यश आणि सुख

0
35

विश्वास काकडेविश्वास काकडे हे सोलापूरचे. आयआयटीमधून बी.टेक. झाल्यावर, त्यांनी तीन वर्षे आदिवासी विभागात काम केले. त्यानंतर धातुशाळेतील अभियांत्रिकी नोकरी व गेल्या दहा वर्षांपासून कन्सल्टन्सी, असा त्यांचा करिअर ग्राफ आहे. परंतु वाचन आणि भाषण व श्रवण हा त्यांचा गभीररीत्या अनुसरलेला छंद आहे. ते थिंक महाराष्ट्र डॉट कॉमसाठी ‘मूल्यविवेक’ या नावाने लेखन करत आहेत. सद्यकाळात सर्वत्र मूल्यांची पडझड होत आहे, नवीन मूल्यांची प्रस्थापना काळाच्या ओघात होईल असे आपण समजतो, परंतु ती जर समाजात बौद्धिक पातळीवर चर्चा झाली तर… काकडे यांचे लेखन अशा चर्चेस खाद्य पुरवील.

यश आणि सुख

विश्वास काकडे

प्रख्यात विचारवंत एडवर्ड डी बोनो असे म्हणतात,  की यश ही संकल्पना कोणीही चांगल्या रीतीने स्पष्ट केलेली नाही. हे खरे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लेखी यशाची संकल्पना जी असते ती सापेक्ष असते. आर्थिक सुबत्ता, प्रसिध्दी, राजकीय सत्ता, प्रकल्पपूर्ती, सत्यशोधन, संशोधन, मोक्ष-प्राप्ती, उद्दिष्टपूर्ती, निरोगी दीर्घायुष्य, क्लेषदायक किंवा दु:खद परिस्थितीतून मुक्तता यांपैकी एक किंवा एकापेक्षा जास्त प्रकारे यशाची संकल्पना मांडली जाते. नव्वद टक्के व्यक्ती अशा चौकटीत विचार करताना दिसतात.

खरे तर, यशाची कल्पना जरी व्यक्तिसापेक्ष असली तरी त्यातल्या त्यात जवळची व्याख्या म्हणजे तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट साध्य करणे. ही उद्दिष्टे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी असतात. छोटे बालक चॉकलेट किंवा आईस्क्रीमसाठी सोपे काम सहजगत्या पार पाडते. त्याला त्या कामाचा मिळणारा मोबदला त्या क्षणी महत्त्वाचा वाटतो. अशा अनेक प्रसंगांतून त्याची यशाची व सुखाची कल्पना ठरत जाते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती ही, की अशीच परिस्थिती पुढे चालू राहिल्यास त्या मुलाची यशाची संकल्पना बाह्य घटकांवर अवलंबून राहते. केलेल्या कामाबद्दल कोणत्या ना कोणत्या प्रकारचे बक्षीस मिळवणे अशी प्रेरणा दृढ होते. प्रौढ वयात यशस्वी कामाचा मोबदला, शाबासकी, प्रसिध्दी, आर्थिक लाभ, सत्तेचे पद यांपैकी काही असू शकते. साहजिकच, तशी प्रेरणा तयार होते. कालांतराने, ती व्यक्ती असा मोबदला मिळणे यालाच यश असे म्हणू लागते. या प्रकारात, यश हे ‘तुम्ही यशस्वी आहात’ असे सांगणारी व्यक्ती व बाहेरून मिळणारा मोबदला या घटकांवर अवलंबून राहते. बहुतांशी लोक याला यश मानतात व असे यशस्वी होणे म्हणजेच सुख असे मानतात. अशा व्यक्तींना दुस-या व्यक्ती स्वार्थासाठी बनवू किंवा गंडवू शकतात.

काही व्यक्तींना आपण यशस्वी आहोत याची इतर महत्त्वाच्या व्यक्तींकडून खात्री करून घेण्याची गरज असते. असे न घडल्यास, त्या व्यक्ती दु:खी होतात. यामध्ये गल्लत होण्याची शक्यता असते. स्वत:चा अनुभव दुस-याबरोबर शेअर करणे ही सवय चांगली आहे, पण दुस-याकडून स्वत:च्या पात्रतेबद्दल अथवा यशाबद्दल शिक्कामोर्तब करून घेणे हे मानसिक दुबळेपणाचे लक्षण आहे. अशा व्यक्तींची स्वत:ची ओळख करून देण्याची पध्दतही वेगळी असते. स्वत:च्या अचीव्हमेंट्सबद्दल सतत बोलणे, स्वत:च्या मालकीच्या वस्तूंचा उल्लेख करणे व त्या मिरवणे, स्वत:च्या लांबलचक पदव्यांची यादी दर वेळी सांगत राहणे किंवा  तत्सम प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख करून, व्यक्तीला स्वत:ची ओळख यशस्वी म्हणून करून देण्याची मानसिक गरज असते. परंतु समोरच्या व्यक्तीने अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास अशा व्यक्ती दुखावल्या जातात. हीच गोष्ट प्रसिध्दीसाठी सतत हपापलेल्या व्यक्तींच्या बाबतीत घडते. अशा व्यक्ती इतरांकडून मिळणारी मान्यता व प्रसिध्दी यालाच यश मानतात आणि त्यात सुख मानतात.

यशाची कल्पना व पर्यायाने त्यातून मिळणा-या सुखाची कल्पना ही आर्थिक प्राप्तीशी जोडणा-या व्यक्तींची परिस्थिती आणखी निराळी. अशा व्यक्ती महिन्यात कमीत कमी एक लाख किंवा दोन लाख रुपये पगार, मालकीची आलिशान गाडी, राहायला उत्तम घर अशा प्रकारच्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी इतक्या पछाडलेल्या असतात, की त्यासाठी त्या कोणतीही तडजोड करायला किंवा जरूर तर गैरमार्गांचा वापर करायला तयार असतात. अशा व्यक्तींना कामातला आनंद किंवा कामात मिळालेले यश या गोष्टी उपभोगता येत नाहीत.

काही व्यक्ती एखाद्या प्रक्रियेच्या अंतिम उद्दिष्टावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ, परीक्षेमध्ये चांगले यश मिळवणे, औद्योगिक प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे, खेळामध्ये विक्रम करणे किंवा अव्वल दर्जाचे यश प्राप्त करणे… असे अनेक. जागतिक स्पर्धेच्या युगात प्रत्येकाच्या कामाच्या ठिकाणी मर्यादित काळात उद्दिष्ट साध्य करण्याचे बंधन खाजगी उद्योगात आढळते. यामध्ये उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रक्रियेपेक्षा त्याच्या एण्ड-पॉइण्टवर लक्ष केंद्रित होते. यामुळे शारीरिक, मानसिक, बौध्दिक तणाव निर्माण होतात. जेव्हा उद्दिष्ट साध्य होते तेव्हा तणावमुक्तीचे समाधान मिळते. पण ते दुसरे उद्दिष्ट समोर उभे ठाकेपर्यंतच ! कामाच्या प्रक्रियेतला आनंद मिळत नाही.

सर्वात दुर्दैवी व्यक्ती म्हणजे ज्या दुस-या व्यक्तींकडून यशाची कल्पना उसनी आणतात; स्वत:ला सुख त्यातूनच मिळणार आहे असे स्वत:ला पटवतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वत:चा असा गाभा नसतो किंवा त्यांना तो समजलेला नसतो. अशा व्यक्ती कायम मृगजळाच्या मागे धावतात. त्यांना लौकिकार्थाने यश मिळाले तरी त्या कधी ख-या अर्थाने सुखी होत नाहीत.

काहीजणांवर दुस-यांच्या अपेक्षेप्रमाणे आयुष्य जगण्याची पाळी येते. उदाहरणार्थ डॉक्टर व्हायचे नसताना व्हावे लागते अथवा कलाकार व्हायचे असताना बँकेत अधिकारी व्हावे लागते. यामध्ये पालकांची सक्ती किंवा परिस्थितीची गरज म्हणून हे करावे लागत असेलही. अशा व्यक्ती सक्षम असतील तर कोणत्याही क्षेत्रात ब-यापैकी समाधानकारक कार्य करू शकतात. यांपैकी काही सूज्ञ व्यक्ती स्वत:ला आवडतील असे छंद जोपासतात. या व्यक्ती यशस्वी असल्या-नसल्या तरी स्वत: थोड्याफार सुखी असतात.

मनस्वीपणे अथवा स्वत:च्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगणा-यांची त-हाच वेगळी.  कलावंत, शास्त्रज्ञ, साहित्यिक यांच्यापैकी काही व्यक्ती यांत मोडतात. यांतील सक्षम व्यक्ती यशस्वी आणि सुखी, दोन्ही होतात. काही व्यक्तींना आपण मनस्वीपणे जगतो याचाच आनंद असतो – यश मिळो किंवा न मिळो. यांतील काही व्यक्ती व्यावहारिक जगात अयशस्वी ठरतात. मनस्वीपणे जगणा-या व्यक्ती संवेदनाशील असतात व प्रबळ भावनिक प्रेरणेमधून आयुष्य जगत असतात. त्यांच्या आयुष्यात विचारांपेक्षा, उद्दिष्टांपेक्षा स्वत:च्या प्रेरणेला, भावनेला, स्वप्नांना, सृजनशीलतेला महत्त्व जास्त असते किंवा याच गोष्टी मार्गदर्शक असतात. आजच्या काळामध्ये कलावंत, शास्त्रज्ञ, साहित्यिक हे आपापले कार्यक्षेत्र व्यवसाय म्हणून निवडतात व त्याला परिश्रम, नियोजन, धोरण यांची जोड देतात. त्यामुळे ते लौकिकार्थाने यशस्वी होतात व स्वत:ही सुखी होतात.

दु:खातून अथवा संकटातून सुटका मिळवून त्याला सुख मानणा-या व्यक्तींचा एक प्रकार असतो. शारीरिक, मानसिक, व्यावहारिक किंवा तत्सम संकटांतून, अवघड परिस्थितीतून बाहेर पडलो म्हणजे सुखी होऊ असे ब-याच वेळा, ब-याच जणांना वाटते. पण ही मनोवस्था संकटे, दु:ख दूर झाल्यानंतर काही काळ टिकते. कारण परिस्थिती सतत बदलते व अडचणी, प्रश्न हे तर निरंतर असतात. काही जण संकटे टाळण्यासाठी अथवा अपेक्षाभंग टाळण्यासाठी नवीन आव्हाने अथवा जबाबदा-या स्वीकारतच नाहीत व त्यात सूज्ञपणा मानतात.

काही व्यक्तींना आव्हाने स्वीकारून त्यामध्ये असणारी एक्साइटमेंट व नंतरचे उद्दिष्टपूर्तीचे समाधान हाच जगण्याचा मार्ग योग्य वाटतो. गिर्यारोहक अथवा वेगवेगळे विक्रम सातत्याने करत राहणा-या व्यक्ती या प्रकारामध्ये येतात.

काही व्यक्ती सुख आणि प्लेझंट सेन्सेशन किंवा एक्साइटमेण्ट यांमध्ये गल्लत करतात. सतत प्लेझंट सेन्सेशन किंवा एक्साइटमेण्ट हे ब-याच प्रमाणावर मूलत: शारीरिक प्रक्रियांशी संबंधित असते. असे प्लेझंट सेन्सेशन किंवा एक्साइटमेण्ट सातत्याने मिळवण्यासाठी या व्यक्ती सतत संभोगसुख, उत्तेजक द्रव्यांचे सेवन व तत्सम वर्तन यांमध्ये अडकून पडतात. यातून त्यांना बाहेर काढणे  कठीण असते, कारण त्या व्यक्तींचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्याला पोषक अशी मानसिकता व मूल्यव्यवस्था तयार झालेली असतात. त्यांची मानसिकता पूर्णपणे प्लेझंट सेन्सेशन किंवा एक्साइटमेण्ट मिळवण्यावर केंद्रित झालेली असते. या व्यक्ती आयुष्यात सुखी होणे हे त्यांच्यात कसा बदल घडतो यावर अवलंबून असते..

वैयक्तिक पातळीवरच्या यशाचा आणि सुखाचा हा विचार; पण त्याला सामाजिक आयामदेखील आहे. नव्हे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

मनुष्य सामाजिक अस्तित्व जगत असतो. त्याची मानसिकता संस्कृती, धर्म, समाजकारण, राजकारण अशा अनेक घटकांतून घडत असते.

मनुष्याचे आदर्श त्याच्या सुरूवातीच्या वाढीच्या व तरूणपणाच्या काळात (प्रामुख्याने) ठरतात. त्या दृष्टीने त्याच्या आयुष्याची दिशा ठरते व वाटचाल चालू राहते. ज्या व्यक्तींच्या आदर्शांबद्दल गोंधळ असतो त्या व्यक्ती कायम दुस-या व्यक्तींचा सल्ला किंवा मार्गदर्शन मिळवण्याच्या मागे असतात. या व्यक्ती रुढार्थाने (पैसा, प्रसिध्दी इत्यादी) यशस्वी कदाचित होतातही, पण त्यांच्याकडे यश कशाला म्हणायचे याचे पक्के मोजमाप नसल्यामुळे त्या दु:खी राहतात अथवा गोंधळलेल्या राहतात.

व्यक्तीच्या मनात जशी यशाची आदर्श कल्पना असते तशीच आपण काय आहोत हे वास्तवही ती व्यक्ती नाकारू शकत नाही. या दोन प्रवृत्तींमध्ये सतत संघर्ष चालू असतो. हा संघर्ष काही व्यक्तींच्या बाबतीत तीव्र स्वरूप धारण करतो. अशा व्यक्ती स्वत:बद्दल, स्वत:च्या कामगिरीबद्दल कायम नाराज असतात. अब्राहम मास्लोव या तज्ञाने मांडलेल्या तत्त्वाप्रमाणे स्वत:ला योग्य वाटेल अशा पध्दतीप्रमाणे ब-यापैकी जगू शकतात, त्या सुखी होतात. (Self Realization)

‘इन्फोसिस’चे नारायण मूर्तीव्यक्तीसमोरील आदर्शांची संकल्पना आकार घेताना ब-याच गोष्टींचा त्यावर परिणाम होतो. ती व्यक्ती ज्या काळात, ज्या समाजात जगत असते त्या सामाजिक परिस्थितीचा व त्याच्या संगोपनाच्या काळातील कोणत्या घटकांचा त्या व्यक्तीवर प्रभाव आहे यावर ते अवलंबून असते. प्रस्थापितांची संस्कृती ही समाजातील यशाच्या कल्पना ठरवते व पसरवते.बहुतांशी लोक त्यांच्या काळातील, समाजातील प्रस्थापित संस्कृती स्वीकारतात व त्या बरोबर यशाचे मापदंडही स्वीकारतात. याची अनेक उदाहरणे दिसतात.

शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणारे मावळे तयार झाले. म. गांधींच्या चळवळीमुळे देश ढवळून निघाला व अनेक लोकांनी गांधीवाद आदर्श मानला. आजच्या घटकेला चंगळवाद हा आदर्श मानला जातो. वैध-अवैध मार्गाने संपत्ती मिळवणे हेच ध्येय ठरवणारे बरेच तरूण दिसतात. पण अमेरिकेत धनाढ्य बिल गेट्स आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा धर्मादाय कार्यासाठी देणगी म्हणून देतो हे या तरुणांना महत्त्वाचे वाटत नाही. बिल गेट्सचे ध्येय संपत्ती गोळा करणे हे नाही तर काम चांगले करणे, नवीन कल्पना राबवणे हे आहे हे तरूण विसरतात.

‘इन्फोसिस’चे नारायण मूर्ती गरिबीतून कष्ट करून वर आले. यामध्ये तरुणांना त्यांची बुध्दिमत्ता, कष्ट, द्रष्टेपणा हा दिसत नाही, तर ते गरिबीतून बाहेर पडून प्रचंड श्रीमंत झाले हे दिसते! त्यामुळे सामान्य युवक अशाच प्रकारची फक्त श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहतो. ही दिवास्वप्नेच ठरतात.

इतिहासात आल्बर्ट आईनस्टाईन, अब्राहम लिंकन, गांधीजी, डॉ. आंबेडकर या व्यक्ती आदर्श ठरल्या. पण त्या धनाढ्य नव्हत्या. इतकेच काय जे.आर.डी. टाटा यांची वैयक्तिक मालमत्ता त्यांच्याच समूहातील काही व्यक्तींच्या मानाने मामुली होती. पण या सर्व व्यक्ती आदर्शपणे जगल्या म्हणूनच यशस्वी व सुखी ठरल्या.

आता प्रश्न उरतो तो महत्त्वाचा !

ज्या व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीत कायम संघर्षमय आयुष्य घालवले त्या यशस्वी असतील, पण सुखी होत्या का? त्यांना त्रास, दु:ख सहन करावे लागले नाही का? जरूर करावे लागले. यातून वेगळी संकल्पना पुढे येते.

या सर्व व्यक्ती आपापले आयुष्य अर्थपूर्ण पध्दतीने जगल्या. ज्या दु:खाला किंवा सुखाला मूलभूत, महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाचा पाया नाही ते दु:ख व सुख, दोन्ही तात्कालिक व फसवे असतात; आभासात्मक असतात. आयुष्यामध्ये सुखापेक्षा अर्थपूर्णतेला, उदात्त ध्येयांना वाहून घेणे हा यशस्वी होण्याचा खरा मार्ग. चंगळवादी सुखापेक्षा अर्थपूर्ण आयुष्य – संघर्षदेखील आंतरिक समाधान देऊन जातो. काही व्यक्ती सुखापेक्षा मानसिक शांती महत्त्वाची मानतात.

पण मानसिक शांती ही आपल्या नियंत्रणाखाली नाही. दु:ख हे कधी न कधी अनुभवावे लागतेच, किंबहुना काही तत्त्ववेत्ते म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही जर आयुष्यात कधीच दु:खी झाला नसाल तर तुम्ही ख-या अर्थाने जगला नाहीत.

मूलभूत मानवतावादाची तत्त्वे, विवेकपूर्ण आयुष्य व स्वत:च्या पलीकडे जाऊन जगण्याचा प्रयत्न करणे हे आंतरिक समाधान देते आणि त्याला पर्याय नाही.

– विश्वास काकडे

Vishwas1000@gmail.com

भ्रमणध्वनी : 9822509682 /  सोलापूर : 2627324, 2729144

About Post Author

Previous article‘डॉक्टर्स डे’
Next articleकुटुंब रंगलंय नेत्रदानात !
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.