मुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून…

0
18

मुंबईत छोट्याशा जागेसाठी मोठ्या मारामा-या होत असताना अशा प्रकारचा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे याची जाणीव होते. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे व त्यांचे सहकारी यांची ही निष्ठा व कामगिरीही!

मुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून

– राजेंद्र शिंदे

मुंबईतील मुलुंड(पूर्व) येथील टाटा कॉलनी मैदान! गेल्या आठ वर्षांपासून कचरा टाकण्यासाठी त्याचा वापर होत होता आणि त्यामुळे साहजिकच, त्या मैदानाला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा या कचरामय मैदानाचा कायापालट करून त्याला मुलुंड सेवा संघाच्या प्रयत्नांनी खेळाच्या मैदानात प्रवर्तित करण्यात आले.

‘टाटा कॉलनी मैदान’ हे खेळाच्या मैदानात रूपांतरितटाटा कॉलनी परिसरातील लोकांच्या मनात खेळाचे मैदान उपलब्ध नसल्याची खंत होती. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. रहिवाशांच्या मनातील खंत व तेथील नाराजीचे वातावरण जाणून मुलुंड सेवा संघाने हालचालींस प्रारंभ केला व त्यांच्या प्रयत्नानी चार महिन्यांत ‘टाटा कॉलनी मैदान’ हे खेळाच्या मैदानात रूपांतरित करण्यात आले. या जागेवरील केवळ कचरा उचलण्यासाठी चार लाख रुपयांचा खर्च आला. मुंबईत छोट्याशा जागेसाठी मोठ्या मारामा-या होत असताना अशा प्रकारचा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे याची जाणीव होते. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे व त्यांचे सहकारी यांची ही निष्ठा व कामगिरीही!

नवघर परिसरातील (अदमासे पंधरा हजार लोकवस्ती असणा-या) लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना हे मैदान खुले करण्यात आले आहे. लवकरच, रहिवाशांच्या पसंतीनुसार या मैदानाला नाव देण्यात येणार आहे असे गंगाधरे यांनी सांगितले. या मैदानाचा कायापालट करण्याकरता तीस लाख रूपये खर्च आला. त्यासाठी विविध संस्थांकडून, लोकप्रतिनिधींकडून निधी गोळा केलेला आहे. मैदानात सध्या अत्याधुनिक व्यायामशाळा प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ उभारली आहे. तिचे संजीवनी व्यायामशाळा असे नामकरण करण्यात आले आहे. मैदानाच्या एका कोप-यात व्यायामशाळा आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते ‘भारतश्री’ शरीरसौष्ठवपटू प्रशांत नारकर यांचे मार्गदर्शन ही व्यायामशाळा उभारताना लाभले. तेथे व्हॉलिबॉल आणि क्रिकेट मैदानही बनवण्यात आले आहे. व्यायामशाळेचे उदघाटन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले.

टाटा कॉलनीतील मैदानमैदानात नाना-नानी पार्क बनवण्यात येणार आहे. त्यासाठी झाडे लावण्यात येतील असे सांगण्यात आले. कचरामय, उकिरडा झालेल्या ‘टाटा कॉलनी मैदाना’चे स्वरूप पालटल्यावर बाजूलाच असलेल्या इमारतीतील लोकांना प्रसन्न वाटत आहे. दुस-या बाजूला असलेल्या चाळवजा झोपडवस्तीतून येणारा बोळ (गल्ली). तेथून लोकांची मैदानातून ‘शॉर्टकट’ रहदारी असायची. त्यांना मैदानातून कच-याच्या उंचसखल ढिगा-यावरुन दुर्गंधीमुळे नाकाला रूमाल लावून जावे लागत असे. परंतु आता त्यांना या त्रासातून जावे लागत नाही. मैदान हे पाऊण एकर आहे. त्याच्या सभोवताली लोकांना बसण्यासाठीची बेंच बनवली आहेत.

प्रकाश गंगाधरे हे प्रसिद्धी पराड.मुख असलेले व्यक्तिमत्त्व. त्यांनी त्यांच्या संस्थेचे ‘सेवाही व्रत, सेवाही धर्म’ हे ब्रीद कसोशीने पाळले आहे. त्यांच्या संस्थेचा उद्देश समाजाची प्रामाणिक, निरलस सेवा करणे हा आहे. संस्थेची स्थापना होऊन एक तप उलटले. या एका तपात त्यांनी कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत विविध उपक्रमांमार्फत कार्य केलेले आहे.

मुलुंड सेवा संघाने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. संघाचे उपक्रम लोकांच्या प्रशंसेस उतरलेले आहेत. संस्थेची मुख्य कार्ये पुढीलप्रमाणे:

१. गरीब, गरजू, निराधार, विधवा, परित्यक्तां शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे.
२. ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त असे ज्येष्ठ नागरिकत्वाचे ओळखपत्र मिळवून देणे.
३. बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी निर्माण करून देणे- त्यासाठी त्यांना शिबिरांमधून मार्गदर्शन करणे.

४. गरजू विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत प्रवेशासाठी मदत करणे.

५. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे.

६. मुलुंडकरांना भूषणास्पद आणि सामाजिकदृष्टया गौरवास्पद कार्य करणा-या व्यक्ती व संस्था यांचा सेवागौरव पुरस्कार देऊन गौरव करणे.

७. आरोग्यासाठी चिकित्साशिबिर आयोजित करणे.

८.  विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका व अंगणवाडी चालवणे.

९.  अपंग व्यक्तींना टेलिफोन बूथ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
१०.  माफक दरात व्यायामशाळा चालवणे

गंगाधरे यांचा जन्म मुंबईतील चुनाभट्टी विभागात एका गरीब कुटुंबात २९ ऑगस्ट १९५४ रोजी झाला. वडील गिरणीकामगार होते त्यांचे शालेय शिक्षण चुनाभट्टी महानगरपालिका शाळा येथे झाले. त्यांना कॉलेज शिक्षण पूर्ण करता आले नाही, कारण दत्ता सामंत यांचा ऐतिहासिक कापड गिरणी कामगारांचा संप! त्यामुळे वडील घरी. घरात उत्पन्नाचा स्रोत नाही. उपासमार. अशा परिस्थितीत कुठले करियर?  आयुष्य नेईल तिकडे चालायचे असे चालले होते. त्यांनी नोकरीसाठी आटापिटा केला, खूप जणांनी त्यांना आस दाखवली होती, पण कोणीच नोकरी दिली नाही. मग असेच याच्या मागे धाव त्यांच्या मागे धाव असे चालले होते. पुढे, सामाजिक क्षेत्राची जाण आली, त्यात आवड उत्पन्न झाली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पगडा मनावर बसला. त्यांनी १९८७ साली मुलुंडला स्थलांतर केले. त्यानंतर आयुष्याला कलाटणी मिळाली. ते सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेऊ लागले.

प्रकाश गंगाधरे हे मुंबई भारतीय जनता पक्षाचे चिटणीस आहेत. परंतु त्यांचा कल राजकारणापेक्षा समाजकार्याकडे जास्त आहे. हाडाचे कार्यकर्ते तर ते आहेतच! या मैदानाच्या प्रकरणात ते असेच कार्यकर्ता म्हणून अडकत गेले आणि त्यांनी बिल्डरांच्या घशात जाण्याची शक्यता असलेले मैदान वाचवले. टाटा कॉलनीचे म्हणून ओळखले जाणारे हे मैदान एक बाजूला उकिरडा बनून गेले होते; खासदार प्रमोद महाजन यांच्या निधीमधून तेथे समाजमंदिर बांधले गेले, पण त्यालाही अवकळा आलेली होती. दुस-या बाजूस ‘म्हाडा’ने मैदानात एक नवी इमारत उभी केली. त्यामुळे आजुबाजूच्या नागरिकांना वैफल्य आले. मोकळे मैदान नष्ट होऊन तेथे इमारतींचे जंगल उभे राहणार अशी त्यांची खात्री पटली आणि आधी जे नागरिक निदान निषेधाच्या गोष्टी बोलायचे, त्यांनाही हतबलता आली व ते उदासीन होऊन गेले.

गंगाधरे यांनी या टप्प्यावर मैदान राखायचे, समाजकेंद्रांला नवे चैतन्य द्यायचे असा चंग मनोमन बांधला आणि गेल्या आठ-दहा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मैदान अबाधित केले. समाजकेंद्रामध्ये संजीवनी व्यायामशाळा सुरू करून त्यास नवी झळाळी आणून दिली. व्यायामशाळेतील सामग्रीसाठी पंचवीस लाख रुपये आणि मैदानास आकार देण्यासाठी आठ लाख रुपये खर्च झाल्याचे गंगाधरे यांनी सांगितले. हा सर्व निधी त्यांनी हिंमतीने उभा केला.

मैदानाचे व व्यायामशाळेचे उद्घाटन मे अखेर झाले. त्यावेळी सर्व पक्षांचे नगरसेवक, आमदार, अन्य राजकीय व्यक्ती व मुख्य म्हणजे सभोवतालचे नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले. आपला मुद्दा राजकीय वादविवाद व मतभेद यांच्यापलीकडे गेला ही गोष्ट गंगाधरे यांना विशेष महत्त्वाची वाटते आणि हेच त्यांचे अस्सल कार्यकर्तापण होय. गंगाधरे म्हणाले, की सध्या सगळ्या गोष्टींचे राजकारण होते. परंतु असे नागरी प्रश्न पक्षनिरपेक्ष दृष्टीतून नागरिकांची संघटित शक्ती उभारून सोडवले गेले पाहिजेत. या मैदानासंबंधात माझे भाजपपण काढून काही हितसंबंधित नागरिकांनी मला सतावण्याचा प्रयत्न केला. परंतु माझे मन स्वच्छ होते. मला राजकारण नको होते. तसे मी नागरिकांना पटवून देऊ शकलो.

गंगाधरे मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांची सावरकरनिष्ठा ज्वलंत आहे. सावरकरांनी ‘मार्सेली’ येथे ब्रिटिश तुरुंगवासामधून पलायन केल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होतात. त्यानिमित्त गंगाधरे यांनी मुलुंडच्या सावरकर महापालिका रूग्णालयात सावरकरांचा अर्धपुतळा अलिकडेच उभा केला. गंगाधरे यांचे वय बावन्न वर्षांचे आहे. ते भाजपमध्ये आले ते स्वयंस्फूर्तीने. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात औपचारिकरीत्या गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांची कार्यनिष्ठा वेगळ्या महत्त्वाची वाटते.

– राजेंद्र शिंदे

भ्रमणध्वनी : 9324635303

thinkm2010@gmail.com

 

About Post Author

Previous articleनाट्यप्रेक्षकांचा अनुनय
Next articleहळदीचा रंग…..
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.