राग संगीत हेच भावसंगीत

सर्वसामान्य माणसांच्या मनात गणिताविषयी जशी एक भीती किंवा हवेतर अढी म्हणू तशीच शास्त्रीय संगीताविषयीही असते. हे आपल्याला समजणार नाही अशी एक समजूत असते. अनेकांना ते ऐकायला आवडते पण ‘समजत’ नाही. शास्त्रीय संगीतातले बारकावे समजले तर ते ऐकताना त्याचा आस्वाद अधिक समृद्ध करणारा असेल अशा विचाराने या क्षेत्रातल्या विविध संकल्पना, राग, त्यांचे स्वरूप याविषयी लिहित आहेत तरूण गायक डॉ. सौमित्र कुलकर्णी. त्यांच्या व्यग्र व्यावसायिक दिनक्रमातून आणि रियाज़ातून वेळ काढून ते एकेका रागाचाही परिचय करून देतील.

जाणीव समृद्धीच्या वाटेवर असीम शांततेच्या अनुभवाइतके मोलाचे काहीच नाही. त्या वाटेवर चालताना या सांगीतिक साधनाचा आणि साधनेचे झाले तर साहाय्यच होईल! ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

राग संगीत हेच भावसंगीत

जागतिक संगीताच्या विशाल सागरामध्ये भारतीय संगीताचा तितकाच विशाल प्रवाह एकरूप झाला आहे. भारताच्या किंवा ज्याला हिंदुस्थानी संगीत म्हटले जाते आणि दक्षिण आशियाच्या सांगीतिक प्रवाहाचा जो भाग आहे; त्या भागाचे ‘राग संगीत’ हे भव्य दालन आहे. ही अतिशय वेगळी व विलक्षण संकल्पना हे संपूर्णपणे भारतीय निर्माण आहे.

असे म्हटले जाते की, निसर्गात आढळणाऱ्या विविध नादांमधून संगीतोपयोगी नाद म्हणजे ज्याला आपण सूर अथवा स्वर म्हणतो त्याचा शोध लागला. याच सुरांचा थोड्या बहुत फरकाने सात शुद्ध व पाच विकृत असा बारा स्वरांचा संच तयार झाला.

अत्यंत सर्वसामान्य स्तरावर असे म्हणता येईल की या बारा सुरांची आपापसात केलेली वेगवेगळी जुळणी म्हणजे राग. शास्त्रांमध्ये ‘रंजयति इति राग:’ अशी या संकल्पनेची व्याख्या दिलेली आहे त्याचा सर्वसाधारण अर्थ असा की; ज्या सुरांच्या मेळामधून रंजकता निर्माण होते, त्याला राग म्हणता येईल. त्यामुळे सुरांच्या फक्त गणिती जुळण्या म्हणजे राग, असे नाही ; तर त्यातून रंजकता, म्हणजेच एक ‘मेलडी’ निर्माण व्हावी लागते. मगच ते एक सशक्त राग-रूप म्हणून प्रस्थापित होते. मग साहजिकच असे किती राग आहेत, असा प्रश्न निर्माण होतो.

भरताचे नाट्यशास्त्र, संगीतरत्नाकर, राजतरंगिणी अशा जुन्या ग्रंथांचा अभ्यास केल्यास सहा मुख्य राग व त्यांच्या प्रत्येकी सहा रागिण्या, म्हणजेच सहा राग व छत्तीस रागिण्या अशी सर्वसाधारणपणे नोंद आढळते. कालांतराने त्यात अनेक राग- रागिण्यांची भर पडत गेली आणि अजूनही पडत आहे.

राग हे चैतन्यमय असे जिवंत अस्तित्व आहे, असे अनेक मोठे संगीतकार सांगतात. मला असे वाटते की याचा संबंध निसर्ग आणि त्यात होणारे बदल यांच्याशी असल्यामुळे त्याचा कोठल्याही सजीवावर अत्यंत दीर्घ परिणाम होऊ शकतो. याचे अत्युत्तम उदाहरण म्हणजे पंडित कुमार गंधर्वांनी केलेले ‘गीत वर्षा’, ‘गीत वसंत’ यांसारखे कार्यक्रम की जे ऋतूंमध्ये होणारे नैसर्गिक बदल व त्याचा मानवी जीवनाशी असलेला संबंध विविध शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच लोकसंगीतातील रचनांमधून उलगडून दाखवतात. आपले सूर हे निसर्गातून सापडलेले असल्यामुळे साहजिकच हे राग संगीत हे निसर्गाचे संगीत आहे. म्हणूनच काही राग गायच्या ठरावीक वेळा किंवा ठरावीक ऋतूदेखील आहेत. त्या त्या वेळेला होणारे नैसर्गिक बदल माणसाच्या मानसिक अवस्थेशी त्या त्या रागातल्या सुरांच्या स्वरूपात संवाद साधतात आणि एक वातावरण निर्मिती होते. त्यालाच भावाचे प्रकटीकरण म्हणता येईल. हे संगीत फक्त ऐकण्याचे संगीत नसून ते बहुतांशी अनुभवण्याचे संगीत आहे. यासाठी शास्त्र त्यातल्या तांत्रिक बाबी समजायला हव्यातच असे अजिबात नाही. भावाभिव्यक्ती हा कोठल्याही कलेचा मूळ उद्देश असतो; असे गान सरस्वती किशोरी आमोणकर म्हणतात. त्यामुळेच कुठल्याही भावाशी एकरूप व्हायला त्यामागचे तंत्र समजण्याची गरज नसते. गरज असते ती खुल्या मनाने त्याला सामोरे जाण्याची, ते सुर स्वतःमध्ये सामावून घेण्याची! त्यामुळेच राग संगीताचा मनावर होणारा परिणाम हा दीर्घकालीन असतो. राग संगीत हे कुणा एकाचे असे कधीच नसते. प्रत्येक कलाकाराने गायलेला तोच राग दरवेळी वेगळ्या रूपात समोर येतो आणि वर्षानुवर्षे गायला किंवा वाजवला गेला तरी राग संपत नसतो. उलट नव्या नव्या रूपात प्रकट होत असतो. मियां मल्हार सारखा अतिशय प्रसिद्ध राग पंडित भीमसेन जोशी, विदूषी किशोरी आमोणकर, विदूषी वीणा सहस्रबुद्धे तसेच पंडित जसराज या सर्वांच्या प्रतिभेतून साकारला जाताना, आपल्या निरनिराळ्या छटा दाखवतो व रागाचे असे एक प्रोफाइल श्रोत्यांसमोर उभे राहते. कदाचित यामुळेच हे संगीत अतिशय जिवंत असल्याची जाणीव होते. पळभरासाठी का होईना श्रोता आपली सुखदुःखे विसरून शांत होऊ शकतो. रागाच्या भावाशी कलाकार व श्रोता एकरूप झाल्याने असीम शांतीचा, eternal blissचा अनुभव येतो. म्हणूनच राग संगीत हे अतिशय सुंदर भावसंगीत आहे असे किशोरीताई कायम म्हणत आल्या असाव्यात.

शांतता ही एकच गोष्ट आजच्या काळात तशी दुरापास्त झालेली आहे. शास्त्रीय संगीत किंवा राग संगीत हे निश्चितच ऐकणाऱ्याला अपार शांततेचा अनुभव करून देऊ शकते; पण ऐकणाऱ्याने शांत होण्याची तयारी मात्र दाखवायला हवी.

बडे गुलाम अली खाँ साहेबांनी असे म्हटले होते की प्रत्येक घरात एका व्यक्तीला जर आपले संगीत शिकवले गेले असते तर आज भारताची फाळणी झाली नसती. मी आणि माझ्यासारखे संगीताचे अनेक विद्यार्थी आशा बाळगून आहोत की आपल्या अभिजात संगीताची गोडी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी आणि आजच्या अनिश्चिततेच्या जीवनात दोन क्षण का होईना; त्यांना शांतता लाभावी.

राग संगीताचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने एकेका रागाचा परिचय करून द्यावा, त्याची वैशिष्ट्ये सांगावी, लेखमालेच्या निमित्ताने भारतीय शास्त्रीय संगीताचे आजचे मैफली मधील स्वरूप, तसेच अनेक प्रचलित राग, त्यांचे विविध कलाकारांच्या द्वारे केले गेलेले अविस्मरणीय सादरीकरण, काही किस्से आणि गाणी याबद्दल आपण पुढील काही भागांमध्ये चर्चा करू आणि या रागांशी मैत्री करायचा प्रयत्न करूया. भेटू पुढील भागा मध्ये!

 – डॉ. सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com

About Post Author

12 COMMENTS

  1. किती अभ्यासपूर्ण लेख. रागांची माहिती वाचायला नक्कीच आवडेल.

    धन्यवाद

  2. खूपच छान उपक्रम असणार नक्कीच…!! उत्कंठावर्धक…👍👌

  3. शास्त्रीय संगिताचा परिचय करून देणारी मालिका हा उपक्रम आवडला. ऋता बावडेकर यांचा एकल स्त्रीवरील अनुभवकथनाचा लेखही चांगला आहे.

  4. सौमित्र, तुझ्या व्यग्रतेतही तू जपलेल्या छंदात तू केलेल्या प्रगतीचे खूप कौतुक वाटते. जप हे सारे तुला खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन..! 🎉 🎊👏💐

  5. शास्त्रीय संगीताधारित हा उपक्रम आनंद आणि आल्हाददायक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here