यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय

9
82
carasole

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते श्री. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. सातारा जिल्‍ह्यातील देवराष्ट्र हे एक हजार वस्तीचे खेडे त्‍यांचे जन्‍मस्‍थान. त्यांचे वडील यशवंतराव लहान बालपणी वारले. त्यांच्या आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून घर चालवले. यशवंतराव या पुत्राने खूप शिकावे ही त्या माऊलीची इच्छा. यशवंतरावांनी शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांनी संगीत, भजन-कीर्तन यांचाही स्वाद घेतला; कऱ्हाड येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लोकमान्‍य टिळक, ना. गोखले यांची भाषणे ऐकली. त्यांनी सालसेत असताना सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली. ते येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम. जोशी यांच्यासारखे नेते तेथे होते. तुरुंगामध्ये राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा होत. यशवंतरावांना त्या वयातच विचारवंत, साहित्यिक यांच्या ग्रंथांसंबंधी आकर्षण वाटू लागले. त्यांनी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयामध्ये असताना त्यांचा व्यासंग वाढवला. ना.सी. फडके यांच्यासारखे नामवंत साहित्यिक प्राध्यापक होते. त्यांनी ते बी.ए., एल्.एल्. बी. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत होऊन कार्य केले. त्यांनी १९४७ नंतर मंत्री, मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि वित्तमंत्री ही पदे समर्थपणे सांभाळली. त्यांनी केंद्र सरकारमध्ये पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली कार्य केले. यशवंतराव चव्हाण यांनी २५ नोव्हेंबर १९८४ रोजी जगाचा निरोप घेतला.

यशवंतराव ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळींपासून अलिप्त राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले.

‘यशवंतराव चव्हाण, जडणघडण’ या ग्रंथाचे संपादन अरुण साधू, मधु मंगेश कर्णिक आणि मी पु.द. कोडोलीकर यांनी केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार, मटाचे संपादक द्वा.भ. कर्णिक यांनी यशवंतरावांच्या वैचारिक प्रवासाबद्दल लिहिले आहे. त्यांच्यावर प्रथम गांधीजी, नंतर पं. नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव पडला. मानवेंद्रनाथ रॉय यांचे ग्रंथ वाचल्यानंतर त्यांच्यावर रॉयिस्ट विचारांचाही प्रभाव पडला. त्यांनी अखेर नेहरूंचे विचार स्वीकारले. त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी कठोर टीकेला तोंड द्यावे लागले. अखेर, पंडितजींनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश त्यांच्या हातात ठेवला. त्यांनी त्या संग्रामामध्ये जी मुत्सद्देगिरी, जी शांतवृत्ती प्रकट केली त्याला तोड नाही असे कर्णिक म्हणतात. यशवंतरावांवर फुले, शाहू महाराज यांच्या समाज प्रबोधनाचा प्रभाव होता. म्हणून त्यांनी हे राज्य ‘मराठ्याचे नाही तर मराठी माणसाचे आहे ’ हे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी सहकारी संस्था स्थापन करून विकेंद्रीकरणाला चालना दिली.

म.टा.चे दुसरे संपादक, विचारवंत गोविंद तळवलकर यांनी महाराष्ट्राची सध्याची अवस्था पाहिल्यानंतर यशवंतरावांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाचे सतत स्मरण होते असे सांगून म्हटले आहे, की यशवंतरावांना विचारवंत, साहित्यिक, सर्व क्षेत्रांतील कलाकार यांच्याबद्दल विशेष आदर होता. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा कोल्हापूर येथे भव्य सत्कार झाला. तळवलकर यांनी ‘सुसंस्कारित मराठी नेता’ या शब्दांत यशवंतरावांचा गौरव केला आहे. यशवंतरावांनी खांडेकरांच्या लेखनातील सौंदर्यस्थळावर रसिकतेने भाष्य केले. त्यावेळी खांडेकर म्हणाले, “यशवंतराव राजकारणात नसते तर ते उत्तम साहित्यिक झाले असते.” त्या समारंभाच्या अखेरीस थोर गायिका लता मंगेशकर यांनी ‘मोगरा फुलला’ हे गीत सादर केले. मी स्वत: त्या समारंभास उपस्थित होतो. ना.सी. फडके यांनी त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मवृत्ताबद्दल आणि त्यातील लालित्यपूर्ण भाषेबद्दल यशवंतरावांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. थोर गायक भीमसेन जोशी यांनी यशवंतरावांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती आणि ते मोठमोठ्या गायकांच्या मैफलीमध्ये आनंदाने सहभागी होत. त्यांना ‘जो भजे हरिको सदा | सोई परमपद पावेगा |’ हे भैरवीतील भजन अतिशय आवडत असे. भीमसेन यांना ते त्या भैरवीची फर्माईश करत.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री शरद उपासनी, केंद्रीय गृह सचिव डॉ. माधव गोडबोले आणि केंद्रीय अर्थसचिव सध्या यशवंतराव प्रतिष्ठानचे सचिव श्री शरद काळे या सनदी अधिकाऱ्यांनी यशवंतरावांबद्दल भरभरून लिहिले आहे. शरद उपासनी हे काही वर्षें दिल्ली येथे अर्थखात्याचे सचिव होते. त्यांनी यशवंतरावांच्या कार्याचा उरक, सचिवांशी चर्चा करून निर्णय घेण्याची पद्धत, परदेश दौऱ्यात नाटके पाहणे, विविध विषयांवर ग्रंथखरेदी करण्यामधून त्यांचे व्यक्त होणारे ग्रंथप्रेम, त्यांचा व्यासंग याविषयी लिहिले आहे. माधवराव गोडबोले हे त्यांचे गृहखात्याचे सचिव. गोडबोले हे तर सरदार पटेल यांच्यानंतर देशाला यशवंतरावांच्या रूपाने खंबीर, समस्यांची जाण असणारा नेता लाभला असे म्हणतात. यशवंतरावांनी नक्षलवादी चळवळ, अल्पसंख्याकांचे हित पाहण्याची बुहजन समाजाची जबाबदारी, बेरोजगारांची समस्या, पक्षबदल करणारे ‘आयाराम गयाराम’ अशा प्रश्नांवर लोकसभेत आणि समितीद्वारे जे विचार व्यक्त केले ते त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात. असा दूरदर्शी, परिपक्व विचाराचा नेता भेटणे कठीणच! शरद काळे यांनी यशवंतरावांचा वक्तशीरपणा, टापटीप, व्यासंग, इंग्रजी-मराठी-हिंदी भाषांवरील प्रभुत्व यासंबंधी लिहिले आहे. ते केंद्रीय मंत्री असताना मृणाल गोरे, रांगणेकर यांनी त्यांची गाडी मुंबईत अडवून अन्नधान्याच्या पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त केली. यशवंतरावांनी त्यांची बाजू शांतपणे ऐकून, पुरवठामंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवला. त्यांचा स्वभाव विरोधकांना सन्मानाने वागवण्याचा होता. तो कोणत्याही समस्येला धीरोदात्त वृत्तीने सामोरे जाणारा थोर नेता होता असे काळे गौरवाने लिहितात.

पत्रकार, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी यशवंतरावांमधील नेतृत्वगुणांचे विश्लेषण अभ्यासपूर्ण केले आहे. त्यांनी युद्धशास्त्र आत्मसात केले होते. त्यांना कुसुमाग्रज, सुरेश भट पाठ होते. ते संतांचे अभंग आणि इंग्रजी ग्रंथांतील उद्धृते यांचे दाखले भाषणांत सहजपणे देत. त्यांची अखेर दुर्दैवी ठरली. ते पुण्यात एस.एम. जोशी यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार होते. पण त्याच वेळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना इस्पितळात हलवले गेले. फक्त राजीव गांधी त्यांना भेटले. महाराष्ट्रातील एकही नेता त्यांना भेटला नाही. सौ. वेणुताई गेल्या. त्यानंतर एकाकी अवस्थेत त्यांना मृत्यू आला. त्या महान नेत्याची अखेर ग्रीक शोकांतिकेतील भव्य नायकाप्रमाणे झाली. द्वादशीवार सांगतात, “अधिकाऱ्यांनी त्यांच्यानंतर त्यांचे सामान हलवले. त्यांचे पासबुक सापडले. त्यांच्या हयातीत त्यांनी मागे ठेवलेली रक्कम फक्त छत्तीस हजार रुपये एवढीच होती. त्यांनी त्यांच्या मागे संपत्ती ठेवली नाही. पण एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा स्वत:च्या बुद्धीच्या, कर्तृत्वाच्या बळावर लोकमान्यांच्या नंतरचा महान नेता बनला हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही” असे द्वादशीवार यांनी त्यांचे मत नोदवले आहे.

ग्रंथात ग.दि. माडगुळकर, त्यांचे स्वीय साहाय्यक खांडेकर, सरोजिनी बाबर यांचे लेख आहेत. ते वाचण्यासारखे आहेत. मी स्वत: यशवंतरावांनी संरक्षण, गृहवित्त, परराष्ट्र मंत्री या नात्याने लोकसभेत जी भाषणे केली होती त्याविषयी पन्नास पानांचा दीर्घ लेख लिहिला आहे. त्याकाळी इंग्रजी-हिंदीवर प्रभुत्व असणारे हिरेन मुकर्जी. वाजपेयी, नाथ पै, एस.एम. जोशी, डांगे, मधु लिमये, राम मनोहर लोहिया यांच्यासारखे नेते विरोधी पक्षांत होते. यशवंतरावांनी त्या सर्व खात्यात श्रम करताना त्यांच्यासमोर येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून जी भाषणे लोकसभेत केली ती उद्बोधक आहेत. वाचकांनी हा ग्रंथ मुळातून वाचावा अशी विनंती करतो.

अनघा प्रकाशनचे प्रकाशक विद्या नाले व मुरलीधर नाले यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठावरील यशवंतरावजींचे छायाचित्र आणि रचना सतीश भावसार यांची आहे.

‘यशवंतराव चव्हाण जडणघडण’
संपादन : अरुण साधू, मधु मंगेश कर्णिक, प्रा. पु. द. कोडोलीकर
अनघा प्रकाशन,
पृष्ठे : २६४
मूल्य रुपये ३५०/-

– टिम ‘थिंक महाराष्‍ट्र’

About Post Author

9 COMMENTS

  1. सह्याद्रीच्या कुशीत जन्माला
    सह्याद्रीच्या कुशीत जन्माला येवून आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने हिमालयाची उंची गाठलेले व्यक्तिमत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला आणि महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रगतीशील करण्यासाठी जो पाया तयार केला तो अतुलनिय आहे.
    सदर ग्रंथपरिचय लेखातून एक सामान्य व्यक्ती ते प्रगल्भ राजकीय नेता हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सारांशपणे अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडला आहे.

  2. Balvayat Karmavir Bhurao ;
    Balvayat Karmavir Bhurao ; Yashavantrao dwayinchi thoravi kanavar padat aali aahe. Satara bhagati yuvakana tyancha Aadarsh vatayacha.Lekh paripurna.

  3. यशवंतराव चव्हाण यांना आमचे
    यशवंतराव चव्हाण यांना आमचे मित्र अंकुश मोहिते याने 1982 साली साहेबांचे कृष्णकाट वाचून पत्र लिहिले आणि त्याला उत्तर आले की साताऱ्यात आल्यानंतर भेट सदर भेट झाली की नाही माहित
    मला एक विनंती करायची आहे की सदर मित्राची नि आमची भेट घडवून आणावी

  4. यशवंतराव चव्हाणांसारखा…
    यशवंतराव चव्हाणांसारखा प्रामाणीक, सुसंस्कृत, अभ्यासु नेता होणे नाही. यशवंतराव च०हाण साहेबांनी महाराष्ट्राला नवी दिशा देण्याच काम केल आहे. महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वाला वाव देण्याची चव्हाण साहेबांची नेहमीच आग्रहाची भुमिका राहिलेली आहे. त्यामुळेच शरद पवारांसारखं नेतृत्व तयार झालं आहे.आणी हीच भुमिका आदरणीय शरद पवार साहेबांची राहीलेली आहे. त्यातुनच स्व. आर.आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार हे उभरत नेतृत्व उदयास येत आहे

  5. मा.यशवंतराव चव्हाण यांच्या…
    मा.यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा कर्तृत्वान मराठी नेता मराठी ,हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, उत्तम संसदपटू भारताचे उपपंतप्रधान, ग्र्ह, वित्त व संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री असा लोकप्रिय नेता -मानाचा मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here