एेतिहासिक वैभवाचे संचित
पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून भारतीय संस्कृतीचे वैभव पाहायला मिळते. दिनकर केळकर यांनी इतिहासाचा व संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन व्हावा आणि पुढील पिढ्यांना त्याचा लाभ घेता यावा, इतिहासाची प्रत्यक्ष वस्तूंतून ओळख व्हावी या दृष्टिकोनातून जुन्या-पुराण्या वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली. त्या प्रयत्नांतून ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ आकारास आले. संग्रहालयात आजमितीला एकवीस हजार प्राचीन वस्तूंचा ठेवा जमा झाला आहे. दिनकर केळकर यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेऊन, चिकाटीने एकेक वस्तू जोडत संग्रहालयाचा डोलारा उभा केला आहे.
पुण्यातील बाजीराव रस्त्यावर सरस्वतीमंदिर आहे. त्याच्या शेजारच्या गल्लीमध्ये केळकर यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव राजा होते. त्याचे आकस्मिक निधन झाले. त्याची स्मृती म्हणून त्या संग्रहालयाला ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ असे नाव दिले गेले. संग्रहालयाची तीन मजली वास्तू उभी आहे. विशेष म्हणजे, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे.
केळकर यांनी १९२० पासून विविध वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांची अडकित्तेवाले-दिवेवाले केळकर अशी ओळख तयार झाली. पत्नी कमलाबाई यांच्यासह त्यांचा वस्तुसंग्रहालयाचा संसारही रूप घेऊ लागला होता. ते संग्रहालयासाठी एखादी वस्तू मिळत आहे असे माहीत झाले, की कसलेही भान न ठेवता ती वस्तू मिळवण्यासाठी झटायचे. कमलाबाई यांनीही त्यांना त्यांच्या अशा धडपडीत मोलाची साथ दिली. त्यांनी प्रसंगी त्यांचे स्वत:चे दागिने विकून त्या बदल्यात तांब्या-पितळ्याची जुनी भांडी विकत घेण्यास केळकर यांना सहकार्य केले. छंद जपण्याच्या वेडेपणात साथ देणाऱ्या कमलाबार्इंमुळे केळकर यांनी संसाराची, तब्येतीची तमा न बाळगता आयुष्यभरासाठी संग्रहालयाचा ध्यास जपला. त्यातूनच एकवीस हजारांहून अधिक वस्तूंचा ठेवा असलेले केळकर संग्रहालय उभे राहिले.
केळकर संग्रहालय पाहण्यासाठी तास-दोन तासांची सवड काढूनच जावे लागते. तेथे दिवे, अडकित्ते, वस्त्रप्रावरणे, दौती-कलमदाने, दरवाजे, स्त्रियांची सौंदर्यप्रसाधने, वाद्ये, शस्त्रास्त्रे, धातूंची भांडी, बैठे खेळ, पेटिंग्ज, कातडी बाहुल्या, लाकडी कोरीवकाम अशा पारंपरिक वस्तूंचा मोठा संग्रह आहे. त्या वस्तूंचे वर्गीकरण करून, तेथील पंधरा दालनांमध्ये त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. ती दालने अशी – १. लाकडी कोरीवकाम व शिल्पे, २. प्रसाधने व गुजरात दालन, ३. भारतीय चित्रकला, ४. दिवे, तांबुल साहित्यमूर्ती, धातूमुर्ती, ५. खेळणी, ६. कपडे, ७. भांडी, ८. शस्त्रे व अस्त्रे, ९. वाद्ये, १०. मस्तानी महाल, ११. हस्तिदंत दालन, १२. दरवाजे विभाग, १३. संदर्भ ग्रंथालय, १४. संरक्षण प्रयोगशाळा, १५. प्रकाशने.
संग्रहालयातील दिव्यांचा विभाग समृद्ध आहे. केळकर यांनी प्रथम दिव्यांचे प्रदर्शन भरवले होते. त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहिल्यानंतर, त्यांना संग्रहालयाची कल्पना सुचली होती. दिव्यांच्या त्या विभागात प्राणी दिवे, पक्षी दिवे, पंचारत्या, उदबत्ती, घरे, कर्पुरारत्या, समया, लामण दिवे, मुघल दिवे पाहायला मिळतात. नेपाळी दिवे विभागात दहाव्या शतकातील ‘सूर्यदिवा’ हा आगळावेगळा, संपूर्ण वर्षाची माहिती देणारा दिवा आहे. त्यावर सात घोडे सात वार, बारा घोडे बारा महिने, तर दिव्यांच्या बारा ज्योती बारा राशी दर्शवतात. दिव्यावरील सूर्यनारायणाच्या पाठीमागील प्रभावळीमधील कळ्या म्हणजे सत्तावीस नक्षत्रे आहेत. त्या संग्रहालयातील आणखी एक आकर्षण म्हणजे मस्तानीमहाल. थोरल्या बाजीरावांनी मस्तानीसाठी महाल बांधला होता. त्यातील दरवाजे, चौकटी, खांब आणून, पूर्वी जसा होता तसाच महाल तेथे उभारला आहे.
संग्रहालयातील गौरवास्पद बाब म्हणजे तेथे असणारी वाद्ये. पन्नालाल घोष यांची बासरी, पु. ल. देशपांडे यांची सारिदा, हिराबाई बडोदेकर यांचे तानपुरे, बडे गुलाम अली खाँ यांची बीन. अशा थोरामोठ्यांचा स्पर्श झालेल्या वाद्यांनी ते दालन समृद्ध झाले आहे.
संग्रहालयात केरळ राज्यातील त्रिपुर येथील सतराव्या शतकातील मोठा दीपस्तंभ आहे. राजीव गांधी यांनी वॉशिंग्टन येथील ‘भारत महोत्सव प्रदर्शना’चे उद्घाटन त्या दीपस्तंभावर दीपप्रज्वलन करून केले होते. त्याचबरोबर गुजरात, दक्षिण भारत, ओरिसा येथील दरवाजे व गुजरातेतील पाटण येथील वैशिष्टयपुर्ण खिडक्या तेथे पाहता येतात. त्याचबरोबर संगमरवरी व कुरूंदाच्या दगडाची सुंदर शिल्पे, तेराव्या व सोळाव्या शतकांतील श्रीविष्णू व सतराव्या शतकातील सूर्याची मुर्ती या गोष्टी विशेष पाहण्याजोग्या आहेत. तेथे असलेली तंजावरमधील रंगीत काचचित्रे भारतीय संस्कृतीच्या कलावैभवाचे दर्शन घडवतात. संग्रहालयात अडीचशे प्रकारची शस्त्रे व अस्त्रे आहेत. सोबत कथा उलगडणाऱ्या चित्रकथी शैलीतील पाच हजार चित्रेही तेथे पाहण्यास मिळतात.
केळकर यांच्या इतिहास व संस्कृती संवर्धनातील भरीव योगदानाबद्दल त्यांना भारत शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. त्यांना पुणे विद्यापीठीतर्फे डी.लिट. पदवीही बहाल करण्यात आली. त्याचबरोबर संग्रहालय क्षेत्रातील विशेष कामगिरीकरता हैदराबादच्या ‘सालारजंग म्युझियम’च्यावतीने दिलेले पहिले सुवर्णपदक, इचलकरंजीच्या ‘फाय फाउंडेशन’चा पुरस्कार, ‘इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे करण्यात आलेला सन्मान, पुणे महानगरपालिकेतर्फे झालेला सत्कार, पश्चिम जर्मनीचा ‘इंडियन सेंटर फॉर एन्करेजिंग एक्सलन्स’ पुरस्कार असे विविध सन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या कार्याची वेळीच दखल न घेतली गेल्याने त्यांना वयाच्या पंचाहत्तरीनंतर पुरस्कार मिळाले. त्यांच्या हयातीत त्यांना ‘त्रिदल संस्थे’चा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला होता, मात्र त्यांचे निधन झाल्याने त्यांना त्या पुरस्काराने मरणोत्तर गौरवण्यात आले.
केळकर यांनी आयुष्यभर वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करता करता कविता करण्याचा छंदही जोपासला. त्यांच्या लेखनामध्ये प्रामुख्याने अज्ञानवाद, अज्ञातवासींची कविता भाग १, २, ३ यांचा उल्लेख करावा लागेल. केळकर यांचे काव्यसंग्रह त्यांच्या काळातील बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट होते. त्याचबरोबर त्यांनी अ.स. गोखले यांचा ‘काहीतरी’ काव्यसंग्रह, भास्करराव तांबे यांची कविता भाग २ चे संकलन, प्र. के. अत्रे लिखित ‘झेंडुची फुले’ या काव्यसंग्रहाचे संपादन-संकलन केले. त्यांनी आधुनिक कवींचा ‘महाराष्ट्र शारदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. तो त्या काळी गाजला होता. केळकर यांनी त्यांच्या काही कवितांमधून त्यांना वस्तू देणाऱ्या दानशूर आणि अज्ञात व्यक्तींचे आभार मानण्याचा प्रयत्न केला आहे.
केळकर यांना संग्रहालयाच्या कामी त्यांची मुलगी रेखा हरी रानडे, ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब केळकर व कुटुंबीयांची विशेष साथ लाभली. केळकर यांनी त्यांचे स्वत:चे आयुष्य संग्रहालय कसे वाढेल, बहरेल, त्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू कशा मिळतील यासाठीच व्यतित केले. त्यांचा मृत्यू १७ एप्रिल १९९० रोजी झाला.
आजमितीला केळकर संग्रहालय पाहण्यासाठी दिवसाला सरासरी तीनशेजण येतात. वर्षाला सव्वा ते दीड लाख लोक त्या संग्रहालयाला भेट देतात. संग्रहालयाची पूर्णवेळ देखभाल केळकर यांचे नातू सुध्नवा रानडे पाहत आहेत. संग्रहालयातील वस्तूंच्या जतनासाठी, विशेष लक्ष पुरवले जाते. रानडे यांनी प्रत्येक वस्तू स्वच्छ पुसून लख्ख ठेवण्यावर आणि एकूणच परिसर स्वच्छ ठेवण्याकडे कटाक्ष ठेवलेला आहे. केळकर यांनी तो अमूल्य संग्रह राष्ट्राची संपत्ती असून, राष्ट्रास अर्पण करावा या भावनेने १९७५ साली महाराष्ट्र शासनास भेट दिला. शासनाकडून त्या संग्रहालयासाठी वार्षिक व्यवस्थापन निधी म्हणून ठरावीक रक्कम मिळते. संग्रहालयात सध्या एकोणीसजणांचा स्टाफ आहे. संग्रहालयाचा एकूण व्याप व त्याच्या देखभालीचा संपूर्ण खर्च पाहता शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही तरीही आपल्या आजोबांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून सुध्नवा रानडे त्या संग्रहालयाचे काम पाहत आहेत. कोणाकडे काही जुन्या, वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा ठेवा असल्यास तो त्या संग्रहालयासाठी दान-देणगी स्वरूपात स्वीकारला जातो.
केळकर संग्रहालयातील वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांना परवानगी दिली जाते. देशी अभ्यासकांबरोबरच इंग्लंड, अमेरिका, जर्मनी या देशांतील अभ्यासकही संग्रहालयाला भेट देतात. संग्रहालयाला अधिक व्यापक स्वरूप देता यावे व त्याचा विकास व्हावा या हेतूने २००० मध्ये बावधन येथे सहा एकर जमीन देऊ केली आहे, मात्र अद्याप संग्रहालयाच्या विकासाचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. नागरिक, विद्यार्थ्यांना इतिहासाच्या, संस्कृतीच्या अमूल्य ठेव्याचा आनंद घेता यावा यासाठी संग्रहालयाचे व्यवस्थापक मंडळ प्रयत्नशील असते.
– धनश्री भावसार
खूप सुंदर माहिती आहे .
खूप सुंदर माहिती आहे .
मी खरोखरच येथे जाऊन हे स्थान
मी खरोखरच येथे जाऊन हे स्थान पाहुन आलो. खरोखरच अप्रतिम आणि अभ्यासजनक वास्तु आहे. डोळ्यावर विश्वास होणार नाही अशी गोष्ट अनुभवायला मिळाली……
Apratim Lekh….jage abhavi…
Apratim Lekh….jage abhavi saglyach vstunche aani tyamagil ghatnanche waranan krta yet nahi….anyatha Kelkar museum wishayi aani tyatil ekunek vastu wishayi lihine aani wachne he aanandadayi tharale aste. ??
आतापर्यंत चार पाच वेळा या…
आतापर्यंत चार पाच वेळा या वास्तूसंग्राहाला भेट दिली आहे. किमान चार तास तरी लागतात सर्व पाहायला. पुण्यातील ही वास्तू अजूनही काही लोकांना माहीत नाही याचं वैष्यम वाटते. अगदी तांदुळावर कोरलेला गणपती सुद्धा पाहिला होता. अक्षरशः भिंगातून बराच वेळ पाहिल्यानंतर दिसायचा. एकंदरीत मस्तच आहे.
Comments are closed.