रानातल्या पाखरांचा चिवचिवाट रोजनिशींतून

_Ranatlya_Pakharancha_2.jpg

नाशेरा हे ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेले आदिवासी गाव. डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेले, एका टेकडीवर आहे. त्या गावात एसटीही जात नाही! गावात कौलारू छोटी छोटी घरे आहेत. गरजेच्या वस्तूंच्या विक्रीचे एखादे दुकान आणि आजुबाजूला थोडीफार शेती व रानच रान!

मी त्या गावात मुख्याध्यापक म्हणून रूजू झालो. प्रथम, मला चिंताच वाटली, कारण तेथे कसे जावे येथपासून प्रश्न होता. पावसाळ्यात तर जाण्यायेण्याचा रस्ता, नदी भरून आल्यामुळे बंद होई. आम्ही शिक्षक सोमवार ते शुक्रवार तेथेच राहत असू. शनिवारी-रविवारी आमच्या आमच्या घरी जात असे.

शाळेतील मुलांना बाहेरच्या जगाविषयी फारशी माहिती नाही. त्यांचे अनुभवविश्व मर्यादित आहे. शिक्षक म्हणून आमचे काम होते, की समोर आलेल्या मुलांना शिक्षित करणे. आम्ही शाळेत लायब्ररी हळुहळू तयार केली. मुलांना पुस्तके वाचण्यास देऊ लागलो. मुलांचा अभ्यास घेताना लक्षात आले, की मुलांना लिहिता-वाचता येत नाही. तेथील बरेच लोक चार महिने कोनगाव-कल्याणच्या बाजूला वीटभट्टीच्या कामावर जातात. ते त्यांच्या मुलांनासुद्धा तेथे सोबत घेऊन जातात. त्यामुळे मुलांना शाळेचे सातत्य राहत नाही व शाळेची तितकी गोडीही लागत नाही. तसेच, इतर मुलेही शाळेत येण्यास जास्त उत्सुक नसत. ती काहीतरी कारणे देऊन शाळा बुडवण्यास बघत. त्यांच्या सबबी बकऱ्या चरायला नेल्या, नदीत आंघोळीला गेलो, कोठे काही काम करण्यास गेलो अशा प्रकारच्या असत. मग आम्ही शिक्षकांनी ठरवले, की मुलांना शाळेविषयी गोडी वाटायला हवी. त्यांना शाळा ही त्यांची  वाटण्यास हवी. आम्ही त्यासाठी मुलांना घेऊन शाळा रंगवली, भिंतींवर विविध चित्रे काढली; मुलांना त्यामध्ये गोडी वाटली. त्यांना फक्त अभ्यास दिला, तर ते काम कंटाळवाणे वाटते. त्यांनी स्वतः जेव्हा शाळेच्या भिंतींवर चित्रे काढली. ती पण ‘छोटा भीम’ वगैरेसारखी त्यांच्या आवडीची कार्टुनस्…  तेव्हा मुलांना खूप गंमत वाटली. मुले शाळेत नियमित येण्यास हळुहळू सुरुवात झाली.

‘भाग्यश्री फांऊडेशन’ने आम्हा शिक्षकांना आमच्या शाळेत रोजनिशी उपक्रम राबवण्याविषयी सुचवले. मुलांनी नियमित काहीतरी लिहावे. त्यांनी त्यांना जास्त काही लिहिता येत नसेल तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींविषयी लिहावे – तो सराव झाला, की मग त्यांना हळुहळू इतर काही लिहिण्यास सांगावे. खरे तर, मुलांनी लिहिण्या-वाचण्याची खूप गरज आहे. त्याशिवाय त्यांना अभ्यासात गोडी कशी निर्माण होणार? पण मुले लिहिण्याचा कंटाळा करतात. त्यांनी त्यांच्या जीवनात रोज घडणाऱ्या गोष्टींविषयी ‘रोजनिशी उपक्रमा’त लिहावे असे अपेक्षित आहे. मुले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती काय काय करतात ते सर्व त्यांनी थोडक्यात लिहायचे होते. त्यामुळे मुले आनंदाने लिहू लागली. आमचाही त्यांच्या जीवनाशी परिचय होऊ लागला.

_Ranatlya_Pakharancha_1.jpgत्यांच्या वह्यांतून आम्हाला कळले, की कोणाला नदीत डुंबायला आवडते, कोणाला टीव्ही बघायला, तर कोणाला चिंचा पाडून खायला! कोणी शेजारच्या मुलाला प्रेमाने खेळवते, तर कोणाची आई अभ्यास कर म्हणून त्याच्या मागे लागते. कधी कधी, मुले शाळा घरची कामे करण्यासाठी बुडवतात! त्यांचे सगळे सगळे जीवन रोजनिशींच्या माध्यमातून आमच्यासमोर उभे राहिले. मुलांना काय आवडते-काय आवडत नाही? ती कशा प्रकारे विचार करतात? हे आम्हाला ‘रोजनिशी उपक्रमा’मुळे समजण्यास सुरुवात झाली. मुले लिहू-वाचू लागली. त्यांना रोज लिहिण्यासाठी काही विषय हवा असतो. त्यामुळे साहजिकच त्यांचे वाचन वाढले. त्यांना वेगवेगळया गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. त्यांना का लिहावे ते आपसूक कळू लागले.

मुख्य म्हणजे, मुले विचार करू लागली. शिक्षण का घ्यावे? ते घेतल्यामुळे त्यांना काय करता येईल? तर त्यांना चांगली नोकरी करता येईल, त्यांचे जीवन नीट जगता येईल, दुसऱ्यांच्या उपयोगी पडता येईल, हे त्यांचे त्यांना कळू लागले. आम्हा शिक्षकांना मुलांच्या भावविश्वाचा परिचय होऊ लागला.

या मुलांनी प्रगती खूप करणे बाकी आहे, पण मला समाधान असे वाटते, की ती प्रगतीच्या मार्गावर चालू तरी लागली आहेत. सर्व शिक्षकांना माझे हे सांगणे आहे, की त्यांच्या विद्यार्थ्यांच्या लिहिण्या-वाचण्याचा पाया हा मजबूत व्हायलाच हवा. त्या पायावर त्यांच्या प्रगत आयुष्याची इमारत उभी राहणार असते. त्यामुळे तेथे दुर्लक्ष करून चालणार नाही. मला ठाऊक आहे, की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बऱ्याच शाळांमधील शिक्षकांचे असे म्हणणे असते, की त्यांच्या शाळांत येणारी कित्येक मुले यांची बोली भाषा व त्यांची शाळांतील भाषा यांत तफावत आहे. त्यामुळे शिक्षकांना त्यांना शिकवताना अडचण येते. त्यामुळेच मुलांना अभ्यासात गोडी वाटत नाही. त्यावर मी त्यांना असे सांगेन, की तुम्ही मुलांना रोज काहीतरी लिहिण्यास द्या. त्यांच्या रोजच्या जीवनाविषयी का असेना. त्यामुळे त्यांना लिखाणाची सवय होईल. सुरुवातीला मुले कंटाळा करतील, पण शिक्षकांनी त्यांचा ध्यास सोडता कामा नये. त्यातून शिक्षकांना त्याचे विद्यार्थी कळतील. मुले विचार करू लागतील आणि त्यातूनच हळुहळू त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होईल.

माझ्या शाळेतील काही मुले – विशाल चौधरी, अजय पारधी, किरण भागडे, प्रविण फासले, रूपाली निरगुडे, पुनम हाडोंगा, चेतन शिंदे, अमृता हाडोंगा, बाळा पारधी, तुषार हाडोंगा या मुलांना चांगल्या प्रकारे लिहिता-वाचता येऊ लागले आहे. मुले स्वतःविषयी विचार रोजच्या लिहिण्यातून करू लागली आहेत. त्यांना अभ्यासाचे महत्त्व हळुहळू कळू लागले आहे. ती अभ्यासाचा कंटाळा करत नाहीत. मुले खूप काही गोष्टी रोजनिशीत लिहितात. त्या वाचताना आश्चर्य वाटते, की त्यांना इतके कसे सुचते? या ‘रानातल्या पाखरां’चा चिवचिवाट वहीवर मुक्तपणे उतरू लागला आहे!

– शंकर अमृता मुकणे

About Post Author

2 COMMENTS

  1. खुपच छान सर एक नवी पिढी…
    खुपच छान सर एक नवी पिढी तुम्ही घडवता आहे अभिनंदन

Comments are closed.