मुणगेची श्री भगवतीदेवी – आदिमायेचा अवतार

4
42
carasole

कोकण हे देवभूमी म्हणून मान्यता पावले आहे. त्याची निर्मिती भगवान परशुरामाने केली अशी लोकांची दृढ धारणा आहे. तेथे पावलोपावली विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी अनेक देवदेवतांची मंदिरे पाहण्यास मिळतात. ती तेथील श्रद्धा व संस्कृती यांचे प्रतिक आहे. प्रत्येक गावात ग्रामदैवत असणे हा तेथील भाविकतेचा स्थायीभाव असून, परमेश्वरी शक्तीची विविध रूपात भक्तीभावाने व श्रद्धेने जोपासना केली जाते.

आजही तेथे अस्तित्वात असणाऱ्या गावरहाटीच्या अधीन राहूनच सर्व धार्मिक सण, उत्सव व व्रतवैकल्ये साजरे करण्याची परंपरा पाळली जाते. ती मंदिरे माणसांना परस्परांशी जोडण्याचे काम नकळत करत असतात. मंदिर विश्वस्त मंडळ, बारा पाचाचे मानकरी, पुजारी, सेवेकरी व अन्य निशानदार ही माणसे कार्यरत असतात. कोकणात साधारणत: त्रिपुरी पौर्णिमेनंतर जत्रोत्सवांना प्रारंभ होतो. तसाच तो देवगडपासून तीस किलोमीटर अंतरावर देवगड-मालवणच्या सीमेवर असणाऱ्या मुणगे या गावीही होतो. ते निसर्गसंपन्न गाव एका बाजूला आचरा खाडी, दुसऱ्या बाजूस अरबी समुद्र व पोयरे तसेच हिंदळे गावच्या शेजारीच वसले आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचेही ते गाव आहे. त्‍या गावास आध्‍यात्मिकतेचा वारसा लाभलेला आहे. तेथील श्री भगवती देवी हे जागृत देवस्थान आहे. आदिमायेचा अवतार व स्थानिकांच्या अढळ श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ती श्री भगवतीदेवी! तेथील देवीचा वार्षिकोत्सव हा सलग पाच दिवस चालतो. तो दरवर्षी पौष पौर्णिमेला (शाकंभरी पौर्णिमा) सुरू होतो आणि त्याची पाचव्या दिवशी ‘लळीता’ने सांगता होते.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी भगवती देवीच्या मूर्तीची स्थापना झाली. तेथील ग्रामस्थांच्या मते त्याकाळी गावात मुनींचे वास्तव्य असल्याने गावाला ‘मुणगे’ हे नाव प्राप्त झाले. गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बांबरवाडीतील ‘बायची देवी’ हे पूर्वी मुणगे गावचे आद्यस्थान होते. कालांतराने मध्यवर्ती स्थानी असलेल्या भगवती देवीस ग्रामदैवताचा मान देण्यात आला. देवीची सध्याची पाषाण मूर्ती १८१० मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. देवीची महिषासूरमर्दिनीच्या रूपातील पश्चिमाभिमुख मूर्ती चार फूट उंचीची असून, ती काळ्या पाषाणात सुंदर कोरीव काम केलेली आहे. मूर्तीच्या बाजूला चांदीच्या पत्र्याचा नक्षीकाम केलेला महिरप आहे. देवीच्या एका हातात खङ्ग, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात ढाल व चौथ्या हातात शंख असून ती महिषासूरावर पाय ठेवून उभी आहे. देवीची मूर्ती गाभाऱ्यात उंचावर असल्याने भाविकांना तिचे मंदिराच्या बाहेरूनसुद्धा दर्शन घेता येते. उत्तरेला असलेल्या गोमुख व शिवस्थानामुळे देवीला ‘सोमसूत्री’ प्रदक्षिणा घालावी लागते. देवीची पालखीही तशीच फिरवली जाते. देवीचे मंदिराचे संपूर्ण बांधकाम हेमाडपंथी आहे.

देवीचे मंदिर प्राचीन आहे. त्‍याचे बांधकाम हेमाडपंतीय शैलीतील असल्‍याचे म्‍हटले जाते. मंदिर प्रशस्त असून ते चार भागांत विभागले गेले आहे. बांधकाम उल्लेखनीय असून गाभारा पुरातन पद्धतीप्रमाणे लाकडी गोलाकार खांबांवर कोरीव काम करून बांधण्यात आलेला आहे. मंदिराच्या गाभा-यात एक शिवलिंग व गाभा-याबाहेर संकेताचा पाषाण आहे. देवीची आज्ञा घेतेवेळी त्‍या पाषाणाचा उपयोग केला जातो. त्या पाषाणात देवतेचा अंश असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तो पाषाण दहा किलो वजनाचा असून त्‍यास ‘गुंडी’ असे म्‍हटले जाते. सोलापूर परिसरात तशा पाषाणाला ‘गुंडा’ असे संबोधन आहे. त्‍या पाषाणाच्‍या साह्याने देवीच्या मंदिरात कौलप्रसाद घेण्याचे काम तसेच न्यायनिवाडे करण्याचे काम नित्यनियमाने सुरू असतात. पंचक्रोशीतील अनेक भक्तगण कौटुंबिक व सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देवीकडे येत असतात.

मंदिराच्या दुसऱ्या भागात आरती, पुराणे सांगितली जातात. तिसऱ्या भागात पालखी ठेवतात तर चौथ्या भागात नृत्य, गोंधळ, किर्तन-प्रवचन व अवसर काढणे आदी कार्यक्रम होतात. तेथेच ग्रामसभा घेतली जाते. मंदिराच्या सभोवतालचा परिसर मजबूत दगडी चिऱ्यांनी बांधून काढला आहे. मंदिराच्या मागे महापुरुष असून जवळच गोमुखातून बारमाही वाहणारे पाणी आहे. मंदिराच्या आवारात श्री देवी अनभवानी, देवी पावणी, देवी भावय, ब्राह्मणदेव, देवगिरावळ व श्री देवी बायची अशी मंदिरे आहेत.

एका आख्यायिकेनुसार, भगवती देवी काशीहून मुणगे येथील ‘पाडावे’ कुटुंबियांच्या घरी वास्तव्याला आली होती म्हणून तिचे माहेर या गावातील पाडाव्यांच्या घरी आहे असे समजले जाते. त्यामुळे देवीची ओटी पाडावे यांच्याच घरी भरली जाते. उत्सव काळात, देवीचे स्नान झाल्यावर सकाळी देवीस वस्त्रालंकारांनी व कवड्यांच्या माळेने सजवतात व तिची विधिवत पूजा करतात. त्यानंतर देवीचे दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. देवी दर तीन वर्षांनी कारिवणे वाडीतील पाडावे यांच्या घरी माहेरपणाला येते. त्‍यास देवीची ‘माहेरस्‍वारी’ असे म्‍हणतात. देवी दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा, महानैवेद्य झाल्यावर वाजत-गाजत पुन्‍हा मंदिराकडे निघते.

चैत्र महिन्यात देवीची एक महिना पालखी असते. त्यावेळी मंदिराच्या आवारात गुढी उभारली जाते. पालखीच्या वेळी बारा-पाचाच्या मानकऱ्यांच्या ‘वसंतपूजा’ केल्या जातात. मंदिरात ज्येष्ठ महिन्यात देसरूढ काढण्याचा विधी असतो तर श्रावण महिन्यात दररोज श्रावणीपूजा केली जाते. मंदिरातील सर्व स्थळांना गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, त्रिपुरी पौर्णिमा व देव दिपावलीत दिव्यांनी सजवले जाते.  देवीचा शिमगोत्सवात साजरा केला जाणारा उत्सव धुळवडीपर्यंत चालतो. नवरात्रोत्सवामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन रोज रात्री जागर करण्यात येतो.

देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे वार्षिक यात्रोत्सव होय. तो पौष पौर्णिमेस चालू होतो व पाच दिवस चालतो. त्‍या जत्रेच्‍या कालावधीत दूरवरच्या गावातील भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस करण्‍यासाठी – फेडण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी तेथे येतात. त्‍यावेळी परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. वार्षिक यात्रोत्सवात देवीची पूजा-अर्चा, दर्शन, ओट्या भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे, सायंकाळी गोंधळी गायन, संगीत भजने, प्रवचन व पुराणवाचन, देवीची आरती, पालखी मिरवणूक आणि किर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात्रेच्या शेवटच्या रात्री ‘लळीता’च्या कार्यक्रमाने त्या शानदार सोहळ्याची सांगता केली जाते. मुंबईकर माहेरवाशिणी बहुसंख्येने उपस्थित राहून देवीचे आशिर्वाद घेतात. त्या काळात गावात आनंदाचे वातावरण असते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवला जातो. दूरवरच्या भाविकांची मंदिराच्या शेजारीच असलेल्या भक्तनिवासात राहण्याची सोय केली जाते. देवीचा डाळपस्वारीचा सोहळासुद्धा अविस्मरणीय असतो.

मुणगे गावापासून जवळच कुणकेश्वर व मीठबांव ही पर्यटनस्थळे असल्याने त्या ठिकाणी असंख्य पर्यटक व भाविक-भक्तांचा राबता आढळतो.

– पांडुरंग भाबल

About Post Author

4 COMMENTS

  1. साहेब,

    साहेब, लेख छान आहे, पण त्याचबरोबर आपल्या इतर वाड्यांची माहिती दिली असती तर छान झाले असते.

  2. आई भगवती देवीची ऐतिहासिक…
    आई भगवती देवीची ऐतिहासिक माहिती उद्बोधक आहे

  3. उपयुक्त माहितीतून देवीची…
    उपयुक्त माहितीतून देवीची महती कथन केली.धन्यवाद

  4. खूपच महत्व पूर्ण माहिती आणि…
    खूपच महत्व पूर्ण माहिती आणि इतिहास सांगितलात प्रसन्न वाटले छायाचित्रण सहित माहिती असती तर अजून प्रभाव वाढला असता… छायाचित्रे हवी असल्यास संपर्क करा… 9821865716

Comments are closed.