राजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख ! (Rajuri)

-rajuri-heading

राजुरी हे कोरडवाहू गाव आहे. ते पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पूर्वेला आहे. तेथे वार्षिक चारशेपन्नास ते पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. शेती हा तेथील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहे. तेथे खरीप आणि थोडासा रब्बी अशी शेतीपद्धत आहे. राजुरीचे क्षेत्रफळ दोन हजार दोनशे एकसष्ट हेक्टर आणि तेथील लोकसंख्या नऊ हजार चारशेअकरा आहे. कुटुंबाचा गुजारा शेतीतील अपुर्याट उत्पन्नावर होणे शक्यच नाही. गावातील प्रत्येक कुटुंबात मुंबई-पुणे शहरांकडे रोजगार कमावणारे सदस्य आहेत.

गंमत अशी, की गावात राजकीय प्रमुख पक्षांचे अस्तित्व आहे, तरी लोक मोठ्या प्रमाणावर कोणतीही राजकीय निष्ठा कठोर न ठेवता फक्त विकासाला मतदान करतात! सर्व पक्ष गावाच्या विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊन एक भूमिका घेतात. गावाची वैचारिक पार्श्वभूमी अशी, की ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा झाला तरी गावातील सर्व कुळांनी त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर मूळ जमीनमालकाला न्याय्य रक्कम देऊन केल्या; ही फार मोठी गोष्ट आहे!

गावात 1972साली चौऱ्याऐंशी कोटी लिटर क्षमतेचा पहिला पाझरतलाव बांधण्यात आला आणि तेथूनच राजुरीत विकासाच्या गंगेचा उगम झाला. गावात ‘गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था’ 8 मार्च 1976 रोजी स्थापन झाली. तो विकासाचा महत्त्वाचा पैलू ठरला. संस्थेमार्फत सरासरी प्रती दिवस चौतीस ते पस्तीस हजार लिटर दूध संकलन होत असते. ती संस्था ग्रामविकासाचे प्रमुख इंजिन म्हणून नावारूपाला आलेली आहे.

गावाने दुधाबरोबर द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, बाजरी, सोयाबीन, गहू, हरभरा यांसारखे पिके घेत शेतीला जोडधंदा म्हणून कोंबडीपालन, शेळीपालन, फळबाग लागवड, कृषिपर्यटन यांसारख्या क्षेत्रांत प्रगती केली आहे. गावाचे प्रतिदिन सरासरी उत्पन्न एकोणीस लाख सहासष्ट हजार रुपये, तर वार्षिक उत्पन्न एकाहत्तर कोटी शहात्तर लाख रुपयेपर्यंत झाले आहे. राजुरी सुखी-संपन्न गाव म्हणून आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या नावारूपास आले आहे.

काही ठळक वैशिष्ट्यपूर्ण बाबी –

1. प्रतिदिन चौतीस ते पस्तीस हजार लिटर दूध संकलन करणारी गावाची गणेश दूध व्यावसायिक सहकारी संस्था (एक हजार पाचशेपन्नास सभासद)
2. पन्नास हजार लिटर दूध शीतकरण सुविधा.
3. राजुरी दूध या ब्रँडने दुधाचे खाजगी विपणन करून सभासदांच्या दुधास चांगला भाव.
4. तीच संस्था पशू खाद्य, औषध व किराणा माल पुरवठा उपक्रम देखील चालवते.
5. पन्नास टन क्षमतेचा वजन मापक
6. पराशर कृषि पर्यटन केंद्र. त्यास आंतरराष्ट्रीय पर्यटक, चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची भेट.
7. प्राथमिक आरोग्य केंद्र
8. पशुधन आरोग्य सुविधा केंद्र
9. विविध कार्यकारी सोसायटी, पाच पतसंस्था व IDBI आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार
10. ISO प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायत, अंगणवाडी, गणेश दूध संस्था व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
11. डिजिटल सुविधायुक्त विद्या विकास मंदिर माध्यमिक शाळा
-pazar-talaw12. पदवीपर्यंत शिक्षण सुविधा
13. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला निर्यातदार शेतकरी
14. मृदा व जलसंधारण उपचारातून गावातून पावसाच्या पाण्याचा एकही थेंब गावाबाहेर जात नाही.
15. गावात द्राक्ष, डाळिंब यांबरोबर सर्व फळबागा, ऊस व भाजीपाला सिंचन केवळ ठिबक पद्धतीने होते.
16. गावात एकही मोकाट जनावर नाही.
17. गावात गणेश, महादेव, मारुती, दत्त, खंडोबा, विठ्ठल-रखुमाईसारखी अनेक मंदिरे, वार्षिक उत्सव, त्यात तमाशा, कुस्ती स्पर्धा, हरिनाम सप्ताह यांचे आयोजन केले जाते.
18. आरोग्य शिबिरे, पशुधन आरोग्य शिबिरे, कृषी महोत्सव, प्रदर्शन व चर्चासत्रे यांचे आयोजन.
19. कृषी माल विपणनासाठी आठवडी बाजार.
20. प्रशस्त क्रीडांगण, व्यायामशाळा, पाणी शुद्धीकरण इत्यादी सुविधा, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन.
21. गावातील निराधार लोकांना घरपोच निशुल्क भोजन व्यवस्था.
22. स्मशानभूमी, दशक्रिया घाट सुशोभीकरण, नळ पाणीपुरवठा, भूमिगत गटारे, कचरा व्यवस्थापन, गावातील सीमेंट रस्ते या पायाभूत सुविधा आहेत.

गावाच्या विकासात पुढील घटकांचे योगदान मुद्दाम नमूद करता येईल-
1. गावातील प्रगल्भ राजकीय सामंजस्य
2. गावातील परदेश, परगावी असलेले डॉक्टर, इंजिनीयर, वकील, व्यावसायिक व प्रशासकीय अधिकारी हे ग्रामविकासात सतत आर्थिक, आधुनिक तंत्रज्ञान व माहिती यांद्वारे योगदान देत असतात.
3. गावात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या राष्ट्रीय समारंभ दिनी; तसेच, लग्न, दशक्रिया विधी, यात्रा, उत्सव प्रसंगी लोक स्वयंस्फूर्तीने व चढाओढीने शाळा व इतर विकास कामांमध्ये आर्थिक योगदान देतात.
4. मी राज्याच्या कृषी विभागात काम करत असताना कृषी विषयक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. त्यास गावातील शेतकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

-dairy-brand-rajuriगावात कृषी विकासासाठी राबवलेले ठळक उपक्रम —

•    गावातील शेतकऱ्यांची पीकनिहाय गट स्थापना
•    शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना 
•    जैन हिल्स (जळगाव), हिवरे बाजार, राहुरी कृषी विद्यापीठ, दापोली कृषी विद्यापीठ, कृषीप्रदर्शने व प्रयोगशील शेतकऱ्यांकडे चारा विकास कार्यक्रमात दुग्ध व्यवसायिकांना सुधारित मका बियाणे वाटप
•    कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर पाच हजार नऊशेचौऱ्याण्णव पाईपचे वितरण (तीस लाख रुपये किंमतीचे) (जमिनीवरून पाटाद्वारे पाणी वितरणमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय कमी         केला)
•    कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर एक हजार पाचशेपन्नास प्लॅस्टिक क्रेटचे वितरण (तीन लाख दहा हजार रुपये)
•   गावकऱ्यांचा गावातील एकशेब्याण्णव हेक्टर वनक्षेत्र संवर्धनात सक्रिय सहभाग, तेथील मृद व जलव्यवस्थापन कामे पूर्ण.
•    युरोपीय देशांच्या अभ्यास दौऱ्यात तीन शेतकरी सहभागी (शासनाकडून पन्नास टक्क्यांचे एक लाख रुपयेपर्यंत प्रती व्यक्ती अनुदान)
•    महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प अंतर्गत शेतमालासाठी बाजारतळ निर्मिती (अनुदान पंचवीस लाख रुपये)
•    सेंद्रिय शेती, आधुनिक पीक उत्पादन तंत्रज्ञान इत्यादि विषयांवर शेतकरी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन.
•    फळबाग लागवडीसाठी अनुदान, प्रगतिशील शेतकऱ्यांना विविध पारितोषिके
•    ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर.

राज्यात राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, आडगाव, निढळ, टाकेवाडी, वेळू इत्यादी गावांची ओळख तेथील जलसंधारणविषयक कामांमुळे झाली आहे. परंतु भविष्यातील विकासाचे बदलते मापदंड विचारात घेऊन राजुरी गावाने मृदा व जलसंधारणाबरोबर शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, वनसंवर्धन, पर्यावरण आणि आर्थिक उन्नती या बाबींवर भर देऊन ग्रामविकासाचा एक नवीन मापदंड निश्चित केला आहे. मला वाटते, की गावाबाहेरील माझ्यासारखे गावाचे हितचिंतक हे जोपर्यंत नि:स्वार्थीपणे त्यांचे योगदान देत आहेत, तोवरच गावचा विकास शाश्वत होऊ शकतो. जर ग्रामस्थ आणि गावातील राजकीय व्यक्ती यांचा थोडाही व्यक्तिगत स्वार्थ लक्षात आला तर मग मात्र हे सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होऊ शकत नाही.

-ghare-shetkariसर्व शेतकऱ्यांची मुले, निसर्गात वाढलेली. सर्वाना चार भिंतींतील शाळेपेक्षा निसर्गाची शाळा आवडत असे. त्या शाळेतील पशु, पक्षी, वृक्ष, आकाश, माती, पाणी, पिके आणि साधी माणसे यांच्याशी संवाद साधण्यात आणि चिंचा, बोरे, कैऱ्या व ऊस खाण्याची मौज करत जगणे ही आवड असे. त्यावेळी चार भिंतींतील शाळेत जाण्यास कंटाळा येई. शाळेतील शिक्षक मारून, मुटकून शाळेत आणून बसवत. दुपारच्या सुकटीचे आमिष दाखवत. शाळेचा रडत, कढत सुरू झालेला श्रीगणेशा इयत्ता पाचवीत इंग्रजी विषयाचे कापरे भरून अर्धमेला होत असे. त्यापुढे गणित आणि विज्ञान हे विषय जीव काढत. निम्मी अधिक पोरे मग तेथून काढता पाय घेत, शेतीला हातभार लावत. तेव्हा घरचेही ‘बरे झाले पोर हाताखाली औताच्या कामास आले’ याचे समाधान मानत. ते म्हणत ‘शिकूनबी काय मोठा पैका मिळणार आहे’ असा विचार करत. पुढे, सरकलेली साठ-सत्तर टक्के पोरे दहावीत गटांगळ्या खात असत. हिकमती हे शिक्षक सकाळ-संध्याकाळ विना मोबदला मुले पुढे जाण्यासाठी अधिक वेळ शिकवत व कष्ट घेत. माझे शिक्षण त्या वातावरणात होत असताना,१९८५ मध्ये दहावीत प्रथम क्रमांकाने पास झालो. मी गावात दहावीपर्यंतच शाळा असल्याने, पुढील शिक्षणासाठी नातेवाईकांच्या मदतीने पुणे गाठले आणि कृषी पदवी मिळवत ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या माध्यमातून कृषी उपसंचालक वर्ग एक म्हणून निवड झाली. मी राज्यशासनाचा कृषीविभाग 1993ला कृषी विभागात काम करत असताना, माझ्या गावातील शेतीविषयक पाणी व इतर प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती उपयुक्त ठरली. गावातील मंडळी कष्टाला कमी नव्हती, मृदा व जलसंधारण उपचार राबवून गाव पाण्याने स्वयंपूर्ण झाले. द्राक्ष, डाळिंब, ऊस, कांदा, भाजीपाला पिकांची व्यापारी लागवड आणि दूध धंद्याचा जोड व्यवसाय यामुळे गावाची भरभराट झाली. अर्थात गावच्या सकारात्मक मानसिकतेमुळे हे शक्य झाले. शेतीतून समृद्ध गाव उभे करण्याचे स्वप्न साकार झाले.

– विनयकुमार आवटे 9404963870/7741978584

avinaykumar.30@gmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. मी राजुरी गावचा नागरीक याचा…
    मी राजुरी गावचा नागरीक आहे. याचा मला खुप अभिमान आहे. मी विदया विकास मंदिर या विदयालयात शिक्षक म्हणून सेवा करत आहे. राजुरी विकासाची गंगा आहे. आणि तो विकास आम्ही अनुभवत आहोत. माहीतीचे संकलन खुप छान आहे. खुप खुप धन्यवाद.

  2. Excellent village which is…
    Excellent village which is more independent on the earth. Each village should follow this system.

  3. Very nice. It is self…
    Very nice. It is self motivated village to lead the area (region ) from front through action and minimum words. Great.

Comments are closed.