मृणालिनी-उमा ह्यांची मायेची सावली

1
52
carasole

पुण्यात उपेक्षित वर्गातल्या, विशेषत: वेश्यांच्या मुलांसाठी काम करणारा ‘सावली सेवा ट्रस्ट’, हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. 2003 सालापासून कार्यरत असलेल्‍या या ट्रस्टने आतापर्यंत अनेक मुलांवर मायेची सावली धरली आहे!

मृणालिनी भाटवडेकर आणि उमा इनामदार या दोघी, संवेदना जाग्या असलेल्या आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव असलेल्या गृहिणी. त्या दोघींनी मुलांसाठी काम करणा-या एका समाजसेवी संस्थेतून कामाला सुरुवात केली. मृणालिनी आणि उमा यांनी, मूळ संस्थेतून तेथील एका गुणी मुलीला बाहेर काढले गेले तेव्हा संस्थेची कार्यपद्धत न पटल्यामुळे तिची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिथेच त्या दोघींच्या स्वतंत्र कार्याची आणि ‘सावली सेवा ट्रस्ट’ची बीजे रोवली गेली.

‘सावली सेवा ट्रस्‍ट’ ही संस्‍था शरिरविक्रय करणा-या महिलांच्‍या मुलांकरीता काम करते. रेड लाईट एरियामध्‍ये राहणारी लहान मुले लहानपणापासूनच दारू आणि गुटख्‍यासारख्‍या व्‍यसनांच्‍या आहारी जातात. ही मुले कचरापेट्या वाटाव्‍यात अशा घरांमध्‍ये राहतात. अनेकदा यांना दोन-तीन दिवस जेवणही मिळत नाही. या मुलांच्‍या अन्‍न, पाणी आणि निवारा अशा मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. यांची काळजी घेणारे कोणी नसते, लक्ष ठेवण्‍यास पालक नसतात, कुठल्‍याही प्रकारचा भावनिक ओलावा यांना मिळत नाही. ही मुले अत्‍यंत असुरक्षित अशा वातावरणात राहतात. या मुलांना शिक्षण प्राप्‍त करून दिल्‍यास त्‍यांची ही परिस्थिती बदलू शकेल, या विचाराने ‘सावली ट्रस्‍ट’ने काम सुरू केले. सुरूवातीला दहा मुलांसोबत सुरू झालेले हे कार्य आज शंभर मुलांपर्यंत जाऊन पोचले आहे.

वेश्यांच्या मुलांसाठी काम करणा-या संस्था अनेक आहेत. बहुतेक ठिकाणी, ‘वेश्यांची मुलं’ ही त्यांची ओळख कायम ठेवली जाते. किंबहुना संस्थेमध्ये ही ओळख अधिक ठसठशीत केली जाते. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. अशा मुलांच्या ‘विशेष’ शाळेत त्यांच्या गुणवत्तेला मर्यादित वाव मिळतो. त्या मुलांना सर्वसामान्यांच्या जगात प्रवेश नाकारला जातो.

त्या मुलांची स्वतंत्र शाळा, संस्कारवर्ग, वह्या-पुस्तके आणि कंपासपेट्या वाटणे ही या मुलांची वास्तविक गरज नाहीच! त्या मुलांना गरज आहे ‘सर्वसामान्य’ मुले बनवण्याची, त्यांची गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व मोकळ्या, सुरक्षित वातावरणात फुलवण्याची. मृणालिनी आणि उमा ह्यांनी ती गरज लक्षात घेऊन काम सुरू केले. त्यांनी पदरमोड करून, मित्र-नातेवाईकांकडून देणग्या घेऊन निधी उभारला. आई जरी वेश्या असली तरी ती मुलांची ‘आई’च असते; या सूत्राआधारे त्यांनी अशा आयांना विश्वासात घेतले. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले. मुलांच्या शाळाप्रवेशापासून ते गणवेश, शैक्षणिक साहित्य या सगळ्याची जबाबदारी उचलली. ज्या आया आपल्या मुलांना नीट सांभाळू शकतात त्यांचा प्रश्न नाही. पण बहुतेक आया वेश्यावस्तीतल्या अंधा-या खुराड्यात राहणा-या. अशा मुला-मुलींसाठी पहिला प्रयत्न करायचा तो शाळांच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्याचा. ते जमले नाही तर अशा मुलांसाठी ट्रस्टने भाड्यानं खोली घेतली. मुलांना प्रवेशही नु.म.वि., हुजुरपागा, रेणुकास्वरूप अशा, पुण्यातील नामांकित शाळांमध्ये मिळवून दिले. खाजगी ‘क्लासेस’ही उपलब्ध करून दिले.

ट्रस्टचे काम पाहून शाळाही मदत करतात. अनेक खाजगी क्लासवालेसुद्धा शुल्कात सवलत देतात. मुलांची शाळेत प्रगती नियमित तपासली जाते. विशेष गुणवत्तेला प्रोत्साहन दिले जाते. नियमित आरोग्यतपासणी केली जाते. एक मुलगी एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह आहे. ट्रस्टने तिच्या उपचारांची जबाबदारी उचलली आहे. एका वेश्येला नको असताना गर्भधारणा झाली. तिने गर्भ पाडण्यासाठी नाही नाही ते अघोरी उपाय केले; एकदा तर कुणाच्यातरी सांगण्यावरून कच्ची दारूही ढोसली. मात्र गर्भ चिकाटीनं जीव धरून राहिला. सात महिन्यांत अशक्त, अपुरी वाढ असलेले मूल जन्माला आले. त्याच्या पायांमध्ये व्यंग आहे. ट्रस्टने त्या बाळाच्या संगोपनाची उपचाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

मुले त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाल्याने प्रगतीची शिखरे गाठायची स्वप्ने बघू लागली आहेत! अमित मिशी ही विद्यार्थिनी हुजूरपागेत बी.काँम.च्या तिस-या वर्षात शिकत आहे. तिने रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्मन भाषेची पदविका प्राप्त केली आहे. त्याचबरोबर, ती मृणालिनी आणि उमा यांना ट्रस्टच्या कामातही मदत करते. सागर भोसले हा दहावीतला विद्यार्थी. त्याने आपली उच्च गुणवत्ता आठवी-नववीत सातत्याने पहिला क्रमांक मिळवून सिद्ध केली आहे. तो चांगला चित्रकारही आहे. नवनाथ कांबळे हादेखील भावे स्कूलमध्ये दहावीत शिकणारा चतुरस्त्र विद्यार्थी वर्गात पहिला येण्याबरोबरच वक्तृत्व, निबंध, नाटक या क्षेत्रांत चमकतो, तो कविताही चांगल्या करतो. नेहा भुतकर या बारावीत शिकणा-या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत शास्त्र विषयात ब्याण्णव टक्के आणि गणितात चौ-याण्णव टक्के गुण मिळाले आहेत.

सावली सेवा ट्रस्टच्या पुढाकाराने ‘उभ्या राहिलेल्या’ मुलांची ही प्रातिनिधिक उदाहरणे! या कामाबरोबरच वेश्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो. त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, शिवण, संगणक अशा प्रकारचे स्वयंरोजगाराला उपयुक्त प्रशिक्षण देणे, आरोग्यतपासणी, उपचारासाठी मदत करणे, लहान मुलांसाठी संस्कारवर्ग चालवणे अशा प्रकारचे काम सावली सेवा ट्रस्टच्या माध्यमातून केले जाते. या शिवाय वेश्यावस्तीत चालवल्या जाणा-या ‘नूतन समर्थ’ शाळेला ट्रस्टकडून सहकार्य केले जाते.

दोन साध्यासुध्या गृहिणींनी संवेदनशील वृत्तीने सुरू केलेले, उपेक्षित मुलांना सर्वसामान्य व गुणवत्ता असेल तिथे असामान्य बनवण्याचे हे उल्लेखनीय कार्य!

सावली सेवा ट्रस्ट,
अ-1, शिवाई, साने गुरुजी स्मारकाशेजारी,सिंहगड रस्ता, पर्वती,पुणे – 411030
020-24329764 / 9823270310

श्रीकांत टिळक
8796166523

About Post Author

1 COMMENT

  1. खूप चांगली माहिती मिळाली
    खूप चांगली माहिती मिळाली. मुंबईहून कशाप्रकारे मदत करता येईल?

Comments are closed.