मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा

0
362

विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे. मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे…

रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील चार गावे देवीच्या यात्रांनी बांधली गेली आहेत. मुरूडआंजर्लेकेळशीवेळास ही ती चार गावे. चारही गावे दर्याकिनारी आहेत. तेथील यात्रा या चैत्र महिन्यात पार पडतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेल्या त्या उत्सवाची सांगता चैत्र वद्य तृतीयेला होते. ती परंपरा गेली तीनशे वर्षे चालू असावी. चारही गावांचे मानकरी दुसऱ्या गावांच्या देवींच्या उत्सवांस जात असतात. त्या गावांच्या यात्रांची निमंत्रणे दुसऱ्या गावांना पाठवली जातात. पूर्वी ती संस्कृत भाषेत असत. आता निमंत्रणे मराठी भाषेतून येतात. त्या गावांतील देवींची देवळे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या गावांतील देवींचे आगमन स्वयंभू आहे, अशी तेथील भोळ्या लोकांची श्रद्धा आहे. त्या चारही गावांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे केवळ देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

त्या चारही गावांमध्ये देवीच्या उत्सवाचे महत्त्व इतके का आहे? तर ती गावे किनारपट्टीवरील. तेव्हा हब्शी, चाचे कधी अकस्मात येतील आणि लुटालूट करतील याचा भरवसा नसे. ते भय ग्रामस्थांच्या मनात असे. आपण जर एकत्र राहिलो तर वेळप्रसंगी एकमेकांच्या आधाराने काहीतरी करता येईल; तसेच, देवीचा आशीर्वाद लाभल्यास भीती राहणार नाही, या भावनेतून चारही गावांत देवीच्या उत्सवाचे महत्त्व निर्माण झाले, असे त्या त्या गावांतील ज्येष्ठ मंडळी सांगतात.

देवीच्या उत्सवात मानपानाचे महत्त्व हे आगळेवेगळे आहे. प्रत्येक गावच्या मंडळींना देवळात कीर्तन-प्रसादासाठी बसण्याकरता ठरावीक ठिकाणी मानाची जागा देण्यात आली आहे. चारही उत्सवांमधून होणारी भव्य रथयात्रा उदंड उत्साहाची, सर्वांना अपूर्व चैतन्य देणारी असते. रथयात्रेच्या आदल्या दिवशी खास कार्यक्रम हा मानपानाचा असतो. प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला उपस्थितांसमोर मानाचा विडा देऊन सन्मानित केले जाते. त्याशिवाय, परिसरातील सुमारे अठ्ठेचाळीस गावांना उत्सवाची निमंत्रणे असतात.

चारही गावांच्या उत्सव आयोजनातील मानपान हा एकसमान दिसून येतो. पूजेची जबाबदारी ब्राह्मणांकडे, रथ फिरवण्याची जबाबदारी कुणब्यांकडे, शिंपी रथाचे कापड आणि छत शिऊन देतात, सोनार मिरवणुकीची मूर्ती तेजस्वी करतात, न्हावी आरसा दाखवतात. अशा प्रकारे कामे त्या त्या जातीजमातींकडून आनंदाने सांभाळली जातात. ती पूर्वापार तशीच सुरू आहेत. जातीजमाती या त्यांच्या त्यांच्या व्यवसायावरून आल्या. त्यातून जातिभेद निर्माण झाला. गावात तो जातिभेद विकोपाला जाऊ नये म्हणून उत्सवाच्या आयोजनामध्ये त्या त्या व्यवसायालाच मानाचे स्थान दिले गेले. त्यामुळे श्रमाला प्रतिष्ठा लाभली आणि गावाचे अभंगत्व टिकून राहिले.

चारही देवींच्या उत्सवाची सारी रचना बारकाईने आणि सर्वसमावेशक करण्यात आली आहे. महाप्रसादासाठी फणसाची भाजी बनवली जाते. त्यासाठी घराघरातून फणसाचे गरे आणि जेवण्यासाठी केळीची पाने गोळा केली जातात. ज्याच्याकडे जे देण्यासारखे आहे, त्याने ते द्यावे आणि त्या उत्सवात सहभागी व्हावे. तेथे पैशाला फारशी किंमत नाही. म्हणून तो उत्सव लोकांच्या मनामनांत विराजमान झाला आहे.

मुरूड, आंजर्ले व वेळास या गावांत दुर्गादेवीची, तर केळशीला महालक्ष्मी देवीची यात्रा भरते. तेथे देवीची नेहमीची पूजा पारंपरिक पद्धतीने होते. उत्सवाच्या वेळी चांदीचा मुखवटा चढवला जातो. मंदिरात हार, वेणी, फुले, नवीकोरी साडी, दागदागिने, धूप-दीप अशा गोष्टींनी आगळी प्रसन्नता व्यापून उरते. उत्सवात नवी पिढीसुद्धा मागे नाही. पूजाअर्चा, रथयात्रा पूर्वीप्रमाणेच चालू आहेत. केळशी गाव वगळता बाकी इतर तीन गावांची यात्रा तीन दिवस, सहा दिवस, नऊ दिवस या तीनाच्या पटीत होते. केळशीची यात्रा ही चैत्र शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा अशी आठ दिवस असते. आंजर्ले गावाची यात्रा चैत्र वद्य प्रतिपदा ते तृतीया, वेळासची चैत्र शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी आणि मुरूड गावाची चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी अशा प्रकारे या यात्रा पार पडतात. एकमेकांच्या उत्सवात सहभागी होता यावे असा उद्देश त्यामागे असावा. त्या सर्व यात्रांच्या शेवटच्या दिवशी भव्य अशी रथयात्रा निघते. मुख्य म्हणजे तेथे देवळात मूर्ती नाही. ती मुखवट्यातून उभी केली जाते.

अपूर्व उत्साहाच्या त्या उत्सवात छोटे दुकानदार प्रसादाची, फुग्या-खेळण्यांची, खाऊची दुकाने दुतर्फा थाटून बसतात. प्रसादाचा दरवळ, भजी-वड्यांचा खमंग वास, खेळण्यातील शिट्या-पिपाण्यांचा आवाज, ‘अंबेचा उदो उदो’ हा गजर, घंटांचे आवाज अशा चैतन्यदायी वातावरणातून भाविकांचा पाय निघत नाही. सर्व दृष्टीने काही ना काही देणारी ती चार देवींची यात्रा सर्वांना ओढ लावते.

चारही गावांत लोक एकी अभंग राखत आनंद लुटण्याची परिसीमा गाठतात. तसा आनंद सद्य काळात सामूहिक पातळीवर फारसा उरलेला दिसत नाही. उत्सवातील काही गोष्टी कालबाह्य ठरत असतील, परंतु सामूहिक कार्यातून मिळणारा दिलासा महत्त्वाचा आहे, ते त्या चार देवींच्या यात्रेत अनुभवता येते.

– विनायक नारायण बाळ 9423296082 vinayak.bal62@gmail.com

——————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here