राजाचे कुर्ले – ऐतिहासिक गाव (Rajache Kurle)

राजाचे कुर्ले हे गाव महादेव डोगररांगांच्या मध्यभागी वसलेले आहे. महादेव डोगररांगा या सह्याद्री डोंगररागांच्या उपरांगा. सातारा राजधानीचे संस्थापक शंभुराजे (प्रथम) हे शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्याच्या अटकेपर्यंत पोचले. त्या शाहू महाराजांच्या कार्यकाळात अनेक सरदार घराणी उदयास आली. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे राजाचे कुर्ले येथील फत्तेसिंह राजेभोसले यांचे घराणे. त्यांच्यामुळे गाव इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे.

राजाचे कुर्ले सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात येते. ‘राजाचे कुर्ले’ कराडपासून बावीस किलोमीटर व साताऱ्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे. ते कराडच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारातील गाव. गावाच्या तिन्ही बाजूंला डोंगर आहेत. मध्यभागी गाव येते. तेथे दुष्काळ पाचवीला पुजलेला. मात्र गावाचा इतिहास तेजस्वी आहे. गावाच्या भोवती तटबंदी आहे. गावात प्रवेश करण्यास मार्ग एकच आहे. शत्रूने गावात प्रवेश कसाही केला तरी परत जाताना तो मुख्य दरवाज्यात अडवला जाईल अशी ती रचना. तुळजाजी भोसले यांनी 1758 मध्ये राजाचे कुर्ले येथे अक्कलकोट येथून गादी स्थापन केली. तेव्हापासून गावाची ओळख ‘राजाचे कुर्ले’ अशी झाली. त्याचा स्वतंत्र संस्थान म्हणूनही लौकिक आहे.

फत्तेसिंह यांचा उल्लेख शाहू महाराजांचे मानसपुत्र म्हणून अनेक ऐतिहासिक पत्रांतून आहे. त्यांच्या घराण्याच्या आठवणी राजाचे कुर्ले या गावी पाहण्यास मिळतात. त्यामधील महत्त्वाची वास्तू म्हणजे राजेभोसले यांचा भुईकोट किल्ला ही (राजवाडा) होय. तो तीन ते चार एकरांत पसरलेला आहे. त्या गावात राजेभोसले यांचे सरदार माने यांचे दगडी वाडे पाहण्यास मिळतात. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले ते वाडे सुस्थितीत आहेत.

गावात इतिहासकालीन गढी आहे. धाकुबाई मंदिराचे बांधकाम फारसे प्राचीन नाही; परंतु मंदिराजवळ जीर्ण स्थितीतील गजलक्ष्मी शिल्प, काही वीरगळ आणि भग्न शिल्पे त्या परिसराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. त्याच मंदिर आवारात सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळला आहे. तो शिलालेख भिंतीत बसवलेला आहे. शिलालेख जीर्ण झालेला असून, कालौघात त्याच्यावर सिमेंट-वाळूचे थर बसल्याने शिलालेखाचा बराचसा भाग अनाकलनीय झाला आहे. ‘जिज्ञासा’च्या सदस्यांनी वेळोवेळी भेट देऊन शिलालेख स्वच्छ केला आहे. संस्थेचे प्राचीन लिपी अभ्यासक धैर्यशील पवार यांना तो शिलालेख आढळून आला आहे. शिलालेखातून साताऱ्याचा सुवर्णकाळ उलगडण्यास मदत होणार आहे.

त्याचे ठसे वेगवेगळी तंत्रे वापरून घेतले आहेत; त्याचबरोबर आधुनिक फोटोग्राफी तंत्राचा वापरही केला आहे. शिलालेखाची लिपी देवनागरी आहे. अक्षरे खूपच खराब झाली आहेत. शिलालेखाची सुरुवात ‘शके 1085 सुभानु नाम संवत्सर’ याने झाली आहे. शिलालेखावर ‘सुवर्ण वृषभ ध्वज, समस्त भुवन आश्रय, श्री पृथ्वी वल्लभ, कालांजरपुरवराधिश्वर या पदव्यांनी वर्णन केलेला कलचुरी चक्रवर्ती भुजबलमल्ल देव म्हणजेच बिज्जलदेव – द्वितीय याचा मांडलिक, महामंडलेश्वर, पंचमहाशब्द प्राप्त, विष्णू वंशोद्भव, जादव नारायण, जादवकुलकमल, विकसित भास्कर या पदव्यांनी गौरवलेला. जे सिंघदेव याने हे भूमिदान दिलेले आहे. ते दान चंद्रग्रहणाच्या दिवशी दिलेले आहे, असा उल्लेख आढळतो.

श्रावण सुरू झाला, की कुर्लेकरांना वेध लागतो तो तिसऱ्या सोमवारचा. शेकडो वर्षांपूर्वीचे गिरिजाशंकराचे मंदिर गावापासून चार किलोमीटरवर आहे. मंदिराचा मुख्य गाभा एकसंध काळ्या पाषाणात घडलेला आहे. त्यावर मनाला मोहून टाकणारे सुंदर असे कोरीव काम आहे. मंडपाला आधार देणारे स्तंभ जणू हसतमुखाने येणाऱ्यांचे स्वागत करतात. त्याशिवाय, गावात धाकुबाईचे व अन्य काही मंदिरे आहेत. हिंदू-मुस्लिम धर्माच्या ऐक्याचे प्रतीक तो बनून गेला आहे. पिरबाबाचा उरूस त्या ठिकाणी भरतो. त्या उत्सवामध्ये हिंदू-मुस्लिम धर्मांतील लोक भावाभावाप्रमाणे सहभागी होतात. गावामधील विविध राजवाडे, पूर्वीची घरे; तसेच, गिरीजाशंकरचे मंदिर हे पाहुण्यांना आर्कषण आहे.

गावात लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास आहे. गावचे मतदार सुमारे दोन हजार सातशेच्या आसपास आहेत. बारा बलुतेदार यांची संख्या भरपूर आहे, पण मुख्य समाज मराठा आहे. गावात साक्षरतेमुळे नोकरवर्ग जास्त आहे.

गावाची रचना ही रेखीव आहे. गावात मुख्य रस्ते रुंद आहेत. गावात जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. तसेच उपरस्ते आहेत. गावाच्या रचनेवर ऐतिहासिक छाप वाटते.

गावची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गावाच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. सध्या गावाला उत्तर व दक्षिण तलाव यांच्यातील पाणीपुरवठा विहिरीद्वारे होतो. त्यासाठी शासनाच्या योजनेची मदत झाली आहे.

गावामध्ये दहावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. तरुणांना पुढील शिक्षणासाठी कराड शहरातील कॉलेजवर अवलंबून राहवे लागते. गावातील पंचवीस-तीस तरूण भारतीय लष्करात सेवा बजावत आहेत. अनेकजण मुंबईपुणे यांसारख्या शहरांत कामानिमित्ताने वास्तव्यास आहेत. काही तरुणांनी शिक्षक, वकील, डॉक्टर, अभियांत्रिकी या क्षेत्रांतही स्वतःचे अस्तित्व तयार केले आहे.

गावाच्या मध्यभागी एक घंटा आहे. तिचा वापर संकटकाळात लोकांना एकत्र येण्यासाठी करतात. गावाच्या प्रवेशद्वाराला सुंदर अशी कमान आहे. गावामध्ये दोन मुख्य राजवाडे आहेत. तसेच, अनेक बुरूज त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत.

गावात तालीम आहे. तरुणवर्ग कुस्तीची आवड जोपासणारा आहे. गावातील कुस्ती परंपरा जुनी आहे. गावातील मल्ल पैलवान बापुसाहेब माने यांनी ‘उपमहाराष्ट्र केसरी’पर्यंत मजल मारली आहे. त्यांचे मार्गदर्शन गावातील तरुणांना होत असते.

गावाने ‘पाणी फाऊंडेशन’ स्पर्धेत भाग घेतला आणि बघता बघता लोकवर्गणीतून दोन कोटी रुपयांची कामे करून दाखवली. त्यामुळे जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र, लोक पावसाची वाट पाहत आहेत. त्या कामासाठी सर्व गाव मतभेद विसरून सलग एक महिना एकत्र काम करत होते. गावात संस्थेचे विवेकानंद वाचनालय ग्रंथालय आहे.

कृष्णात दा जाधव 9028804147, 9730426340, krushnatjadhav3518@gmail.com

 

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.