मीरा कुलकर्णी झाल्या आसामच्या मीराबायदेव! (Meera Kulkarni Turned To Meera Baydev)

मीरा कुलकर्णी

मीराबायदेव नावाच्या मूळ मराठी महिला कार्यकर्त्या आसाममधील चहाच्या मळ्यांच्या प्रदेशात लोकप्रिय आहेत. त्या तेथील कामगारांच्या कुटुंबीयांचे जीवनमान सुधारावे, त्यांना चांगल्या सवयी लागाव्या, त्यांचे शिक्षणाने भले व्हावे यासाठी कळकळीने प्रचार करत असतात. मीराबायदेव म्हणजे मूळ मीरा कुलकर्णी (आसामी भाषेत मोठ्या बहिणीला बायदेव म्हणतात). त्या विवेकानंद केंद्राच्या आसाम प्रांत संघटक आहेत. त्या ‘आनंदालय’ नावाचा चहामळ्यातील कामगारांसाठीखास करून त्यांच्या मुलांसाठी उपक्रम चालवत आहेत. त्यांना केंद्रात सामील होऊन मार्च 2020 मध्ये तेवीस वर्षे झाली. त्यांनी स्थानिक भाषा आपलीशी केली आहे. त्या महाराष्ट्रातून आल्या आणि आसामशी एकरूप होऊन गेल्या. माझा देश – माझी माती’ हा त्यांचा विश्वास आहे. त्या मुलांबरोबर दोस्ती करण्यात पटाईत आहेत, त्यांनी मुलांबरोबर त्यांच्या घरी जाणेभारतीय संस्कृतीचा आसामी अवतार पाहणे आणि मराठी आविष्काराबरोबर त्याची तुलना करत समजावून घेणे, भाषा शिकणे या सर्व गोष्टी झपाटल्यासारख्या आत्मसात केल्या. त्या आधारे त्यांचे जीवन समृद्ध होऊन गेले आहे. त्यांनी तरुणपणी जे समाजस्वप्न पाहिले होते ते त्यांना आसामात गवसले आहे!

आनंदालयातील मुले

इंग्रजांनी आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये वेगवेगळ्या जाती-जमातींचे कामगार एकत्र आणले. ही दोन शतकांपूर्वीची गोष्ट. त्यांना तेथे कधी न्याय्य वागणूक मिळालीच नाही. स्वातंत्र्य मिळाले तरी सरकारी योजनांचा फायदा मिळत नव्हता. मीरा यांची विवेकानंद केंद्राच्याकार्यकर्ता म्हणून नियुक्ती दिब्रुगडला झाली तेव्हा त्यांना त्या लोकांचे जीवन जवळून बघण्यास मिळाले. त्या हादरून गेल्या. विशेषत: कामगारांच्या मुलांची शिक्षणाची परवड बघून त्यांच्यासाठी काही करावे हा त्यांचा मानस नक्की झाला. त्यातून दोन तासांच्या आनंदालयला सुरुवात झाली. पहिला तास शाळेत दिलेले होमवर्क पूर्ण करण्याकरता आणि दुसरा तास सामुहिक खेळगीता पठणश्लोकदेशभक्तीपर गाणी यांमधून जीवनानंद निर्माण करण्यास ते उपक्रम म्हणजे कामगार कुटुंबीयांसाठी मोठाच विरंगुळा झाला. त्याबरोबर त्यामधील बोधाने त्यांचे जीवन उजळून जाई. बघता बघताआनंदालय’ ही कामगार वस्त्यांमध्ये चळवळ होऊन गेली. मोठीशाळा सोडलेली मुले त्यांच्या भावंडांसाठी तो उपक्रम घेऊ लागली. पुढे, दोन तासांची मर्यादा संपली. विवेकानंद केंद्र कामगारांच्या घरा-घरांतून पोचले. त्यामुळे ज्यांना Tea Tribe म्हणून दुर्लक्षित केले जात होते त्यांच्यात आमूलाग्र बदल घडू लागला. आनंदालयाची कल्पना लोकप्रिय झाली. चहाच्या वेगवेगळ्या मळ्यांमधून आमच्याकडे पण आनंदालय सुरू करा’ अशी मागणी सुरू झाली. दिब्रुगडच्या चहाच्या मळ्यांमध्ये 2003 साली सुरू झालेले ते काम सात जिल्ह्यांत एकशेत्र्याहत्तर जागी पोचले आहे.

     

गांधी जयंती

आनंदालय’ हा मीरा कुलकर्णी यांच्या आसाममधील कामातील महत्त्वाचा उपक्रम, पण त्यांचे कार्य त्याहून बरेच मोठे आणि व्यापक आहे. मीरा मूळ जळगावच्या. त्या केंद्रात 1997 साली आल्या. तेव्हा त्यांचे वय होते तेवीस वर्षे. त्यांनी एम. कॉमपर्यंत शिक्षण घेतले होते, जळगाव जनता बँकेत एक महिना काम केले होते. पण त्यांचे मन बँकेच्या कामात रमेना. त्यांची आई शिक्षक व वडील सरकारी नोकरीत होते. त्या दोघांकडून मीरा यांना समाजसेवेचा वारसा मिळाला. त्यांनी एका वर्षी विवेकानंद केंद्राच्या शिबिरात हजेरी लावली आणि त्या केंद्रात जीवनव्रती म्हणून रुजू झाल्या! त्या वेळचे त्यांच्या डोक्यातील खूळ म्हणजे संसारात रमून वयाच्या साठाव्या वर्षी पश्चात्तापाची वेळ नको यायला! कुलकर्ण्यांच्या घरात त्या दोघी बहिणीच. मीरा त्यांची नियुक्ती आसामात झाल्यावर सुरुवातीला, 1997 साली गोलाघाटलामग जोरहाट 2001, दिब्रुगड 2003 अशी आसाममधील शहरे करत करत गुवाहाटीला 2008 साली पोचल्या. त्यांच्यात कामाचा झपाटा होतात्यांना सामाजिक जाणीव पक्की होती आणि त्या पलीकडे होती ती त्यांची समर्पण भावना. त्या विवेकानंद केंद्राच्या कार्यात फिट्ट’ बसल्यात्यांच्याकडे आसामच्या संघटक म्हणून 2006 पासून जबाबदारी आहे. त्यांना स्वामी विवेकानंद’ सगळ्या आसाममध्ये कसे पोचतील हीच चिंता आहे. त्यांनी जोरहाटदिब्रुगड आणि नंतर गुवाहाटी येथे पोस्टिंग असताना संस्कार वर्गयोग वर्गस्वाध्याय वर्ग सक्षमपणे हाताळले.

सामाजिक कार्यात रोजचा दिवस काहीना काही नवा अनुभव पदरी पाडत असतो; नव्याने काही शिकवून जातो. कार्यकर्त्याने लोकांशी संवाद साधताना त्याचा अभ्यास वाढवत न्यायचा असतो. कार्यकर्त्याला स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे असतात किंवा त्याला घरातील इतर कामे असतात. मीरा म्हणतातपण तेच तर चॅलेंज आहे आणि केंद्रात वरिष्ठ कार्यकर्ते असल्यामुळे सतत मोठ्या कुटुंबासारखे (Extended Family) कोणी ना कोणी मार्गदर्शन करण्यास असतेच, भावनिक आधारही मिळतो. शिवायजीवनव्रती स्वाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, कार्यकर्त्यांच्या बैठका यांतून घडवत नेण्याची केंद्राची व्यवस्था आहेच”.
 

मीरा कुलकर्णी यांनी आसाममध्ये जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यातून प्रवास केला आहे. त्यांचा स्थानिक लोकांशी घट्ट संपर्क आहे आणि त्यात भर पडली आहे आनंदालयला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाची. त्यामुळे, दीदी महाराष्ट्रातील आहेत’ हे त्यांच्याबाबतचे आरंभीचे विधान जाऊन आता ‘मीराबायदेव’ अशा नामाभिधानातून त्यांची त्या आसामच्या’ अशी स्वीकृती त्यांना मिळाली आहे. मीरा सांगतात, “येथील लोकंच मुळी आपलेसे करणारे आहेत. त्यांना विरोध दर्शवायचा असेल तर तोदेखील ते इतक्या अलगदपणे मांडतात!
 

आसामी भाषेसाठी मीरा कुलकर्णी यांच्या हातून अत्यंत महत्त्वाचे कार्य घडले आहे. त्यांनी ‘समग्र स्वामी विवेकानंद’ (मूळ: Complete Works of Swami Vivekananda) आसामी भाषेत आणला आहे.  तो अनुवाद आसामी भाषेत झालेला नव्हता. ते काम मीरा कुलकर्णी यांनी केले. त्याकरता मीरा ग्रांथिक आसामी भाषा शिकल्या. मीरा सांगतात, “आमची भाषांतरकर्त्यांची टीम मोठी होतीसर्वात महत्त्वाचा हातभार लागला तो डॉक्टर महेश्वर हझारिका यांचा.” ते कार्य पूर्ण 2018 साली झाले. ती आसामी साहित्यात मोलाची भर ठरली.

महिलांसाठी खटखटीचे व्यावसायिक प्रशिक्षण

मीरा यांची अनंत कामे सतत चालू असतात. विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या शाळांसाठी बैठकागुवाहाटीच्या विवेकानंद केंद्र इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरसाठी धावपळकेंद्राचे अनेक ठिकाणी प्रकल्पांतर्गत बांधकाम, तेथे मधूनच चक्कर मारणे, खटखटी येथील महिलांसाठीच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील महिलांचे निरंतर प्रशिक्षण आणि अर्थातच वाढत्या आनंदालयांची मागणी … विवेकानंद केंद्राच्या पन्नास वर्षे पूर्तीच्या, 2022 सालापर्यंत आसामच्या सगळ्या तीनशेदहा कॉलेजांमधून काम विस्तारत नेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. संस्थांमधून संपर्क होऊन काहीना काही उपक्रम युवकांकरता घेणे सुरू झाले आहे.


मीरा बायदेव सांगतात, ईशान्यभारताच्या सगळ्या राज्यांमधून महिलांना रात्री-अपरात्रीही सुरक्षित प्रवास करता येतो. त्यामुळे प्रत्येक भारतीय, विशेषत: मराठी तरुणीने ईशान्य भारतात किमान दोन वर्षे घालवली पाहिजेत – सेवा म्हणून, नोकरी म्हणून-कशीही.

आसामच्या एकूण स्थितीविषयी मीराबायदेव सांगतात, आसामी तरुणांचे स्थलांतर देशातील अनेक राज्यांमधून होत आहे, तरी आसाममध्ये त्याचे परिणाम फार भयानक रीत्या समोर येऊ लागले आहेत. “शिकण्यास किंवा कामाला राज्याबाहेर गेलेली युवा पिढी तेथेच राहणे पसंत करतेजेमतेम वीस टक्के लोक परत येतात. लोकसंख्येचा पोतच बदलत आहे.

मीरा कुलकर्णी 94353 94151 meera@vkendra.org

 – निवेदिता खांडेकर

nivedita_him@rediffmail.com

निवेदिता खांडेकर या दिल्लीत मुक्त पत्रकार म्हणून काम करतात. पर्यावरण आणि विकास हे त्यांचे आवडते विषय. त्यांबाबतचे लेखन त्या अधिक करतात. त्या ईशान्य भारतातखास करून आसाम आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी वार्तांकनासाठी वारंवार जात असतात. 

(‘ईशान्य वार्ता‘वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

———————————————————————————————-

About Post Author

7 COMMENTS

  1. खूपच खडतर परिस्थितीत निडरपणे काम करणाऱ्या मीरा आणि तिच्या सारख्या शूर कार्यकर्त्यांना अनेक अनेक धन्यवाद 🙏🙏

  2. मीरा ताई चे योगदान अफाट आहे. त्यांचे काम खूप सुंदर आहे. तुम्ही हे सर्वन पर्यंत पोहचवले. खूप खूप आभार

  3. मीरा ताईंना शतश: प्रणाम !! त्यांचे हे अनमोल कार्य आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार.

  4. खूपच प्रेरणादायी प्रवास आहे. माझं भाग्यच की मी एक वर्षभर गोलाघाट येथे मीराबायदेव बरोबर होते. …। अपर्णा लळिंगकर, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here