मदेवाचे मार्गदर्शन, नारदमुनींचा सल्ला, महादेवांनी दिलेली संघर्ष करण्याची प्रेरणा, पुत्र मेघनादाला स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी स्वतःच्या क्षमतेशी संघर्षास जागे करणारा पित्याचा मुलाशी प्रेरणादायी संवाद… असे असंख्य, उल्हसित करणारे, रोमहर्षक प्रसंग लेखकाने कादंबरीत यथोचित महत्त्वाने रेखाटले आहेत. रावण हा विषय खूपसा उपेक्षित राहिला होता आणि बराचसा अनपेक्षितही होता. पण पुराणात अन्याय झालेल्या रावण या व्यक्तिरेखेला लेखकाच्या विवेकबुद्धीने या कादंबरीत न्याय मिळवून दिला आहे, हीच खरी लेखकाच्या लेखणीची किमया आहे.
नवनिर्मिती ही आनंद देत असते. रावण स्वतःच्या ताकदीच्या जोरावर एवढे मोठे साम्राज्य उभारतो, लंका निर्माण करतो, आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक असलेला रावण हा व्यापारी, व्यावसायिक, दर्शन-राज्यशास्त्र आदी विषयांत पांडित्य मिळवूनही विध्वंसक आणि दुष्ट; तो का? शिवतांडव स्त्रोत्र रचणारा, रुद्रवीणा, बुद्धिबळ, रावणसंहिता, कुमारतंत्र हे तयार करून ज्ञानार्जन साधणारा रावण खलनायक कसा? असे कित्येक निरुत्तरित प्रश्न कादंबरीत उत्तरीत तर होतातच, पण काही प्रश्न रावणाच्या उदार अंत:करणाबद्दल विचार करण्यास भाग पाडतात. जसे, की तो शेवटच्या क्षणी लक्ष्मणाचे शिष्यत्व स्वीकारून त्याला मार्गदर्शनपर संदेश देतो हा रावणाचा विचार वाचकांच्या दृष्टिकोनात नव्याने भर घालतो. काही प्रसंग तर मनाला स्पर्शून अगदी कायमचे राहतात. आईला मारणे हा सर्वात मोठा गुन्हा आणि आईचा शब्द हा राक्षस संस्कृतीतील प्रमाण असेल असा मातृभक्त रावण महादेवाचा निस्सीम भक्त होता, महादेवाच्या भेटीचे कादंबरीतील वर्णन तर पराकोटीचे सुरेख आहे. ते वाचकाला साक्षात महादेव भेटीची अनुभूती देते. ब्रह्मदेवाचा आश्रम, कैलास, निसर्ग यांचे वर्णन तर अप्रतिमच; अगदी खिळवून ठेवणारे आहे. आई कैकसी, आजोबा सुमाली यांच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र मेघनाद याचा डोळ्यांसमोर मृत्यू झाल्याने एका पित्याचे हाल काय होतात ती हळहळ वाचून हृदयाला पीळ पडतो.
‘लंकेत प्रत्येकाला जगण्याचे, धर्माचे, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, तर मग मला माझ्या पतीसोबत सती जायचे आहे. मला मरण्याचे स्वातंत्र्य हवे आहे’ हे सुलोचनेचे वाक्य हादरवून टाकते. अशा प्रसंगांची वर्णने तर वाचकाची मती गुंग करतात. बळीने स्वतःचे राज्य वामनाच्या कपटाला भुलून महान बनण्याच्या अभिलाषेपोटी दान दिले. ‘राजा हा राज्याचा विश्वस्त असतो, मालक नाही’ हे वामनाचे कपट आचार्य शुक्राचार्यांनी बळीला समजावून सांगूनही बळीने ते ऐकले नाही, म्हणून वामनाने त्यांना ‘झारीतील शुक्राचार्य’ म्हटले, तरीही आचार्यांना त्याच नावाने हिणवले जाते.
शरद तांदळे यांच्या चार वर्षांच्या दीर्घ चिंतनातून, गाढ्या अभ्यासातून रावणाला न्याय देणारी ‘रावण – राजा राक्षसांचा’ ही साहित्यकृती निर्माण झाली आहे. तांदळे यांचे हे पहिले-वहिले पुस्तक आहे. रावण खराच राजा होता. मी दसऱ्याच्या रावण दहनात या आधी कधी सहभागी नव्हतो, या पुढेही निश्चित पण विचाराने त्यात सहभागी नसेन; कादंबरीतील प्रसंगांचा लपंडाव विविध अंगांनी, अनेक ढंगांनी मनाला भुरळ घालतो.
रावण – राजा राक्षसांचा
लेखक – शरद तांदळे
मूल्य – 350/-
पृष्ठ संख्या – 432
न्यू एरा पब्लिशिंग हाऊस
शरद तांदळे – 9689934481, tandale.sharad@gmail.com
– रामदास कराड, ramdaskarad72@gmail.com
Last Updated On 22nd Oct 2018
लेखका पेक्ष्या तुमचे कादंबरी…
लेखका पेक्ष्या तुमचे कादंबरी विषयी विश्लेषण खूप आवडले आणि हे विश्लेषण
वाचणाऱ्या प्रत्येकाला कादंबरी वाचायला लावेल यात काहीही शंका नाही.
Ek number book kadhi…
Ek number book kadhli ravnachya bajune vichar navhta kela amhi…
सर आपली समिक्षा वाचली…
सर आपली समिक्षा वाचली. रावणाबद्दलची उत्कंठा वाढली. कादंबरी वाचून झाल्यावर निश्चित अभिप्राय अधोरेखीत करील
तुमचे विश्लेषण वाचून नव्याने…
तुमचे विश्लेषण वाचून नव्याने रामायण रावणलोकांसमोर आले पाहिजे असे वाटते
आतापर्यत रावणाबद्दल माहिती…
आतापर्यत रावणाबद्दल माहिती कोणालाही नव्हती पण शरद तांदळे सरांनी सर्व वाचकांना उपलब्ध करून दिली खुप खुप धन्यवाद
Comments are closed.