मुंबईचा अफलातून अनुभव!

1
36
carasole

सविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे! त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले आहे. असे असूनही त्या पुस्तकातील दादर परिसरातील स्थळांबद्दलची काही माहिती माझ्यासाठी नवीन होती. जसे वीर कोतवाल उद्यानाच्या जागेवर पूर्वी एक तलाव होता किंवा चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळची भगवान बुद्धांची मूर्ती ही थायलंडच्या भिक्खूंनी दिलेली आहे वगैरे. अरुण साधू यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, “सविताने या पुस्तकात नव्याने मुंबईत येणाऱ्यांना ‘मुंबईत नेमके काय पाहायचे, तेथे कसे पोचायचे’ हे माहितगार वाटाड्याप्रमाणे सांगताना, अस्सल मुंबईकरांचे देखील कुतूहल जागृत होईल अशी वर्णने केली आहेत.”

पुस्तकाची आखणी करताना सविताचा उद्देश हे पुस्तक सामान्य पर्यटकांसोबत अभ्यासकांनाही उपयोगी ठरावे असा होता. पुस्तक वाचल्यावर तो उद्देश पूर्ण झाला आहे हे पटते. मुंबईत राहणाऱ्यांपासून या शहरात येणाऱ्या नवख्यांपर्यंत सगळ्यांनाच ते पुस्तक मार्गदर्शन करते. सोबत रोचक भाषेत मुंबईची नवी माहितीही पुरवते.

शिवकालीन किल्ल्यांवर मनमुराद भटकंती करणाऱ्यांना मुंबईतील सायन, धारावी येथील किल्ल्यांची माहिती नसते. मुंबईला ‘देशाची आर्थिक राजधानी’ अशी बिरुदावली लाभली, त्यात तेथील सक्षम आर्थिक संस्थांप्रमाणेच तेथील मार्केटचा मोठा वाटा आहे. क्रॉफर्ड मार्केट, भेंडीबाजाराजवळची दीड गल्ली, चोर गल्ली, खरेदी व खाद्य यात्रा यांनी गजबजलेला महम्मद अली रोड, भायखळ्याची भाजीमंडई, ‘लग्न करावे पुण्यात आणि खरेदी करावी मुंबईत’ याची प्रचिती देणारी दादर पूर्वेकडील बस्ता लेन, स्वस्त व मस्त शॉपिंगची संधी देणारा लिंकिंग रोड अशा सर्व महत्त्वाच्या बाजारांची माहिती सविताने पुस्तकात नोंदवली आहे. पर्यटनस्थळांमध्ये संग्रहालयांचे वेगळे महत्त्व असते. मुंबईत बरीच संग्रहालये आहेत. त्यातील निवडक संग्रहालयांची माहिती त्या पुस्तकात सापडते.

मुंबईत आरबीआयचे मुद्रासंग्रहालय आहे. तेथे पैशांच्या उत्क्रांतीत वस्तुविनिमयापासून ऑनलाईन व्यवहारापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. उच्च न्यायालयाच्या ‘न्यायिक संग्रहालयात’ दुर्मिळ कागदपत्रांचे दर्शन घडते. भारतातील विविध संस्कृतींबरोबर चिनी, जपानी, आखाती, युरोपीयन अशा जगभरातील संस्कृतींचे सहजदर्शन ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ अर्थात आजच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त घडते. पशू, पक्षी, वनस्पती यांच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरावे असे ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री’चे संग्रहालय आहे. पेडर रोडला भारतीय चित्रपट संग्रहालय आहे. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा आधार असलेल्या रेल्वे आणि बेस्ट बसच्या स्थापनेपासूनची माहिती देणारी स्वतंत्र संग्रहालये शहरात आहेत. न्यायवैद्यक शास्त्रातून निर्माण झालेले नायर फोरेन्सिक म्युझियम, भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या दोन विश्वचषकांची स्मृती जपणारे अंधेरीची विश्वचषक क्रिकेट गॅलरी, मुंबईचा प्रवास उलगडून सांगणारे भाऊ दाजी लाड म्युझियम, मुंबईच्या सागरी सामर्थ्याची ओळख करून देणारे नौदलाचे संग्रहालय, मत्स्यविविधतेने नटलेले तारापोरवाला मत्स्यालय आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्मृती जागवणारे संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन अशा मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या संग्रहालयांची माहिती वाचताना ते पुस्तक ‘संग्रही’ असायलाच हवे असे वाटते.

मुंबादेवी, काळबादेवी, महालक्ष्मी, शितळादेवी, जोगेश्वरी ही नावे सामान्य मुंबईकराच्या परिचयाची आहेत. परंतु महालक्ष्मीच्या जवळच असलेले धाकलेश्वर मंदिर किंवा वरळी कोळीवाड्यातील बाराव्या शतकातील गोल्फादेवी मंदिर ही नावे माहितीची नसतात. सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या मुंबईत चायनीज टेम्पल, जपानी बौद्ध मंदिर, अफगाण चर्च, पोर्तुगीज चर्च अशी वेगवेगळ्या देशांतील लोकांची श्रद्धास्थाने आहेत. त्या महानगरीच्या जडणघडणीवर पारशी मंडळींचा मोठा प्रभाव आहे. लेखिकेने त्याची दखल पुस्तकात घेतली आहे. दादरची पारशी कॉलनी, पारशी अग्यारी, पारशी म्युझियम, पारशी विहीर या ठिकाणांची माहिती जुने संदर्भ गोळा करत नेमकी टिपली आहे. मुंबईच्या व्यापारउदिमातील मुस्लिमांचा सहभाग मतपेटीच्या पलीकडचा आहे. भरसमुद्रात तग धरून असलेला हाजीअली दर्गा, उत्सवात पोलिसांना मानाचे स्थान देणारा माहिमचा मखदूमशाहबाबांचा दर्गा या मस्लीम धार्मिक स्थळांचा इतिहास आणि महत्त्व पुस्तकात नोंदवले आहे. त्याचप्रमाणे ख्रिश्चन चर्चेसची महत्त्वपूर्ण चर्चा आहे. त्यात तीनशे वर्षांचा इतिहास असलेले माउंट मेरी चर्च, सर्वात जुने कॅथलिक सेंट मायकेल चर्च यांचा समावेश आहे.

पुस्तकातील प्रत्येक लेख ‘उल्लेखनीय’ आहे. मुंबई विद्यापीठ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सामाजिक-राजकीय अभ्यासकांना उपयोगी पडावे असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ग्रंथालय अशी ज्ञानदानाची ठिकाणे मुंबई शहरात आहेत. राज्याची प्रमुख सत्ताकेंद्रे – मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला, राजभवन, मंत्रालय, नवे विधानभवन यांचा तपशील योग्य आकडेवारीसह आहे. एन.सी.पी.ए., शिवाजी मंदिर, जहांगीर आर्ट गॅलरी असे सांस्कृतिक अड्डे त्यात आहेत. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याने नवे ग्लोबल टेरर स्पॉट निर्माण केले. त्यातील लिओपोल्ड कॅफे, छाबड हाऊस यांचा इतिहास पुस्तकात मोजक्या शब्दांत मांडला आहे.

‘अफलातून मुंबई’ या पुस्तकात काय काय आहे याची स्वतंत्र यादी पुस्‍तकात असणे आवश्‍यक होते. त्‍याची कमतरता भासते. अशा संदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पुस्तकात कोणत्या व्यक्तीसंस्थांचा उल्लेख किती पानांवर आहे याची एक संदर्भसूची असते. ती पुस्तकात नाही. तसेच, प्रत्येक छायाचित्रावर छायाचित्रकाराचा उल्लेख असायला हवा होता.

सविता अमर ९९६९३८७६१४
savita.amar@gmail.com

– रमेश दिघे

Updated On – 05 Mar 2016

 

About Post Author

1 COMMENT

  1. अफलातून मुंबई खूप वेधक पुस्तक
    अफलातून मुंबई खूप वेधक पुस्तक असावं. वाचक या पुस्तकाचा आपली मुंबई जाणून घेण्यासाठी नक्की वापर करतील.अभिनंदन.

Comments are closed.