मुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना!

0
59
_janbhalache_akhyan

शाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक अकादमी’ म्हणजे लई भारी! मोठमोठ्या कलावंतांची मिरासदारी तेथे! पुरस्कार लोकसंस्कृतीतील एका पठ्ठ्याला मिळतो म्हणजे काय? लोकसंस्कृतीकडे बघण्याचा विद्वानांचा दृष्टिकोन तसा चांगला नसे. त्या मंडळींना शेला-पागोट्यांचा मान देऊन घडीभर कौतुक केले, की झाले काम… त्यांनी प्रस्थापितांचे मोठेपण मान्य करावे म्हणून त्यांचे घडीभर कौतुक करायचे हाच शिरस्ता. म्हणूनच, परिस्थितीशी झगडून, रक्ताचे पाणी करून, लोकांमध्ये मिसळून, तळागाळातील समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या उमप यांच्यासारख्या लोककलाकाराचे कौतुक राष्ट्रीय पातळीवर व्हावे, यापेक्षा आनंद कोणता?

महाराष्ट्र म्हणजे लोककलाकारांची खाण. तेथे प्रत्येक वाडीवस्तीवर, गावात, तालुक्यात, शहरातील गल्लीबोळात, झोपडपट्टीत लोककलाकार उगवत गेले, वाढत गेले. ग्रामीण समाजजीवनाच्या शुद्धिकरणाला आवश्यक असलेले बलुतेदारच ते. कला दाखवायची आणि मिळेल त्यात भागवायचे, गावागावांतून हिंडायचे, लोकांचे मनोरंजन करायचे, जमल्यास त्यांना थोडाफार शहाणपणा शिकवायचा अन् कौतुक करून घ्यायचे हे त्यांचे जीवन. त्यांची पाले मात्र पडायची गावाबाहेर. ती मंडळी कलेची ऊर्मी, साथसंगत आणि पोटापाण्यासाठी घडत गेली, स्वत:ला टिकवत गेली आणि समाजस्वास्थ्यासाठी जगत गेली. लोककलाकारांचा जन्मच सामाजिक तळमळीतून झाला आहे. त्यामुळे त्यांच्या काव्यात सभोवतालच्या समाजाचे प्रतिबिंब दिसते. त्यांना कधी चंद्रचांदण्या आठवल्या नाहीत, की प्रेमपाशाची दिवास्वप्ने पडली नाहीत. ते कविकल्पनेत कधी रमले नाहीत, की त्यांनी वैयक्तिक दु:खाचा बाजार कधी मांडला नाही. जे काही बोलायचे ते थेट आणि रांगडे. त्यांना चमचमत्या दुनियेने कधी भुलवले नाही, त्यांची निष्ठा कधी पैशांच्या लोभाने ढळली नाही. त्यांचे विषय असतात, जितीजागती माणसे आणि मक्सद असतो समाजाचे काहीतरी देणे.

शाहीर विठ्ठल उमप तशाच परंपरेतील. विठ्ठलाच्या नावाप्रमाणेच त्यांचा काळाकभिन्न रंग, पण अंतरी सामाजिक तळमळीच्या शुभ्र ज्वाळा. उमप मंडळी मूळ नागपूरची. ती पोटापाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चिकनी ह्या गावी स्थायिक झाली. त्यांनी तेथे भागेना म्हणून मुंबई गाठली. ती नायगावसारख्या कामगार वस्तीत राहिली. विठ्ठलचा जन्म तेथे झाला. वडील गंगाराम रेल्वेत फिटर होते, पण त्यांची दारूच्या व्यसनापायी सतत हलाखीची परिस्थिती. त्यांची पोराने पैलवान व्हावे अशी इच्छा तर माय बजाबाईला ‘इठ्ठला’ने बाबासाहेब आंबेडकरांसारखे शिकावे असे वाटे. पण पोराचे मन ना कसरतीत रमे, ना शाळेत. त्याने हाती धरले बुलबुलतरंग अन् तो गाऊ लागला. त्याने पैशांसाठी मोलमजुरीही करून बघितली, पण त्याच्या नशिबात त्याला गायकच व्हायचे होते. मग त्याने पोटापाण्यासाठी म्हणून कलेची संगत धरली ती कायमची. तो कलाकारी करत-करत कला शिकत गेला; साथसंगतीमुळे हुशार होत गेला. तो बालपणी खेळात रमला नाही, की तरुणपणी वाईट नादाला लागला नाही. सभोवतालच्या लोकांचे भेसूर जगणे त्याच्या संवेदनाशील मनावर आघात करत राहिले. त्यांवरील राग आणि उपाय यांसाठी तो कलंदर कलाकार तळमळीने काम करत राहिला. ते करत असताना, कलाकार म्हणून स्वत: तो मोठा होत राहिला; त्याच्या विनम्र स्वभावाने एकेक उंची गाठत राहिला.

‘संगीत नाटक अकादमी’चे पुरस्कार महाराष्ट्रातील अनेक लोककलाकारांना मिळाले आहेत. वगसम्राट दादू इंदुरीकर, नृत्यबिजली विठा भाऊ मांग नारायणगांवकर, तमाशापटू काळू-बाळू, लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, दशावतारवाले बाबी नालंग, गोंधळमहर्षी राजरामभाऊ कदम ही सगळी माणसे त्यांच्या त्यांच्या विशिष्ट सादरीकरणशैलीमुळे मोठी कामगिरी करून गेली. विठ्ठल उमप हे त्या सगळ्या कलाप्रकारांना गवसणी घातलेले एक हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांनी कलेचा श्रीगणेशा बुलबुलतरंग वाजवून केला. चाळीच्या पटांगणात गाणी गाऊन बघ्यांची गर्दी जमवली. शिमग्यात सोंगे सजवली. ते संस्कारकेंद्रात रमले, चित्रपटात मॉबमध्ये काम मिळावे म्हणून ‘श्री साऊंड स्टुडिओ’च्या दारात तासन् तास उभे राहिले. त्यांनी सत्यनारायणाची पूजा, लग्न, बारसे… ते मिळेल तेथे गात राहिले. शेतकरीगीते, धनगरीगीते, कोळीगीते, भजन, भारुडे येथपासून आंबेडकरी जलसे आणि कव्वाल पाटर्या अशा सर्व ठिकाणी गाऊन त्यांनी नाव कमावले. राष्ट्रीय सेवा दलाच्या ‘महाराष्ट्र दर्शन’मध्ये अदाकारी पेश केली आणि ‘विठ्ठल उमप पार्टी’ या नावाने आख्खा महाराष्ट्र, संपूर्ण देश आणि परदेशही गाजवला, नायगावच्या ‘विजय नाट्य मंडळा’त हौशी रंगभूमीवर ‘हर हर महादेव’, ‘जिंजीहून सुटका’ यांसारख्या नाटकांतून कामे केली. व्यावसायिक रंगभूमीवर अरुण सरनाईक, मोहन कोठीवान यांच्यासारख्या कलाकारांबरोबर ‘हैदोस’ हे नाटक केले. त्यांनी ‘कामगार कल्याण मंडळा’च्या वतीने आकाशवाणीवर प्रवेश केला आणि तेथे लोककलांचे भरपूर कार्यक्रम केले. त्यांनी एच.एम.व्ही.मध्ये प्रवेश सतत पाच वर्षें खेटे घालून अखेर मिळवला आणि लोकगीते, कोळीगीते यांच्या असंख्य रेकॉर्ड गाजवल्या. ते मधुकर पाठक, श्रीनिवास खळे, राम कदम यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांसाठी गायले. त्यांनी दूरदर्शनसाठी ‘जिवाची मुंबई’ हे लोकनाट्य सादर केले व नंतर लोकगीते दूरदर्शनच्या माध्यमातून घराघरांत नेली. ते अनेक चित्रपटांत गायले, त्यांनी अभिनय केला. असे विचारा, की त्या माणसाने काय के_koli_geetले नाही? ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि आंबेडकरी जलशांपासून ‘आंबेडकर’ चित्रपटातील अभिनयापर्यंत सर्वत्र आत्मविश्वासाने वावरले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वतःचा ठसा उमटवत बाजी मारली. महाराष्ट्राच्या इतिहासात असा कलाकार विरळाच असेल. तो मनस्वी कलाकार जेथे जेथे भजने, भारुडे, कव्वाल चालत तेथे रात्र-रात्र घालवत होता; जे जे ऐकले ते एकलव्याप्रमाणे आत्मसात करत होता आणि स्वतः गात होता. तो इस्माईल आजाद, जानीबाबू अशा कव्वालांचे जलसे ऐकत ऐकत गोपाळ कर्डक यांच्या कव्वाल पार्टीत सामील झाला. ‘समाजपरिवर्तनासाठी कला’ हा निर्धार त्यांच्या मनात कायम होता, तो कलाकार अण्णाभाऊ साठे, गोपाळ कर्डक, गोविंदराव म्हशीलकर, श्रावण यशवंते, वसंत बापट यांच्यासारख्या चळवळीतील कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून जनजागरणासाठी लढत होता.

त्यांच्या बहारीचा काळ आला तो त्यांच्या आवाजातील एच.एम.व्ही.ने काढलेल्या रेकॉर्डमुळे, त्यातून त्यांचा आवाज घराघरांत पोचला. त्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘ये दादा हावर ये, कवरा मोटा लावला वाटा । बोंबील, वाकटी, कोलंबी, काटी, हाणला म्हावरा झे रे झे |’ या गाण्याने त्यांच्या लोकप्रियतेची सुरुवात झाली. मग, ‘आज कोलीवाड्यात येईल वरात | लगीन हाय दारात बाय गो ।’ यांसारखी पारंपरिक गीते… ‘फाटकी नोट मला घेवाची नाय ।  धंद्यात खोट मना खावाची नाय ।’ यांसारखी कुंदन कांबळे यांची गीते…  ‘घेऊनशी जा रं ताजा ताजा ।  चिकना चिकना म्हावरा माझा’ | यांसारखी कोळीगीते…  ‘क्रांतिबा महात्मा फुले, वीर जन्मले, सुधारक झाले ।  जातिवाद्यांचा करी धिक्कार, घेतला गरिबांचा कैवार ।  झुंजला कठोरांशी अनिवार जी जी जी’ यांसारखे पोवाडे…  ‘माणुसकीला हो बाटवी, दारूची बाटली ।  मसणात झणी पाठवी, दारूची बाटली’| यांसारखी लोकगीते… ‘ऐका बंधूंनो माली ही गोठ, संसाराची मी बांधून मोट । तुम्हासाठी जाळीले हे एक बोट’ | यांसारखी आंबेडकरी गीते… ‘शाहिरांनो थाप डफाची सीमेवर वाजवू ।  वीरश्रीच्या रणगीतांनी चला हो रण गाजवू |’ यांसारखी समरगीते त्यांनी आकाशवाणीवर गायली.

सर्वात कहर केला तो मात्र ‘फु ऽऽबाई फुऽऽ फुगडी फुऽ| दमलास काय माझ्या गोविंदा तू |’ या भारूडाने. त्यांनी तुकोबारायांचे ते भारुड घराघरांत पोचवले आणि ते स्वत:ही जनसामान्यांपर्यंत पोचले. जमाना बदलत गेला तसे तेही बदलत गेले, पण विचारांनी नव्हे फक्त माध्यमांनी. अशोकजी परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने लोककला विभाग सुरू केला आणि विठ्ठल उमप यांनी नाटकांतून कामे सुरू केली. त्यांनी लोककलावंताची अस्सल अभिनयक्षमता ‘अबक दुबक तिबक’, ‘खंडोबाचे लगीन’, ‘विठो रखमाय’ यांसारख्या नाटकांमधून दाखवली. कहर केला तो ‘जांभूळ आख्यान’ने. त्यांनी परभणीच्या गोंधळ महर्षी राजारामभाऊ कदम यांचा वारसा उंचीवर नेऊन ठेवला. गण झाला, की गवळणीमध्ये ‘कृष्णविलास’ सादर व्हायचे. त्यात ते राधेची भूमिका करत. पुढे गोंधळी रूपात सूत्रधार म्हणून त्यांचा सहजसुंदर वावर आणि कर्णाला पाहून, ‘द्रौपदीचे मन पाकुळलं’ म्हणत केलेला द्रौपदीचा लाजवाब अभिनय, केवळ लाजवाब! त्याच गोंधळी वेषात ते जणू काही परकायाप्रवेश करत. प्रेक्षक त्यांच्यावर फिदा होत. कला आणि कलाकार यांची तीच तर खरी किमया!

हे ही लेख वाचा –
शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)
शाहीर आणि पोवाडा
शाहीर सुभाष गोरे

दूरदर्शन हे माध्यम आल्यावर भल्याभल्या कलाकारांची भंबेरी उडाली, पण विठ्ठलरावांनी तेही माध्यम कवेत घेतले. ‘जीवाची मुंबई’सारखे लोकनाट्य दूरदर्शनवर सादर करून त्यांनी त्यांची पकड त्या माध्यमावर बसवली आणि लोकसंस्कृतीचे असंख्य कार्यक्रम तेथे सादर केले. पुढे, त्यांना चित्रपटसृष्टी खुणावू लागली. ते नामदेव व्हटकर यांच्या ‘अहेर’मध्ये पहिल्यांदा पडद्यावर दिसले. मग ‘पायगुण’, ‘जन्मठेप’, जब्बार पटेल यांचा ‘आंबेडकर’ आणि मंगेश हाडवळे यांचा ‘टिंग्या’… तिकडेही तेवढीच हुकूमत. त्यांच्यातील कवी तेवढ्या सगळ्या धबडग्यातही कधी विझला नाही. त्यांनी असंख्य लोकगीते, पोवाडे, कोळीगीते, भीमगीते, समरगीते लिहिली, स्वतः चाली लावून पहाडी आवाजात सादर केली. हिंदीमध्ये गझला लिहिल्या, कव्वाली  लिहिल्या, लोकगीते लिहिली. संत साहित्य, पंत साहित्य, तंत साहित्य, लोकसाहित्य आणि खासकरून आंबेडकरी साहित्य यांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या शाहिरीतून जनसामान्यांना जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांची ‘रंग शाहिरीचे’, ‘माझी आई – भीमाई’ आणि आत्मचरित्र ‘फुऽऽ बाई फुऽ’ ही पुस्तके गाजली. त्यांनी लिहिलेली देवीची गीते तर इतकी पारंपरिक वाटतात, की काव्यात ‘विठ्ठल बाळा देई बळ’ ही शेवटची ओळ येईपर्यंत वाचक जुनेच काही वाचत आहे असा भास त्याला होत राहतो.

‘पहिल्या धारेची’ हा त्यांचा काव्यसंग्रह इतका छान जमला, की त्याची बरोबरी ‘मधुशाला’शी करावीशी वाटते. ते काव्य संपूर्ण विनोदी ढंगाने लिहिलेले आहे. ते मद्याची महती सांगता सांगता डोळ्यांत अंजन घालते आ_bahirji_naikणि विशेष म्हणजे तो माणूस आयुष्यात दारूच्या थेंबालादेखील शिवलेला नाही! अशी बहुआयामी कलाकाराची मुशाफिरी त्या कलाकाराची होती. ते स्वत:च्या मुलांनी सुरू केलेल्या ‘मी मराठी’ या कार्यक्रमात समर्थपणे गात आणि लीलया वावरत. अनेक चॅनेल्सवर लोकसंगीत म्हणजे विठ्ठल उमप हे समीकरण अबाधित आहे. वसंतराव नाईक यांच्यापासून इंदिरा गांधी यांच्यापर्यंत सगळ्यांना त्यांच्या शाहिरीतून विचार करायला लावणारा अस्सल मातीतील विठ्ठल! त्यांनी त्यांच्या अभिनव सादरीकरणाने 1983 साली लंडनच्या कॉर्क आयलंड येथील आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात भारताला प्रथम पारितोषिक मिळवून दिले. त्यांना पुरस्कार अनेक मिळाले, पण ते ‘दलित मित्र’ ह्या पुरस्काराने भावुक होत. उमप हे दलितांचे खरे मित्र, गरिबांचे कैवारी अन् माणुसकीचे विनम्र पाईक. बापाने त्यांना पैलवान होण्यास सांगितले, आईने आंबेडकरांसारखे शिकण्यास सांगितले, पण ते दोघांच्याही इच्छा पुऱ्या करू शकले नाहीत. खरे म्हणजे तळागाळातील समाज हाच त्यांचा बा आणि माय. त्यांनी त्या समाजाचे ऋण मात्र पुरेपूर फेडले. कधी कोणाशी भांडले नाहीत, कधी कंपुशाही केली नाही. जे घडत गेले ते सोसत गेले. कलेशी इमान राखले. त्यांनी रंगमंचावर प्रवेश केल्यावर त्यांच्या अंगात वारे भरत असे. एकदा भूमिकेत शिरले, की वय दिसत नाही. जेथे जाईल तेथे बाजी मारणारा हा बाजिंदा गडी फुले-आंबेडकर यांचे विचार कधी विसरला नाही. विठ्ठल उमप स्वतःच्या आयुष्यातील कृतीने गौतम बुद्धाचा शांतीचा विचार जनसामान्यांसमोर कायम ठेवत राहिले. त्यांना मरण आले, तेदेखील गौतम बुद्धाच्या सोहळ्यात, बुद्धाचे नाव मुखी घेऊनच. इतके पुण्यवंत मरण, की ते स्वतःच बुद्ध होऊन गेले.

कलेसाठी झटला, कुटुंबासाठी राबत राहिला आणि समाजासाठी तळमळला; ह्या अवलियाबद्दल एवढेच म्हणावे, की दुसऱ्यांच्या दुःखाने स्वत:च्या डोळ्यांत पाणी येणारा हा माणूस आपल्यात वावरला होता, हे आपले भाग्य…

– अशोक हांडे  9821082804
chaurang.ashokhande@gmail.com
(‘रुची’ मार्च 2010 अंकावरून उद्धृत संपादित – संस्कारित)

About Post Author

Previous articleविष्णूचे उपासक – वैष्णव संप्रदाय (Vishnu Worshiper – Vaishnava sect)
Next articleपाण्याचे खाजगीकरण : दशा आणि आशा (Privatization of Water: Condition and Hope)
अशोक हांडे हे लोककळावंत, अभिनेता, गायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्श, नेपथ्यकार, निर्माते आणि लेखक आहेत. त्यांनी 'मंगलगाणी - दंगलगाणी'पासून 'मराठीबाणा'पर्यंत तेहतीस वर्ष मराठी रंगभूमीवर लोककलेचे कार्यक्रम केले. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावच्या चिकित्सक समूह शाळेत झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण 'रूपारेल महाविद्यालय' येथे झाले. त्यांनी महाविद्यालयात असताना एन एस एस कॅम्पमध्ये सहभाग घेऊन आदिवासी पाड्यात जाऊन संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी गोंधळी, वासुदेव, कोळीनृत्य, जोगवा, पोवाडा अशा सर्व लोककलेचे सादरीकरण केले आहे. त्यांनी 'साडेसातहजार स्टेज शो' केले आहेत. त्यांनी 1999 साली 'प्रजासत्ताक दिन' निमित्त 'आंबा' विषयावर सादर केलेल्या चित्ररथाचे दिग्दर्शन केले. लेखकाचा दूरध्वनी 9821082804