यवतमाळचे सर्पमित्र श्याम जोशी

0
53

श्याम गोविंदराव जोशी म्हणजे यवतमाळमधील विशेष व्यक्ती आहेत. ते वयाच्या चौदाव्या वर्षांपासून सेहेचाळीस वर्षें सर्पांच्या राज्यात रमून गेले आहेत. जिल्ह्यात कोठेही साप निघाला तर ते बोलावल्या जागी जाऊन पोचतात. ते किंवा त्यांचे सहकारी यांच्या बरोबर सापाला पकडण्याची सगळी साधने हमखास असतात. ते विषारी किंवा बिनविषारी सापाला पकडून त्याला जंगलात सोडण्याचे काम करतात. यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात नाना प्रकारचे साप आहेत. श्याम यांच्या या छंदाची सुरूवात अशी झाली, की श्याम शाळेत असताना यवतमाळात रामभाऊ देशपांडे नावाचे गृहस्थ साप मारण्यात प्रवीण होते. ते श्यामच्या घराजवळच्या झाडीत साप मारण्यास आले होते. देशपांडे साप मारत असताना श्यामने त्यांचे धोतर ओढले. तो म्हणाला, ‘सापाला मारू नका.’ तो त्याचा सहजोद्गार होता. तेव्हा रामभाऊंनी त्याला बाजूला ढकलले. शाळकरी श्याम पडला. रामभाऊंनी सापाला मारल्यावर त्याचा दहनविधी केला गेला. एका संस्थेने सगळ्यांना चहापाणी दिले. तेव्हा श्यामने ठरवले, की सापाला मारायचे नाही; तसेच, यवतमाळात एकही मृत साप दिसता कामा नये.

पुढे, त्याच्या मनासारखे झाले. सरकारने 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सापाला मारणे, बंदिस्त करणे, प्रयोगशाळेत विनापरवाना ठेवणे, त्याचे विष काढणे, त्याची कातडी काढणे, सापाचा खेळ करणे इत्यादी बाबींवर बंदी आहे. त्या कायद्याचे उल्लंघन केल्यास कमीत कमी तीन ते सात वर्षांपर्यंत कैद व पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

श्याम यांचे शालेय शिक्षणात लक्ष नव्हते. त्यांना लहानपणापासून खोलीबंद शाळेचा तिटकारा होता. त्यांना इंजिनीयरींग वगैरे काही शिकायचे नव्हते. ते म्हणतात, “इंजिनीयर झालेल्या मुलांना सायकलची चैनसुद्धा बसवता येत नाही, की पाण्याच्या बिघडलेल्या नळाला वायसर बसवता येत नाही”. म्हणून ते इंजिनीयरिंगच्या शिक्षणाकडे वळले नाहीत. पण त्यांना शेती, सुतारकाम, गवंडीकाम, प्लंबिंग, वायरमनचे काम अशा अनेक गोष्टी आवडत व त्या त्यांना सहज शिकता शिकता अवगत झाल्या. वडिलांनी मुलाचा कल पाहून त्याला मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पाठवले. तेथे त्यांना चांगले शिक्षक मिळाले व तेथून ते उत्तम रीतीने पास होऊन यवतमाळला परतले. त्यांना एका शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी मिळाली. ती त्यांनी निवृत्त होईपर्यंत केली. त्यांनी त्यांच्या माध्यमातून मुलांना जीवनात उपयोगी पडतील अशा कला शिकवल्या.

श्याम जोशी यांनी बावीस वर्षांपूर्वी, 1997 साली ‘कोब्रा अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड नेचर क्लब’ स्थापन केला. तो रजिस्टर केलेला आहे. श्याम जोशी त्या संस्थेचे सचिव असून ती संस्था वन्यजीव रक्षक म्हणून सरकारमान्य आहे. तिचे एकतीस अधिकृत सभासद आहेत. तसेच, त्यांनी शंभर मुलांना साप पकडण्याचे तंत्र शिकवले आहे.

त्यांनी स्वत:च्या मुलांनाही साप पकडण्याचे कसब शिकवले. मुले लहान असताना, ती गळ्यात बिनविषारी साप घेऊन खेळायची, जोशी यांनी ‘वनसंपदा’ नावाचे मासिक दहा वर्षांपूर्वी काही वर्षें चालवले. त्यात ते दरवेळी ‘साप पकडताना काय घडले’ हा लेख लिहीत. त्यांचे सापांविषयीचे सदर ‘लोकमत’मध्ये दीड वर्षे दर रविवारी 2008 सालापासून येत होते. यवतमाळात अनेक सर्पमित्र असल्याचे ते सांगतात. ते बजावतात, साप निघाल्यास एकाच व्यक्तीला फोन करावा. दोनचार जणांना फोन केल्यास सगळ्यांना स्कूटर घेऊन निघावे लागते. सर्पमित्रांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा पगार दिला जात नाही. तरी त्या सर्पमित्राला जाण्यायेण्यासाठी पेट्रोल खर्च अपेक्षित आहे.

आगीशी खेळल्यावर चटका बसतोच. श्याम यांचा हात एकदा अजगराने पकडला. अजगराची पकड मगरीसारखी असते. त्याला खूप दात असतात. त्यांनी कसाबसा हात मोकळा करून घेतला, पण दोन तुटके दात हातातच रूतून राहिले होते. ते शस्त्रक्रिया करून काढावे लागले होते. तरीही त्यांनी साप पकडणे थांबवले नाही. ते त्यांच्या साठाव्या वर्षीही साप दिसल्याबाबत फोन आला, की लगेच स्कूटरला किक मारतात.

संपर्क – कोब्रा अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड नेचर क्लब 9960156886
श्याम गोविंद जोशी, गोकुळ २ महादेव मंदिरामागे, जोशी वाडा, यवतमाळ – 445 001

– प्रकाश पेठे, 09427786823, prakashpethe@gmail.com

About Post Author

Previous articleकरजावडेवाडीच्या बाबीबाईची गोष्ट
Next articleहिंदकेसरी गणपत आंदळकर – महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्मपितामह
प्रकाश पेठे यांचा जन्म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्थायिक आहेत. त्यांनी ‘सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्ये झाले. त्यांनी ‘महाराज सयाजीराव विद्यापीठ’ बडोदे येथे 1977 पासून अतिथी प्राध्यापक, 2001 पासून ‘सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलाजी’ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्यांची ‘स्वप्नगृह’, ‘धमधोकार’, ‘आनंदाकार’, ‘वडोदरा’ व ‘नगरमंथन’ अशी पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.