मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी

carasole

कोटेश्वरी ही मुरुडची ग्रामदेवता. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताना, सीमेवर कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवस्थान तीनशे वर्षांपूर्वींचे आहे. देवीचे मूळ स्थान मुरुड शहरासमोर समुद्रात उभ्या असलेल्या पद्मदुर्गात (कासार जलदुर्ग) आहे असे मानले जाते. अकल्पित भ्रष्ट घटना घडली आणि देवीने किल्ल्यातील मूळ स्थान सोडले व तिचा मुखवटा मुरुड शहराच्या सीमेवरील शेतजमिनीत लाठीच्या खांबावर प्रकट झाला! राज्यातील त्वष्टा कासार समाजबांधवांची त्या देवीवर जास्त श्रद्धा आहे. केवळ मुरुडकर नव्हे, तर रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून देवीचे भक्त वर्षातून एकदा तरी देवीचे दर्शन घेण्यास येतात.

देवीच्या नित्य पूजाअर्चेचा मान गुरव घराण्याला आहे. गुरव घराणे सालकरी पद्धतीने पूजाअर्चा पाहते अशी माहिती सालकरी मनोहर गुरव व प्रमोद गुरव यांनी दिली. नवरात्रोत्सवात देवीला वस्त्र-आभूषणांचा साज चढवण्यात येतो. सालकरी गुरवांचा मुक्काम दहा दिवस मंदिरात असतो. नृत्ये व गीतगायन असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. होमहवन, नवचंडी होम, सप्तपदी, भजने असे नित्य धार्मिक कार्यक्रम सुरूच असतात. दस-याला भल्या पहाटे देवीला ‘घोसाळ्याचा कळा’ वाहण्यासाठी भक्तांची रीघ असते.

देवीसंबंधी दोन दंतकथा प्रचलीत आहेत :

साठ-सत्तर वर्षापूर्वीपर्यंत एक वाघ नवरात्राच्या आदल्या दिवशी देवालय परिसरात आणि गुरव आळीत फेरफटका टाकण्यासाठी येत असे. वाघाला देवीचा दूत समजले जाई.

व्यापारी प्रवीण शहा व अरविंद शहा यांच्या आजोबांना अपत्य प्राप्ती होत नव्हती. तेव्हा दारी आलेल्या अज्ञात साधूने भोजनाची मागणी करून कोटेश्वरी देवीपाशी होम करण्यास सांगितले. तसे केल्यानंतर शहा कुटुंबात गणपतलाल व सुंदरलाल हे पुत्र झाले. तेव्हापासून शहा कुटुंबीयांची देवीवर अपार श्रद्धा आहे.

कोटेश्वरी देवस्थानची जागा ही १९२५ च्या महसूल-जमीन सर्वेक्षणानुसार सरकारने दिलेली आहे. देवालयाची जागा दहा गुंठे आहे. मंदिर पूर्वी कौलारू होते. मंदिराचा जीर्णोद्धार पन्नास वर्षांपूर्वी कै. मधुकर लक्ष्मण दांडेकर यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत झाला. स्लॅबचे मंदिर उभारले गेले. कोटेश्वरी देवस्थान ट्रस्ट आहे. विद्यमान अध्यक्ष सुधीर जगन्नाथ दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली काम पाहिले जाते. प्रमोद मसाळ, अमोल उपाध्ये, नारायण पटेल, सुरेश पाटील, सुधाकर दांडेकर, हसमुख जैन, श्रीकांत माळी, प्रकाश विरकूड, नंदकुमार धोत्रे, अरुण बागडे, नागेंद्र सिंग, प्रल्हाद राणे, अशोक कारभारी, महेंद्र पारेख, विजय पोतदार, अण्णा वाडकर, संतोष दर्गे, सुनील मिठाग्री, विजय कदम, बाळकृष्ण पाटील अशी एकवीस जणांची कार्यकारी समिती आहे. समिती सदस्य दरवर्षी यात्रेच्या आदल्या दिवशी पद्मदुर्गात देवीच्या मूळ स्थानापाशी पूजनासाठी जातात. भक्तांसाठी ‘भक्तनिवास’ उभारण्याचा संकल्प सोडल्याचे सुधीर दांडेकर यांनी सांगितले.

देवीमाता तेज, ज्ञान व शौर्य; तसेच, अन्यायाला प्रतिकार करणारी शक्ती असून मंत्र समुदायात ती मातृका म्हणून निवास करते. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. त्या आधी देवीची पालखी मुरुड शहरात काढण्यात येते.

( आधार – ‘प्रहार’ दैनिक मधील माहिती)

Last Updated on – 30th September 2016

About Post Author