मुंबईतील मैलाचे दगड

3
103
carasole

मुंबईचा इतिहास गाडला जातोय!

आपली मुंबई कशी घडली त्याची साक्ष देणारे मैलाचे ऐतिहासिक दगड आज मुंबई शहरात काही ठिकाणी वाटांच्या कडेला निपचित पडून आहेत. या शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार असणाऱ्या ब्रिटिशकालीन मैलांच्या तेरा उपलब्ध दगडांपैकी सात दगड यापूर्वीच अनास्थेचे बळी ठरले आहेत. उरलेले सहाही फार काळ तग धरतील अशा अवस्थेत नाहीत.

पाण्याने वेढलेली सात बेटे एकमेकांना जोडली आणि मुंबई नावाच्या महानगरीचा जन्म झाला. ती बेटे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी समुद्रात भर घातली, नवे रस्ते बांधले. त्या रस्तांचे अचूक मोजमाप करून जागोजागी मैलाचे दगड बसवण्यात आले. त्‍या मोजमापासाठी गोऱ्या सायबाने हॉर्निमन सर्कलजवळचे सेंट थॉमस चर्च हा आरंभबिंदू ‘शून्य मैल’ मानला आणि त्यापुढील प्रत्येक मैलाच्या दगडावर या चर्चपासून किती मैल अंतर ते नोंदवले.

पंचकोनी आकाराच्या बेसॉल्ट दगडांवरील या खुणांनी मुंबईची वाहतूकव्यवस्था उभारली. पुढे अंतर मोजण्याची पद्धत बदलली. मैलाचे संपून किलोमीटरचे मोजमाप आले. त्यामुळे आता फार उपयोगाचे नसले तरी या महानगरीचा इतिहास असणारे हे मैलाचे दगड दुर्लक्षित होऊन जमिनीच्या पोटात गाडले जात आहेत.

त्‍या मूळ मैलांच्या तेरा दगडांपैकी सात दगड रस्तारुंदीकरण, नव्या इमारती किंवा फूटपाथचे बांधकाम यामुळे कधीच उखडले गेले आहेत. त्यांचा कुठेच थांगपत्ता लागत नाही. जे शिल्लक आहेत त्यातील काही अर्धवट दिसतात, तर काही वाकलेले आहेत. त्यापैकी एकाच्या कडेला सार्वजनिक बाकडे बांधले आहे तर एकावर चक्क फळवाल्याने धंदा थाटला आहे!

ग्रेड वन हेरिटेज व्हॅल्यू असणारा हा ऐतिहासिक वारसा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि आपल्या अनास्थेमुळे अस्तंगत होत चालला आहे. एकाही दगडाजवळ त्याचे महत्त्व सांगणारा फलक नाही किंवा झाडाभोवती असते तशी त्याच्या जपणुकीसाठी साधी कुंपणासारखीही व्यवस्था नाही. हीच अवस्था राहिली तर हरवलेल्या सात दगडांप्रमाणे हे इतिहासाचे सहा साक्षीदारही काळाच्या उदरात गडप झाल्याखेरीज राहणार नाहीत.

1. मैलाचा पहिला दगड – मेट्रोकडून काळबादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूच्या फूटपाथवर एस. पी. जैन इन्स्टिट्यूट आहे. त्‍या इन्स्टिट्यूटच्या दाराजवळ जमिनीत अर्धवट रुतलेला पंचकोनी दगड दिसतो. तो मुंबईचा पहिला मैलाचा दगड. त्या‍वर रोमन लिपीमध्ये लिहिलेला ‘एक’ आकडा स्पष्ट दिसतो, पण त्याखालील ‘माइल’ ही इंग्रजी अक्षरे मात्र अर्धी जमिनीवर आणि अर्धी जमिनीखाली अशी दिसतात. अजून दोन-चार वेळा त्या फूटपाथचे काम निघाले तर तो दगड आणखी जमिनीत जाईल किंवा पूर्ण दिसेनासाही होईल.

2. तिसऱ्या मैलाचा दगड – ताडदेव येथील भाटिया हॉस्पिटलसमोर ‘कामत हॉटेल’जवळच्‍या फूटपाथवर मुंबईच्या तिसऱ्या मैलाचा दगड आढळतो. अगदी वाटेत असलेला तो मैलाचा दगड अर्ध्याहून अधिक जमिनीच्या आत गेला आहे. तो साधारणत: तीन-साडेतीन फूट उंचीचा असला तरी सध्या त्याचा एक-दीड फूट एवढाच भाग जमिनीवर उरला आहे. त्यावरील ‘माइल्स’ ही अक्षरे फूटपाथवरील दगडांवरून डोकावण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात.

3. तिसऱ्या मैलाचा (दुसरा) दगड – ऑगस्ट क्रांती मैदानाकडून केम्स कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, डाव्या बाजूच्या फूटपाथवर, सेंट्रल बँकेच्या एटीएमशेजारी एक फळवाला बसतो. तो फळवाला जेथे फळांचे करंडे मांडतो तेथील दगड साधासुधा नाही. तो मुंबईचा तिसऱ्या मैलाचा (दुसरा) दगड आहे. तो दगड पाहायचा असेल तर त्या फळवाल्याला बाजूला करावे लागते किंवा भल्या पहाटे तो फळवाला येण्याआधी तेथे पोचावे लागते. मैलाचे इतर दगड आणि या दगडात एक महत्त्वाचा फरक आहे. इतर दगडांवर रोमन लिपीत आकडे आढळतात, तर या दगडावर मात्र लॅटिन लिपीमधला ‘३’ हा आकडा दिसतो. तसेच इतर दगडांवर सेंट थॉमस चर्च असे लिहिले आहे, पण या दगडावर मात्र कॅथेड्रल असे लिहिलेले दिसते. सेंट थॉमस चर्चला कॅथेड्रलचा दर्जा जुलै १८३७ मध्ये मिळाला. म्हणजेच तो दगड त्या नंतरचा आहे.

4. चौथ्या मैलाचा दगड – ना. म. जोशी मार्ग (डिलाइल रोड) आणि सानेगुरुजी मार्ग (आर्थर रोड) एकमेकांना जेथे छेदतात, तेथून चिंचपोकळीचा पूल सुरू होण्याआधीच्या रस्त्यावर ब्लू बर्ड बेकरी दिसते. त्‍या बेकरीच्या समोर काही बाकडी आहेत. यातील एक बाकड्याच्या पाठी चौथ्या मैलाचा दगड विसावला आहे. त्यावरील ‘४ माइल्स फ्रॉम’ एवढीच अक्षरे स्पष्टपणे दिसतात. बाकीची अक्षरे फूटपाथच्या खाली गेली आहेत.

5. सहाव्या मैलाचा दगड – दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या चित्रा थिएटरसमोर पंजाब नॅशनल बँक आहे. बँकेच्या गेटसमोर फूटपाथच्या कडेला सहाव्या मैलाचा दगड कललेल्या अवस्थेत आढळतो. तो दगड अद्याप चांगल्या अवस्थेत आहे. त्यावरील ‘६ माइल्स फ्रॉम थॉमस चर्च’ ही अक्षरे स्पष्ट दिसतात. त्या दगडाचा पाया पक्का करण्याची गरज आहे. अन्यथा एक दिवस तो दगड रस्‍त्‍याच्या कामात आडवा पडेल आणि मूळ जागा गमावून बसेल.

6. आठव्या मैलाचा दगड – शीव किंवा सायन ही जुन्या मुंबईची सीमा. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या उजवीकडे सायन-पूर्व परिसरात ‘तामिळ संघम’ ही सुप्रसिद्ध संस्था आहे. तामिळ संघमच्या गल्लीमध्ये कर्नाटक बँक आहे. बँकेच्या पुढे काही अंतरावर मुंबईचा आठव्या मैलाचा दगड आहे. त्‍या परिसरात तुलनेने कमी वर्दळ असल्याने आणि ती जागा मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असल्याने तो दगड शोधण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. तो दगड सुस्थितीत असला तरी वाकलेला आहे. त्यावरील ‘८ माइल्स फ्रॉम सेंट थॉमस चर्च’ ही अक्षरे स्पष्ट दिसतात. मात्र कोणा हौशी माणसाने त्या दगडाला पिवळा ऑॅइलपेंट फासला आहे.

– नीलेश बने

About Post Author

Previous articleघोरपड
Next articleबहुजन सांस्कृतिकवादाकडे – जयंत पवार
नीलेश बने हे सध्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये ‘रिसर्च फेलो’ म्हणून काम करत आहेत. त्याआधी बारा वर्षांहून अधिक काळ त्यांनी मुद्रित आणि ऑनलाइन माध्यमांमधून पत्रकारिता केली. 'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम' या मराठीतील आघाडीच्या वेबसाइटच्या संपादकीय विभागाचे ते प्रमुख होते. ‘इंटरनेट माध्यमामुळे बदलत असणारा लोकसंवाद’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. वारकरी संताचे कार्य ही त्यांची प्रेरणा असून यासंदर्भात त्यांनी लेखनही केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9892745685

3 COMMENTS

  1. Very good information sir.
    Very good information sir. You focussed attention on important issue.Unfortunately no one pays attention to this heritage.Politicians are interested in changing names of old places & buildings only.Thank you.

  2. लाख मोलाचा मैलाचा मजकूर.
    लाख मोलाचा मैलाचा मजकूर.

  3. सुंदर, छान, अभ्यास आणि
    सुंदर, छान, अभ्यास आणि संशोधनपूर्ण

Comments are closed.