रामचंद्र दीक्षितांचा वाडा

0
58
carasole

मंजरथ हे गाव बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गोदावरी व सिंधुफेणा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ते मार्जारतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या गावाचे रामचंद्र दीक्षित. त्यांचा अडीचशे-तीनशे वर्षांचा जुना वाडा मंजरथ येथे उभा आहे!

मंजरथ हे गाव टेकडीवजा थोड्या उंचीवर वसले आहे. गावाची लोकसंख्या तीन-साडेतीन हजार असेल. सतराव्या शतकात जेव्हा वाडा बांधला गेला तेव्हा गावाची लोकसंख्या तीनशेच्या दरम्यान असावी.

रामचंद्र दीक्षितांचा वाडा पूर्वाभिमुखी आहे. त्याला भव्य दरवाजा आहे. दगडी भव्य रेखीव आठ फूट उंच व सहा फूट रुंद अशी चौकट आहे. त्याला घट्टपणे बिलगलेली सागवानी दारे पाहिल्यावर आश्चर्यचकित व्हायला होते! त्यांवरील कोरीव नक्षीकाम हा काष्ठ शिल्पाचा उत्कृष्ट नमुना वाटतो. आठ इंच बाय सहा इंच जाडीचे दार आहे. त्याची कावड खाली व वर दगडी बसवलेली दिसते. दोन्ही बाजूंस लोखंडी साखळ्यांनी दगडी आवटीमध्ये गच्च आवळले आहे. बाजूच्या भूजपट्ट्या व इंदाळे गोलाकार खिळ्यांमध्ये आवळून टाकले आहेत. दाराला मोठा लाकडी आढणा असून बाजूला लाकडी जीभ तिच्या वजनदारपणामुळे घट्ट आवळून बसवली जात असे.

दाराच्या दोहो बाजूंस ढेलजा असून त्याच्यावरील छप्पर जरा पडले असले तरी पाच फूट उंच आणि तीन फूट रुंद असे घोटीव पाषाणाचे जोते उत्तम स्थितीत आहे. जोत्यांच्या बांधकामावर कमळाची चित्रे कोरलेली आहेत. ढेलजांचे ओटे ओलांडले, की आत पाच घडीव दगडांच्या पाय-यांवरून पुढील दालनात प्रवेश होतो.

चौसोपी वाड्याच्या पहिल्या सोप्यात गेल्यावर वाड्याच्या पडिक अवस्था जाणवते. चारी सोप्यांची जोती मजबूत अवस्थेत असून मागील भिंती ब-या अवस्थेत आहे. काही खांब ब-यापैकी दिसतात. दोन दगडी खांब सात फूट उंचीचे असून त्यांची घडण घोटीव, रेखीव आहे. भिंतीच्या बांधकामात दगडावर कोरलेल्या राघू, मैना, हत्ती, घोडे, मोर, सूर्य-चंद्र इत्यादी प्रतिमा पाहून वाड्याचे वैभवशाली स्वरूप लक्षात येते.

पुढे दोन पाय-या उतरल्यावर आतील दालनात जाता येते. त्याखाली तळघरे आहेत. त्याला लादन्या किंवा लक्ष्मी म्हणतात. सर्व लादन्या सुस्थित आहेत. त्यांच्या आकारावरून तत्कालीन धनधान्याने हा वाडा किती समृद्ध असेल हे लक्षात येते. पुढे गेल्यावर चौकात प्रवेश होतो. तेथेही खाली लादन्या किंवा लव्हारे असून चार सोपे पडिक अवस्थेत जे त्यावर उभे आहेत. दक्षिण बाजूस आणि उत्तर दिशेस तळघरे दिसतात.

पाण्याचा हौद आहे. हौदात पाणी बाहेरून येत असावे. मागील बाजूस दिंडी दरवाजा असून तेथे आणखी तळघरे दिसतात. कदाचित गावाचा धान्यसाठा त्या वाड्यात ठेवला असावा – अशी शंका येते. काही ठिकाणी कोनाडे आहेत, ज्यावर दगड ठेवला, की ते बंद असल्याचे दिसतात. पाच फूट रूंदीच्या पांढरमातीच्या भिंती पाहिल्यावर वाड्याच्या भव्यतेची आणि वैभवाची कल्पना येते.

वाडा माळवदी असावा. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पाच पाय-या दिसतात. पुढे स्वयंपाकघर, कमानीत असलेले देवघर दिसते. खोल्यांची दारे, खिडक्या सागवानी लाकडाच्या असून विशेष जाडी असल्यामुळे भक्कमपणा टिकवून आहेत. पोथ्या ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा, भिंतीतून खाली उतरण्याचा मार्ग, मजबूतपणा हे वाड्याचे वैशिष्ट्य आहे. वाड्यात जन्मास आलेल्या रामचंद्र दीक्षिताने प्रतापदुर्गामहात्म्य ग्रंथ लिहिला. ते साता-यास 1749 साली कन्यागत पर्वानिमित्त माहुली येथील संगमावर (कृष्णा आणि वेण्णा) स्नानासाठी गेले होते. त्यांनी महाराणी सकवारबाई यांच्या सांगण्यावरून ‘प्रतापदुर्गामहात्म्य’ या ग्रंथाचे लेखन केले. त्याचा इतिहास

‘इदं प्रतापदुर्गामहात्म्यस्य पुस्तकं शके 1671 शुक्ल अश्विन शु. 1 लिखित रामचंद्र दीक्षित सदाव्रतिना!’ असे तो म्हणतो. ग्रंथात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी नमूद केली आहे. त्याला ती साता-याच्या राजवाड्यात समजली होती. ‘शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया शुभलग्नावर पाचगृह अनुकूल उच्चीने असताना शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्मले.’ 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतारीख कविंद्र परमानंदकृत ‘शिवभारती’ या समकालिन ग्रंथात तसेच जेधे शकावलीत नमूद केली आहे आणि ती अधिकृत मानली जाते. ‘प्रतापदुर्गामहात्म्य’ या ग्रंथातील जन्‍मतारीख हा प्रत्‍यंतर पुरावा ठरतो. हा पोथीग्रंथ मिळाल्यावर त्याचे वाचन केले आणि त्यातून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे दोनशेसाठ वर्षांपूर्वीचे कथन मिळाले. ग्रंथकर्ता कन्यागत पर्वानिमित्त साता-याजवळील माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर स्नानासाठी आला होता. (शके 1671-सन 1749) त्या वेळी साता-यात थोरले शाहुमहाराज राज्य करत होते. त्यांच्या थोरल्या महाराणी सकवारबाई या धर्मप्रवण वृत्तीच्या होत्या. त्यांना रामचंद्र दीक्षित भेटला. त्यांनी त्याला सांगितले, की आमचे आजेसासरे शिवाजी महाराज यांना प्रतापगडाची देवी प्रसन्न होती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात वैभव निर्माण केले. तुम्ही त्या प्रतापगडाच्या दुर्गेचे महात्म्य लिहा. त्याप्रमाणे त्याने सात-यात राहून ‘प्रतापदुर्गामहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला. त्याने अश्विन शुद्ध 1 शके 1671 (ऑक्टोबर 1749) रोजी हा ग्रंथ पूर्ण केला. (प्रस्‍तुत लेखाच्‍या लेखकाने त्‍या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे.)

त्यानंतर त्याने अफझलखान वधाची हकिगत व त्याची वेळ आणि तिथी नमूद केली आहे. ‘शके 1581 विकारी नाम संवत्सराच्या मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवारी सप्तमीला जावळीच्या खो-यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानास प्रतापदुर्गेने दिलेल्या लहानश्या तलवारीने ठार केले.’ तो औरंगजेबाबद्दलही लिहितो. तो रामदासांचाही उल्लेख करतो. रामदासांनी शिवाजी महाराजांना मंत्रोपदेश दिला असे तो म्हणतो. अशा काही ऐतिहासिक घटना रामचंद्र दीक्षिताने लिहिल्या आहेत. त्यामुळे, त्यांच्या ग्रंथाला ऐतिहासिक साधन म्हणून महत्त्व आहे. तो ग्रंथ प्रस्तुत लेखकाने अनुवाद करून प्रसिद्ध केला आहे.

तो वाडा रामचंद्र दीक्षिताला महाराणी सकवारबाई साहेबांकडून इनाम मिळाल्याचे सांगितले जाते. वर वर्णन केलेला एवढा मोठा वाडा सर्वसामान्य माणसाने कसा बांधला? त्यास काहीतरी राजाश्रय मिळाल्याशिवाय ते शक्य नाही. मंजरथ गावी त्याची समाधी आहे. ते घराणे त्या गावात सन्मानाने नांदत आहे. रामचंद्र दीक्षितांचे वंशज बाळकृष्ण नागेश दीक्षित हे मंजरथ गावात राहतात. ते शेती आणि भिक्षुकी व्‍यवसाय करतात. त्‍यांना एक बंधु आहेत. ते माजलगाव येथे राहतात. त्‍यांनी ‘मंजरथ – एक शोध आणि बोध’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यांच्या देवघरात रामचंद्र दीक्षितांचा मुखवटा असून त्याची नित्यपूजा केली जाते. त्यांना रामचंद्र ऊर्फ ‘चतुर्वेदी बुवा’ असे म्हटले जाते. गावात श्री लक्ष्मी-त्रिविक्रमाचे सुंदर असे मंदिर आहे. संगमावर वृक्षरूपाचे मंदिर, रामचंद्र दीक्षित समाधी व इतर अनेक मंदिरे पाहावयास मिळतात.

बाळकृष्‍ण नागेश दीक्षित
8605580912

–   डॉ. सदाशिव शिवदे
(छायाचित्र – सदाशिव शिवदे)

About Post Author

Previous articleबबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा
Next articleमाळवद
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांच्‍या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्‍यांच्‍या लेखनाकरता अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. लेखकाचा दूरध्वनी 9890834410