मिरासी हक्क

2
138
carasole

मिरास म्हणजे वारसा. मिरास हा अरबी शब्द आहे. त्यावरून मिरासी हा शब्द बनला असावा. मिरासी हे लोक मुसलमान असून, त्यांची वस्ती प्राधान्याने पंजाब व राजस्थान या प्रदेशांत आहे. मिरासी लोक मुळचे हिंदू असावेत. मिरासी लोक वंशपरंपरेने निरनिराळ्या जातींची भाटगिरी करत आले आहेत.

ज्या कुळाचे भाट म्हणून हे लोक काम करतात, त्या कुळांची सर्व माहिती लक्षात ठेवून ती हवी तेव्हा सांगणे, वारसासंबंधी शंकाचे निरसन करणे, यजमानाकडे आलेल्या पाहुण्यांचे आगत-स्वागत व व्यवस्था करणे, शेतकरी कुटुंबात घरकाम करणे, लग्नातील मेजवानीची तयारी करणे, लग्नाची निमंत्रणे पोचवणे इत्यादी कामे त्यांना करावी लागतात. त्याबद्दल त्यांना द्रव्य, धान्य, वस्त्र या रूपाने बक्षिसी मिळते. विशेष प्रसंगी त्यांनी गाय किंवा म्हैस मागितली तरी ती दिली जाते. आता ते लोक शेती किंवा अन्य व्यवसाय करू लागले आहेत. काही जण शिकून नोकरी करतात.

मिरासी लोकांच्या अनेक पोटजाती आहेत. ज्या लोकांचे ते भाट असतात, त्यांच्या दर्ज्यावरून संबंधित मिरासींचा दर्जा ठरतो. रइ व कुमाची मिरासी – हे शिकलेले असून ते जाट, सैयद व हिंदू लोकांचे भाट असतात; राणा मिरासी – राजपूत व सैय्यद यांचे भाट. मीर मिरासी – धनिकांचे भाट. कलावंत मिरासी – संगीतकलेचे जाणकार. कव्वाल – कुरैशी जातीचे भाट. खरिआल – कुंभाराचे मिरासी. वाद्य वाजवून भीक मागणारे, कनिष्ठ दर्जा मीरमलंग –मिरासींचे मिरासी. नकारची – नगारा वाजवणारे. रबाबी –रबाब वाजवणारे, ते शीख आहेत. कलनोत- हे सर्वांकडे भीक मागतात. त्यांचा पूर्वज तानसेनाचा वंशज नानक बक्ष हा होता. सरदोई – पठाणांचे मिरासी. त्याशिवाय लच्छ, लंगा, लोरी, पोस्ला, चारण इत्यादी आणखी काही पोटभेदही आहेत.

ते लोक मुसलमान असूनही दुर्गा भवानीला भजतात. त्या व्यतिरिक्त ते सखि सरवर, पीर मुर्तजा, गुग्गा पीर, पीर हिदायत अली शाह, शाह मस्सावली, शाह बहावल हक्क, गौर अझम जिलानी यांनाही भजतात. ते लोक अमीर खुस्रू व हजरत दाऊद यांनाही पीर मानतात. त्यांच्यातील एक पोटजात नागपूजक आहे.

त्यांच्या स्त्रिया सरदार दरकदारांच्या जनानखान्यांतील स्त्रियांपुढे नाचगाणी करून पोटापुरते मिळवतात. ते लोक त्यांच्या गाण्याला साथ म्हणून ढोलक, मंजीरी, किंगरी इत्यादी वाद्ये वाजवतात. महाराष्ट्रात ते लोक भिक्षा मागताना आढळतात.

(संस्कृती कोशातील माहितीवर आधारित)

2 COMMENTS

Comments are closed.