राजस माळढोक… रेस्ट इन पीस?

0
70
carasole

माळढोक पक्ष्‍याचे नाव पहिल्यांदा कानावरून गेले तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये आणि साप्ताहिकांमध्ये त्याचे ग्लॅमर तयार झाले नव्हते. त्यामुळे ते नाव ऐकले तेव्हा मन कोरे होते. एक तर नाव असे तिरपागडे. चित्र पाहिले तर शहामृगासारखे. महाराष्ट्रातील खेडेगावात ‘ढोक नंबर’चा अर्थ सगळ्यात पाठीमागचा नंबर आणि माळ म्हणजे उघडी, पडीक जमीन. त्यावरून मी अर्थ काढला, की माळावरच्या प्राणी-पक्ष्यांमध्ये ज्याचा विचार कदाचित सगळ्यात शेवटी करतात तो माळढोक. ‘ग्रीन ऑस्कर’ने सन्मानित झालेला माझा जुना मित्र डॉ. प्रमोद पाटील माळढोकचा अभ्यास करत होता. त्याचे सारखे ‘माळढोक, माळढोक’ चालायचे, म्हणून आम्‍ही त्यालाही त्याच नावाने हाक मारायचो. माझे माळढोकविषयीचे अगाध ज्ञान त्याला सांगितल्यावर त्याच्या स्वभावाप्रमाणे तो माझे बौद्धिक घ्यायला बसला आणि माळढोक हळुहळू कळायला लागला. तसेही माळढोकच्या राहण्याच्या म्हणजे अधिवासाच्या कोंडीमुळे तो प्रदर्शनात ठेवण्यापुरताच उरेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हेदेखील समजले.

भारतात दुर्मिळ प्रजातींचे जिवंत ठेवून जतन करण्यापेक्षा पेंढा भरून जतन करण्याला जास्त मार्केट आहे, त्यामुळे माळढोक अजून असेतोवर त्याचे हवे नको समजून घ्यायला पाहिजे.

ढोक म्हणजे बगळा. तो वैशिष्ट्यपूर्ण बगळा माळावर आढळतो म्हणून तो माळढोक. ओसाड आणि निर्जन माळराने ही माळढोकची आवडती जागा. तो एकांतप्रिय असणारा पक्षी आहे. त्याचे शास्त्रीय नाव कोरिओटिस नायग्रिसेप्स. माळढोक राजस, देखणा व डौलदार. तीन-चार फूट उंच. लांबलचक, पांढरीशुभ्र मान, पोटही शुभ्र. पाठ आणि पंख चॉकलेटी. फिकट पिवळसर रंगाचे मजबूत पाय. डोक्यावर काळी पिसे ज्यामुळे ऐटदार टोपी घातल्याचाच भास होतो. खांद्यांवरच्या काळ्या पिसांमध्ये अंधार भरलेल्या आकाशात चांदण्या चमकाव्यात त्याप्रमाणे पांढरे उठून दिसणारे ठिपके असा निसर्गदत्त सौंदर्याने मढलेला माळढोक! १९८० पूर्वी म्हणे भारतातील अकरा राज्यांमध्ये माळढोकचा आढळ होता. जसजशी गंगेकाठची लोकवस्ती वाढत गेली, माळराने घटत गेली तसा माळढोक उत्तरेकडच्या भागातून दिसायचा बंद झाला. १९८० नंतरच्या काळामध्ये डॉ. सलीम अली व डॉ. असद रहमानी यांनी माळढोक पक्ष्याचा सखोल अभ्यास केला. त्या अभ्यासामधून त्यांनी असा निष्कर्ष मांडला, की माळढोकला अन्न मिळवण्यासाठी, प्रजननासाठी, अंडी घालण्यासाठी, पिलांचे संगोपन करण्यासाठी, रातथाऱ्यासाठी; म्हणजेच सर्व गरजांसाठी फक्त आणि फक्त उघड्या गवताळ माळरानांची गरज असते. जर अशी उघडी माळरानं जपली नाहीत तर त्या पक्ष्याचा अधिवास नष्ट होईल. पर्यायाने त्या पक्ष्याची प्रजात नष्ट होण्याची शक्यता आहे. डॉ.सलीम अली व डॉ. असद रहमानी यांच्या सूचनेनुसार काही बदल झाले तरी फक्त सहा राज्यांमध्ये माळढोक उरला आहे आणि त्या सहापैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र! महाराष्ट्राशिवाय राजस्थान (डेझर्ट नॅशनल पार्क, सोंखालिया, सोरसन), मध्यप्रदेश (करेरा, घाटीगाव), कर्नाटक (राणीबेन्नूर), आंध्रप्रदेश (रोलापाडू), गुजराथ (लाला माळढोक अभयारण्य, नलिया) या ठिकाणी माळढोक पक्ष्याला संरक्षण आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर! पण मोराच्या नावाने कोठले अभयारण्य नाही, मात्र सोलापूर-अहमदनगरच्या पट्ट्यात सुमारे ८४९, ६४४ हेक्टर इतक्या क्षेत्रफळातील जमीन १९७९ पासून ‘जवाहरलाल नेहरु माळढोक पक्षी अभयारण्या’साठी संरक्षित केलेली होती. असा हा नशिबवान पक्षी! – पण ही जागा कमी होत होत न्यायालयाच्या आदेशानुसार तीनशे छत्तीस चौरस किलोमीटर इतकीच उरलेली आहे. योग्य नियोजन व संरक्षणाअभावी माळढोकची संख्याही रोडावते आहे. पाऊस कमी झाल्यामुळे सगळेच चिंतेत आहेत. माळढोकच्या आवडत्या माळरानांवरसुद्धा पावसाअभावी गवताची वाढ झालेली नाही. त्यामुळे अर्थातच, किडामुंगी कमी. त्यामुळे त्याच्या अन्नाचे दुर्भीक्ष्य मोठेच आहे!

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे असद रहमानी यांनी माळढोकवर एक प्रबंध लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिले आहे, की माळढोकला प्रादेशिक भाषेत पस्तीस नावे आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळात अनेक ब्रिटिश पक्षीतज्ज्ञांनी माळढोकविषयी लिहून ठेवले आहे. त्या कामाचे महत्त्व एवढे आहे, की एकविसाव्या शतकातही माळढोकच्या अभ्यासाला सुरुवात करताना ब्रिटिश लेखकांनी लिहून ठेवलेल्या बाराखडीपासूनच सुरवात करावी लागते. भारतात वास्तव्य केलेल्या ब्रिटिशांपैकी न्हिगॉर, ब्लॅनफोर्ड, जेर्डान, ह्यूम, बेकर, ब्लिथ, डेव्हिस, इलिऑट अशा अनेक अभ्यासकांनी माळढोकसंदर्भातील रीतसर व शास्त्रीय नोंदी ठेवल्या. त्याच नोंदींवरून ब्रिटिशकालीन भारतात; अगदी पंजाब-सिंधपासून ते दक्षिणेत ;चेन्नईपर्यंत माळढोकचे वास्तव्य असल्याचे समजते व त्या काळी भारतातील माळराने बऱ्याच विस्तृत प्रदेशावर सुस्थितीत असल्याचे देखील कळते. ‘नॅशनल काँग्रेस’चे संस्थापक सर अॅयलन ह्यूम यांचा अंड्यांचा व पक्ष्यांचा संग्रह ब्रिटिश म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. जगभरात माळढोकच्या एकूण बावीस प्रजाती आढळतात. त्यांपैकी एक ‘द ग्रेट इंडियन बस्टर्ड’ म्हणजे भारतात आढळणारा माळढोक. ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक बी.एस. कुलकर्णी (सोलापूर) म्हणतात, ‘‘१९६४ मध्ये मला माळढोकचा परिचय झाला. गॅझेटियर वाचल्यावर या भागात एकेकाळी शंभर माळढोक असल्याची नोंद वाचायला मिळाली. नान्नजला एका वेळेला तीस ते चाळीस माळढोक मला पाहायला मिळाले. या भागातील गावकऱ्यांना हा माळढोक आहे याची माहिती नव्हती. ते त्याला ‘गिधाड’ असे म्हणत होते. या पक्ष्याविषयी अभ्यास वाढवत गेल्यावर त्याचे महत्त्व कळले व नान्नजलादेखील इतर ठिकाणांप्रमाणे अभयारण्य व्हावे असे प्रयत्न केले. सभा-संमेलनात ठराव मांडले, संबंधीत मंत्र्यांना भेटून निवेदने दिली आणि शेवटी निसर्गातील दुर्मिळ ठेवा असलेल्या माळढोक पक्ष्याला आश्रयस्थान मिळवून देऊ शकलो. अभयारण्य मंजूर झाले मात्र माळढोक पक्षी सोलापुरातून हळूहळू नामशेष होण्याची शक्यता आहे. याला माळरान कमी होणे हे कारण आहेच, परंतु आजूबाजूच्या द्राक्षशेती व ऊसाची शेती यासाठी वापरण्यात आलेल्या विषारी द्रव्यांमुळे माळढोकच्या अंड्यांची कवचं पातळ होऊ लागली आहेत. त्यांची मादी एकच अंडे घालत असल्यामुळे आणि ती ते उघड्यावर टाकत असल्यामुळे शिकारी पक्षी आणि प्राणी यांचे ते अंडे भक्ष्य होऊ शकते. माळढोक काय, सर्व निसर्गच मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गविरोधी विकासयोजना आणि धोरणे यांमुळे हळूहळू निसर्गातील प्रत्येक प्रजातीबाबतीत धोक्याची घंटा ऐकू येत आहे. सावध व्हायला हवे!”

महाराष्ट्रामध्ये जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबर हा माळढोकच्या विणीचा काळ. पावसाच्या आगमनाबरोबर अगदी जून सुरू होता होताच नर माळढोक त्यांच्या आवडत्या प्रजननस्थळी पोचतात आणि अन्य माळढोक नरांपासून त्यांची त्यांची  हद्द राखण्यासाठी व माद्यांना आकर्षित करण्यासाठी मोहक नृत्य करतात. त्या वेळेस नर त्याच्या आवडत्या अशा जागी उभा राहतो, की जेथून त्याला त्याच्या संपूर्ण क्षेत्रावर नजर ठेवता येते. नर पक्ष्याला गळ्याखाली एक पिशवी असते, त्यामध्ये हवा भरुन तो ती फुगवतो. अशी हवेने भरलेली पिशवी गळ्याखाली लोंबताना अगदी दुरूनही ओळखू येते. त्या पिशवीतील हवेमध्ये कंपने निर्माण करून नर दूरपर्यंत ऐकू जाईल असा ‘हम्म् हम्म्म् हम्म्म्म् ऽऽऽ’ अशा प्रकारचा थोडा खर्जातील वाटणारा आवाज काढतो. (त्यामुळेच विदर्भात माळढोकला स्थानिक लोक ‘हुऽम’ या नावाने ओळखतात.) तो आवाज एक किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात ऐकू येऊ शकतो. प्रणयाराधनेच्या नृत्यावेळी  माळढोक त्याची शेपटी उलटी करून मानेला टेकवतो. गळ्यातील पिशवी त्यावेळी लोंबत असते. ती स्थिती साधल्यावर गोल गोल फिरत तो हा विशिष्ट आवाज सगळ्या दिशांना पोचवतो. त्या नृत्याची भूल माद्यांना पडतेच. त्या आकर्षित होतात. नृत्य साधारण दहा मिनिटांपासून ते सलग चार तासांपर्यंत चालू शकते अशी नोंद झालेली आहे.

मीलनापश्चात मादी उघड्या खडकाळ माळावर सहसा वर्षातून एक किंवा क्वचित प्रसंगी दोन अंडी घालते. अंडी साधारणत: आकाराने मोराच्या अंड्याएवढी म्हणजे बारा सेंटिमीटरपर्यंत लांबीची असतात. रंग मातकट-हिरवट-राखाडी असतो, त्यावर गडद चट्टे असतात. तो रंग माळाशी एकरूपत्व सांगणारा असतो. त्यामुळे अंडी सुरक्षित राहण्यासही मदत होते. अंडी घालण्यापासून पिलाचे संगोपन करण्यापर्यंत सगळी जबाबदारी मादीचीच. तब्बल सत्तावीस ते तीस दिवसांच्या कालावधीनंतर अंड्यातून पिले बाहेर पडतात. मात्र अंडे उबवण्याच्या दरम्यान मादीला शत्रूंपासून रक्षण करावे लागते. कोल्हा, खोकड, लांडगा, घोरपड, रानमांजर, कावळा, शिकारी पक्षी, भटकी कुत्री, डुकरे व माणसे यांपासून अंड्याला व पुढे पिलालाही धोका असतो. पिलाला उडायला येईपर्यंत आणखी पंच्याहत्तर दिवस पिलांना आईबरोबर फिरावे लागते.

माळढोकसाठी नऊ अभयारण्ये घोषित केली गेली तरी ती तेथील स्थानिक लोकांना विश्वासात न घेता झाली. त्यामुळे जीवनावश्यक कोठलेही नवे उद्योगधंदे उभारताना, शेतीत काही सुधारणा करताना, बारीकसारीक विकसनांना थेट सुप्रीम कोर्टाची परवानगी लागते. ‘कायदेशीर कटकटीं’चा जाच होत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये माळढोक संवर्धनाविषयी तिडीक वाढली. माळढोक संरक्षित माळरानाच्या तुकड्याव्यतिरिक्त खूप मोठ्या भागात फिरत असतो, त्यामुळे लोकसहभागाशिवाय तो वाचणे शक्य नव्हते. लोकांमधील कायद्याची अनाठायी भीती घालवणे, त्यांना माळढोकचे महत्त्व सांगणे, माळरानांविषयी जाणीव निर्माण करणे हे तळापासून करायचे काम आहे. चराऊ रानं कमी झाल्यामुळेही माळढोकच्या अधिवासावरचा ताण बराच वाढला आहे. विकासाचे राजकरण सतत बदलत व विस्तारत राहिल्यामुळे मानवी अन्नसाखळी व परिसंस्थेतला एकेक घटक नाहीसा होत आहे, त्याचे परिणाम कळण्यासाठी योग्य प्रशिक्षण गरजेचे बनले आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अरब देश, युरोप अशा ठिकाणी माळढोकच्या प्रजाती योग्य वेळी केलेल्या प्रयत्नांमुळे वाचल्या आहेत. बंदिस्त प्रजनन करूनही ती प्रजात वाचवता येईल असा एक विचार चालू आहे, पण संशोधक व शास्त्रज्ञांची त्यावर अनेक मतमतांतरे आहेत.

ते सगळे ठीक, पण माळढोक नष्ट झाल्यामुळे किंवा वाचल्यामुळे असा काय फरक पडणार मनुष्याच्या आयुष्यात, हा प्रश्न पडणे अगदी साहजिक वाटले तरी फक्त एक देखणा पक्षी वाचवण्याचा आनंद मिळवायचा आहे  इतकेच आहे का ते?

नक्कीच नाही! माळढोक हा माळरानावर वाढणारा पक्षी. तित्तर, लावे, भोवत्या, शिक्रा, भटतित्तर, होले, चंडोल, बाज, गरुड यांसारखे पक्षी, टोळ, शेणकिडे, ढालकिडे, प्रार्थना किडे, फुलपाखरे यांच्यासारखे अनेक कीटक आणि सारगोटा सरडा, शॅमेलिऑन, सापसुरळी, नाग-धामण, घोरपड असे सरीसृप वंशातील प्राणी, तसेच काळवीट, चिंकारा, लांडगा, कोल्हा, खोकड, ससा, रानउंदिर, जंगली मांजर यांसारखे सस्तन प्राणी हेही प्रामुख्याने माळरानाला पसंती देणारे निसर्गघटक. त्यांचे प्रत्येकाचे जैवसाखळीत, अन्नसाखळीत महत्त्वाचे स्थान आहे. कोणा एकावर जरी प्रजात नष्ट होण्याचे संकट आले तरी हळुहळू ही साखळी सैलावत जायला वेळ लागणार नाही. आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्य खातो ते सगळे धान्य म्हणजे गवताच्या जाती. तृणधान्य! त्या सगळ्या पिकांचा मूळ स्त्रोत म्हणजे माळरानावरचे गवत. रानावनात उपलब्ध होणाऱ्या रानटी स्वरूपातील मूळ जनुकांवरच अन्नधान्य अवलंबून असते. रानावनातील, तसेच माळरानावरील रानटी स्वरूपातील नवनवीन मूळ जनुकांचा संकर करूनच धान्यपिकांची उत्पादकता कायम राखता येते आणि ते धान्यपीक वेगवेगळ्या किडींचा प्रतिकार करू शकेल अशी प्रतिकारक्षमता नैसर्गिकरीत्या त्या पिकांमध्ये निर्माण करता येऊ शकते, पण रानावनातील रानटी स्वरूपातील जनुकांची विविधताच वेगवेगळ्या कारणांनी नष्ट केली तर? हा सर्व भाग लक्षात घेता जैविक विविधता ही जागतिक अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरत आहे. तेव्हा आजच्या जी.एम. व बी.टी. धान्य-फळफळावळांच्या जमान्यामध्ये जनुकांच्या मूळ स्त्रोतांचे संरक्षण म्हणजे माळरानांचे संरक्षण! मुद्याचे बोलायचे तर माळढोकसारख्या पक्ष्यासाठी माळराने वाचवणे म्हणजे पर्यायाने मानवाचा भविष्यकाळ सुरक्षित करण्यासारखेच आहे.

माळराने, सडे आणि देवराया यांचे रक्षण करून जबाबदारी पार पाडणार की माळराने व सड्यावर काही नसतेच, मग अशी पडीक जमीन विकासकामांसाठी वापरली तर काय बिघडले असे म्हणत मानवाचे भविष्य असुरक्षित करणार? कोऱ्या मनाने माळढोक समजून घेताना जो जिव्हाळा तयार होऊन त्याचे स्थान निरखता आले. त्यातून उमगले, की खरेच, भविष्यात पेंढा भरलेला माळढोक खरोखरच परवडणारा नाही!

– सोनाली नवांगुळ

पक्षी निरीक्षक बी.एस. कुलकर्णी – 9850253507
डॉ. प्रमोद पाटील – 8007070001

About Post Author

Previous articleवाडातरचे निसर्गरम्य हनुमान मंदिर
Next articleभुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे
सोनाली नवांगुळ या मुक्त पत्रकार, लेखक व अनुवादक आहेत. त्‍या ‘स्पर्शज्ञान' या ब्रेल पाक्षिकेच्या उपसंपादक म्हणून काम करतात. त्‍या अनेक नियतकालिकांमध्ये आणि साप्ताहिकांमध्ये विविध विषयांवर लेखन करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रिय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद' हे पुस्‍तक 'मेनका प्रकाशना'ने प्रकाशित केले आहे. दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणा-या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर' या नावाने ‘मनोविकास'ने प्रकाशित केला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे याकरता 'मनोविकास' प्रकाशित व कविता महाजन संपादित जी महत्त्वाची पुस्तक मालिका आली त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास' या नावाने मराठीत आणली आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या 'अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद भूषविले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9423808719