रत्नाकर मतकरींची पुस्तके मुलांना आवडती!

0
29

रत्नाकर मतकरींची पुस्तके मुलांना आवडती!

सुरेंद्र दिघे

मुलांना लिहिण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक, उपजत साहित्यगुणांची जोपासना व्हावी या उद्देशाने ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट दरवर्षी शालेय विद्यार्थ्यासाठी लेखन शिबिर घेत असते. या शिबिरात सुपरिचित लेखक, कवी, तज्ज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना साहित्याच्या विविध अंगांची ओळख करून देतात व त्यांना मार्गदर्शन करतात. संस्थेतर्फे ‘शालेय जिज्ञासा’ हे मुलांनी, मुलांसाठी संपादिलेले वार्षिक नियतकालिक गेली सतरा वर्षे प्रकाशित केले जाते. शालेय वयातील मुलांच्या भावविश्वाला हक्काचे व्यासपीठ मिळावे ही कल्पना या नियतकालिकाच्या मागे आहे. दिनकर गांगल यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाखाली ‘शालेय जिज्ञासा’चा पहिला अंक १९९३ साली प्रथमत: प्रकाशित झाला होता.

रत्नाकर मतकरीया वर्षीचे लेखन शिबिर ७ व ८ ऑगस्ट रोजी मो. ह. विद्यालय, ठाणे येथे मराठी अभ्यास केंद्राच्या सहकार्याने पार पडले. शिबिरात उपस्थित मुलांकडून एक माहितीपत्रिका भरून घेतली होती. या माहितीपत्रिकेत त्यांचा आवडता लेखक/कवी व आवडते पुस्तक आणि दररोज नियमितपणे वाचले जाणारे दैनिक याबद्दल माहिती विचारली होती. दहा शाळांतील सातवी ते नववीतील १४४ मुले शिबिरास उपस्थित होती.

दुस-या दिवशी शाळेप्रमाणे गट करून मुलांशी गप्पा मारताना त्यांच्याकडून त्यांच्या आवडत्या लेखक आणि पुस्तकांबद्दल सविस्तर माहिती घेता आली. सहभागी झालेल्या शाळा या ठाणे शहराच्या वेगवेगळ्या प्रभागातील होत्या. मुले मराठी माध्यमातील असल्यामुळे ऐंशी टक्के मुले ही मध्यम आर्थिक गटातील होती असे म्हणावयास हरकत नाही.

मुलांनी दिलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यावर गमतीदार माहिती उजेडात आली. काही वैशिष्ट्ये:

ग्रंथालये

१.  बहुतांश विद्यार्थी अवांतर वाचनासाठी शाळेच्या ग्रंथालयावर अवलंबून असतात. थोड्या मुलांच्या घरी बाहेरील ग्रंथालयांतील पुस्तके वाचनासाठी आणली जातात. फारच थोडया मुलांच्या घरी स्वत:चा छोटा का होईना पुस्तकसंग्रह आहे.
२.  मुलांना शाळेच्या दिवसांत घरी अवांतर वाचनासाठी वेळ नसतो. अवांतर वाचन सुट्टीतच केले जाते.

३.  एखादे पुस्तक चांगले आहे याची पहिली माहिती वर्गातील मित्र-मैत्रिणींकडून अथवा कुटुंबीयांकडून समजते.

४. शाळेतील शिक्षकांकडून पुस्तकाची माहिती मिळण्याचा अनुभव अपवादत्मकच.

५. शाळेच्या ग्रंथालयांवर सर्वसाधारणपणे विद्यार्थी समाधानी आहेत, (मुले शाळेच्या ग्रंथालयांवर समाधानी आहेत, कारण ते चांगल्या नवीन पुस्तकाबद्दल अज्ञानी असण्याची शक्यता आहे).

६.  शाळांत वाचायला मिळणारा वेळ आणि वितरणाची व्यवस्था यावर विद्यार्थी नाखूश आहेत.
७.  ग्रंथालयांतील चांगली पुस्तके घरी नेण्यास देत नाहीत ही सर्वसाधारण तक्रार.

आवडते पुस्तक

विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या पाच पुस्तकांची नावे लिहिण्यास सांगितली होती. त्यांचा आवडती पुस्तके लिहिण्याचा क्रम हा त्यांच्या पसंतीप्रमाणे होता असे नाही. तरी त्यांनी लिहिलेली सर्वच नावे पहिल्या पसंतीची आहेत असे अध्याहृत धरले आहे.

पु.ल.देशपांडे पु.ल.देशपांडे यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘असा मी असा मी’, ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकांचा समावेश आवडत्या पुस्तकांच्या यादीत होता. रणजित देसाईंची ‘स्वामी’, शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘माझा जन्मठेप’ ही मराठी भाषेतील अभिजात पुस्तके मुलांना आवडलेली आहेत. ज्ञानपीठ विजेते लेखक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांचा समावेश आवडत्या लेखकांत आहे. मराठीतील पहिले वि. वा. शिरवाडकर ज्ञानपीठविजेते वि.स. खांडेकर यांचा उल्लेख फक्त दोन विद्यार्थ्यांनी केला. परंतु या तिन्ही मान्यवरांच्या एकाही पुस्तकाचा उल्लेख मुलांच्या आवडत्या पुस्तकांत नाही! गूढकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचे कथासंग्रह आणि कांदबरी मुलांच्या पसंतीच्या यादीत होते. यामध्ये ‘खेकडा’, ‘गहिरे पाणी’, ‘मध्यरात्रीचे पडघम’, ‘बारा पस्तीस’, ‘बिंदु सरोवर’ इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. ‘राजा शिवछत्रपती’ या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकाला सर्वात जास्त मुलांची पसंती होती.

आवडीच्या पुस्तकांच्या यादीत एकाही कवितासंग्रहाचे नाव नाही, ही समस्त मराठी कवींना अस्वस्थ करणारी गोष्ट आढळून आली. याचप्रमाणे बालसाहित्यकार भा. रा. भागवत, यदुनाथ थत्ते किंवा आजच्या काळातले दिलीप प्रभावळकर यांच्या नावाचा आणि साहित्याचा पण उल्लेख नव्हता.

विंदा करंदीकरगूढकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचे नाव पु.ल. देशपांडे यांच्या खालोखाल आहे. परंतु जर आवडीच्या पुस्तकांची नावे आणि आवडता लेखक यांची सांगड घातली तर रत्नाकर मतकरी यांचे नाव पु.लं.च्या वर जाते. रत्नाकर मतकरी यांच्या कथा आवडतात याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कथा, कांदब-या जे. के. रोलिंगच्या ‘हॅरी पॉटर’च्या फॅण्टसी आणि गूढतेशी जवळीक साधतात, ही माहिती मुलांनी गप्पांच्या ओघात सांगितली.

वि. एस्. खांडेकर‘श्यामची आई’ हे पुस्तक सातवी-आठवीतील विद्यार्थ्यांच्यात अजूनही प्रिय आहे. ‘आम्ही आणि आमचा बाप’ या पुस्तकाचा उल्लेख लक्षणीय संख्येतील विद्यार्थ्यांनी केलेला आहे. याचप्रमाणे ‘बौध्द धर्माची धम्म दिशा’ हे पुस्तक पण आवडत्या पुस्तकांच्या यादीत होते! डॉ. अब्दुल कलामांचे ‘अग्निपंख’ ,सुधा मूर्तीचे ‘वाईज अ‍ॅण्ड अदरवाईज’, वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’, जे. के. रोलिंगची ‘हॅरी पॉटर सीरीज’, ‘तोतोचेन’ अशा इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे मुलांच्या आवडीची आहेत.

आवडता लेखक कवी

आवडत्या लेखकांत इंग्रजी लेखकांचा उल्लेख लक्षणीय आहे. अ‍ॅगाथा ख्रिस्ती, स्टेफनी मेअर, जे. के. रोलिंग, सर ऑर्थर कॉनन डॉयल या लेखकांच्या पुस्तकांची मराठी भाषांतरे उपलब्ध असल्याने लेखक मंडळी मराठी माध्यमाच्या मुलांच्या पसंतीस पात्र झाली आहेत. या सर्व लेखकांच्यात भारतीय असलेला चेतन भगत हा मुलांच्यात प्रिय आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अनेक मुलांनी त्यांची मूळ इंग्रजी पुस्तके वाचली आहेत. चेतन भगतची सरळ, साधी गंमतीशीर भाषा, कथानक आणि विनोद मुलांना भावलेले आहे हे लक्षात येते.

वर्तमानपत्रे

वर्तमानपत्रांचे वाचन जवळजवळ सगळी मुले करत आहेत. त्यांनी ‘आपल्या आवडीच्या वृत्तपत्रां’त सर्व मराठी वृत्तपत्रांना सारखे माप दिले आहे. आवडते वृत्तपत्र व त्यातील आवडते सदर या विषयांचा अभ्यास वेगळ्या प्रकारे, स्वतंत्रपणे करणे गरजेचे आहे.

ही पाहणी शास्त्रोक्त पध्दतीने केलेली नाही. मुळात अशा प्रकारचे सर्वेक्षण करणे हे पूर्वनियोजित नव्हते. मुलांच्या माहितीपत्रकांचे विश्लेषण आणि त्यांच्याशी झालेल्या व्यक्तिगत गप्पांतून काढलेले हे निष्कर्ष आहेत. यामुळे या निर्ष्कषांतून काय बोध घ्यायचा आणि त्यास किती महत्त्व द्यायचे हे विचारपूर्वक ठऱवावे लागेल. पण सूचक माहिती म्हणून या अचानक जमा झालेल्या माहितीचे महत्त्व वाटते.

सुरेंद्र दिघे

कार्यकारी विश्वस्त – जिज्ञासा ट्रस्ट. ठाणे

9820137576

surendradighe@yahoo.com

About Post Author

Previous articleतंत्रज्ञानाने नागरिकांचे बंध तुटतील!
Next articleतमीळ कवी सुब्रमणीयम् भारती
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.