यादवकालीन कचेश्वर मंदिर

_Kacheshwar_Mandir_2.jpg

कोपरगाव बेट भागातील कचेश्वर मंदिर परिसर हा श्री निवृत्तिनाथ व त्यांची बहीण संत मुक्ताबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. निवृत्तिनाथ व मुक्ताबाई प्रत्यक्ष पांडुरंगासह (विठोबा) पुणतांबे येथील योगीराज श्री चांगदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरता बेटातील कचेश्वर मंदिरात माहे पौष मासी पूर्ण एक महिनाभर वास्तव्यास राहिले होते. निवृत्तिनाथ व मुक्ताबाई यांचे आगमन ज्ञानेश्वर व सोपानदेव यांचा समाधी विधी संपल्यानंतर झाले. ते मांडवगण पारनेरमार्गे आले. त्यांचा हेतू गोदास्नान व कचेश्वर दर्शन असा होता. पुढे, त्यांनी माघ मासी चांगदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी म्हणून पुणतांबा गावी प्रयाण केले. ते तो समाधी सोहळा झाल्यावर नेवासा येथे गेले. तसा उल्लेख नामदेव गाथा या ग्रंथातील ओवी नंबर 1138 (पृष्ठ क्रमांक 477 वर) मध्ये आलेला आहे.

चालिले घेवूनी देव ऋषीश्वरा । अवघिया पुढारा गरूडदेव ॥1॥

दिवसानुदिवस चालिले सत्वर । पहावे गोदातीर म्हणोनिया ॥2॥

धन्य गोदातीर धन्य कचेश्वर । जाती ऋषींवर स्नानालागी ॥3॥

सारा पौष मास गेलो कचेश्वरी । नित्य गंगातीरी स्नानसंध्या॥4॥

पाहिला कचेश्वर पाहिली ती गोदा । आली प्रतिपदा माघमास ॥5॥

नामा म्हणे देवा जावे पुण्यस्तंभा । मनोहर जागा सिद्धेश्वर ॥6॥

कचेश्वर मंदिराची देखभाल पुजारी श्री. प्रभाकर जनार्दन क्षीरसागर व काशिनाथ क्षीरसागर करतात. कचेश्वर मंदिरात राहून सेवा करणारी त्यांची पाचवी पिढी सध्या आहे. कचेश्वरांचे मंदिर दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. महाशिवरात्रीला तेथे मोठी जत्रा भरते. गुरू शुक्राचार्य व शिष्य यांची त्या दिवशी वाजतगाजत भेट होते. मंदिराच्या चारीही बाजूंस भिंती असून आवारात ऐसपैस जागा आहे. मंदिरात मुंज, लहान मुलांचे जावळ काढणे, लघुरूद्र असे धार्मिक कार्यक्रम होतात. त्या ठिकाणी मुहूर्त नसतानादेखील विवाह होऊ शकतात.

त्र्यंबकेश्वराचे देवस्थान कचेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असून त्या मंदिराची देखभाल व पूजा यांसाठी इंग्रज राजवटीतून सनदा दिल्या गेलेल्या आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी असून ते घुमटाकार आहे. मंदिरापुढे दगडात कोरीव काम केलेला सभामंडप आहे. त्र्यंबकेश्वराची पिंड ही पाच ते सहा फूट लांबीची आहे.

श्री कचेश्वर देवस्थान (तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर) हे कोकमठाण ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. ते सुस्थितीत आहे. रामजी गुरव यांनी 1229 पासून मंदिर परंपरा, संस्कृती जपली, ती पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे.

_Kacheshwar_Mandir_1jpg.jpgश्री कचेश्वर देवस्थानाची स्थापना यादव राजांच्या काळात झालेली आहे. मोगल बादशहाने हल्ला केल्यानंतर त्यावेळच्या गुरवांनी त्या ठिकाणी मोगलांशी लढा दिला असा इतिहास सांगितला जातो. ब्रिटिश सरकारने जमिनीबाबत सनद 3 डिसेंबर 1861 रोजी दिली. पुजार्यााची सनद वहिवाटदार म्हणून दिनांक 25 ऑक्टोबर 1875 रोजी दिली गेली आहे. देवापुढे भाविकांनी वाहिलेले धान्य, दक्षिणा, पैसाअडका ही बाब गुरवांची खाजगी असल्याने, त्याच्याशी गावकरी वा इतर कोणाचाही संबंध नाही. जिजाबा गुरव यांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूद्ध लढा दिला, त्यासाठी तुरूंगवास भोगला.

भाऊ वल्लभा जिजाबा गुरव आणि पत्नी भिकाबाई गुरव यांनी 1861 मध्ये कायम सनद दिलेली आहे. त्यात नमूद केले आहे, की मंदिराची सेवा, पूजा-अर्चा, आरती, दिवाबत्ती गुरव पुजार्याेने करावी व त्याच्या पत्नीने देवीपुढे स्वच्छता राखावी, सडा-रांगोळी घालावी.

भाऊराव दादा क्षीरसागर, प्रभाकर जनार्दन क्षीरसागर यांच्या नावाची व्यवस्थापक म्हणून नोंद 1952 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पंच कमिटीने केलेली आहे. वसंत नरहरी क्षीरसागर हेही गुरव पुजारी 1952 पासून होऊन गेले. त्यानंतर काशिनाथ ऊर्फ रमेश भाऊराव क्षीरसागर व प्रभाकर जनार्दन क्षीरसागर (मयत) यांचा वारसदार म्हणून मुलगा सुंदर प्रभाकर क्षीरसागर हे गुरव पुजार्‍यांचे काम करत आहेत.

मंदिरासमोर महादेवाची पिंड आहे. तेथे पूर्वी नारायण नागबलीचा विधी केला जात असे. पिंडीजवळ वटवृक्ष आहे. तेथे ग्रहशांती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो. घाटाजवळ गणपती मंदिर आहे, घाट मातीत बांधलेला आहे. भाविकांना राहण्यासाठी खोल्या बांधल्या गेल्या असून, त्यांचे बांधकाम भाविक भक्तांनी केले आहे.

कोकमठाण येथील संत विभूती परमपूज्य रामदासी महाराज यांनी कचेश्वर मंदिराच्या छताचे बांधकाम 1972 मध्ये करून दिले आहे.

– सुंदर प्रभाकर क्षीरसागर

 

About Post Author

1 COMMENT

  1. Bota gav,sangamner ,Dist-…
    Bota gav,sangamner ,Dist- ahmednagar yethe ek kacheshwar Mandir aahe tyachach yancha Kahi sabandh aahe ka?

Comments are closed.